You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा फुले यांचा ब्राह्मणांबरोबरचा संघर्ष आणि सहयोग कसा होता?
- Author, श्रद्धा कुंभोजकर
- Role, इतिहास अभ्यासक
महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारं समाजातल्या सर्व माणसांसाठी खुली केली याबाबत काही दुमत नाही. मात्र, त्यांच्या काळाच्या संदर्भात त्यांना आणि एकूणच सत्यशोधक चळवळीला समजून न घेतल्यामुळे 'त्यांनी ब्राह्मणद्वेषाला सुरुवात केली' असा गैरसमज अनेकांच्या मनात आजही आहे. याबाबत वस्तुस्थिती काय आहे हे पहायला हवं.
इंग्रजी राज्य इथे स्थापन झालं, तेव्हा श्रेष्ठत्वाच्या भ्रमात असणाऱ्या इथल्या ब्राह्मणवर्गालाही एका त्रयस्थ दृष्टिकोनातून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांनी केलेली ही आत्मटीका 1857 च्या बंडाच्याही आधीची आहे.
"मला तर एक मनुष्य दाखवा की, भटांनी शाळा घालून कोणी तयार केले किंवा कोणास विद्वान् केलें, किंवा ग्रंथ केले, किंवा ज्ञान सांगितलें किंवा लोक सुधारले किंवा मजुरी केली, असें कांहीतरी मला या भटांचें व भिक्षुकांचे खाण्याचा मोबदला, त्यांचा उपयोग दाखवा! बाजीरावाकडून भटांनी व शास्त्री यांणी भलभलतेंच सांगून अनुचित कर्में करविलीं...आणि बिघडवून राज्याचा व त्याचे कुळाचा सत्यानास केला. याचे कारण हे भटच आहेत." (भटांच्या विद्येचा निरुपयोग, शतपत्रे, लोकहितवादी, 12-08-1849)
लोकहितवादींनी जसं कठोर शब्दांत ब्राह्मण जातीसाठी उपयुक्त असं आत्मपरीक्षण केलं, तसंच महात्मा फुले यांनीही शोषण करणाऱ्या ब्राह्मणजातीवर जहाल टीका केली.
उपयुक्त अशी वस्तू किंवा सेवा न देता मोबदल्याचा हक्क मागणाऱ्या या प्रवृत्तीला महात्मा फुले यांनीही उपदेश केला - "स्वकष्टाने पोटे भरा| जोती शिकवी फजितखोरां||" (ब्राह्मणांचे कसब, समग्र: 130)
तसंच, विद्यादानाच्या कामी नेमणूक होऊनही ते काम नीटपणे न करणाऱ्या शिक्षकांवरही त्यांनी टीका केली होती. सरकारी पट्टी म्हणजे शिक्षणकर कष्टकरी समाज भरतो आणि त्यांच्याच मुलांना पंतोजी नीट शिकवत नाहीत, असं वर्णन त्यांनी 1869 मध्ये रचलेल्या पोवाड्यात केलेलं आहे. पंतोजींचा दिनक्रम कसा? तर "जेवून झोपती गार|| नंतर न्युजपेपर|| लिहिती पत्र अखेर|| थंडाई पडल्यावर || शाळेत जाती घडीभर|| शिकवितीं भावलें तर||" अशा शब्दांत जोतीरावांनी त्यांना आरसा दाखवला. (पवाडा विद्याखात्यांतील ब्राह्मण पंतोजी, समग्र: 114)
वर्णश्रेष्ठत्व मानणाऱ्या ब्राह्मणांच्या भूमिकांना जोतीरावांनी अनेक रचनांमधून कडाडून विरोध केला होता.
"यावरून या बळीस्थानांतील एकंदर शूद्रादि अतिशूद्रांसह भिल्ल, कोळी वगैरे सर्व लोक विद्वान् होऊन विचार करण्यालायक होईतोपावेतों ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय (Nation) होऊं शकत नाहीं. असे असतां एकट्या उपऱ्या आर्यभट ब्राह्मण लोकांनी नॅशनल कांग्रेस स्थापिली, तर तिला कोण विचारतो?" (सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक, समग्र: 441)
कॉंग्रेस ही स्वत:ला सार्वजनिक असं म्हणवून घेत असली तरीही प्रत्यक्षात ती सर्व जनांसाठी नसल्याने तिच्या उच्चभ्रू स्वरूपावर जोतीरावांनी मूलभूत प्रश्न उपस्थित केले होते.
जोतीरावांनी या ब्राह्मण्यविरोधी लढाईत आघाडी घेतल्याने 1881 मध्ये केसरी वृत्तपत्रात सलग दोन अग्रलेख आले होते. त्यांचं शीर्षक होतं – 'ज्याचा त्याचा ब्राह्मणांवर कटाक्ष.' खास विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या शैलीमध्ये 'जन्मजात श्रेष्ठत्व हा आपला दोष तर नाहीच, उलट ब्राह्मणेतरांच्या अज्ञानामुळे फायदा मिळवण्यात काहीच गैर नाही' अशी दुराग्रही भूमिका या अग्रलेखात होती. "शहाणपणा अंगीं असल्यावर त्यापासून आपलें हित करून घेण्याचा कोण प्रयत्न करीत नाही? एकाच्या अज्ञानाचा फायदा दुसऱ्यास मिळाला नाहीं, असें कोठें झालें नाहीं?" (केसरी, 15 व 22 मार्च 1881)
फुल्यांच्या ब्राह्मण्यविरोधामागचा जातिव्यवस्थेची भुई समजून न घेता साप साप म्हणून ब्राह्मणद्वेषाला धोपटण्याचा हा प्रकार पुढेही अनेक वर्षं टिकला.
ब्राह्मणांच्या जन्मजात श्रेष्ठत्वावर आधारलेल्या सर्व भूमिकांना जोतीरावांनी कडाडून विरोध केला हे स्पष्टच आहे. पण म्हणजे ते ब्राह्मणांचा द्वेष करत होते, असं अजिबात नाही. त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना मदत करणारे, पाठबळ देणारे अनेक ब्राह्मण त्यांचे जिवलग मित्र होते, ही गोष्ट विसरून चालणार नाही. आणि जोतीरावांनीही ब्राह्मण जातीच्या विशिष्ट समस्यांवर उपाय करून ब्राह्मणांचं जगणं सुसह्य केलं हेही लक्षात ठेवायला हवं.
ब्राह्मण जातीत पुनर्विवाहावर असणाऱ्या बंदीमुळे तरुण विधवा स्त्रियांना बाळंतपण करायची वेळ आली तर ते अतिशय अपमानास्पद मानलं जाई. या अपमानापेक्षा त्या कशातरी अशास्त्रीय पद्धतीनं गर्भपात करत. ही भयंकर प्रथा थांबवण्यासाठी जोतीरावांनी जागोजागी जाहिराती चिकटवून अशा स्त्रियांना गुप्तपणे बाळाला जन्म देवून नंतर निघून जाण्याची सोय केली. (समग्र : 322) या बाळांची काळजी पुढे सावित्रीबाई घेत असत. पुढे यांच्यापैकीच एक मुलगा सावित्रीबाई आणि जोतीरावांनी दत्तक घेऊन यशवंतराव नावाने त्याला आपला वारस केले.
ब्राह्मण स्त्रिया विधवा झाल्या की, त्या इतर पुरुषांना आकर्षक दिसू नयेत म्हणून त्यांचे केस भादरून टाकले जात. याला केशवपन करणे असं म्हणत. जोतीरावांनी याही प्रथेविरुद्ध आपल्या लिखाणातून तर आवाज उठवलाच. पण त्यांनी आणि सावित्रीबाईंनी मिळून या प्रथेमध्ये ज्यांना इच्छेविरुद्ध सहभागी व्हावं लागत असे अशा केस कापण्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांमध्ये जागृती घडवून त्यांचा संप घडवून आणला.
स्त्रीशिक्षणाच्या कामी फुले दांपत्य आणि सत्यशोधक समाजाचे प्रयत्न अनन्य स्वरूपाचे आहेत. 1852 मध्ये पुण्यातील स्त्रीशिक्षणासाठी काम करणाऱ्या समितीने मुंबई इलाक्याचे गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांना आर्थिक मदतीसाठी अर्ज केला. या अर्जाखाली जोतीरावांच्या खालोखाल केशव शिवराम जोशी, बापू रावजी मांडे, अण्णा सहस्रबुद्धे, विष्णु मोरेश्वर भिडे आणि जगन्नाथ सदाशिवजी यांच्या सह्या आहेत. अर्थातच जोतीरावांच्या स्त्रीशिक्षणाच्या कामी अनेक ब्राह्मण सदस्यांचा सक्रिय सहभाग होता.
पारंपरिक जातव्यवस्थेनं या स्त्रीशूद्रांच्या शिक्षणाला आडकाठी केली, तरीही जोतीरावांनी सर्व जातींच्या मदतीनं आपलं काम सुरू ठेवलं. जेव्हा अस्पृश्य जातींमधले पालक आपली मुलं शाळेत पाठवत नव्हते, तेव्हा लहूजी मांग आणि राणोजी महार या समाजसुधारकांनी आपापल्या समाजाची समजूत काढून मुलांना शाळेत पाठवायला प्रवृत्त केलं. सदाशिव बल्लाळ गोवंडे यांनी या शाळेला जागा दिली, काही पाट्या दिल्या आणि शिवाय दरमहा दोन रुपये देऊ लागले. मुलांची संख्या वाढल्यामुळे विष्णुपंत थत्ते यांनी शाळेत शिकवायची जबाबदारी घेतली. या शाळेच्या कामाची जबाबदारी घेतलेल्या समितीतही जोतीरावांच्या बरोबरीनं सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे आणि बाबाजी मनाजी डेंगळे यांची नावं आहेत. शिवाय, अण्णासाहेब चिपळूणकर सावकार, कृष्णशास्त्री चिपळूणकर, केरो लक्ष्मण छत्रे, वामन प्रभाकर यांचंही सक्रिय साहाय्य होतं.
ज्या शाळा पुण्याच्या विविध भागांमध्ये ही समिती चालवत असे, त्यांतील शिक्षकांची नावंही महात्मा फुले समग्र वाङ्मयात उपलब्ध आहेत. बुधवारपेठेतील पहिलीच्या वर्गाला नारायणशास्त्री टोकेकर आणि तिसरी-चौथीला विनायकपंत हे शिक्षक होते. गणेशशास्त्री वेलणकर हे दोन नंबरच्या शाळेत दुसरीला शिकवत. तर चिंतोपंत पारखी हे तिसरी आणि चौथीला शिकवत. मुलींच्या तीन नंबरच्या शाळेत पहिलीला बाळशास्त्री आणि दुसरीला विठ्ठल भास्कर हे शिक्षक होते. तिसरी चौथीला कुशबा बिन जोतीराव फडतरे हे शिकवत. अस्पृश्यांच्या शाळेतही सर्व जातींचे शिक्षक होते. केसो त्र्यंबक, धुराजी आणजी चांभार, विठोबा बिन बापूजी, गणु शिवजी मांग, विष्णु मोरेश्वर हे या शाळेत शिकवत असत. म्हणजेच स्पृश्य आणि अस्पृश्य जातींचे शिक्षक मिळून याकामी सामील होते. शाळांचे देणगीदारही विविध जातींचे आणि धर्माचे होते.
या सगळ्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की स्त्रिया आणि अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी जोतीरावांनी पुढाकार घेतलेल्या सर्व उपक्रमांचं वैचारिक सामर्थ्य ज्या ज्या लोकांना पटलं होतं, त्यांनी याकामी हातभार लावला होता. जोतीराव जर ब्राह्मणांचा द्वेष करत असते, तर ना त्यांना ब्राह्मण मित्र आणि सहकारी मिळाले असते, ना त्यांनी ब्राह्मण जातीच्याही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असता. त्यांनी वेळोवेळी ब्राह्मणांवर केलेल्या प्रातिनिधिक टीकेमागची जातिव्यवस्थेला विरोधाची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे.
असं असताना जोतीराव फुले ब्राह्मणविरोधी असल्याचा गैरसमज का आहे? सत्यशोधक चळवळ ही मुळात सामाजिक चळवळच होती, पुढेही ती सामाजिक स्वरूपाचं कार्य करत राहिली. पण एकेकाळी जातिव्यवस्थाविरोधी राजकारणाला वैचारिक अधिष्ठान देणारी ही चळवळ फुलेंच्या पश्चात् त्या राजकारणापासून दुरावली.
1890 मध्ये जोतीरावांचं निधन झाल्यानंतर दहा-वीस वर्षांत सत्यशोधक चळवळीतील सगळे नाही, पण अनेक अनुयायी हे ब्राह्मणेतर चळवळीत सामील झाले. पण या चळवळीतील काही लोकांनी जातिव्यवस्थेला विरोध आणि एका विशिष्ट जातीला विरोध यामधल्या सीमारेषा ओलांडल्या.
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रवादी चळवळीतल्या राजकीय पोकळीमध्ये ब्राह्मणेतर चळवळीतील लोकांनी आपापलं स्थान भक्कम केलं. सामान्य लोकांच्या मनात मात्र विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून निर्माण केली गेलेली सुलभ प्रतिमा रुळत गेली, ती म्हणजे – 'सत्यशोधक आणि जातिव्यवस्थाविरोधी चळवळ म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्या माणसांची चळवळ.'
मात्र, 'जोतीराव हे माझे गुरू आहेत' हे सांगणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ब्राह्मणद्वेषाच्या सोप्या वाटेला ठाम नकार दिला. 1927 मध्ये महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी डॉ. आंबेडकरांना आपला सशर्त पाठिंबा जाहीर केला.
शर्त अशी होती की, या सत्याग्रहात ' कोणत्याहि ब्राह्मण जातींतील गृहस्थास सामील करण्यांत येऊं नये.'
त्यावर डॉ. आंबेडकरांनी जाहीर प्रतिसाद दिला तो असा होता. "ही अट आम्हांस केव्हांच मान्य करतां येणार नाही. आम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध नाहीं. ही गोष्ट आम्ही जाहीर करूं इच्छितों. आमचा कटाक्ष ब्राह्मण्यावर आहे. ब्राह्मणलोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असें आम्हीं समजतों. या भावनेने प्रेरित झाल्यामुळे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर हा आम्हाला दूरचा वाटतो व ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हास जवळचा वाटतो. आमच्या मनाची ठेवण अशा तऱ्हेची असल्यामुळे आम्ही योजिलेल्या सत्याग्रहात दरेक व्यक्तीस मुभा आहे. मग ती व्यक्ति, कोणत्याहि जातींतील असो. ज्यास ब्राह्मण्य नको असेल, तोच या खटाटोपींत पडेल. येथें निवडानिवड करण्याची आम्हांस कांही जरुरीच दिसत नाहीं." (अग्रलेख : बहिष्कृत भारत, 01-07-1927)
संदर्भ –
- केसरी, दि. 15 व 22 मार्च 1881. पुणे.
- बहिष्कृत भारत, संपा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दि. 1-7-1927. मुंबई.
- महात्मा फुले समग्र वाङ्मय, संपा. धनंजय कीर, स. गं. मालशे, य. दि. फडके, म. रा. सा. सं. मंडळ, मुंबई, 2006.
- शतपत्रे, लोकहितवादी, 12-8-1849.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)