नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी : नरेंद्र मोदींनी ही रिस्क घेतलीय की भाजपतील 'पिढी' बदललीय?

फोटो स्रोत, ani
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी हिंदी
भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी (12 डिसेंबर) कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला. 11 डिसेंबरला पक्षानं मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली होती, तेव्हाही त्यांना असाच धक्का बसला होता.
त्याच्या एका दिवसापूर्वी छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री निवडीनं पक्षानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मंगळवारी राजस्थानची वेळ होती. कारण त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार होती.
कार्यालयाच्या अतिथी कक्षात लावलेल्या टीव्हीवर राजस्थानची बातमी येत होती. तेव्हाच वसुंधराराजे सिंधिया यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.
भोपाळमधले नेते आणि कार्यकर्ते यांनी तर आजवर त्यांचं नावंही ऐकलं नव्हतं. एका नेत्यानं मलाच विचारलं, "हे भजनलाल कोण आहेत?"
आधी छत्तीसगडमध्ये विष्णूदेव साय. नंतर मध्य प्रदेशात मोहन यादव आणि आता राजस्थानात भजनलाल शर्मा. राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की, धक्कातंत्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीनं आता 'प्रभुत्व' मिळवलं आहे.
कमी चर्चेत असलेल्या चेहऱ्यांना प्रमुखपदांची जबाबदारी सोपवण्याचा जो सपाटा भाजपनं लावला आहे, तो विश्लेषकांच्याही समजण्यापलिकडचा आहे.
कारण पक्षानं उचललेल्या या पावलाची वेगवेगळ्या पद्धतीनं व्याख्या केली जात आहे. दिग्गजांना बाजुला करत ज्यांची नावं यादीमध्ये दूरपर्यंत कुठंही नव्हती आणि जे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही नव्हते, अशाच नेत्यांच्या हाती पक्षानं राज्यांची जबाबदारी सोपवली आहे.
राजस्थानबाबत विश्लेषकांचं म्हणणं आहे की, ही तर 'कमालच आहे' कारण पहिल्यांदाच आमदार बनणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवलं जाईल याचा कुणीही विचार केला नसेल.
भजनलाल शर्मा : 'राजयोग' असलेले नेते!
भजनलाल शर्मा यांनी राजस्थानच्या सांगानेर विधनासभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. रंजक बाब म्हणजे, त्यांना भरतपूर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण पक्षाला वाटलं ते या जागेवर जिंकू शकणार नाहीत, म्हणून त्यांना सांगानेरमधून मैदानात उतरवण्यात आलं.
त्यांनी विजय मिळवलाच पण त्याचबरोबर प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे पुष्पेंद्र भारद्वाज यांना 48 हजार 81 मतांनी पराभूतही केलं. असं असलं तरी ते 'राजयोग' घेऊन मैदानात उतरले आहेत, याचे संकेत कुठूनही मिळत नव्हते.
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात ज्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे, त्यांच्याकडं निवडणुका लढवण्याचा अनुभव आधीपासूनच आहे. पण भजनलाल यांच्या बाबतीत सर्व अंदाज आणि गणितं बिनकामाची ठरली.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, त्या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात निवडून आलेल्या नव्या आमदारांचं 'फोटो सेशन' ही झालं. मोठे नेते समोरच्या रांगेत खुर्चीवर बसलेले होते.
त्यात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि या शर्यतीत असलेले सर्व मोठे नेते केंद्रीय पर्यवेक्षकांसह हसताना दिसत होते.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC
त्यात तिसऱ्या रांगेत उभे असलेले मोहन यादव ओळखू येणंही कठिण होतं. पण काही मिनिटांच्या नंतरच मोहन यादव पुढच्या रांगेतली सर्वांत मुख्य नेते बनले.
मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा केल्यानंतर छत्तीसगडची राजधानी रायपूर, भोपाळ आणि जयपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयांवर उपस्थित नेत्यांना धक्का बसल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल.
रायपूर आणि जयपूरमध्ये जे पत्रकार उपस्थित होते त्यांच्या मते, घोषणा झाल्यानंतर कार्यकर्ते आणि नेत्यांना तर काही मिनिटांपर्यंत, 'काय घडलं काहीच कळच नव्हतं'.
भोपाळमध्येही तसंच दृश्य दिसलं. त्याठिकाणी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर ठाण मांडलेलं होतं. त्यांच्याकडे त्यांच्या नेत्यांचे पोस्टरही होते.
घोषणा झाली तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले. नंतर मोहन यादव यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. पण त्यांच्या समर्थकांची संख्या अगदी कमी होती.
'फक्त मोदीच अशी जोखीम पत्करू शकतात'
प्रसिद्ध लेखक आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवई यांच्या मते, "ज्या प्रकारे राजकीय पक्ष चालतात किंवा राजकीय पक्षांची जी परंपरा असते त्या राजकारणाचं व्याकरण बदलण्याचं काम भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत."
पक्ष नवीन प्रयोग करत असून त्यांचे काही निर्णय अनपेक्षित असतात, असंही ते म्हणाले. त्यांनी हरियाणाचं उदाहरण दिलं आणि म्हणाले की, मनोहर लाल खट्टर यांनाही अशाच प्रकारे, संघटनेत वरिष्ठ नेते असतानाही मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं.
"महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवत पक्षानं बड्या नेत्यांना धक्का दिला होता. त्यानंतर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीही बनवलं. राष्ट्रवादीचे अजित पवारही उपमुख्यमंत्री आहेत, तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत."
"एवढंच नाही तर उत्तराखंडमध्ये तर विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. फक्त भारतीय जनता पार्टी आणि मोदीच अशा प्रकारची जोखीम पत्करू शकतात," असंही किडवई म्हणाले.

फोटो स्रोत, RAJESH DOBRIYAL/BBC
भारतीय जनता पार्टीनं फक्त मुख्यमंत्र्यांच्या नव्हे तर उपमुख्यमंत्री निवडतही पक्षाच्या नेत्यांना धक्का दिला आहे.
छत्तीसगडमध्ये विजय शर्मा आणि अरुण साव असो किंवा मध्य प्रदेशात राजेंद्र शुक्ल आणि जगदीश देवडा – पक्षानं या माध्यमातून जातीय समिकरणांचं संतुलन राखण्याचा प्रयत्नही केला आहे.
राजस्थानातही तसंच झालं. तिथं जयपूर राजघराण्यातील दीया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपचा यशस्वी फॉर्म्युला
राजकीय विश्लेषकांच्या मते, या तिन्ही राज्यांत दोन-दोन उपमुख्यमंत्री बनवणं हे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याचे संकेत आहेत.
यापूर्वी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही भारतीय जनता पार्टीनं दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला अवलंबला आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेशात हा प्रयोग झाला. त्यावेळी केशव प्रसाद मौर्य आणि आधी दिनेश शर्मा तर नंतर बृजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. पक्षानं हा फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचा दावाही केला आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
रशीद किडवई म्हणाले की, "गुजरातमध्ये तर भारतीय जनता पक्षानं मंत्रिमंडळात अगदीच नव्या चेहऱ्यांना संधी देऊन एक प्रकारे नवी परंपरा सुरू केली. ते म्हणाले की, भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात बहुतांश चेहरे अगदी तरुण आणि नवे आहेत."
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातही हे प्रयोग केले आहेत. त्यांनी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एस जयशंकर, अश्विनी वैष्णव अशा अधिकाऱ्यांना मंत्री बनवलं.
ज्येष्ठ पत्रकार देव श्रीमाळी यांच्या मते, काँग्रेसनं जो धोका कधीही पत्करला नाही, तो धोका नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जोडीनं सत्ता आणि पक्षाची जबाबदारी स्वीकारल्यापासून पत्करला आहे.
'रिमोट' द्वारे चालवण्याचा प्रयत्न
"काँग्रेस कायम जुन्या नेत्यांवर डाव खेळत असतं. पक्षात नव्या चेहऱ्यांना जागा तयार करण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागला आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, मध्य प्रदेशात कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यासमोर दुसऱ्या एकाही चेहऱ्याला काँग्रेसनं पुढं येऊ दिलं नाही.
त्याचप्रमाणे राजस्थानात ज्येष्ठ अशोक गेहलोत यांच्यासमोर काँग्रेसच्या एकाही नेत्याचं काही चाललं नाही. नवं नेतृत्व आणि नव्या पिढीला कायम मागंच ठेवण्यात आलं. त्यामुळंच ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही काँग्रेसला राम-राम करावा लागला," असंही श्रीमाळी म्हणाले.

फोटो स्रोत, BJP
गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपनं 'पीढी बदलावर' प्रचंड जोर दिला आहे. त्यामुळंच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ज्याप्रकारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, त्याला या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.
पण रशीद किडवई याकडं वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात.
"ज्या चेहऱ्यांबाबत चर्चा नसते किंवा ज्यांची नावं शर्यतीत नसतात, त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली तर ते कायम कृतज्ञ राहतात आणि त्यांना 'रिमोट' द्वारे चालवलं जाऊ शकतं, असा त्यांचा तर्क आहे. अशावेळी परिस्थिती कायम केंद्रीय नेतृत्वाच्या नियंत्रणात राहते," असं रशीद किडवई म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








