मोरोक्कोत जेव्हा क्रिकेट सीरिज झाली होती...

यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमधली सगळ्यात चर्चित गोष्ट म्हणजे मोरोक्कोचा संघ. फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक मारणारा मोरोक्को हा पहिलाच आफ्रिकन देश ठरला होता.

मोरोक्कोच्या संघाच्या अफलातून बचावाची, त्यांच्या लाल रंगाच्या जर्सीची, कुटुंबीयांबरोबर विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या सेलिब्रेशनचीही जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

पण फुटबॉलवेड्या मोरोक्कोत चक्क क्रिकेट मालिका झाली होती. तुम्ही बरोबर ऐकलंत. मोरोक्कोत क्रिकेट हे अजब वाटतं ना? पण हे खरं आहे.

मोरोक्कोतल्या टँजिजर इथे 2002 मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी एकदिवसीय मालिका झाली होती.

स्पर्धेचं नाव होतं मोरोक्को कप. ही मालिका मोरोक्कोत होण्याचं प्रमुख कारण म्हणजे युएईतील उद्योगपती अब्दुल रहमान बुखातीर. टँजियर इथल्या नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ही मालिका झाली.

25 मिलिअन अमेरिकन डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम खर्च करून बुखातीर यांनीच या स्टेडियमच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला होता. उत्तर आफ्रिका भागात झालेली क्रिकेटची ही पहिलीच स्पर्धा होती.

नवख्या ठिकाणी मालिका होत असूनही तिन्ही संघांनी प्रमुख खेळाडूंचा समावेश असलेले संघ पाठवले होते.

यामुळेच सनथ जयसूर्या, कुमार संगकारा, अरविंदा डिसिल्व्हा, महेला जयवर्धने, चामिंडा वास, मुथय्या मुरलीधरन, शॉन पोलॉक, जॅक कॅलिस, अलन डोनाल्ड, जाँटी ऱ्होडस, मोहम्मद युसुफ, इंझमाम उल हक, वासिम अक्रम, वकार युनिस हे मोठे खेळाडू सहभागी झाले होते.

या मालिकेसाठी आयसीसीने सायमन टॉफेल, डॅरेल हार्पर, श्रीनिवास वेंकटराघवन या ज्येष्ठ पंचांची नियुक्ती केली होती. भारताचे माजी खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ मालिकेसाठी सामनाधिकारी होते.

पाकिस्तानला प्राथमिक फेरीपैकी चारपैकी एकच सामना जिंकता आला. श्रीलंकेने चारपैकी तीन सामने जिंकत गटात अव्वल स्थान राखलं.

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम मुकाबला रंगला. श्रीलंकेने पहिल्यांदा बॅटिंग करताना 235 धावांची मजल मारली.

कर्णधार सनथ जयसूर्याने 10 चौकार आणि एका षटकारासह 71 धावांची खेळी केली. कुमार संगकाराने 40 तर अरविंदा डिसिल्व्हाने 33 धावा करत त्याला चांगली साथ दिली. आफ्रिकेतर्फे लान्स क्लुसनर, अलन डोनाल्ड आणि निकी बोए यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 208 धावातच आटोपला. मार्क बाऊचरने 70 तर बोएटा डिप्पेनारने 53 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पण या दोघांना बाकीच्यांची साथ मिळाली नाही.

श्रीलंकेकडून चामिंडा वास, पुलस्थी गुणरत्ने, मुथय्या मुरलीधरन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. सनथ जयसूर्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. जयसूर्याने स्पर्धेत 5 सामन्यात 299 धावा केल्या. पाकिस्तानच्या वकार युनिसने 4 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या.

बुखातीर यांच्याच टेन स्पोर्ट्स या वाहिनीवर मालिकेचं प्रक्षेपण झालं होतं. भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर हे मालिकेसाठीच्या समालोचन चमूचा भाग होते. मोरोक्कोत त्यावेळी क्रिकेटचा प्रसार मर्यादित असल्याने सामन्यांना मोजक्या प्रमाणात प्रेक्षक लाभले पण टीव्हीवर पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघांच्या चाहत्यांनी मालिकेचा आनंद लुटला.

दरम्यान 1991 मध्ये मोहम्मद लारबी ताबला यांनी मोरोक्कोत पहिल्या क्रिकेट क्लबची स्थापना केली. शारजात होणारं क्रिकेट मॅचफिक्सिंगमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने बुखातीर क्रिकेट मालिकेच्या आयोजनासाठी नव्या जागेच्या शोधात होते. मोरोक्कोला क्रिकेटची पार्श्वभूमी नसली तरी तिथलं वातावरण चांगलं होतं. सराव आणि राहण्याची, वाहतुकीची व्यवस्था उत्तम होती. त्यामुळे त्यांनी मोरोक्कोचा क्रिकेट मालिकेसाठी तसंच गुंतवणुकीसाठी विचार केला.

बुखातीर यांच्या पुढाकाराने भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ मोरोक्कोत आले. त्यांनी मोरोक्को क्रिकेट संघ घडवला. अमरनाथ द्वयीने तीन वर्ष मोरोक्कोत काम केलं. मोरोक्कोतल्या खेळाडूंना दिग्गज खेळाडूंचं मार्गदर्शन मिळालं.

2006 मध्ये मोरोक्कोनं आफ्रिका डिव्हिजन थ्री स्पर्धेत पदार्पण केलं. अमरनाथ द्वयीने सोडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू गॅरी कोझियर यांनी संघाची सूत्रं स्वीकारली. मोरोक्कोने पहिला सामना रवांडाविरुद्ध खेळला. त्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला.

बुखातीर यांना वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा समावेश असलेली तिरंगी मालिका आयोजित करायची होती. त्यासाठी त्यांनी कामही सुरु केलं पण मोरोक्कोतल्या कसाब्लनका इथे झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. ऑस्ट्रेलियाने माघार घेतली. त्यानंतर बुखातीर यांनीही तो विचार सोडून दिला.

बुखातीर यांचा निधीपुरवठा बंद झाल्यानंतर आयसीसीकडून (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) मिळणारा पैसा हाच मोरोक्कोसाठी स्त्रोत होता. पुढची पाच ते सहा वर्ष मोरोक्कोने आयसीसीच्या संलग्न देशांसाठीच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. 2012 मध्ये मोरोक्कोने शेवटचा सामना खेळला. प्रशासकीय गोंधळामुळे आयसीसीने मोरोक्को क्रिकेट बोर्डाचं निलंबन केलं.

नोव्हेंबर 2018 मध्ये इंग्लंडमधल्या बर्ले संघाने मोरोक्कोचा दौरा केला होता. नॉर्वेतला सिनसेन नावाचा संघही मोरोक्कोत खेळायला गेला होता. मेरलीबोन क्रिकेट क्लब संघानेही मोरोक्कोत काही सामने खेळले. मात्र हे सामने लुटुपूटूचे ठरले. व्यवसायिक आणि स्पर्धात्मक पातळीवर मोरोक्कोचं क्रिकेट बंदच झालं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)