You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रिटनमध्ये राजे चार्ल्स तृतीय यांच्याकडे नेमक्या काय जबाबदाऱ्या असतील?
ब्रिटनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार राजे चार्ल्स तृतीय यांना तातडीने राजगादी सोपवण्यात आली.
ब्रिटनमध्ये संसदीय राजेशाही आहे. म्हणजे, तिथे राजाही आहे आणि संसदही आहे. या दोन्ही संस्था तिथं ताकदवान आहेत आणि एकमेकांना पूरकही.
राजे चार्ल्स तृतीय हे ब्रिटनचे राष्ट्रप्रमुख असतील. राजगादीची ताकद प्रतीकात्मक आणि औपचारिक आहे. ब्रिटनमध्ये राजा राजकीय पातळीवर तटस्थ राहतो.
राष्ट्रप्रमुख म्हणून राजे चार्ल्स तृतीय यांना सरकारी कामकाज आणि निर्णयांची माहिती दर आठवड्याला लेदरच्या लाल बॉक्समध्ये दिली जाईल.
त्याचसोबत, महत्त्वाच्या बैठका किंवा कागदपत्रांचीही आधीपासूनच माहिती दिली जाईल, ज्यांवर त्यांची सही असेल.
पंतप्रधान लिझ ट्रस साधारपणे दर बुधवारी बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजे चार्ल्स तृतीय यांना भेटतील आणि सरकारच्या कामकाजाची माहिती देतील.
ही बैठक पूर्णपणे खासगी असेल आणि यात काय चर्चा होते, याची कुठलीही अधिकृत नोंद ठेवली जात नाही.
राजे चार्ल्स तृतीय यांच्याकडे काही संसदीय कामंही असतात.
राजांकडे काय काय जबाबदाऱ्या असतात?
राजाच्या सर्वांत महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे ब्रिटनमध्ये सर्वसाधारण निवडणुकांनंतर सरकारची नियुक्ती करणं.
निवडणुकीत विजयी होणाऱ्या पक्षाच्या नेत्याला राजा बकिंगहॅम पॅलेसमध्ये बोलावतो आणि सरकार स्थापन करण्यासाठी अधिकृत आमंत्रण देतो.
ब्रिटनमध्ये सर्वसाधारण निवडणुकांपूर्वी सरकार बरखास्त करण्याचे अधिकारही राजाकडे आहेत.
त्याचसोबत, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवातही राजाच्या हस्ते उद्घाटनानंच होते. त्यानंतर ते आपल्या भाषणात सरकारच्या योजना निश्चित करतात. हे भाषण ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये होतं.
संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना औपचारिकरित्या स्वीकृती देणंही राजाचं काम आहे. शेवटचं 1708 सालापासून राजगादीने आजवर कधीच विधेयक मंजूर करण्यास विरोध केला नाहीय.
कॉमनवेल्थचे प्रमुख
त्याचप्रमाणे, दरवर्षी नोव्हेंबरमध्ये 'रिमेम्बरन्स डे' निमित्तानंही आदेश देतात. याला युद्धविराम दिन किंवा 'व्हेटेरन्स डे'ही म्हटलं जातं. कॉमनवेल्थ देशांमध्ये युद्धादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सैनिक आणि सर्वसामान्य लोकांची आठवण म्हणूनही या दिवसाकडे पाहिलं जातं.
नवे राजे कॉमनवेल्थचेही नवे प्रमुख असतील. कॉमनवेल्थ 56 स्वतंत्र देश आणि 2.4 अब्ज लोकांची संघटना आहे.
त्याचसोबत, राजे चार्ल्स तृतीय 14 कॉमनवेल्थ देशांचे राष्ट्रप्रमुखही झाले आहेत.
मात्र, 2021 मध्ये बारबाडोस प्रजासत्ताक बनल्यानंतर, इतर कॅरेबियन कॉमनवेल्थ देशांनीही प्रजासत्ताक बनण्याची इच्छा व्यक्त केलीय.
महाराणीच्या जागी राजा
आता महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे फोटो काढून त्या ठिकाणी राजे चार्ल्स तृतीय यांचे फोटो लावले जातील. पोस्टल सर्व्हिस रॉयल मेलचे नवे स्टॅम्प आणि बँक ऑफ इंग्लंडकडून जारी करण्यात येणाऱ्या नोटांवरही राजे चार्ल्स तृतीय यांचे फोटो लावले जातील.
त्याशिवाय, ब्रिटिश पासपोर्टमध्ये लिहिले जाणारे शब्द बदलून 'हिज मॅजेस्टी' असं केलं जाईल.
राष्ट्रगीताही बदल केला जाईल. 'गॉड सेव्ह द क्वीन'ऐवजी 'गॉड सेव्ह द किंग' असा बदल केला जाईल.
राजे चार्ल्स तृतीय कुठे राहणार?
राजे चार्ल्स तृतीय आणि क्वीन कन्सॉर्ट दोघेही लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये राहतील.
यापूर्वी ते बकिंगहॅम पॅलेसजवळील क्लेरेन्स हाऊस आणि पश्चिम लंडनस्थित हायग्रोव्ह हाऊसमध्ये राहत होते.
प्रिंस विल्यम आणि त्यांची पत्नी प्रिसेस कॅथरीन नुकतेच लंडनच्या केन्सिंग्टन पॅलेसमधून राजधानीच्या बाहेरील बाजूस असलेल्या विंडसरच्या एडिलेड कॉटेजमध्ये राहायला गेलेत.
प्रिंस हॅरी आणि मेगन मर्केल अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहतात.
राजेशाहीबद्दल ब्रिटनमधील लोकांना काय वाटतं?
यावर्षाच्या मध्यात केल्या गेलेल्या यू-गव्ह (YouGov) च्या सर्वेक्षणानुसार, महाराणींच्या प्लॅटिनम जुबलीवेळी 62 टक्के ब्रिटिश नागरिकांचं म्हणणं होतं की, राजेशाही कायम राहिली पाहिजे. तर 22 टक्के लोकांचं म्हणणं होतं की, राष्ट्रप्रमुखपदासाठी निवडणूक झाली पाहिजे.
इप्सॉस मॉरीच्या 2021 च्या दोन सर्वेक्षणांमध्येही जवळपास असंच समोर आलं. सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या प्रत्येक पाचमध्ये केवळ एका व्यक्तीचं म्हणणं होतं की, राजेशाही हटवणं ब्रिटिशांसाठी चांगलं असेल.
मात्र, YouGov च्या सर्वेक्षणाचे निकालातून असं दिसतं की, गेल्या दशकात राजेशाहीच्या समर्थकांमध्ये घट झालीय. 2012 मध्ये राजेशाहीचं समर्थन करणाऱ्यांची संख्या 75 टक्के होती, तीच संख्या 2022 मध्ये 62 टक्के झालीय.
खरंतर वयस्कर लोकांमध्ये राजेशाहीचं समर्थन दिसून येतं, तर युवावर्गात समर्थनाबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत नाही.
2011 मध्ये YouGov ने याबाबत पहिल्यांदा मतदान घेण्यास सुरुवात केली. तेव्हा 18 ते 24 वर्षे वयोगटातील 59 टक्के तरुणांना वाटत होतं की, राजेशाही सुरू राहायला हवी. मात्र, 2022 मध्ये एकूण 33 टक्के तरुणांनीच राजेशाहीचं समर्थन केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)