या 5 कारणांमुळे नांदेडची निवडणूक महाराष्ट्रासाठी महत्त्वाची

अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे

अनेकांना वाटेल की नांदेडच्या निवडणुकीचा पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाशी काय संबंध? पण ही निवडणूक एवढी महत्त्वाची आहे की तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तर ठाण मांडून बसले आहेत. ओवेसींची जादू चालणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

1. काँग्रेससाठी 'करो या मरो'

मुंबई, पुणे आणि नागपूरसकट राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या महापालिकांवर शिवसेना किंवा भाजपची सत्ता आहे. नांदेड-वाघाळा हा काँग्रेसचा अखेरच्या नागरी बालेकिल्ल्यांपैकी एक आहे.

2014 सालच्या मोदी लाटेतही नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण निवडून आले होते. पण तरीही त्यांच्यासमोर आता आव्हानांचा डोंगर आहे, असं मत वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

एकीकडे भाजप, दुसरीकडे ओवेसींच्या MIMचं आव्हान असताना चव्हाणांना राज्य काँग्रेसकडूनही फारशी रसद मिळत नाहीये.

"इथे जवळपास ८० हजारांचं मुस्लीम मतदान आणि १० हजारांचं शीख समुदायाचं मतदान यावर काँग्रेसची भिस्त आहे. MIMपासून मुस्लीम समुदायाला बाजूला करण्यात काँग्रेसला यश येतंय. चव्हाणांच्या पत्नी अमिता यांना अमिता भाभी म्हणून ओळखलं जातं. त्या पंजाबी आहेत आणि चव्हाणांच्या प्रचाराची धुरा त्यांच्याकडेच आहे," असं कुलकर्णी सांगतात.

2. काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचं भाजपचं स्वप्न

स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दौरे, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांना आपल्याकडे वळवणं, संभाजी पाटील निलंगेकरांसारखे मंत्री, सुजितसिंह ठाकूरांसारखे आमदार अशी तगडी फौज भाजपनं मैदानात उतरवली आहे ती काँग्रेसमुक्त नांदेड आणि मराठवाडा करण्यासाठी, असं सांगतात दै. प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे.

एका सभेसाठी जमलेला जनसमुदाय.

फोटो स्रोत, Ameya Pathak

फोटो कॅप्शन, एका सभेसाठी जमलेला जनसमुदाय.

"चव्हाण आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीसांना चव्हाणांचा गड खालसा करायचा आहे."

2012मध्ये फक्त दोन नगरसेवक असलेल्या भाजपला बदललेलं राजकीय वातावरण आणि चिखलीकरांनी शिवसेनेतून आणलेले नगरसेवक यांची मोठी मदत होत आहे. पण शिवसेना ही भाजपची मोठी डोकेदुखी ठरू शकते. स्वतंत्र लढणारी शिवसेना भाजपच्या 10 जागांवर प्रतिकूल परिणाम घडवून आणू शकते," असंही डोईफोडे म्हणाले.

3. भाजप-सेना युतीवर परिणाम?

"भाजपनं राज्य पातळीला वेळोवेळी केलेल्या अपमानामुळे शिवसेना दुखावलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची भाषणं मुख्यत: भाजप आणि मोदींवर टीका करणारी आहेत. सेना सत्तेत येण्याच्या स्थितीत नसली, तरी भाजपचं नुकसान करू शकते," असं सुशील कुलकर्णी म्हणतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्थानिक निवडणुकांचे पडसाद राज्यातल्या युतीवर पडण्याची शक्यता नसली, तरी त्यामुळे दोघांमधलं वातावरण अधिक गढूळ होऊ शकतं, हे सांगली महापालिका निवडणुकीने दाखवलं होतं.

4. ओवेसींच्या MIMची प्रयोगशाळा

हैदराबादच्या ओवेसी बंधूंच्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM या पक्षानं 2012च्या नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत 11 जागा जिंकून राज्यात खळबळ उडवून दिली होती.

"यावेळी मात्र MIMमध्ये अंतर्गत वाद उफाळले आहेत. अनेकदा ओवेसींच्या समोरच त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत. शिवाय, काँग्रेसनं MIMला मत म्हणजे भाजपला मत, असं मुस्लीम समाजाच्या मनात ठसवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे," असं पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात.

असदुद्दीन ओवेसी

फोटो स्रोत, Raveendran

फोटो कॅप्शन, असदुद्दीन ओवेसी

डोईफोडेंचं मात्र वेगळं मत आहे. "MIMकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दोन्ही ओवेसी बंधूंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. सध्या देशात असलेल्या राजकीय वातावरणाचाही लाभ MIMला होऊ शकतो." तसं झालं तर काँग्रेससाठी परिस्थिती कठीण होऊ शकते.

नांदेडमध्ये सलग दुसऱ्यांदा MIM दबदबा कायम ठेवू शकली, तर मराठवाड्यात MIMमध्ये उत्साह वाढेल. पण इथेच जर MIMची पडझड झाली, तर त्याचे परिणाम पक्षाच्या मराठवाड्यातल्या आणि पर्यायाने राज्यातल्या स्थितीवर होतील.

5. राष्ट्रवादीची अवस्था बिकट

2014च्या दारुण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी भाजपविरुद्ध एकत्र येतील, अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली होती. पण त्यांच्यात या घडीला समन्वय किती आहे, याचं प्रतिबिंब नांदेडमध्ये दिसतं.

डोईफोडे सांगतात की राष्ट्रवादीला काँग्रेससोबत आघाडीची आशा होती. मात्र, काँग्रेसनं शेवटपर्यंत प्रतिसाद दिला नाही आणि अगदी शेवटी सहा जागा देऊ केल्या. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वबळावर लढणं पसंत केलं. पण त्यांच्या सभांना फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्यांच्या जागा निम्म्याने कमी होऊ शकतात, असा अंदाज डोईफोडे व्यक्त करतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)