उष्ण वातावरणात काम केल्याने वाढतो गर्भपात किंवा मृत अर्भकाच्या जन्माचा धोका

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ट्युलिप मुझुमदार
- Role, जागतिक आरोग्य प्रतिनिधी
प्रचंड उष्ण वातावरणात काम केल्यामुळं गर्भपात आणि गर्भातच अर्भकाचा मृत्यू होण्याचा धोका दुपटीनं वाढतो. भारतात झालेल्या एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
आधी वाटलं होतं त्या तुलनेत यामुळं गर्भवतींना होणारा धोका खूप जास्त असल्याचं या संशोधनात आढळून आलं आहे.
संशोधकांच्या मते, कडाक्याच्या उन्हाळ्याचा फटका हा केवळ उष्ण कटिबंधातील महिलांनाच बसतो असं नाही, तर युके सारख्या देशांमध्येही हा धोका आहे.
त्यामुळं जागतिक स्तरावर काम करणाऱ्या गर्भवती महिलांसाठी विशिष्ट आरोग्यविषयक सल्ला किंवा शिफारसी असाव्यात असं त्यांचं मत आहे.
या संशोधनात दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील 800 गर्भवती महिलांनी सहभाग घेतला. चेन्नईतील श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेनं 2017 मध्ये याची सुरुवात केली होती.
या संशोधनात सहभागी होणाऱ्यांपैकी सुमारे अर्ध्या महिला या प्रचंड उकाड्याचा किंवा गर्मीचा सामना करावा लागणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या होत्या.
त्यात शेतीकाम, वीट भट्ट्या किंवा मीठागरात काम करणाऱ्यांचा समावेश होता. इतर महिला तुलनेनं थंड वातावरणात म्हणजे शाळा, रुग्णालयं इथं काम करणाऱ्या होत्या. काहींना तर कामाच्या ठिकाणी खूपच प्रचंड गर्मीचा सामना करावा लागत होता.
मानवी शरिरासाठी किती उष्णता ही खूप जास्त समजली जावी यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा किंवा पातळी ठरवण्यात आलेली नाही.
"तुमच्या सवयी कशा आहेत किंवा तुमच्या शरिराला कशा सवयी आहेत, यावर उष्णतेचा शरिरावर होणारा प्रभाव अवलंबून असतो," असं मत या संशोधनात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांपैकी एक जेन हिर्स्ट यांनी व्यक्त केलं.
तिरुवन्नमलाईतील हिरव्या गार शेतांमध्ये आमची भेट सुमती यांच्याशी झाली. त्याही संशोधनात सहभागी झालेल्या गर्भवती महिलांपैकी एक होत्या.
त्यांनी हातातील मोजे काढले आणि बोटां ताणू लागल्या. दोन तासांपासून त्या काकड्या तोडण्याचं काम करत होत्या.
"या उन्हात माझे हात भाजतात," असं हातची बोटं हळुवारपणे दाबत त्या सांगू लागल्या.
अजून उन्हाळा पूर्णपणे सुरूही झालेला नाही, तरी आजच इथं पारा 30 अंशावर गेला आहे. त्यामुळं प्रचंड उकाडा आणि दमटपणा जाणवत आहे.

सुमती यांना काकड्यांच्या लहान लहान काट्यांपासून हातांचं संरक्षण करण्यासाठी हातमोजे वापरावे लागतात. पण त्यामुळं त्यांच्या हाताला प्रचंड घाम येतो.
"माझा चेहराही भाजला जातो," असंही त्यांनी सांगितलं.
त्या त्यांच्या मुख्य कामाच्या आधी आणि नंतर या काकडीच्या शेतात काम करण्यासाठी येतात. त्या शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करतात. त्या मोबदल्यात त्यांना एका दिवसाला 200 रुपये एवढाच मोबदला किंवा वेतन मिळतं.
या संशोधनात सहभागी होणाऱ्या सुरुवातीच्या काही महिलांपैकी सुमती एक होत्या.
तसंच संशोधनात सुरुवातीला मृत्यू झालेल्या काही अर्भकांमध्ये त्यांच्या अर्भकाचा समावेश होता.
"गर्भवती असताना अशा कडक उन्हामध्ये काम करताना मला प्रचंड थकवा जाणवत असायचा," असं सुमती म्हणाल्या.
एके दिवशी सुमती पतीसाठी जेवण घेऊन जात असताना त्यांना अचानक तब्येत खराब झाल्याचं जाणवू लागलं. त्या सायंकाळी डॉक्टरकडं गेल्या. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचा गर्भपात झाल्याचं सांगितलं. तेव्हा त्या 12 आठवड्यांच्या गर्भवती होत्या.
"माझे पती मला आधार देण्याचा प्रयत्न करत होते. ते नसते तर मी काय केलं असतं मला माहिती नाही," असं त्या म्हणाल्या.
सुमती त्यांच्या पतीबाबत खूप प्रेमान बोलतात. पण आता त्यांना पतीशिवाय एकटं राहणं शिकावं लागत आहेत. नुकतंच त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यामुळं आता कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्याची सर्व जबाबदारी सुमती यांच्याच खांद्यावर आली आहे.
सुमती यांनी पहिल्या गर्भधारणेत जे बाळ गमावलं त्यामागं कडाक्याच्या उन्हात काम करण्याचं कारण असू शकतं, हे कदाचित त्यांना कधीही कळू शकणार नाही.
पण सर्वसाधारणपणे अभ्यासातून हे आढळून आलं की, सुमती यांच्यासारख्या वातावरणात काम करणाऱ्या महिलांमध्ये तुलनेनं अधिक थंड वातावरणात काम करणाऱ्या महिलांपेक्षा गर्भपात किंवा गर्भातच अर्भकाचा मृत्यू होण्याची शक्यता ही जवळपास दुपटीनं अधिक असते.
जगभरातील महिलांसाठी महत्त्वाचे
भारतात या संशोधनात सहभागी असलेल्या महिला या प्रत्यभात हवामान बदलाचा अनुनभव घेणाऱ्यांमध्ये आघाडीवर होत्या, असं मत द जॉर्ज इन्स्टिट्यूट या वैद्यकीय संशोधन संस्थेतील ग्लोबल वुमन्स हेल्थच्या प्राध्यापक आणि प्रसुती तज्ज्ञ जेन हिर्स्ट यांनी व्यक्त केलं.
पूर्व औद्योगिक काळाच्या तुलनेत या शतकाच्या अखेरीस पृथ्वीचं सरासरी तापमान हे जवळपास तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. हा आपल्या सर्वांसाठीच धोका असून त्याचे गंभीर परिणाम असू शकतात असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.
यापूर्वीच्या संशोधनांवरून समोर आलेल्या माहितनुसार, उष्णतेच्या लाटेदरम्यान मुदपूर्व प्रसुती आणि गर्भात अर्भकाचा मृत्यू होण्याचा धोका जवळपास 15% नं वाढतो. पण साधारणपणे ही संशोधनं उच्च उत्पन्न असलेल्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये करण्यात आलेली आहेत.
प्राध्यपक हिर्स्ट यांच्या मते, भारतात आढळलेल्या नवीन निष्कर्षांचा विचार करता ही बाब अधिक गंभीर, चिंताजनक आणि व्यापक परिणाम असलेली आहे.
"युकेमध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे. पण तरीही भारताएवढी उष्णता तिथं नाही. तरीही युकेसारख्या तुलनेनं कमी उष्ण असलेल्या देशांमध्येही गर्भधारणेवर याचे दुष्परिणाम आढळून येत आहेत."
तरीही त्यांचा विचार करणं गरजेचं असल्याचं त्या सांगतात. धोका दुपटीनं वाढत असला तरी, बाळ गमावणं ही कोणत्याही महिलेसाठी अत्यंत दुःखद आणि दुर्मिळ बाब असते, असं त्या म्हणाल्या.
काम करणाऱ्या गर्भवती महिलांनी उष्ण भागात काम करताना काय करावं, याबाबतच्या काहीही आंतरराष्ट्रीय सूचना किंवा दिशाननिर्देश सध्या तरी उपलब्ध नाहीत.
उष्ण हवामानामध्ये काम करण्यासंबंधी फक्त एक मार्गदर्शन उपलब्ध आहे. तेही 1960-70 च्या दशकात अमेरिकेच्या लष्करातील पुरुषांवर करण्यात आलेल्या संशोधनावर आधारित आहे. सरासरी 70-75 किलो वजन आणि 20% बॉडी फॅट असलेले हे पुरुष होते.

नवीन अभ्यास आणि आणखी संशोधनाच्या माध्यमातून यात बदल होण्याची आशा हिर्स्ट यांनी व्यक्त केली. त्यांनी उष्णतेमध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिलांनी स्वतःचं संरक्षण कसं करावं यासाठी खालील उपाय सुचवले आहेत :
- दीर्घकाळ उन्हात राहून काम करणे टाळावे.
- उकाड्यात बाहेर काम करत असताना ठरावीक वेळाने सावलीत विश्रांती घ्यावी.
- दिवसातील सर्वांत उष्ण काळात दीर्घकाळ व्यायाम किंवा सनबाथ घेणं टाळावं.
- शरिरात पाण्याचं संतुलन राखावं.
भारतात अभ्यासासाठी संशोधकांनी वेट-बल्ब-ग्लोब-टेम्परेचर (WBGT)चा वापर केला. त्याच्या मदतीनं तापमान, आर्द्रता, हवेचा वेग आणि उकाड्याचा मानवी शरिरावर होणारा परिमाण मोजता येतो.
WBGT च्या नोंदी या शक्यतो टीव्ही किंवा हवामानाची माहिती देणाऱ्या अॅपवरील नोंदींपेक्षा कमी असतात.
यूएल ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते अवजड काम करणाऱ्यांसाठी सुरक्षित तापमानाची पातळी 27.5C WBGT एवढी आहे.
'उन्हात काम करण्याशिवाय पर्याय नाही'
केम्ब्रिज विद्यापीठाच्या एका नव्या अभ्यासानुसार, सावलीत आराम करणाऱ्या निरोगी लोकांसाठी सुरक्षित पातळीपेक्षा अधिक तापमान असणारा भारत हा जगातील पहिला देश ठरू शकतो.
भारतात 2050 पर्यंत उष्ण दिवस आणि उष्ण रात्री (जेव्हा शरिर दिवसाच्या उष्णतेपासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करत असतं) यांचा आकडा दुप्पट किंवा चौपट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नर्स असलेल्या SRIHER अभ्यासाच्या प्रमुख रेखा षण्मुगम या तिरुवन्नमलाईच्या ऊसाच्या शेतांमध्ये दिवसाच्या वेळी असलेलं उष्णतेचं प्रमाण मोजत आहेत.
आमच्या आस-पास काही कर्मचारी लहान-लहान विळ्यांनी ऊस कापण्याचं काम करत आहेत. त्यात जवळपास अर्धी संख्या महिलांची आहे.
"या महिलांकडे उन्हामध्ये काम करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण त्यांना पैशांची गरज असते," असं षण्मुगम म्हणाल्या.
त्यांनी गॉज पाण्यात टाकला आणि काही बटन दाबले. त्यावर 29.5C WBGT एवढं तापमान दाखवलं. अशा प्रकारचं शारीरिक शक्तीचं काम करण्यासाठी असलेल्या तापमान मर्यादेपेक्षा हे तापमान अधिक आहे.
"कर्मचारी एवढ्या उन्हामध्ये दीर्घकाळ राहिले, तर त्यांना उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका अधिक असतो. विशेषतः गर्भवती महिलांसाठी हे अधिक चिंताजनक ठरतं," असंही त्यांनी सांगितलं.
28 वर्षीय संध्या म्हणाल्या की, त्यांच्याकडं अशाप्रकारचं कठिण काम करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. त्यासाठी त्यांना रोज अंदाजे 600 रुपये मिळतात.
त्यांना दोन लहान मुलं आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो.
संध्या यादेखील या अभ्यासात सहभागी झाल्या होत्या. गर्भधारणेच्या सहा महिन्यांतच त्यांनी पहिलं बाळ गमावलं होतं.
पूर्णपणे बरं होण्यासाठी त्यांना अनेक महिने कामावरून सुटी घ्यावी लागली होती. त्यावेळी घेतलेलं कर्ज अजूनही फेडत असल्याचं त्यांनी सांगितलं.
"माझं लक्ष्य आता पूर्णपणे मुलांवर केंद्रीत आहे. त्यांनी भरपूर शिकून चांगली नोकरी मिळवावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी माझ्यासारखं असं शेतात काम करता कामा नये," असं संध्या आमच्याशी बोलताना म्हणाल्या.
लघुशंकेची समस्या

उष्णतेचा गर्भवती महिलांवर आणि त्यांच्या गर्भातील बाळावर कसा आणि का परिणाम होतो? हे नीटपणे समजून घेण्यात आलेलंच नाही.
गाम्बियामध्ये झालेल्या यापूर्वीच्या संशोधनात असं आढळून आलं की, उच्च तापमानामुळं भ्रुणाच्या हृदयाचा वेग वाढू शकतो. तसंच गर्भनाळेच्या माध्यमातून रक्ताच्या प्रवाहाचा वेग कमी होऊ शकतो.
एक सिद्धांत असंही सांगतो की, आईच्या शरिराची उष्णता वाढते तेव्हा, रक्त आईचं शरीर थंड करण्यासाठी वापरलं जातं त्यामुळं भ्रूणाला पुरेसं रक्त मिळत नाही.
षण्मुगम यांच्या मते, शौचालयांचा अभाव याचीही यात महत्त्वाची भूमिका आहे.
अनेक महिलांना खुल्या जागेत लघुशंका करणं आवडत नाही. त्यामुळं त्या पुरेसं पाणी पिणं टाळतात. त्याचा परिणाम म्हणजे त्यांना लघवीशी संबंधित समस्या होऊ लागतात.
"झाडाझुडपांमध्ये कीडे किंवा साप असण्याची त्यांना भिती असते. तसंच पुरुष पाहतील या चिंतेनंही महिला हे टाळतात," असंही त्यांनी म्हटलं.
"महिलांना शक्यतो उघड्यावर लघुशंका करणं, सुरक्षित वाटत नाही. त्यामुळं त्या दिवसभर लघवी रोखून धरतात आणि घरी गेल्यानंतर शौचालयात जातात."
पर्याय शोधणे
तमिळनाडूमध्ये या निष्कर्षांची गांभीर्यानं दखल घेतली जात असल्याचं, राज्याचे आरोग्य संचालक डॉ. टीएस सेल्बाविनयगम म्हणाले.
"आम्ही आधीपासूनच गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य करत आहोत. पण त्याचबरोबर पर्याय रोजगारच्या मुद्द्यावरही लक्ष द्यावं लागणार आहे," असं ते म्हणाले.
राज्य सरकारकडून गरीब महिलांना 12 आठवड्यांच्या गर्भावस्थेनंतर 18,000 रुपये मिळतात. त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी हे पाऊल सरकारने उचललं आहे.
पण कमी पगारावर काम करणाऱ्या या महिलांना अधिक संरक्षण त्यांना रोजगार देणारेच (मालक/कंपन्या) देऊ शकतात.
चेन्नईच्या शहराबाहेरील भागात थिल्लई भास्कर यांची वीटभट्टी आहे. त्यांनी कामगारांना पुरेशी सावली मिळावी म्हणून छत तयार केलं आहे. उष्णता कमी करणारं विशेष कोटिंग असलेल्या स्टिलचं हे छत आहे.
"कर्मचाऱ्यांना कसं टिकवायचं हे समजण्याएवढी बुद्धी मालकांकडे असायला हवी. तुम्ही त्यांची काळजी घेतली तर ते तुमची काळजी घेतील," असं भास्कर म्हणाले.
फक्त महिलांसाठीची शौचालयं तयार करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

उष्णतेपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं याबाबत जनजागरणासाठी काही संस्था प्रयत्न करत आहेत. तसंच पिण्याचं पाणी थंड राहावं म्हणून इन्सुलेटेड बाटल्याही उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
सुमती गर्भपातानंतर काही वर्षांनी पुन्हा गर्भवती राहिल्या. पण तेव्हाही त्यांच्याकडं उष्ण वातावरणात काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
पण त्यांनी स्वतःची अधिक काळजी घेण्यासाठी त्यांना डॉक्टर आणि SRIHER च्या संशोधकांकडून विशेष मार्गदर्शन मिळालं होतं. सुमती यांनी एक निरोगी मुलगी आणि मुलाला जन्म दिला.
रात्री दिवसभराच्या कामानंतर त्या मुलांजवळ परतल्या. थकवा आणि चिंता असली तरी मुलं आहेत ही एक प्रकारची समाधानाची भावनाही त्यांच्या मनात आहे.











