लिझ ट्रस : सगळ्यात कमी वेळासाठी सर्वोच्चपदी राहिलेले नेते तुम्हाला माहिती आहेत का?

लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्या आहेत.
    • Author, फर्नांडो ड्युआर्टे
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्या. त्यामुळे आता एकूण असे पाच पंतप्रधान आहेत ज्यांची कारकीर्द सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीची आहे. याला आता जागतिक विक्रम म्हणायचं का?

तर अजिबात नाही.

कारण अर्जेंटिनाच्या लोकांना विचारलं तर ते सांगतील की, फक्त दोन आठवड्यांच्या कालावधीत त्यांनी पाच राष्ट्राध्यक्ष होताना पाहिलेत.

आता लिझ ट्रस यांची 10 डाउनिंग स्ट्रीटवरील कारकीर्द तशी 45 दिवसांचीच आहे. आणि ब्रिटनच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीसाठी पंतप्रधान होणाऱ्या त्या एकमेव असतील. पण जगात असे बरेचसे नेते होऊन गेलेत ज्यांची कारकीर्द खूप कमी राहिलीय.

फक्त एका रात्रीपुरता जर्मन नाझी चांसलर

जर्मनीत जेव्हा नाझी राजवट (1933-1945) होती तेव्हा प्रोपोगंडा मिनिस्टर असलेला जोसेफ गोबेल्स एका दिवसासाठी जर्मन नाझी चान्सलर बनला होता. बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसेल पण असं घडलं होतं.

जर्मनीत जेव्हा नाझी राजवट होती तेव्हा प्रोपोगंडा मिनिस्टर जोसेफ गोबेल्स एका दिवसासाठी नाझी चांसलर बनला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जर्मनीत जेव्हा नाझी राजवट होती तेव्हा प्रोपोगंडा मिनिस्टर जोसेफ गोबेल्स एका दिवसासाठी नाझी चांसलर बनला होता.

हे घडलं होतं 30 एप्रिल 1945 रोजी. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जवळ आला होता. आपण युद्ध हरतोय असं जेव्हा अॅडॉल्फ हिटलरला समजलं तेव्हा त्याने बर्लिनमधील भूमिगत असलेल्या बंकरमध्ये स्वतःचा जीव घेतला.

हिटलरनंतर गोबेल्स सेकंड-इन-कमांड होता. त्यामुळे तो चान्सलर बनला. पण त्याने आणि त्याच्या पत्नीनेही आपल्या सहा मुलांसह सायनाइड पिऊन आत्महत्या केली.

व्हाईट हाऊसमध्ये महिनाभर

अमेरिकेचे नववे अध्यक्ष म्हणून विल्यम हेन्री हॅरिसन पदावर बसले. पण पदावर बसल्यावर अवघ्या 32 दिवसांत ते न्यूमोनियाने आजारी पडले आणि वयाच्या 68 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

अमेरिकेचे नववे अध्यक्ष म्हणून विल्यम हेन्री हॅरिसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे नववे अध्यक्ष म्हणून विल्यम हेन्री हॅरिसन

पदावर असताना मरण पावणारे आणि अत्यंत कमी कालावधीसाठी (32 दिवस) पदावर असणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते.

अध्यक्ष बदलाचं चक्र

2001च्या डिसेंबर महिन्यात अर्जेंटिनावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरून हिंसक निदर्शन करत होते. यात 25 लोक मरण पावले.

या अशा अभूतपूर्व राजकीय गोंधळामुळे अध्यक्ष असलेल्या फर्नांडो डी ला रुआ यांनी 20 डिसेंबरला राजीनामा दिला.

पण त्यानंतर अध्यक्ष बदलाचं चक्र सुरूच राहिलं. अध्यक्ष असलेल्या फर्नांडो डी ला रुआ यांच्या राजीनाम्यानंतर सिनेटचं बहुमत असलेले रॅमन पुएर्टा अध्यक्ष झाले. त्यानंतर उपाध्यक्षपद रिक्त झालं.

2001 च्या डिसेंबर महिन्यात अर्जेंटिनावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. यादरम्यान अध्यक्ष असलेल्या फर्नांडो डी ला रुआ यांनी 20 डिसेंबरला राजीनामा दिला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2001 च्या डिसेंबर महिन्यात अर्जेंटिनावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. यादरम्यान अध्यक्ष असलेल्या फर्नांडो डी ला रुआ यांनी 20 डिसेंबरला राजीनामा दिला.

त्यानंतर दोन दिवस गेले आणि पुएर्टा यांनी राजीनामा दिला. कारण काँग्रेसने अडोल्फो रॉड्रिग्ज सा यांना अध्यक्ष म्हणून निवडलं.

पण अडोल्फो रॉड्रिग्ज सा यांनीही एका आठवड्यात राजीनामा दिला. कारण त्यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या आर्थिक उपाययोजनांना पाठिंबा मिळाला नव्हता.

तसं बघायला गेलं तर, कायद्याने पुएर्टा यांनी माघार घेऊन सिनेटचा नेता म्हणून राजीनामा द्यायला हवा होता. पण त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला.

त्यानंतर चेंबर ऑफ डेप्युटीजचे नेते, एडुआर्डो कॅमानो चौथे अध्यक्ष बनले.

एडुआर्डो दुहाल्डे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एडुआर्डो दुहाल्डे

पुढे तीन दिवस उलटल्यानंतर एडुआर्डो कॅमानो यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसचे अध्यक्ष एडुआर्डो दुहाल्डे अध्यक्ष बनले. त्यानंतर 2003 साली सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. तोपर्यंत तरी दुहाल्डेच सत्तेत होते.

पंधरा दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी सरकार

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 13 दिवसांचं सरकार चालवलं होतं. 1996 च्या लोकसभा निवडणुकीनंतर वाजपेयी सरकार सत्तेवर तर आलं पण सरकार चालवण्यासाठी जे बहुमत लागतं ते त्यांना टिकवता आलं नाही.

1998 मध्ये ते पुन्हा सत्तेवर आले. यावेळी अविश्वास ठराव पारित करण्यात आला तेव्हा 13 महिन्यांनी सरकार कोसळलं.

अटलबिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अटलबिहारी वाजपेयी

पण 1999 मध्ये निवडणूका पार पडल्यानंतर ते सत्तेवर आले आणि त्यांनी 1999 ते 2004 दरम्यान पंतप्रधान पदाचा कार्यभार तिसर्‍यांदा सांभाळला.

सिएरा लिओनचा डबल रेकॉर्ड

आफ्रिकेच्या सिएरा लिओन या देशाचे सियाका स्टीव्हन्स यांच्या नावावर दोन रेकॉर्ड आहेत. एक म्हणजे सर्वात कमी कालावधीसाठी पंतप्रधान तर दुसरीकडे जास्त कालावधीसाठी पंतप्रधान.

1967 च्या निवडणुकीत ते निवडून आले आणि त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पण त्याच दिवशी लष्कराने त्यांना पदच्युत करून अटक केली.

आफ्रिकेच्या सिएरा लिओन या देशाचे अध्यक्ष सियाका स्टीव्हन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आफ्रिकेच्या सिएरा लिओन या देशाचे अध्यक्ष सियाका स्टीव्हन्स

लष्करी राजवट संपल्यानंतर ते कैदेतून सुटले आणि त्यांनी पदग्रहण केलं. त्यानंतर 1971 ते 1985 पर्यंत ते पदावर होते.

पण त्यांची कारकीर्द ही हुकूमशाही, मानवी हक्कांचं उल्लंघन तसेच निवडणूक घोटाळ्याचे असंख्य आरोप अशा आरोपांनी झाकोळली गेली.

असंच साऊथ आफ्रिकेतही घडलं होतं. 24 सप्टेंबर 2008 रोजी थाबो म्बेकी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आय व्ही मॅटसेपे कसाबुरी देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. त्याआधी त्या दळणवळण मंत्री होत्या.

पण अध्यक्ष म्हणून त्या फक्त 15 तासचं काम करू शकल्या. कारण साऊथ आफ्रिकेच्या संसदेने म्बेकी यांच्या जागी क्गलेमा मोटलांथे यांची रीतसर निवड केली.

मेक्सिको आणि ब्राझीलमध्ये तात्पुरते अध्यक्ष

अर्जेंटिना सारखीच उदाहरण लॅटिन अमेरिकेत सुद्धा आहेत.

1913 साली मेक्सिकोमध्ये लष्करी बंडाळी झाली होती. यावेळी तत्कालीन अध्यक्ष फ्रान्सिस्को माडेरो यांना हटवून पेड्रो लास्कुरेन यांना अध्यक्षपदी बसवण्यात आलं. पण एक तासापेक्षा कमी कालावधीसाठी.

1955 मध्ये ब्राझीलचे तत्कालीन अध्यक्ष कॅफे फिल्हो गंभीर आजारी पडले. त्यामुळे 8 नोव्हेंबर 1955 रोजी ब्राझीलच्या चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष कार्लोस लुझ यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

पण ब्राझीलने नवे अध्यक्ष म्हणून जुसेलिनो कुबित्शेक यांची आधीच निवड झाली होती. पण त्यांचा कार्यकाळ जानेवारी 1956 मध्ये सुरू होणार होता.

कार्लोस लुझ

फोटो स्रोत, Brazilian National Library

फोटो कॅप्शन, कार्लोस लुझ

पण तीन दिवसांनी संरक्षण मंत्रालयाने अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी करा असे आदेश लुझ यांना दिले. आणि नंतर सिनेटचे नेते नेरेउ रामोस यांनी दोन महिन्यांसाठी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

राजांची कारकीर्द

आजच्या लोकशाही जगात निवडणूक लढवावीच लागते. मात्र राजा आणि राण्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत. पण मग त्यांची राजवट दीर्घकाळ होती असंही काही नव्हतं.

आता इटलीचा राजा उम्बर्टो दुसरा याचंच बघा ना. व्हिटोरियो इमॅन्युएल नंतर त्याचा मुलगा उम्बर्टो दुसरा सत्तेवर आला. पण इटलीमध्ये राजेशाहीला विरोध वाढतच होता. त्यामुळे राजाने सार्वमताला मान्यता देऊन राजेशाही विरोधी भावना शांत करण्याचा प्रयत्न केला.

पण राजाचं दैव फिरलं. 54% इटालियन लोकांनी प्रजासत्ताकाच्या बाजूने मतदान केलं. आणि अवघ्या 34 दिवसांच्या काळात राजेशाही राजवट संपली.

उम्बर्टो दुसरा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उम्बर्टो दुसरा

नेपाळचा राजा दीपेंद्र बीर बिक्रम शाह देव याच्यावर तर याहून दुःखद प्रसंग ओढवला होता.

नेपाळचा क्राउन प्रिन्स दीपेंद्र बीर बिक्रम शाह देव याने एका भारतीय मुलीशी लग्न करायचं होतं. पण त्याच्या एका नातेवाईकाने या लग्नाला विरोध केला. त्यामुळे 1 जून 2001 रोजी दीपेंद्र बीर बिक्रम शाह देव याने राजघराण्यातील सदस्यांना गोळ्या घालून ठार केलं.

खुनानंतर दिपेंद्रने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मात्र तो वाचला आणि कोमात गेला. याच काळात दिपेंद्रला राजा घोषित करण्यात आलं. मात्र तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

याहीपेक्षा कमी कारकीर्द होती फ्रान्सचा राजा एकोणिसावा लुई याची.

प्रिन्स दीपेंद्र बीर बिक्रम शाह देव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रिन्स दीपेंद्र बीर बिक्रम शाह देव

फ्रान्समध्ये त्यावेळी सम्राट चार्ल्स दहावा याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. त्यामुळे 2 ऑगस्ट 1830 रोजी लुई सिंहासनावर बसला.

परंतु अवघ्या 20 मिनिटांनंतर लुई पायउतार झाला आणि त्याचा पुतण्या ड्यूक ऑफ बोर्डो सिंहासनावर बसला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)