विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून घोषणाबाजी आणि आमदारांना दमदाटी

विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत येऊन पत्रकार प्रकाश पोहरे यांनी घोषणाबाजी केली आहे.
संसदेत 13 डिसेंबर रोजी काही तरुणांनी गोंधळ घातल्याचं प्रकरण ताजं असतानाच आज (14 डिसेंबर ) महाराष्ट्र विधीमंडळाचं कामकाज सुरू असताना ही घटना घडली आहे.
प्रकाश पोहरे हे दैनिक देशोन्नती या वर्तमानपत्राचे संपादक आहेत. तसंच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष आहेत.
या प्रकारानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश तालिका अध्यक्षांनी दिले आहेत. तर सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
प्रकाश पोहरे काय म्हणाले?
विधीमंडळात चर्चा सुरू असताना प्रकाश पोहरे म्हणाले की, "तुमच्या या काय चर्चा सुरू आहेत. विदर्भावर बोला. हे काय चालू आहे तुमचं?"
त्यानंतर काही वेळानं सुरक्षारक्षक पोहरे यांनी घेऊन जाण्यासाठी आले.
त्यावेळी पोहरे म्हणाले की, "माझी अटक व्हायची तयारी आहे. काही चिंता करू नका. लोकांना वेडं समजतं का? विदर्भवाल्यांना वेडं समजतं का? नुसता तमाशा चाललाय. विदर्भाचा वेळ गमवायचा आहे."
चौकशीचे आदेश
विधानसभा पत्रकार गलरीत घोषणाबाजी करणाऱ्यांंची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी जाहीर केले.
विधानसभेचे कामकाज सुरु असताना पत्रकार गॅलरीत घडलेल्या मुद्याकडे लक्ष वेधून विधानसभा भाजपचे मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार यांनी ही कसली सुरक्षा? असा सवाल उपस्थित केला.
"13 डिसेंबर रोजी संसदेत घडलेल्या घटनेनंतर विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत कोणीतरी येतो, अध्यक्षांकडे हातवारे करून घोषणाबाजी करतो? कोण आहे ही व्यक्ती? त्यांना प्रवेश कसा मिळाला? विधानसभेची सुरक्षा कशी काय भेदली?" असे प्रश्न उपस्थितीत करुन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.
ती तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी मान्य करीत चौकशीचे आदेश दिले.
प्रकाश पोहरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मी गॅलरीत गोंधळ नाही घातला. अजून 40 जण बोलायचे बाकी आहेत, असं ते म्हणाले. त्यामुळे माझी तळपायातली आग मस्तकात गेली. याचा अर्थ दोन दिवस याच्यावर (आरक्षणाच्या चर्चेवर) गमावणार आहेत.”
कारवाईच्या आदेशावर बोलताना ते म्हणाले, “त्यांनी कारवाई करावी, मला तुरुंगात टाकावं. त्या गोष्टींना तोंड द्यायला मी तयार आहे. मी आतापर्यंत 40 वेळेला तुरुंगात गेलोय. शेतकरी आत्महत्येवर कुणी बोलायला तयार नाही. इथं येऊन तमाशे करतात. शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आलोय आणि त्यावरच मी बोलत आहे.”
“यावेळेला आम्ही वॉर्निंग दिली होती की विदर्भाच्या अधिवेशनात विदर्भाचेच प्रश्न घ्या. विदर्भाचे आमदार नालायक आहेत. इतर भागातले आमदार त्यांचे प्रश्न मांडत आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो,” असंही पोहरे म्हणालेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








