तवायफ : जेव्हा गौहर जान यांनी महात्मा गांधींना स्वातंत्र्य चळवळीसाठी 12 हजार रुपये पाठवून दिले होते

तवायफ़

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, वक़ार मुस्तफ़ा
    • Role, पत्रकार आणि अभ्यासक, लाहोर

खरंतर लोक त्यांना 'कंजरी' असं म्हणत. पण 16 व्या शतकात बादशहा अकबराने त्यांना 'कंचनी' असं म्हणण्याचा हुकूम दिला.

कंजर आणि कंजरी याचा हिंदीत नाच-गाणी करणारे असा होतो. शायर आणि इतिहासकार मोहम्मद हुसैन आझाद यांनी 'सुखनदान-ए-फारस' या पुस्तकात याबद्दल लिहून ठेवलं आहे. अकबराने एके दिवशी खुश होऊन कंजरींना 'कंचनी' म्हणजे 'सोनेरी' असं संबोधण्यास सांगितलं.

लेखिका राणा सफवी यांच्यामते, "सिद्धहस्त गायिका आणि नृत्यांगनांना कंचनी म्हटलं जातं. बँड किंवा समूहाला तायफा (अनेकवचन तवायफ) आणि दक्ष संगीतकार, गायक-नर्तकांना तवायफ म्हटलं जाई. हे सगळे शब्द सन्मान करणारे होते."

भारतात मुसलमानांच्या विधींवर 1832 साली 'कंचनी का तायफा' पुस्तकात तिला राजपुत्र आणि शोरफा (शरीफचं अनेकवचन) मेजवानीसाठी बोलवायचे. पोंगी, मृदंग, झांज, घघरी, सारंगी (सारंगी किंवा तंबोरा) ही वाद्यं पुरुष वाजवत.

महिला घुंगरू घालून गाणी म्हणत नाचत. त्यांची संख्या तीन पेक्षा कमी नसे आणि पाचपेक्षा जास्त नसे. असं नमूद केलं आहे.

सांस्कृतिक वारशाचा अतूट भाग

रुथ विनिता या शिक्षणतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. ब्रिटन आणि भारतातील साहित्यिक इतिहासात शैली आणि लैंगिकता या विषयाच्या त्या तज्ज्ञ आहेत. त्यांच्यामते कलावंतिणीची संस्कृती हिंदू-मुस्लीम अशी सरमिसळ झालेली होती.

तवायफ़

फोटो स्रोत, Getty Images

कलावंतिणी या भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक वारशाच्या अतूट भाग होत्या. त्यांच्या कलेला फारसी, उर्दू साहित्य-शायरीचा विचार करता भऱपूर सन्मान मिळे, अर्थात मुघलकाळा आधीही त्या शोरफांचं मनोरंजन करत असत परंतु नंतर मुघलकाळात त्यांचा खरा उत्कर्ष झाला.

'डेरेदार तवायफ' म्हणजे 'चांगल्या कलावंतिणी' मुघल दरबाराशी आपला वंश जोडतात असं लेखक आणि इतिहासकार प्राण नेवेल लिहितात.

त्या बादशहा आणि नवाबांच्या दासींमध्ये असत. त्यातील अनेक प्रसिद्ध नृत्यांगना आणि गायिका ऐश-आरामात आणि सुखसुविधांत राहात.

कलावंतिणींशी जोडलेलं असणं हे तुमची समाजात चांगली पत असण्याचं, श्रीमंतीचं, सभ्य आणि सौम्य वृत्तीचं प्रतीक समजलं जायचं.

त्या स्त्रियांना कोणीही वाईट समजत नसत की त्यांना सहानुभूती दाखवली पाहिजे असं त्यांना वाटत नसे.

उत्तर भारतात कलावंतिणींना कशाप्रकारे पैसा, शक्ती, पत आणि राजसत्तेपर्यंत पोहोच मिळाली होती याबद्दल प्राण नेवेल यांनी 'नाच गर्ल्स ऑफ इंडिया'मध्ये लिहिलं आहे.

या कलावंतिणींना संस्कृतीक्षेत्रात महत्त्वाचं स्थान होतं. सभ्य घरातले लोक आपल्या मुलांना वागण्याची रीत, अदब, बोलण्याची पद्धत शिकायला त्यांच्याकडे पाठवत असत.

कलावंतिणींचा प्रभाव

इतिहास अभ्यासक सलीम किडवई सांगतात, "अनेक मुघल बादशहांच्या काळात, विविध राजवटीत सर्व हिंदू-मुस्लीम दरबारांमध्ये कलावंतिणींनी एक सक्षम महिलांचा वर्गच तयार केला होता. त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं असे आणि अनेकदा राजकीय घटनांमध्ये सक्रीयही राहात. "

वानगीदाखल सरधनाच्या शासक बेगम समरू (1753-1836) यांचं उदाहरण देता येईल. त्यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात एक कलावंतीण म्हणून केली होती.

पत्रकार सौम्या राव लिहितात, "कलावंतिणी श्रीमंत असत. त्यांचा समाजात दबदबा असे. कलाकार वर्गात त्यांचं स्थान वर असे. गल्लीबोळात कला दाखवणारा वर्ग आणि देहव्यापार करणारे यांच्यापेक्षा हा वेगळा वर्ग होता."

इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ दानिश इक्बाल यांच्यामते, "कलाकारांच्या वर्गात कलावंतिणी सर्वात वरती असत.

दिल्लीच्या 'नाच गर्ल्स'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीच्या 'नाच गर्ल्स'

जेव्हा पितृसत्ताक भारतीय समाजात महिलांना स्थान नव्हते त्या चार भिंतींच्या आतच राहात तेव्हा पुरुषांच्या वर्चस्व असलेल्या या समाजात त्यांचा प्रभाव होता त्यांची पोहोच वरपर्यंत असे."

त्या फक्त कला आणि संस्कृतीच्या केंद्र नव्हत्या तर स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रिया होत्या. पुरुष त्यांच्यावर अवलंबून होते.

पुरुष त्यांच्याकडे नोकरी करत. संगीतकार असो वा संगीत-नृत्य गुरू, पुरुषच त्यांचे ग्राहक, दलाल असत.

महलुकाबाई चंदा उर्दूच्या पहिल्या शायरा आहेत. त्यांचा काव्यसंग्रह 1898 साली प्रकाशित झाला. त्यांचा एक शेर आहे.

ग़मज़ा व नाज़ व अदा शेवा है ख़ूबों का

मगर हर सुख़न में रूठ जाना कौन सा दस्तूर है

याचा ढोबळ अर्थ सांगायचा झाला तर त्या सांगतात, गर्व अभिमान, अदाकारी हे सगळं ठीक आहे पण प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर नाराज होणं, काय योग्य आहे का?

1857 नंतर

राणा सफवी सांगतात, "1857मध्ये फक्त मुघल परिवार आणि नवाबच उद्धवस्त झाले नाहीत तर एक अख्खं युग संपलं, एक संस्कृती नष्ट झाली. कथ्थक नृत्यांगना आणि शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिकांना आता इंग्रज शासकांच्या लेखी 'नाच गर्ल्स' एवढीच पत राहिली होती."

बेगम हजरत महल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेगम हजरत महल

पत्रकार सौम्या राव सांगतात, "तेव्हा अनेक दशकांपासून मुघल राजवटीचा ऱ्हास सुरू होता. त्यामुळे बहुतांश कलावंतिणींनी दिल्ली सोडून लखनौच्या दिशेने अवध संस्थानाची वाट धरली होती. कारण तिथं नवाबांनी त्यांच्या कलेला संरक्षण दिलं होतं."

इराणी आणि भारतीय नृत्याच्या मिलाफाच्या रुपात कथकने ठुमरी, दादरा आणि गझलेच्या बरोबर अवध दरबारात लोकप्रियता मिळवली होती.

नवाब वाजिद अली शाह स्वतः कथ्थक नर्तक, गायक आणि शायर होते. त्यांनी कलांना वाव दिला होता.

तो संगीत आणि नृत्यासाठी सोनेरी काळ होता. परंतु दुर्भाग्यानं त्यांची लखनौमध्येही पाठ सोडली नाही. 1856 मध्ये इंग्रजांनी अवध संस्थानावर ताबा मिळवला.

अवधचे शेवटचे नवाब यांची पत्नी बेगम हजरत महल या लग्नापुर्वी कलावंतीण (काही माहितीस्रोतांनुसार) होत्या.

जेव्हा 1857 च्या उठावात बंडखोरांनी कलावंतिणींच्या कोठ्यात आश्रय घेतला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कलावंतिणी

उठावाच्या वेळेस त्यांच्या पतीला हद्दपार करण्यात आलं तेव्हा हजरत महल यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कमी काळात बंडखोर सैनिकांनी लखनौवर ताबा मिळवला आणि त्यांच्य़ा मुलाला शासक घोषित केलं होतं.

1858मध्ये ब्रिटिश फौजांनी लखनौवर दुसऱ्यांदा ताबा मिळाला तेव्हा हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला आणि 1879 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिल्या.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात असंतोष वाढत होता. कलावंतिणीनी पडद्याआडून उठावात सक्रीय भूमिका घेतली होती.

त्या त्यांच्या ब्रिटिश ग्राहकांवर हेरगिरी करायच्या. त्यांना बोलतं करण्यासाठी त्या प्रयत्न करत आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती बंडखोरांपर्यंत पोहोचवत.

बेगम हजरतमहल आणि वाजिद अली शाह

फोटो स्रोत, HURST

फोटो कॅप्शन, बेगम हजरतमहल आणि वाजिद अली शाह

कोठा असं म्हटल्या जाणाऱी त्यांची घरं भेटीची आणि लपण्याची केंद्र झाली. श्रीमंत कलावंतिणी बंडखोरांना आर्थिक मदतही करत.

राव लिहितात," कानपूरची एक कलावंतीण अजिजुन्निसा किंवा अजिजन बाईने 1857 च्या उठावात इंग्रजांविरोधात लढाईही केली.

बंडात सामील झालेल्या लोकांना शिक्षा करायला सुरुवात केल्यावर इंग्रजांनी कलावंतिणींवरही कारवाई केली होती."

सौम्या लिहितात, उत्तर भारतात ज्यांना तवायफ, दक्षिण भारतात देवदासी, बंगालमध्ये बाईजी, गोव्यात नायकिण म्हटलं जाई त्या सर्व व्यावसायिक गायिका आणि नृत्यांगनांना ब्रिटिश साम्राज्यात नाच गर्ल्स म्हटलं जाऊ लागलं आणि 19 व्या शतकाच्या अखेरिस त्यास देहव्यापाराला जोडल गेलं.

अशाप्रकारे शास्त्रीय कलांमध्ये त्यांच्या योगदानाला सामूहिक स्मृतीमधून पुसून टाकलं आणि त्यामुळे त्यांच्या कहाण्यांना इतिहासात एखाद्या कोपऱ्यातलं स्थानही मिळालं नाही.

मुंबई प्रांतातील 'नाच गर्ल्स'

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, मुंबई प्रांतातील 'नाच गर्ल्स'

कलावंतिणींना देहव्यापाराशी जोडणं हे अत्यंत अन्यायकारक चित्रण आहे, असं इतिहासकार विणा ओल्डनबर्ग यांनी आपल्या 'द मेकिंग ऑफ कोलोनियल लखनौ' पुस्तकात लिहिलं आहे.

ओल्डनबर्ग यांनी लखनौच्या कलावंतिणींवर सखोल संशोधन केलं आहे.

त्या लिहितात, जेव्हा इंग्रजांनी 1857च्या बंडात सहभागी असलेल्या लोकांचा शोध घ्यायला सुरू घेतल्यावर त्यांना 'या महिला नाचगाण्या करणाऱ्या होत्या' आणि 'टॅक्स रेकॉर्डमध्ये त्या सर्वाधिक कर भरणाऱ्या' होत्या, म्हणजेच शहरातील त्या सर्वाधिक कमाई असणाऱ्या होत्या हे त्यांच्या लक्षात आलं.

1857 मध्ये ब्रिटिश शासनाविरोधात विद्रोह केल्याचं कारण दाखवून इंग्रजांनी त्यांची घरं, बागा, कारखाने आणि इतर सुखसुविधांची साधनं जप्त केली होती.

देहव्यापार करण्याशिवाय पर्याय उरला नाही

हे फक्त संपत्ती जप्त करण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही तर सर्वात आकर्षक कलावंतिणींना ब्रिटिश छावण्यांत सैनिकांची सेवा करण्यासाठी पाठवलं गेलं.

ज्या कलावंतिणींनी शास्त्रीय संगीत, नृत्य आणि उर्दू साहित्य परंपरेत सुंदर भूमिका बजावली होती त्यांना आता शरीरविक्रय करावा लागला.

सभ्य घरातील मुलांना ज्यांच्याकडे सभ्य कसं वागावं हे शिकण्यासाठी पाठवलं जाई त्यांना आता इंग्रज अधिकारी आणि सैनिकांची शारीरिक भूक भागवावी लागणार होती.

कलावंतीण बाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एक कलावंतीण

या महिला अनेक कलांच्या जनक होत्या. त्या कला लोकप्रिय होण्यासाठी त्यांनी योगदान दिलं होतं.

कथ्थक, दादरा, गझल आणि ठुमरी अशा कलांमध्ये त्या निपुण होत्या. विविध कलांना अनेक रुपांमध्ये त्यांनी जिवंत ठेवलं होतं, आता मात्र त्यांना फक्त नाचण्यापुरतं मर्यादित ठेवलं गेलं.

19 व्या शतकाच्या शेवटी वसाहतवादी प्रशासन, ख्रिश्चन मिशनरी आणि भारतीय समाजसुधारकांनी नर्तिकांविरोधात आंदोलन सुरू केलं. त्यामुळे जनमानस कलावंतिणी आणि नृत्यांगनाविरोधात गेलं. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांधे झाल्यावर काहींनी पोट भरण्यासाठी देहव्यापार करुन जगण्याची वाट धरली. त्यामुळे त्यांचा शरीरविक्रयाशी संबंध अधिक वाढला.

कर्जिटोफ इवानिक लिहितात, "कलावंतिणी शिक्षित, उच्चकुलिन होत्या, त्यांनी भारतीय कलांमध्ये योगदान दिलं होतं हे मान्य आहे, पण त्यांना पुरुषांसाठी 'शारीरसेवा' करावी लागत असे या वास्तवाकडेही दुर्लक्ष करता कामा नये.

अनेक कलावंतिणींवर पुरुषांचं वर्चस्व होतं, काही जणींवर शारीरिक अत्याचारही झाले, काही जणींना कैद्यांसारखं आयुष्य काढावं लागलं. किंवा त्यांच्या शरीरासाठी पुरुष जेव्हा आपसांत भांडायचे तेव्हा शेवटी त्रास या महिलांना भोगावा लागे."

कलावंतिणींच्या आयुष्याला लागलेल्या या ग्रहणांच्या मालिकेची झलक काही साहित्यकृतींमध्ये पाहायला मिळते.

रुमी दरवाजा, लखनौ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रुमी दरवाजा, लखनौ

अमृतलाल नागर यांनी 1960 साली 'ये कोठेवालिया' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.

त्यातील एका गोष्टीत कलावंतिणीबद्दल लिहिलं आहे. "19 व्या शतकात डेरेवाली कलावंतिणींनी एखाद्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवले तर सामान्यतः तो माणूस पूर्ण कुटुंबाची काळजी घेई. कुटुंबप्रमुख वारला तर त्या पुढचं आयुष्य विधवांसारखं जगत."

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अब्दुल हलीम शरर यांनी नवाबांची प्रशासन काळात अवधमधलं जीवन आणि संस्कृतीवर आधारित 'गुजश्ता लखनौ' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात लखनौमधील कलावंतिणीचे तीन वर्ग सांगितले आहेत, त्यामध्ये कंचनीही आहेत. दुसरा वर्ग चुनावाली असा आहे. या महिला आधी चुना विकत आणि नंतर त्या या व्यवसायात आल्या. तिसऱ्या वर्गाला नगराट असं नाव होतं, त्यांचा गुजरातशी संबंध होता. या तिन्हींना 'बाजारच्या राण्या' म्हणत.

त्यांना शरीरविक्रय हा व्यवसाय करावा लागला. यामागे दिल्लीवर नादिरशहा, अहमदशाह अब्दाली सारख्यांच्या हल्ल्यांसारख्या घटनाही कारणीभूत होत्या.

त्या हल्ल्यांमुळे मुघल राजवटीला तडे जात होते आणि या महिलांना जीवनाचा उच्च स्तर शाही संरक्षणाविना राखणं अशक्य होत गेलं असेल.

बडा इमामबाडा, लखनौ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बडा इमामबाडा, लखनौ

त्या इतक्या श्रीमंत आणि बलशाली होत्या हे सांगताना शरर लिहितात, 'हकीम मेहदीसारखे सौम्य स्वभावाचे गृहस्थ अवधचे पंतप्रधान होण्याआधी प्यारू नावाच्या कलावंतिणीवर अवलंबून होते.'

'अवध प्रांताचे प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यावर शासकांना भेट देण्यासाठी प्यारूनं रक्कम दिली होती. कलावंतिणीशी संबंध ठेवले की त्यांना सुसंस्कृत समजलं जात नसे. आताच्या वेळी म्हणजे 1913मध्ये काही कलावंतिणी आहेत ज्यांच्याबरोबर उठबस निंदनीय समजली जात नाही आणि त्यांच्याकडे बेधडक जाता येतं.'

शरर यांनी हे 1857 नंतरच्या काळाचं वर्णन केलंय हे स्पष्ट आहे. कारण तोपर्यंत कलावंतीण ही संस्था इंग्रजांनी नष्ट केली होती.

काझी अब्दुल गफ्फार यांनी 'लैला के खुतूत' ही कादंबरी 1932 साली लिहिली. पत्रांचा वापर असलेली ही उर्दूतली पहिली कादंबरी आहे.

बडा इमामबाडा, लखनौ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बडा इमामबाडा, लखनौ

यामध्ये पुरुषसत्ताक समाजाकडून एका कलावंतिणीला होणारा त्रास त्यांनी लिहिला आहे. आपल्या पत्रातून ती अशा समाजावर टीप्पणी करते.

याच आधारावर अजिज अहमद यांनी या कादंबरीला पुरोगामी कादंबरी म्हटलं आहे. अर्थात पुरोगामी आंदोलन या कादंबरीच्या प्रसिद्धीनंतर 4 वर्षांनी सुरू झालं होतं.

प्रेमचंदांच्या 'बाजार ए हुस्न' या पुस्तकाचाही हाच विषय आहे.

काश्मीरचे महाराज हरिसिंह यांच्या दरबारातील गायिका आणि नृत्यांगना मलिका पुखराज हिच्या कहाण्याही प्रसिद्ध आहेत. सलीम किडवई यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे.

काश्मीरच्या 'नाच गर्ल्स'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काश्मीरच्या 'नाच गर्ल्स'

अशाप्रकारे कलावंतिणींवर शरीरविक्रय करणाऱ्या महिला असा डाग लागला. "1960च्या दशकाच्या मध्यापर्यंत माझ्या वडिलांनी मला मैफिलीमध्ये पाठवणं सुरू केलं आणि इथंच माझ्या साहित्यिक जीवनाची सुरुवात झाली. शहरातल्या प्रसिद्ध कलावंतिणीची पात्रता एखाद्या विद्वानासारखी होती. सभ्य लोकांनी लखनौमधील या महिलांचं बोलणं- आदबशीर वागणं पाहून शिकावं", असं नियाज फतेहपुरी हे शायर सांगतात.

चित्रपट आणि नाटक

नाटक आणि सिनेमातही कलावंतिणीही आपल्या अभिनय आणि साहित्यिक कलेचं योगदान दिलं, असं शरया इला इंसुया सांगतात.

भारतीय सिनेमाच्या जनकमंडळीत जद्दनबाईंचा समावेश होता. त्याचप्रमाणे बेगम अख्तर भारतातील सर्वाधिक सन्मान मिळालेल्या आणि यशस्वी गायिकांपैकी एक होत्या. त्यांना त्यांच्या कलेमुळे 'मलिका ए गझल' म्हटलं जाई.

तवायफ़

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुघल दरबारातले रेसिडेंट डेव्हिड ऑख्टरलुनी हे ब्रिटिश असले तरी भारतीय पोशाख करायचे. या फोटोत ते हुक्का पिताना आणि समोर नाचगाणं सुरू असल्याचं दिसत आहे.

काही कलावंतिणीनी भारतीय संस्कृतीवर दूरगामी ठसा उमटवला.

त्यात सर्वात प्रसिद्ध गौहर जान होत्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ग्रामोफोनवर आपलं गाणं रेकॉर्ड करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार होत्या.

त्यांचे वडील आर्मेनियन आणि आई ब्रिटिश होती, त्यांनी सगळं आयुष्य भारतातच काढलं. गौहर जान यांनी 1900 च्या दशकात रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून अतिशय मोठं यश संपादन केलं होतं.

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी स्वराज फंडात योगदान द्यावं यासाठी गौहर यांच्याशी संपर्क केला. त्यावर महात्मा गांधी कार्यक्रम पाहायला आले तरच आपण निधी गोळा करणारा कार्यक्रम करू असं गौहर यांनी उत्तर पाठवलं होतं.

गांधीजी आले तरच निधी गोळा करायला कार्यक्रम करू याच अटीवर गौहर जानने कार्यक्रम करण्याची तयारी दाखवली.

फोटो स्रोत, BOOK/MY NAME IS GAUHAR JAN

फोटो कॅप्शन, गांधीजी आले तरच निधी गोळा करायला कार्यक्रम करू याच अटीवर गौहर जानने कार्यक्रम करण्याची तयारी दाखवली.

'गांधीजी कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत आणि गौहर जान यांनी 24 हजारातली 12 हजार रक्कम त्यांना पाठवली', असं विक्रम संपत आपल्या 'माय नेम इज गौहर जान' या पुस्तकात लिहितात.

1920 पासून 1922 पर्यंत महात्मा गांधींच्या नेतृत्वात असहकार चळवळ सुरू झाली. त्याला पाठिंबा द्यायला वाराणसीमधील कलावंतिणींनी 'तवायफ सभा' स्थापन केली.

त्याचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या हसिनाबाईने सदस्यांना ब्रिटिशांना विरोध म्हणून दागिन्याऐवजी लोखंडी बेड्या वापरण्यास आणि परदेशी वस्तूंच्या सामानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.

जद्दनबाईसुद्धा एक कलावंतीण आणि प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांनी 1934 साली भारतातली पहिली सिनेमानिर्मिती कंपनी 'संगीत मूव्हीटोन कंपनी' स्थापन केली.

त्यांनी फक्त सिनेमेच तयार केले नाहीत तर पटकथाही लिहिल्या, संगीत दिलं, संवाद लिहिले, अदाकारीही केली. जद्दनबाईंची मुलगी नर्गिस या 1950-60च्या दशकात प्रसिद्ध बॉलीवूड तारका होत्या.

तवायफ़

फोटो स्रोत, BBC/GOPAL SOONYA

फोटो कॅप्शन, सिनेमातलं एक दृश्य

सुफी कथ्थक नृत्यांगना मंजरी चतुर्वेदी सांगतात, "कलावंतीण हा आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. जर नवाबजान कलावंतीणीनं शायरी गायलीच नसती तर मिर्झा गालिबच नसते. या कलावंतिणीनंच मिर्झा गालिबचा आपल्याला परिचय करुन दिला."

कलावंतिणींच्या कलेला, संस्कृतीला देहव्यापाराशी जोडून त्यांचं महत्त्व कमी करण्यात आलं.

राणा सफवी सांगतात, "आता शरीरविक्रयाला तवायफ म्हटलं जातं. जी गाणं-नाचणं शिकवते. ती आता गालिब किंवा दागच्या गझल गात नाही, ती ग्राहकांना खुश करण्यासाठी अश्लील फिल्मी गाणी गाते. आता संगीत किंवा नृत्याचे शौकीन माड्या चढत नाहीत. आता फक्त कोठे उरलेत तिथं मुलींना पळवून किंवा लालूच दाखवून त्यांच्या मनाविरुद्ध आणून शरीरविक्रय करण्यास मजबूर केलं जातं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)