प्रेस रिव्ह्यू : हुतात्मा मुलाच्या स्मारकासाठी जमीन विकली

मराठी, हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

जम्मू-कश्मीरमधील उरी भागामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांनी आपली जमीन विकून मुलाचं स्मारक बांधलं आहे.

मागील वर्षी उरी हल्ल्यात मूळचे बिहारमधील गयाचे रहिवासी सुनील कुमार विद्यार्थी हुतात्मा झाले होते.

त्यांचं स्मारक बांधू असं आश्वासन राजकीय नेत्यांनी दिलं होतं. पण, त्यांनी हे आश्वासन पाळलं नाही.

त्यामुळे वडिलांनी आपली जमीन विकून मुलाचं स्मारक बांधलं असं वृत्त आज तकनं दिलं आहे.

'त्या' दिवशी माया कोडनानी विधानसभेत होत्या: शाह

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणात सोमवारी न्यायालयात साक्ष दिली. या प्रकरणात गुजरातच्या माजी राज्यमंत्री माया कोडनानी या आरोपी आहेत.

ज्या दिवशी हत्याकांड झाले त्या दिवशी कोडनानी या गांधीनगरमध्ये विधानसभेत हजर होत्या असा जबाब शाह यांनी अहमदाबाद न्यायालयात नोंदवला आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

रोहिंग्या निर्वासित आयसिस आणि आयएसआयच्या संपर्कात: केंद्र सरकार

रोहिंग्या निर्वासितांपैकी काही जण हे आयसिस आणि पाकिस्तानी गुप्तहेर विभाग आयएसआयच्या संपर्कात आहेत असं केंद्र सरकारनं सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

रोहिंग्या निर्वासित हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

जर रोहिंग्या निर्वासित हे हिंदू किंवा ख्रिश्चन असते तर त्यांना बांगलादेशनं आश्रय दिला असता का? असा सवाल बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केला आहे.

मानवतेच्या दृष्टीकोनातून नाही तर मतांवर डोळा ठेऊन बांगलादेश रोहिंग्यांना आश्रय देत असल्याचं नसरीन यांनी म्हटलं आहे, असं वृत्त बीबीसी हिंदीनं दिलं आहे.

रक्तपेढ्यांतील दूषित रक्तामुळं 18 जणांना एचआयव्ही

रक्तपेढ्यातील दूषित रक्तामुळं मुंबईत गेल्या वर्षभरात 18 जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

सध्या वापरात येत असलेल्या एलायझा रक्त तपासणीत पहिल्या टप्प्यातील एचआयव्हीचं निदान होत नाही.

त्यामुळं रक्तघटकांच्या संक्रमणामुळं रुग्णांना एचआयव्हीची बाधा झाली असं या वृत्तात म्हटलं आहे.

रेल्वेत होणार एक लाख भरती

वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यामुळं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे अशी बातमी लोकमतनं दिली आहे.

वाढते अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, साधन सामग्री आणि कुशल कर्मचाऱ्यांची गरज असल्याची चर्चा रेल्वे बोर्डाचे अधिकारी आणि रेल्वे मंत्री गोयल यांच्यात झाली.

प्रसूतीसाठी महिलेचा खाटेवरून तीन किमी प्रवास

गावापर्यंत रस्ता नाही म्हणून एका महिलेला प्रसुतीसाठी खाटेवरून तीन किलोमीटर घेऊन जावं लागलं. रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली. पण, गावापर्यंत रस्ता नव्हता म्हणून तीन किमी दूर उभी राहिली.

अशा स्थितीमध्ये त्या महिलेला खाटेवर झोपवण्यात आलं. ग्रामस्थांनी तीन किमी चालून तिला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवलं. लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)