परवेझ मुशर्रफ: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचे दुबईत निधन

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुर्शरफ यांचं निधन झालं आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार 79वर्षीय मुशर्रफ यांचं दुबईत प्रदीर्घ आजाराने एका रुग्णालयात निधन झालं.
देशद्रोहाच्या आरोपात लाहोर हायकोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी त्यांच्या मृत्यूबद्दल अफवा पसरली होती. मुर्शरफ यांना अॅमीलॉयडॉसिस हा दुर्धर आजार झाला होता.
पाकिस्तान लष्कराने बीबीसी प्रतिनिधी शुमायला जाफरी यांच्याशी बोलताना मुशर्रफ यांच्या निधनाला दुजोरा दिला आहे. मुशर्रफ यांच्या निधनाने दु:ख झाल्याचं लष्कराने म्हटलं आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यास बळ मिळो असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे.
परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 साली दिल्ली इथे झाला होता. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले होते. मुशर्रफ यांचे वडील सय्यद मुशर्रफ मुत्सदी होते. परवेझ मुशर्रफ 1949 ते 1956 टर्कीत होते आणि त्यानंतर त्यांनी पाकिस्तान लष्कराचा भाग झाले.
क्वेटास्थित आर्मी कमांड अँड स्टाफ कॉलेजमधून ते ग्रॅज्युएट झाले. लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज इथेही त्यांनी शिक्षण घेतलं. तोफखाना, पायदळ आणि कमांडो युनिट्स अशा विविध स्तरावर त्यांनी लष्करात काम केलं.
भारताविरुद्ध 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या युद्धात ते पाकिस्तान लष्कराचा भाग होते. 1965 युद्धातील कर्तृत्वासाठी त्यांनी गॅलन्ट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 1971च्या युद्धात त्यांनी एका तुकडीचं नेतृत्व केलं होतं.
1999 मध्ये सत्तांतर होऊन ते पाकिस्तानचे प्रमुख झाले. अनेकपक्षीय राजकीय व्यवस्था आणि संविधानाला त्यांनी बरखास्त केलं. 2002मध्ये ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. ऑक्टोबर 2017मध्ये त्यांची पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. ते सत्तेतून बाजूला झाल्यानंतर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. 2008 मध्ये त्यांनी पाकिस्तान सोडलं आणि लंडनला रवाना झाले.
2013 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी ते पाकिस्तानात परतले पण निवडणूक लढण्यास त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. 2017 मध्ये त्यांना फरार घोषित करण्यात आलं.
माजी राष्ट्राध्यक्ष बेनझीर भुट्टो यांच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आणीबाणी जाहीर करणे आणि राज्यघटना बरखास्त केल्याप्रकरणी डिसेंबर 2019मध्ये देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
काय असतो हा आजार?
अॅमीलॉयडॉसिस या आजारात शरीरात अतिरिक्त पॉलिमर प्रोटीन म्हणजे प्रथिनं साठतात. आणि त्याचा परिणाम पेशींवर होऊन जिथे ही प्रथिनं साठतात ते अवयव निकामी व्हायला लागतात.
एरवी जर अशी प्रथिनं जिवंत असतील तर त्यामुळे उलट शरीराचा फायदाच होत असतो. म्हणजे ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्तीही वाढते. तसंच हार्मोन्स स्त्रवतानाही त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही प्रथिनं करतात.

फोटो स्रोत, APML
पण, ही प्रथिनं मृत असतील आणि प्रमाणाबाहेर वाढली तर मात्र पेशींवर ताण पडून अवयवांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.
मुशर्रफ-राष्ट्रपमुख ते महाभियोगाची कारवाई
माजी राष्ट्रप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी 1999 मध्ये सैन्याच्या बंडखोरीसह पाकिस्तानची सत्तेची सूत्रं आपल्या ताब्यात मिळवली.
जून 2001मध्ये मुशर्रफ यांनी लष्करप्रमुख असताना स्वत:ला राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केलं. 2002 मध्ये वादग्रस्त पद्धतीने मतं मिळवत मुशर्रफ पुढच्या पाच वर्षांकरता राष्ट्राध्यक्ष झाले.

फोटो स्रोत, Getty Images
2007 ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मुर्शरफ यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक जिंकली. मात्र त्यांच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी घोषित केली. मुख्य न्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांच्या जागी नव्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली. नव्या मुख्य न्यायाधीशांनी मुशर्रफ यांच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केलं.
ऑगस्ट 2008मध्ये मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दोन मुख्य सत्ताधारी पक्षांनी त्यांच्याविरोधात महाभियोगाचे आरोप निश्चित केल्यानंतर सहमतीने मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडलं.
मुशर्रफ यांच्यावर आरोप काय?
मुशर्रफ यांच्यावर हा खटला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दाखल केला होता. 2013 मध्ये त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग दुसऱ्यांदा सत्तेत आला होता.
या खटल्याचं कामकाज सहा वर्ष चाललं. न्यायाधीश वकार सेठ यांनी लष्कराच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. दोन न्यायाधीशांपैकी एका न्यायाधीशाने देहदंडाच्या शिक्षेचा विरोध केला होता.
या खटल्याच्या सुनावणीसाठी मुशर्रफ एकदाच सहभागी झाले. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी मुशर्रफ यांच्याकडे 30 दिवसांचा कालावधी होता. मात्र त्यासाठी त्यांना न्यायालयात उपस्थित राहणं अनिवार्य आहे.
इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने 31 मार्च 2014 रोजी देशद्रोहाच्या एका प्रकरणात पाकिस्तानचे माजी राष्ट्रप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना आरोपी ठरवण्यात आलं.
राज्यघटनेची पायमल्ली करण्यासंदर्भातील पाकिस्तानमधलं हे पहिलंच प्रकरण आहे. त्यामुळे असा खटला दाखल झालेले मुशर्रफ हे पहिलेच नागरिक आहेत.
2013 मध्ये निवडणुका जिंकल्यानंतर पाकिस्तान मुस्लीम लीगचं सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आलं. त्यावेळी माजी राष्ट्रप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात संविधानाचं उल्लंघन केल्याचा खटला दाखल करण्यात आला.
माजी राष्ट्रप्रमुखांविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाचे चार प्रमुख बदलण्यात आले. आरोप निश्चित झाल्यानंतर आरोपी मुशर्रफ केवळ एकदा न्यायालयात उपस्थित राहिले. त्यानंतर ते न्यायालयात हजर राहिलेले नाहीत.
मार्च 2016मध्ये प्रकृती ठीक नसल्याने मुशर्रफ पाकिस्तान सोडून परदेशी रवाना झाले. तत्कालीन सत्ताधारी पक्ष मुस्लिम लीगने एक्झिट कंट्रोल लिस्टमधून त्यांचं नाव वगळण्यात आलं. त्यानंतर त्यांना परदेशी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.
परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तान का सोडलं?
पाकिस्तानच्या राजकारणात मुशर्रफ पहिल्यांदा प्रकाशझोतात आले जेव्हा नवाझ शरीफ यांनी 1998 मध्ये त्यांना चार स्टार बहाल करून लष्करप्रमुख नेमलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी भारताविरोधात कारगीलच्या युद्धात पाक सैन्याचं नेतृत्व केलं. पण, कारगीलच्या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा सहभाग नव्हता, असं भासवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर फसला.
तिथून आणि इतरही कारणांवरून शरीफ आणि मुशर्रफ यांच्यात बेबनाव वाढत गेला. आणि शरीफ यांनी पुढच्याच वर्षी 1999 मध्ये मुशर्रफ यांना लष्करप्रमुख पदावरून काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला. मुशर्रफ यांनी शरीफ यांच्याविरुद्ध बंड करून सत्ता हस्तगत केली. 2001 मध्ये ते देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाले. आणि त्यांनी नवाझ शरीफ यांना त्यांच्याच घरात नजरकैद केलं.
मुशर्रफ यांनी पाकिस्तानची घटना बरखास्त केली. आणि देशात आणीबाणी जाहीर केली. पंतप्रधान शौकत अझिझ यांच्याबरोबर त्यांचा अंमल सुरू झाला. देशातल्या मध्यमवर्गाला बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, जीडीपी वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रीय बचत कमी कमी होत गेली. परिणामी देशात आर्थिक विषमता कमालीची वाढली.
त्यामुळे मुशर्रफ आणि पंतप्रधान शौकत अझिझ यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये रोष वाढत होता. आणि 2008 मध्ये अझिझ यांनी पंतप्रधानपद सोडल्यावर मुशर्रफ यांची बाजू वेगाने कमकुवत होत गेली. महाभियोगाच्या भीतीने त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडलं आणि ते लंडनला निघून गेले. त्यांनी पाकिस्तान पहिल्यांदा सोडलं ते असं...
मुशर्रफ सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय होते. आणि मुलाखतींमधूनही पाकिस्तानशी आपण कसे जोडले गेलेलो आहोत हे ते नेहमी सांगायचे. म्हणजे पाकिस्तानमधल्या राजकारणात त्यांना कायम रस होता.
त्या महत्त्वाकांक्षेपोटीच 2013 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी ते परत पाकिस्तानला आले. पण, यावेळी चक्र फिरली होती. तिथल्या हायकोर्टाने त्यांच्याविरोधात बेनझीर भुट्टो आणि नवाब अकबर बुगटी यांच्या हत्येच्या आरोपावरून अटक वॉरंट काढलं.
आणि मग नवाझ शरीफ सत्तेत आल्यावर तर त्यांनी देशाशी गद्दारी केल्याचाच खटला मुशर्रफ यांच्या विरोधात चालवला. यानंतर संधी साधून मुशर्रफ दुबईला पळून गेले. पाकिस्तानातून पळ काढण्याचा हा दुसरा प्रसंग होता...
पाकिस्तानात दोन्ही गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले. आणि देशाशी केलेल्या गद्दारीसाठी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पुढे ते देशात हजर नसल्याने लाहौर कोर्टाने त्यांची फाशी रद्द केली. मुशर्रफ दुबईतच राहिले. पण, ट्विटर आणि सोशल मीडियावर कायम आपल्याला पाकिस्तानमध्ये परत यायचं असल्याची त्यांची विधानं गाजत राहिली.
कधी त्यात विरोधकांसाठी धमकी असायची तर कधी आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा. आताही आजारी पडेपर्यंत ते पाकिस्तानमध्ये परतण्याच्याच गोष्टी करत होते. पण आता मात्र तब्येत पाहता ते कठीण दिसतंय. अॅमीलॉयडॉसिस आजाराने त्यांचं शरीर जर्जर झालंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








