Ind vs West Indies : विराट कोहलीला वेस्ट इंडिजमध्ये खेळायला का आवडतं?

विराट कोहली

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विराट कोहली

भारतीय टीमचा स्टार खेळाडू विराट कोहलीला वेस्ट इंडिजच्या विरोधात टेस्ट मॅच सुरू होण्यापूर्वी कॅरिबियन भूमीवरचे आपले चांगले दिवस आठवले आहेत.

विराट कोहलीने त्याचं पहिलं द्विशतक वेस्ट इंडिजमध्येच केलं होतं.

अर्थात त्याने शेवटचं द्विशतक करून आता 4 वर्षं उलटली. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने द्विशतक केलं होतं, त्यानंतर अजून केलेलं नाही.

भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर बुधवारी, 12 जुलैला वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट खेळायला उतरेल.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 209 रनांनी हरवलं होतं.

तेव्हा भारताचे दिग्गज बॅट्समन अयशस्वी ठरले होते आणि विराट कोहलीही फारशी चमक दाखवू शकला नाही. दुसऱ्या डावात आऊट झाल्यानंतर विराट कोहलीवर टीकाही झाली होती.

न विसरता येण्याजोगी खेळी

विराट कोहली सध्या जुन्या चांगल्या आठवणींमध्ये रममाण आहे.

म्हणूनच वेस्ट इंडिजच्या भूमीवर त्याने केलेल्या उत्तम खेळीची त्याला आठवण झाली.

वृत्तसंस्था ANI नुसार विराट कोहलीने म्हटलं की त्याची सर्वोत्तम खेळी एंटिगाची आहे. विराटने इथेच आपल्या क्रियरमधील पहिलं द्विशतक झळकवलं होतं.

जुलै 2016 मध्ये झालेल्या या मॅचच्या पहिल्या डावात विराट कोहलीने 200 रन केले होते. या द्विशतकाच्या जोरावर भारतीय टीमने पहिल्या डावात आठ विकेटवर 566 रन्स केले होते.

भारताने ही टेस्ट एक डाव आणि 92 रनांनी जिंकली होती.

विराट कोहली तेव्हा टीमचा कॅप्टन होता.

त्याने म्हटलं, "माझी सर्वोत्तम खेळी नक्कीच एंटिगाची होती. मी माझ्या आयुष्यातील पहिलं द्विशतक केलं आणि तेही सर विवीयन रिचर्ड यांच्यासमोर. माझ्यासाठी ही अविस्मरणीय खेळी होती.

त्याने पुढे म्हटलं, "त्यादिवशी संध्याकाळी रिचर्ड मला भेटले आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या."

वेस्ट इंडिजमध्ये विराट कोहलीचं रेकॉर्ड

विराटचं वेस्ट इंडिजमधील रेकॉर्ड इतकं खास नाहीये.

त्याने वेस्ट इंडिजमध्ये 9 टेस्ट मॅच खेळल्या आहेत ज्यात 13 डावांमध्ये 35.61 च्या सरासरीने त्याने एकूण 435 र केले आहेत.

द्विशतक वगळता त्याने एक अर्धशतक इथे केलं आहे.

कागदांवर काहीही आकडे असोत पण विराट कोहलीला वेस्ट इंडिजमध्ये खेळायला आवडतं. त्याच्या मते इथे खेळणं हा एक वेगळा अनुभव असतो.

विराट कोहली

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विराट कोहली

तो म्हणतो, "जेव्हा तुम्ही इथे खेळता तेव्हा क्रिकेटचा इतिहास आणि क्रिकेटसाठी असलेलं लोकांचं वेड तुम्हाला दिसतं. वेस्ट इंडिजमध्ये वातावरण खूपच छान असतं आणि इथे खेळण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत."

तो पुढे म्हणतो, "इथे स्टेडियममध्ये जो लोकांचा आवाज तुम्ही ऐकता त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. लोक इथे छोटी छोटी वाद्य घेऊन येतात आणि त्याची गाज दिवसभर स्टेडियममध्ये ऐकू येत राहते. लोक दिवसभर नाचत असतात, निवांत असतात आणि आयुष्याचा आनंद घेतात."

वाईट कामगिरीवरून टीका

भारतीय टीम सलग दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली आहे पण दोन्ही वेळेस हरली.

जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या फायनलमध्ये भारतीय टीमकडून खूप आशा होत्या पण संघाने गुढघे टेकले.

विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मासह सगळे बॅट्समन अपयशी ठरले. टीम हरल्यानंतर भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली होती.

गावस्कर म्हणाले होते की, "भारताची बॅटिंग फारच वाईट होती आणि शेवटचा दिवस तर लाजिरवाणा होता."

विराट कोहलीबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले, "(दुसऱ्या डावात) त्याचा शॉट फारच सामान्य होता. तुम्ही मला विचारताय त्याने कसा शॉट खेळला, तुम्ही खरं त्याला विचारायला हवं की असा शॉट कसा खेळालास? तुम्ही असे खराब शॉट खेळाल तर कसं शतक कराल? ज्याप्रकारे आपले बॅट्समन खेळलेत, ते पाहता ते एक सेशन जरी टिकले असते तरी फार मोठी गोष्ट झाली असती. कोहली तर ऑफ स्टँपच्या बाहेर जाणारा बोल खेळत होता."

विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली

कोहली फक्त या फायनलमध्ये अपयशी ठरला नाहीये तर गेल्या दोन वर्षातली त्याची टेस्टमधली कामगिरी काही खास नाहीये.

जून 2021 पासून त्याने 17 टेस्ट मॅच खेळल्या आहेत आणि 32.13 च्या सरासरीने एकूण फक्त 932 रन्सच केले आहेत. या काळात त्याने फक्त एक शतक झळकवलं आहे.

विराटचं एकूण रेकॉर्ड पाहता ही कामगिरी अगदीच सुमार समजली जातेय.

वेस्ट इंडिजची टीम एकेकाळी दिग्गज समजली जायची पण आता तसं राहिलं नाहीये.

भारत मात्र टेस्ट रँकिंगमध्ये नंबर एकला आहे. विराट कोहली जर परत फॉर्ममध्ये आला तर यापेक्षा चांगली टीम असू शकत नाही असं तज्ज्ञांना वाटतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)