एडिथ थॉमसन : प्रियकराने केलेल्या गुन्ह्यासाठी तिला फाशी झाली, त्याला मात्र वाचवण्याचा प्रयत्न झाला...

    • Author, टीम स्टोक्स
    • Role, बीबीसी न्यूज

9 जानेवारी 1923 साली एडिथ थॉमसन आणि तिचा प्रियकर फ्रेडरिक बायवॉटर्स या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दोघांवर आरोप कोणते होते की या दोघांनी एडिथच्या पतीची हत्या केली होती.

पण आपल्या पतीची हत्या होणार आहे याविषयी एडिथला माहिती होती असे कोणतेच पुरावे सापडले नव्हते.

मग तरीही एडिथला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं? आज एक शतक उलटलं तरी हे प्रकरण चर्चेत का आलंय?

तर 9 जानेवारी 1923 रोजी मंगळवार होता. त्यादिवशी सकाळी वातावरणात गारठा होता. जल्लाद आणि त्याचा सहाय्यक गडबडीत लंडनमधील होलोवे जेलच्या अंधारकोठडीबाहेर पोहोचले.

त्यांच्या समोर 29 वर्षांची एडिथ थॉमसन खांदे गळून पडल्यासारखी बसली होती. मागच्या काही दिवसांत तिला वेदनाशामक औषधं आणि इंजेक्शन्स दिले जात होते. या औषधांमुळे ती जवळपास बेशुद्ध आल्यासारखीच होती.

जल्लाद तिच्या कोठडी जवळ गेला आणि त्याने एक उसासा टाकला.

एका माणसाने एडिथच्या मनगटाला धरून तिला उठवलं

आणि म्हणाला, 'काळजी करू नकोस. हे सर्व लवकरच संपेल.

एडिथच्या हातापायात बेड्या होत्या. त्याच अवस्थेत तिला फाशीसाठी नेण्यात आलं आणि बघता बघता तिचा मृत्यूही झाला.

तिथूनच अर्ध्या मैल दूर असलेल्या पेंटनविले जेलमध्ये एडिथच्या 20 वर्षीय प्रियकराला फाशी देण्यात आली.

फाशी देण्याआधी तीन महिने एक घटना घडली होती. एडिथच्या प्रियकराने म्हणजेच फ्रेडी बायवॉटर्सने एडिथच्या पतीवर म्हणजेच पर्सीवर चाकूने वार केले होते. एडिथ आणि पर्सी चित्रपट बघून थिएटरमधून घरी चालले होते. फ्रेडी शेवटपर्यंत सांगत राहिला की, एडिथला या खुनाविषयी काहीच माहिती नव्हती.

मग एडिथचा गुन्हा काय होता? तर ती मोहक आणि रूपवान होती. ती स्वतंत्रविचारसरणी असलेली स्त्री होती.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका एक्स्पर्टचं म्हणणं होतं की, एडिथ एका अशा समाजाचा बळी ठरली होती, ज्या समाजात स्त्रीच्या पायात नैतिक तत्त्वांची बंधन घालण्यात आली होती.

एक यशस्वी कादंबरीकार आणि पटकथा लेखक एडगर वॉलेस लिहितात की, "या देशाच्या इतिहासात एका स्त्रीला तिचा अपराध सिद्ध झाला नसतानाही पुरव्याअभावी केवळ अशिक्षित जनतेच्या दूषित पूर्वग्रहामुळे जीव गमवावा लागला होता आणि ती स्त्री एडिथ थॉमसन होती."

'तिला सगळ्यांपेक्षा वेगळं व्हायचं होतं'

आपलं आयुष्य इतर कामगार-वर्गीय स्त्रियांपेक्षा वेगळं असावं, असं एडिथ ग्रेडॉनला नेहमीच वाटायचं.

तिचा जन्म 1893 साली लंडनच्या उपनगरातील मनोर पार्क इथं झाला होता. एडिथच्या जन्माच्या दिवशी ख्रिसमस होता. तिच्या आईवडिलांना एकूण पाच मुलं होती, एडिथ या सगळ्यांमध्ये थोरली होती.

"कुटुंबात सर्वांत मोठी मुलगी असल्याकारणाने एडिथ एका बहिणीची आणि तीन भावांची काळजी घेण्यात आईला मदत करायची."

अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि हुशार एडिथने तिचं शालेय शिक्षण पूर्ण करताच कामाच्या शोधात लंडन गाठलं. लंडनमध्ये येऊन तिने बार्बिकनमधील हॅट उत्पादक कंपनी कार्लटन आणि पाल्मर या कंपनीत नोकरी धरली. लवकरच ती कंपनीची मुख्य खरेदीदार बनली.

एडिथच्या केससंबंधी दोन पुस्तकं लिहिणारी लॉरा थॉमसन सांगते, "ती एक तथाकथित सामान्य स्त्री होती जिला असाधारण बनायचं होतं."

तिने 1916 च्या जानेवारी महिन्यात शिपिंग कंपनीत क्लार्क म्हणून नोकरी करणाऱ्या पर्सी थॉमसनशी लग्न केलं. या जोडप्याने इलफोर्ड येथील 41, केन्सिंग्टन गार्डनमध्ये एक घर खरेदी केलं. हे दोघेही ज्या परिसरात लहानाचे मोठे झाले त्या परिसरापासून अगदी थोड्याच अंतरावर हे घर होतं.

त्यावेळी एडिथला तिच्या पतीपेक्षा जास्त पगार मिळायचा. त्यामुळे 250 पौंड किंमत असलेल्या घरासाठी एडिथने अर्ध्याहून अधिक रक्कम दिली होती. पण घराचं खरेदीखत मात्र एडिथचा नवरा पर्सी याच्या नावावर होणार होतं.

नवी नवरी असलेल्या एडिथने आता घरसंसार सांभाळून मुलंबाळं जन्माला घालणं अपेक्षित होतं, मात्र एडिथच्या मनात दुसरंच काही होतं.

एडिथ एक उत्तम नृत्यांगनाही होती. त्यामुळे तिला लंडनच्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, डान्सिंग हॉलमध्ये संध्याकाळ व्यतीत करणं आवडायचं. पण ही अशी ठिकाणं होती, जिथं सामान्य वर्गातील महिलांना प्रवेश निषिद्ध होता.

एडिथची संध्याकाळ अनेकदा मित्रांसोबत वेस्ट एंड थिएटर, सिनेमा हॉल आणि रेस्टॉरंटमध्ये जायची.

एडिथवर पुस्तक लिहिणारी लॉरा थॉमसन सांगते, "एडिथ मला एक अतिशय उमदी आणि नव्या विचारसरणीची तरुणी वाटते. ती खूप आनंदी, महत्त्वाकांक्षी आणि स्वप्नाळू शहरी मुलगी होती."

एडिथला तेव्हाच्या काळी महिलांसाठी असलेल्या नैतिक बेड्या मान्य नव्हत्या. ती सर्वसामान्य स्त्रियांसारखी पत्नी नव्हती. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे एडिथचा एक प्रियकर देखील होता. तो अतिशय देखणा, मोहक आणि एडिथपेक्षा आठ वर्षांनी लहान असा तरुण होता.

"तिला स्वतःचं घर हवं होतं, जे तिला आता मिळालं होतं. मात्र, ते घर तिच्या पतीच्या नावावर होतं."

'मी एका अशाही महिलेला भेटले होते, जिने आपले तीन पती गमावले होते.'

फ्रेडरिक बायवॉटर्स हा एडिथच्या माहेरच्या लोकांना पूर्वीपासून ओळखत होता. कारण एडिथचा भाऊ ज्या शाळेत जात होता त्याच शाळेत फ्रेडरिक बायवॉटर्स सुद्धा शिकत होता. फ्रेडरिकने वयाच्या 13 व्या वर्षी लंडन सोडलं आणि मर्चंट नेव्हीमध्ये जॉईन झाला.

जून 1921 मध्ये फ्रेडरिक घरी आला. यावेळी त्याला पर्सी, एडिथ आणि एडिथची धाकटी बहीण एव्हिस ग्रेडनने सुट्टयांसाठी बोलवून घेतलं. हे सगळेजण आइल ऑफ व्हाइटवर एक आठवड्याच्या सुट्टीसाठी जाणार होते.

या सुट्ट्यांच्या काळात एडिथ आणि फ्रेडरिक यांच्यात प्रेम फुलू लागलं. फ्रेडरिकला थॉमसन कुटुंबासोबत आणखी काही आठवडे घालवण्याची जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांच्यातलं प्रेम आणखीनच फुललं.

शेवटी पर्सी आणि फ्रेडरिक यांच्यात भांडण झालं आणि फ्रेडरिकला 41 केन्सिंग्टन गार्डनमधील घर सोडून जावं लागलं. पर्सी बऱ्याचदा त्याच्या पत्नीसोबतही गैरवर्तन करायचा. फ्रेडरिकशी जेव्हा भांडण झालं तेव्हा मध्यस्थी करणाऱ्या एडिथला पर्सीने उचलून खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात फेकून दिलं. यात एडिथला गंभीर दुखापत झाली.

फ्रेडी बराच काळ लांब असायचा त्यामुळे एडिथ त्याला पत्र लिहायची. तर फ्रेडीही एडिथला पत्र लिहायचा, मात्र ती पत्र वाचून झाल्या झाल्या नष्ट करावीत अशी ताकीद फ्रेडीने दिली होती.

लॉरा थॉमसनने तिच्या नव्या पुस्तकात फ्रेडी आणि एडिथच्या या प्रेमपत्राचं तपशीलवार वर्णन केलंय. लॉरा सांगते की, "ही प्रेमपत्र महत्वाचे दस्तऐवज आहेत. पत्रात जणू एडिथने तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू उलगडला आहे. यात ती उघड उघड व्यक्त झाली आहे."

एडिथच्या पत्रांमध्ये भावनांचा समुद्र उचंबळला होता. रोजच्या आयुष्यातील वास्तविकता आणि स्वप्नांच्या मधोमध असणाऱ्या भावना यात व्यक्त केल्या होत्या.

कधी कधी एडिथ आपल्या पत्रात दिवसभरातील क्षुल्लक गोष्टींचा उल्लेख करायची तर पुढच्याच क्षणी लैंगिक संबंध, गर्भपात आणि आत्महत्या यासंबंधीचे अतिशय वैयक्तिक विचार व्यक्त करायची.

एडिथला काल्पनिक कथांमध्ये रस असावा असं तिच्या पत्रांमधून दिसतं. तिच्या पत्रात लिहिलेल्या काही गोष्टी कधीकधी अत्यंत कारस्थानी वाटतात.

अशावेळी ती स्वतःकडे कादंबरीतील एक पात्र म्हणून पाहायची आणि पर्सीच्या जेवणात काचेचे छोटे तुकडे घालून त्याच्यापासून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त करायची.

एका पत्रात, एडिथ लिहिते की,

'काल मी एका अशा महिलेला भेटले जिने तीन पती गमावले होते. ते युद्धाचे दिवस देखील नव्हते. तिचे दोन पती बुडून मरण पावले तर एकाने आत्महत्या केली होती. आणि मी अशाही लोकांना ओळखते ज्यांना एका पतीपासून सुटका करून घेणंही अवघड वाटतं. हे खूप अन्यायकारक आहे. बेस आणि रेग रविवारी संध्याकाळी जेवणासाठी येणार आहेत.'

दुसर्‍या एका पत्रात, एडिथ लिहिते,

'मी लाईट बल्बमुळे उत्साहित होते. मी बरेचसे लाईट बल्ब वापरले. यात फक्त बारीक चुरा केलेले बल्बच नाही तर खूप मोठे तुकडे सुद्धा वापरले होते. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. ही बातमी मी तुला पत्राद्वारे कळवेन असं ठरवलं होतं पण यातून काहीच निष्पन्न झालं नाही.'

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या प्रोफेसर रीनी वीस यांनी अनेक वर्षं एडिथच्या केसचा अभ्यास केला. त्यांना वाटतं त्याप्रमाणे, ही पत्र 'उत्कट कल्पनेच्या अभिव्यक्तीपेक्षा जास्त काही नाहीत.'

एडिथसाठी तिचेच शब्द जीवघेणे ठरले.

'त्याने असं का केलं?'

ज्या दिवशी फ्रेडीने पर्सीवर हल्ला केला, त्यादिवशी तो बेलग्रेव्हमधील बागेत हल्ला करण्यासाठी टपून बसला होता.

3 ऑक्टोबर 1922 चा तो दिवस, एडिथ आणि पर्सी यांनी ती संध्याकाळ पिकाडिली राउंडअबाउटवरील क्राइटन थिएटरमध्ये द डिपर्स नावाचा कॉमेडी शो पाहण्यात घालवली. शो संपल्यानंतर दोघेही लिव्हरपूल स्ट्रीटला जाण्यासाठी सबवे ट्रेनमध्ये चढले. त्यानंतर ते दोघेही ट्रेनने इलफोर्डला पोहोचले.

हे जोडपं बेलग्रेव्ह रोडवरील त्यांच्या घराच्या दिशेने निघालं असताना एका व्यक्तीने पर्सीवर हल्ला केला. नंतर पोलिस चौकशीत एडिथने सांगितलं की, या हल्ल्यामुळे ती बेशुद्ध पडली. नंतर तिने तिचा पती जमिनीवर पडल्याचं पाहिलं होतं.

डॉक्टरांना बोलावण्यात आलं, पण त्यांनी पर्सीला मृत घोषित केलं.

32 वर्षीय पर्सीला अचानक रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला असावा असा एक प्राथमिक अंदाज सुरुवातीला बांधण्यात आला होता. मात्र नंतर जेव्हा पोलिसांनी पर्सीच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्याच्या मानेवर चाकूने वार केल्याच्या खुणा आढळल्या. दिवसाच्या उजेडात पाहिलं तेव्हा पर्सीच्या रक्ताचे थेंब 44 फूट (13 मीटर) च्या त्रिज्येत उडालेले दिसले.

फ्रेडीची चौकशी करावी असा सल्ला पर्सीच्या भावाने पोलिसांना दिला. फ्रेडी दोन आठवड्यांपूर्वीच लंडनला परतला होता. फ्रेडीच्या आईच्या घराची जेव्हा झडती घेतली गेली तेव्हा एका खोलीत एडिथने फ्रेडीला लिहिलेलं प्रेमपत्र सापडलं.

इलफोर्ड पोलिस स्टेशनमध्ये एडिथ आणि फ्रेडीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं.

या दोघांचीही समोरासमोर बसवून चौकशी केल्यास एडिथ तिच्या गुन्ह्याची कबुली देईल अशी आशा पोलिसांना होती. चौकशी सुरू असताना एडिथ रडत रडत म्हणाली, "त्याने असं का केलं असेल? तो असं करेल ही अपेक्षा त्याच्याकडून नव्हती. अरे परमेश्वरा. मी काय करू? मला आता खरं सांगावंच लागेल."

फ्रेडी मोरिया शिपवर कामाला होता, तिथल्या त्याच्या केबिनची झडती घेण्यात आली. त्याच्या केबिनमध्ये बंद पेटीत एडिथची आणखीन बरीच पत्रं सापडली. या पत्रात एडिथने पर्सीपासून सुटका करून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, असं एक पत्र पोलिसांच्या हाती लागलं.

फ्रेडीने पर्सीवर हल्ला केल्याचा आरोप अजिबात नाकारला नाही. पण त्याचं म्हणणं होतं की, पर्सीने आधी त्याच्यावर हल्ला केला होता, म्हणून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पर्सीवर वार केले.

एडिथवरही खुनाचा खटला चालवला जाणार आहे, असं जेव्हा पोलिसांनी फ्रेडीला सांगितलं, तेव्हा फ्रेडी म्हणाला की, "तुम्ही तिला का आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय?मिसेस थॉमसनला मी काही करणार आहे याची माहिती देखील नव्हती."

पहिल्या रात्री उद्भवलेली परिस्थिती.

या प्रकरणाची उलटतपासणी होण्यापूर्वीच एडिथ आणि फ्रेडीची प्रेमपत्र वृत्तपत्रात छापून आली होती. यामुळे ते दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

लॉरा थॉमसन सांगते की, "फ्रेडी आणि एडिथ आता सेलिब्रिटी बनले होते. वृत्तपत्राच्या मथळ्यांमधून फ्रेडी 'रूपर्ट ब्रुक' हे पात्र बनलाय असं वाटत होतं, मात्र एडिथला वासनेचं वलय देण्यात आलं होतं.

6 डिसेंबर 1922 रोजी ओल्ड बेली कोर्टरूममध्ये एडिथ आणि फ्रेडीला हजर केलं जाणार होतं. कधी नव्हे ते त्यादिवशी कोर्टरूम खचाखच भरलं होतं.

लंडनच्या या नामांकित कोर्टरुम बाहेर सुद्धा मोठी गर्दी जमली होती. कोर्टाबाहेर लोकांना बसण्यासाठीची जागा आता लंडनमधील सर्वांत महागडी जागा बनली होती.

नऊ दिवस या प्रकरणाची सुनावणी चालली. सुनावणीच्या शेवटच्या दिवसांत ब्रिटनमधले बेरोजगार तरुण रोज रात्री कोर्टहाउसच्या बाहेर जमून रांगेत उभे राहायचे. आणि नंतर ती जागा दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्याला विकायचे. त्यावेळी ब्रिटनमधील सरासरी दैनंदिन रोजगाराच्या कैक पट जास्त किंमतीने या जागा विकल्या जात होत्या.

लेखक बेव्हर्ली निकोल्स त्यावेळी एक तरुण रिपोर्टर होते. हा संपूर्ण खटला त्यांनी कव्हर केला होता. त्यांच्यासाठी हा खटला म्हणजे, "रोमन साम्राज्याच्या काळात, ख्रिश्चनांना सिंहांसमोर फेकलं जायचं" अगदी तसा होता.

1973 साली पार पडलेल्या बीबीसीच्या एका रेडिओ कार्यक्रमात बेव्हरलीने त्या रात्रीचं वर्णन "लग्नाआधीची एक रात्र" असं केलं होतं.

"कोर्टाबाहेर हरतऱ्हेचे लोक जमायचे. इथं समाजातील वरच्या स्तरातील महिला, सनसनाटी पसरवणारे लोक यायचे, जणू काही त्यांनी हा खटला पाहण्यासाठी पैसेच भरले असावेत. अगदी स्टॉल लावल्याप्रमाणे तिथं गर्दी जमलेली असायची."

मादाम तुसाद म्युझियमचे कलाकारही कोर्ट नंबर एकमध्ये हजर असायचे. ते या दोन नव्या खलनायकांची रेखाचित्रे चितारण्यासाठी यायचे. जेणेकरून भविष्यात या दोन खलनायकांचे पुतळे म्युझियमच्या चेंबर ऑफ हॉरर्समध्ये लावून गर्दी जमवता येईल.

उद्धट आणि स्वार्थी स्त्री

एडिथने तिच्या प्रेमपत्रांत लिहिलेल्या गोष्टी तिच्याविरुद्धचा पुरावा म्हणून वापरण्यात आला. ही प्रेमपत्र जेव्हा कोर्टात मोठ्याने वाचली गेली तेव्हा कोर्टरूममध्ये लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे ज्युरी मेम्बर्सने ही पत्र मनातल्या मनात वाचावी असं सांगण्यात आलं.

लॉरा थॉमसन सांगते, "खचाखच भरलेल्या त्या कोर्टरूममध्ये पत्र वाचून दाखवणं हा एकप्रकारे छळच होता. हा विचार करूनच माझा थरकाप उडाला होता. अतिशय वैयक्तिक असणारी ती पत्र मोठ्याने वाचली जात होती, आणि विशेष म्हणजे हे सगळं करणारे लोक त्यांच्या आजूबाजूचेच होते."

"तो खासगी पत्रव्यवहार ऐकण्यासाठी जणू वेड्या लोकांची जत्राच भरली होती. हा एखाद्याचा भावनिक छळ करण्यासारखं होतं असं मला वाटतं."

प्रोफेसर वीस सांगतात की, ही घटना पहिल्या महायुद्धानंतर घडली होती. त्यामुळे हे सुद्धा एडिथबद्दलच्या द्वेषाचं एक कारण असू शकतं.

प्रोफेसर वीस पुढं सांगतात की, "पहिलं महायुद्ध होऊन गेल्यामुळे ब्रिटनमध्ये विधवांची संख्या जास्त होती. त्यामुळे एका बाजूला या स्त्रिया तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य वर्गातून आलेली उद्धट आणि स्वार्थी स्त्री होती, जी सुंदरही होती."

"तिचं स्वतःचं एक सुंदर घर होतं, नवरा होता. ती नाचगाण्यांच्या पार्ट्यांमध्ये जायची, थिएटरमध्ये जायची. आणखीन तिने बऱ्याच गोष्टी केल्या, पण यासाठी तिला एक चांगला माणूस पुरा पडला नाही."

प्रोफेसर वीस सांगतात की, "फ्रेडी लोकांमध्ये प्रसिद्ध झाला होता, पण त्याउलट जनता एडिथचा तिरस्कार करू लागली होती. त्यांच्या नजरेत एडिथ ही एक दुष्ट खलनायिका होती, जिने एका तरुणाला फूस लावली आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. यात तिचा नवरा मरण पावला, तर दुसरा तरुण फासावर जाणार होता."

पण एडिथ दोषी नव्हती

होलोवे तुरुंगात फासावर जाण्याऱ्या 29 वर्षीय एडिथला मतदानाचा अधिकार नव्हता.

ज्या पद्धतीने समाजातले लोक एडिथचा द्वेष करायचे, अगदी त्याच पद्धतीने जस्टीस शेरमन यांनीही तिचा तिरस्कार केला. खटला सुरू असताना त्यांनी बऱ्याचदा पोलिसांची बाजू घेतली होती.

उलटतपासणीनंतर खटल्याचा शेवट जवळ आला, त्यावेळी जस्टीस शेरमन यांनी ज्युरी मेम्बर्सना 'एडिथच्या व्यभिचाराबद्दल त्यांचं मत काय आहे' असं विचारलं. या ज्युरी मेम्बर्समध्ये दोन महिलांचाही समावेश होता.

ते म्हणाले की, "मला खात्री आहे की जसं इतरांना वाटतं त्याप्रमाणे तुम्हाला ही या कृत्याची घृणा वाटत असणार."

एडिथविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नव्हता. पर्सीच्या शरीरात विष आणि काचेचे तुकडे आहेत का याची तपासणी करण्यात आली होती, पण तसं काही आढळलं नव्हतं.

पर्सीवर झालेल्या हल्ल्याने एडिथला धक्का बसल्याचं तिने सांगितलं होतं. आणि खुनाच्या रात्री काही साक्षीदारांनी तिची ती अवस्था पाहिली होती.

एडिथच्या वकिलाने अपील करून देखील, तिला कोर्टात उभं राहून साक्ष द्यावी लागली. लॉरा थॉमसन म्हणते, "माझ्या मते, एडिथने उचललेलं हे पाऊल तिच्या निर्दोषतेचे लक्षण होतं."

पण, एडिथने एक महाभयंकर चूक केली होती. तिने तिच्या प्रेमपत्रात ज्याचा उल्लेख केला होता त्याचा वापर पोलिसांनी तिच्याविरुद्ध केला. त्यांनी या पत्रांमधून चुकीचे निष्कर्ष काढले. आणि तिला आरोपी करण्यासाठी पत्रांवरच्या तारखा बदलल्या.

हे प्रकरण 11 डिसेंबर रोजी ज्युरी मेम्बर्सकडे गेलं. सुमारे दोन तास चर्चा झडल्या. यावेळी एडिथ घाबरलेल्या अवस्थेत होती. आणि एडिथला कोर्टात जवळजवळ खेचत आणलं होतं. आणि इथंच एडिथ आणि फ्रेडीला दोषी ठरवण्यात आलं.

कोर्टरूम मध्ये खूप गोंधळ सुरू होता, इतक्यात फ्रेडी रडवेल्या अवस्थेत जवळजवळ किंचाळून म्हटला, "ज्युरीने दिलेला निर्णय चुकीचा आहे. एडिथ दोषी नाहीये."

जेव्हा जस्टीस शेरमन यांनी या जोडप्याला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा त्यांच्या विगवर काळी टोपी ठेवण्यात आली.

एडिथला तुरुंगाच्या कोठडीत नेत असताना ती ढसाढसा रडत होती.

यातून बाहेर पडण्याची एकही संधी त्यांच्याकडे नव्हती...

फाशीच्या आदल्या दिवशी एडिथला तिच्या आईवडीलांना भेटण्याची परवानगी मिळाली.

फ्रेडीला फासावर जाण्यापासून वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली. या याचिकेवर जवळपास दहा लाखांहून अधिक लोकांनी सह्या केल्या होत्या. पण एडिथबद्दल कोणालाच सहानुभूती नव्हती.

लॉरा थॉमसन सांगते, "स्त्रियांना एडिथ आवडत नव्हती, त्यांना तिची भीती वाटायची. एडिथ एक अशी स्त्री होती, जिच्या मागे पुरुषांचा घोळका असायचा. त्यामुळे इतर स्त्रियांच्या मनात तिच्याविषयी जळफळाट व्हायचा."

एडिथच्या नावे वृत्तपत्रांमध्ये पानं भरून लेख छापून यायचे, यातले बहुतांश तर खूप टीका करणारे असायचे. द टाईम्सने लिहिलं होतं, "हे प्रकरण एकदम सरळधोट आणि अनैतिक होतं, त्यामुळे यात सहानुभूती दाखवण्यात यावी अशी परिस्थिती कधी आलीच नाही."

स्वयंघोषित स्त्रीवादी रेबेका वेस्ट यांनी तर एडिथला 'एक गरीब मुलगी' असल्याचं म्हटलं होतं. शिवाय समाजाला धक्का देणारी कचऱ्यातील तुकडा असल्याचं देखील म्हटलं होतं.

एडिथला फाशी दिल्यानंतर बऱ्याच महिलांनी ब्रिटनचे तत्कालीन गृहमंत्री विल्यम ब्रिजमन यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले होते. ब्रिजमन यांनी एडिथची फाशीची शिक्षा कमी होऊ दिली नव्हती, त्यामुळे इतर महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण केल्याबद्दल हे आभार व्यक्त करण्यात आले होते.

एडिथने तुरुंगातून पत्रं लिहिली. त्यात विस्मृतीत गेलेल्या स्त्रीच्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या.

एडिथ तिच्या पालकांना लिहिलेल्या पत्रात म्हणते, "आज सगळंच संपून गेल्यासारखं वाटतंय. मला काहीही समजत नाहीये. असं वाटतंय, मी एका भल्या मोठ्या भिंतीसमोर उभी आहे. त्या भिंतीपलीकडे काय आहे हे माझ्या डोळ्यांना दिसत नाहीये, ना माझ्या भावना त्या भिंतीचा अडथळा पार करू शकतात."

"मी जो गुन्हा केलाच नाही, त्यासाठी मला शिक्षा होणं, हा विचारही मला सहन होत नाही. मला त्याबद्दल आधीही माहीत नव्हतं, ना आता मला त्याबद्दल माहिती आहे."

पूर्वी फाशीची शिक्षा झालेल्या प्रत्येक महिलेला सवलत दिली जायची. मात्र एडिथच्या प्रकरणात तिने दाखल केलेले सर्व अर्ज फेटाळण्यात आले.

लॉरा थॉमसन म्हणते, "एडिथला फाशी मिळावी याची खात्री करण्यासाठी गृह मंत्रालयाने ज्या काही गोष्टी केल्या ते अत्यंत भयावह होतं."

लॉराचं म्हणणं आहे की, एडिथच्या व्यभिचाराला 'नैतिकतेवरील हल्ला' म्हटलं गेलं. तिने केलेल्या वर्तनामुळे विवाह संस्थेला तडे गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली.

किमान आता ती त्यांच्यासोबत आहे.

फाशी दिल्यावर एडिथचा मृतदेह सिटी ऑफ लंडनच्या स्मशानभूमीत दफन करण्यात आला.

सप्टेंबर 1923 मध्ये एडिथच्या घरातील वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावासाठी तुफान गर्दी जमली होती. तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एडिथच्या आयुष्यातील काहीना काही भाग मिळवायचा होता.

लिलाव करणार्‍यांपैकी एकाने सांगितलं की, "लिलावात सहभागी झालेल्या लोकांनी एडिथच्या घराच्या बागेतील झाडांची पानं सुद्धा शिल्लक ठेवली नाहीत. त्यांना एडिथच्या घरातून काहीतरी मिळवलंय याची फुशारकी मित्रांसमोर मारता येईल यासाठी सगळं करण्यात आलं."

एडिथ आणि फ्रेडीचे मेणाचे पुतळे तयार करून मादाम तुसादमध्ये ठेवण्यात आले होते. हे आकर्षणाचं सर्वात मोठं केंद्र बनलं होतं.

शेवटी 1980 च्या दशकात चेंबर ऑफ हॉरर्समधील या दोघांचे पुतळे काढून संग्रहालयाच्या तळघरात ठेवण्यात आले. आज त्या पुतळ्यांवरचा रंग उडालाय, मेण वितळलंय.

एडिथला न्याय मिळावा म्हणून प्रोफेसर वीस यांनी अनेक वर्षे लढा दिला. शेवटी 2018 मध्ये, एडिथचा मृतदेह मॅनर पार्कमधील सिटी ऑफ लंडन स्मशानभूमीत तिच्या आईवडिलांसोबत पुन्हा दफन करण्यात आला.

प्रोफेसर वीस म्हणतात, "तिच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी अशी मला आशा होती. आज निदान ती आता त्यांच्यासोबत आहे."

लॉरा थॉमसनच्या मते, ब्रिटनमध्ये फाशीची शिक्षा रद्द होऊन 50 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीही एडिथ सोबत जे झालं ते आजही प्रासंगिक आहे.

ती सांगते, "लोकांना आठवण द्यायला हवी की, काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. पूर्वग्रह नेहमीच असतात. त्यांचं फक्त स्वरूप बदलतं."

"आपण आजही नकारात्मक संस्कृतीत आपलं आयुष्य कंठतोय. एडिथला समाजाने नाकारलं होतं. ही अतिशय धोकादायक विचारसरणी होती आणि समाजाला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)