रोनाल्डोचा पोर्तुगाल वर्ल्ड कपमधून बाहेर, मोरक्कोनं दिला पराभवाचा धक्का

रोनाल्डो

फोटो स्रोत, Getty Images

यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमधली धक्कादायक निकालांची परंपरा उपांत्यपूर्व फेरीतही कायम राहिली. मोरक्कोने पोर्तुगालला हरवून इतिहास घडवला.

अरब जगातील किंवा आफ्रिकन देशातली टीम फुटबॉल वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच घटना आहे.

या सामन्यावर सगळ्या अरब जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. सामन्याच्या वेळी मोरक्कोचं कासाब्लांका शहर मॅचच्या वेळी जणू श्वास रोखून थांबलं.

मोरक्कोने फर्स्ट हाफमध्येच 42 व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. मॅच संपेपर्यंत पोर्तुगालला बरोबरी साधता आली नाही.

पोर्तुगालने फर्स्ट हाफमध्ये आपला स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला बेंचवरच बसवून ठेवलं होतं. सेकंड हाफमध्ये रोनाल्डो मैदानात उतरला खरा, पण त्याला काहीच कमाल करता आली नाही.

मॅचच्या शेवटच्या मिनिटांमध्ये पोर्तुगालच्या खेळाडूंनी गोल करण्याचे खूप प्रयत्न केले, पण मोरक्कोचा गोलकीपर बोनोनं त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. अगदी शेवटच्या काही मिनिटांत पोर्तुगालच्या जोआओ फेलिक्सने बॉक्सच्या बाहेरून मारलेली किक बोनोने अतिशय चपळाईनं अडवली.

त्यानंतर अगदी 88 व्या मिनिटाला पोर्तुगालला कॉर्नर मिळाला, पण तेव्हाही त्यांना गोल करण्यात यश आलं नाही.

शेवटच्या मिनिटात रोनाल्डोही चेंडू गोल पोस्टपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरला, पण बोनोने ती किकही अडवली.

90 मिनिटांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर आठ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला गेला. त्यातही गोल झाला नाही.

इंज्युरी टाइममध्ये 6 मिनिटं बाकी असताना मोरक्कोच्या वलीद चिदाराला गार्ड रेफरीनं दुसरं यलो कार्ड दाखवलं. त्यामुळे मैदानावर मोरक्कोचे दहा खेळाडू राहिले.

वलीद चिदाराला 60 सेकंदातच रेफरीने दोन यलो कार्ड दाखवले आणि त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर पडावं लागलं.

मोरक्कोचे कोच

फोटो स्रोत, Getty Images

मॅच संपल्याची शिट्टी वाजल्यानंतर पोर्तुगालची टीम निराश झाली, फॅन्समध्ये शांतता पसरली. ख्रिस्तियानो रोनाल्डोला मैदान सोडताना अश्रू अनावर झाले.

मॅच संपल्यावरही मोरक्कोचे समर्थक मैदानात थांबून जल्लोष करत होते.

मोरक्कोचा स्ट्रायकर अशरफ हकिमीने जल्लोष करताना प्रेक्षकांमध्ये असलेल्या आपल्या आईला शोधलं आणि किस केलं. त्याचा हा फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

फ्रान्सकडून इंग्लंडचा पराभव

ऑलिव्हियर जिरूड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑलिव्हियर जिरूड

दरम्यान, उपांत्यपूर्व फेरीतील दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने इंग्लंडला 2-1 फरकाने पराभूत केलं.

सामना सुरू झाल्यानंतर 17 व्या मिनिटालाच फ्रान्सने पहिला गोल केला. ग्रीजमॅनच्या पासवर फ्रान्सच्या टचौमेनीनं हा गोल केला.

त्यानंतर 54व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हॅरी केननं पेनल्टीवर गोल करत बरोबरी साधून दिली.

सेकंड हाफमध्ये इंग्लंडने आपला खेळ उंचावला. पण फ्रान्सच्या ऑलिव्हियर जिरूडनं 78व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली.

आता उपांत्य फेरीत फ्रान्सची लढत मोरक्कोसोबत होईल.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)