You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कराची हल्ला: सईदच्या मुलाने केक आणायला सांगितलं होता, पण जाताना त्याचा मृतदेह घेऊन जावं लागलं
जावेदने सांगितलं "मोहम्मद सईदच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. त्याने येताना केक आणायला सांगितला होता, पण जाताना त्याचा (मोहम्मद सईद) मृतदेह घेऊन जावं लागलं.
जावेद सईद शनिवारी सकाळी छिपा फाउंडेशनच्या शवागाराजवळ उभे होते. ते त्यांच्या मोठ्या भावाचा मृतदेह आणायला गेले होते.
पन्नास वर्षीय मोहम्मद सईद कराचीच्या पोलीस मुख्यालयात लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करायचे. काल रात्री कराची पोलीस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. मोहम्मद सईद हे त्या चार जणांपैकी एक होते.
हल्ल्यात मारल्या गेलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघांच्या अंत्यसंस्काराची नमाज शनिवारी मध्यवर्ती पोलिस कार्यालयात अदा करण्यात आली.
ही नमाज अदा करताना सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह, आयजी गुलाम नबी मेमन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मी माझ्या भावाला फोन बंद करायला सांगितलं...
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मोहम्मद सईद यांचा भाऊ जावेद सांगतात की, कराची पोलीस मुख्यालयावर हल्ला झाल्याची बातमी आम्ही टिव्हीवर पाहिली. मी लगेचच माझ्या भावाला फोन केला, त्यावेळी तो जिवंत होता. त्याने सांगितलं की, हल्ल्यात शेजारची इमारत उद्ध्वस्त झाली आहे पण तो ठीक आहे.
फोनची रिंग वाजली तर धोक्याचं ठरू शकतं म्हणून जावेदने आपल्या भावाला मोबाईल फोन बंद करून ठेवण्याचा सल्ला दिला.
जावेद सांगतात की, सईदला दोन लहान मुलं आहेत. यातला एक चार वर्षांचा आणि एक 11 वर्षांचा आहे. शनिवारी त्यांचा वाढदिवस होता. आता या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली आहे.
जावेदच्या हातात नोटांचे बंडल होते. ते सांगतात की, पोलीस वेल्फेअरच्या अधिकाऱ्यांनी त्यांना 50 हजार रुपये दिले. पण मी आता हे पैसे घेऊन काय करू? असं ते विचारतात.
ते सांगतात की, 20 वर्षांपूर्वी त्यांचा मोठा भाऊ शमीम टार्गेट किलिंगचा बळी ठरला होता. आजही त्याचे मारेकरी मोकाट आहेत. मी एजन्सींच्या कामावर अजिबात समाधानी नाहीये.
जावेदना वाटतं की, सुरक्षेबाबत निष्काळजीपणा दाखवल्यामुळे हा हल्ला झाला आहे. नाहीतर इतक्या संवेदनशील संस्थेत हल्लेखोर सहज कसे काय घुसू शकतात. आणि हल्ला झाला त्यावेळी वरिष्ठ अधिकारी कुठे होते?
"माझ्या भावाचं नाव टिव्हीवर आल्याचं माझ्या चुलत भावाला कळलं, त्याने मला जिना हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करायला सांगितली."
मुलांना यातलं काहीच माहिती नाही...
कराची पोलीस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात अतिरेक्यांनी खकरूब अजमल यांचा पहिला बळी घेतला. त्यांचा मृतदेह घेण्यासाठी त्यांच्या वहिनी शबाना मसीह एकट्याच आल्या होत्या.
दु:खाने हताश झालेल्या निढाल सांगतात की, 'अजमल हा माझा धाकटा भाऊच नाही तर तो माझ्या मुलासारखा होता, गेली पाच वर्षे तो इथे काम करतोय'.
त्या म्हणाल्या, "मी टीव्हीवर बातम्या पाहिल्या, त्यानंतर अजमलचा फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिसला. अजमलचे कुटुंब फैसलाबादमध्ये आहे, त्याच्या मृत्युची बातमी मी त्यांना फोनवरून दिली आहे."
"त्याला 12 वर्षांची मुलगी आणि तीन मुलं आहेत. त्याच्या मुलांना याविषयी काहीच माहिती नाही. अजमलला गोळी लागली आहे आणि तो जखमी झालाय एवढंच त्यांना सांगितलंय"
नोकरीवर रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी मृत्यू...
कराची पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल गुलाम अब्बास यांचा नोकरीचा पहिलाच दिवस होता. आणि त्याच दिवशी झालेल्या हल्ल्यात ते मारले गेले. पूर्वी ते कोरंगीमध्ये नोकरीला होते, तिथून त्यांची बदली करण्यात आली होती.
त्यांच्या एका चुलत भावाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, गुलाम अब्बास पूर्वी सैन्यात होते आणि निवृत्तीनंतर 2011 मध्ये ते कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले.
गुलाम अब्बास हे लारकानाचे रहिवासी असून त्यांना चार मुलं आहेत. या चारपैकी एका मुलाचं लग्न झालंय आणि इतर तिघेजण अजून लहान आहेत.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले सब इंस्पेक्टर तैमूर हा मुलतान प्रांताचे रहिवासी होता.
रेंजर्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सात वर्षांपूर्वी ते हवालदार म्हणून रेंजर्समध्ये रुजू झाले होते.
युद्ध सुरू असल्याचा भास झाला..
कराची पोलीस मुख्यालयाजवळच छिपा फाउंडेशनचं कार्यालय आहे. केंद्राचे प्रभारी चौधरी शाहिद सांगतात की, मागच्या काही दिवसांपासून सदरमध्ये फायरिंग झाल्याच्या, स्फोटाच्या बातम्या येत होत्या. पण नंतर समजलं की लग्नाचे दिवस असल्यामुळे या गोष्टी सुरू आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी फायरिंग झाल्याचा आवाज ऐकू आला. पुढच्या दहा मिनिटात हा आवाज आणखीन तीव्र झाला, जणूकाही युद्धच सुरू असल्याचा भास होत होता. जेव्हा काही लोक अॅम्ब्युलन्स घेऊन निघाले तेव्हा समजलं की कराची पोलिस मुख्यालयावर हल्ला झालाय.
छिपा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांपैकी एक असलेल्या नौमन बलोच यांनी हल्लेखोरांचे मृतदेह उचलले होते. ते सांगतात की, ते जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा मोठ्याने फायरींग सुरू होतं.
ते पुढे सांगतात, "जेव्हा आम्ही इमारतीच्या वरच्या भागात पोहोचलो तेव्हा हल्लेखोर मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी अंगावर बॉम्ब लावले होते. हे बॉम्ब आमच्या समोर डिफ्युझ करून मृतदेह स्ट्रेचरवर टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले."
चौधरी शाहिद सांगतात की, तीन हल्लेखोरांपैकी एकाने आत्मघातकी जॅकेट घातलं होतं. तिसर्या मजल्यावर जाऊन त्याने स्वतःला उडवून घेतलं तर दुसऱ्या दोघाजणांना छतावर ठार करण्यात आलं.
हे तिघेही अंदाजे 30 ते 35 वयाचे असतील. तिघांनी सलवार कमीज घातली होती, एकाने दाढी केली होती, दोघांनी जॉगर्स घातले होते तर एकाच्या पायात चप्पल होती. त्याच्या बॅगेत हत्यारांसोबत बिस्किटांचे पुडे होते.
सलग एक महिना रेकी सुरू होती...
कराची पोलिस सांगतात की, मुख्यालयावर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी सुमारे 15 दिवस ते महिनाभर रेकी अभ्यास केला होता.
डीआयजी साऊथ इरफान बलोच सांगतात की, केपीओसाठी तीन शिफ्टमध्ये सुरक्षा पुरवली जाते. हे हल्लेखोर स्टाफ क्वार्टरमधून आत शिरले. इथून सामान्य माणसांना एन्ट्री नाहीये.
"हल्लेखोरांनी एकाच वेळी बऱ्याच गोष्टींची माहिती घेतली होती. जसं की, कोणत्या वेळी एन्ट्री दिली जाते, सुरक्षाव्यवस्था सैल कधी केली जाते, शुक्रवारी मशिदीच्या आत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असतो. हा हल्ला मगरीबच्या नमाजाच्या वेळी करण्यात आला. त्यावेळी सर्वच कॉन्स्टेबल नमाज अदा करत होते आणि लोकांची संख्या देखील कमी होती."
इरफान बलोच यांचा दावा आहे की, हल्लेखोरांच्या टार्गेटवर अॅडिशनल आयजींचं ऑफिस होतं. तिथेच त्यांनी स्फोट घडवून आणला. त्यांच्याकडे आधुनिक हत्यारं होती. तिघांपैकी एकाने स्वतःला आत्मघाती जॅकेटने उडवून घेतलं.
ते म्हणाले की, 'अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात हातबॉम्बही होते. त्यांनी यातले दहा ते पंधरा वापरले आणि उरलेले पोलिसांनी जप्त केले आहेत.'
पोलिसांनी एक कारही ताब्यात घेतली आहे. डीआयजी बलोच यांच्या माहितीनुसार, या गाडीत दोन-तीन नंबरप्लेट सापडल्या असून सध्या त्याचा तपास सुरू आहे.
या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने स्वीकारली आहे. कराचीतील ऑपरेशन जर्ब-ए-अजब नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जातंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)