कॉमनवेल्थ गेम्स 2022 : जेरेमी, मीराबाई चानू, अचिंत, साक्षी, बजरंग यांना सुवर्णपदक

फोटो स्रोत, Sai media
Commonwealth Medals table_Marathi
यंदाची कॉमनवेल्थ स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होत आहे. मागच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या भारताकडून यावेळी अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
इंग्लंडच्या बर्मिंघहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाचं खातं वेटलिफ्टर संकेत सरगरने उघडलं. महाराष्ट्रातील सांगलीच्या संकेत सरगरनं वेटलिफ्टिंगच्या 55 किलो वजनी गटात मिळवलं. संकेतनं 248 किलोचं वजन उचलून रौप्य पदकाची कमाई केली.
त्यानंतर मीराबाई चानूने इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.
- दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव करून कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं.
- अचिंत शेउली यांनी रविवारी (31 जुलै) पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये 73 किलो वर्गात सुवर्णपदक पटकावलं .
- पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये 67 किलो वजनी गटात जेरेमी लालरिनुंगा याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.
- वेटलिफ्टिंगमधील महिलांच्या 55 किलो वजनी गटात 202 किलोचं वजन उचलून बिंदियाराणी देवीनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं.
- वेटलिफ्टर लवप्रीत सिंहने कांस्यपदक मिळवले आहे. 109 किलो वजनी गटात त्याला हे यश मिळाले आहे.
- सुशीला देवीने ज्युडोमध्ये 48 किलोग्राम वजनी गटात रौप्य पदक जिंकलं.
- भारताच्या लॉन बॉल खेळातील महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
- टेबल टेनिसमध्ये पुरुषांच्या संघाने सुवर्णपदक मिळवले आहे.
- प्रियंका गोस्वामीने महिलांच्या 10 किलोमीटरच्या रेस वॉकिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली.
- साक्षी मलिकनं कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं.
- बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात कुस्तीत सुवर्णपदक पटकावले.

फोटो स्रोत, Getty Images
यंदा होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समधले महत्त्वाचे मुद्दे कोणते, जाणून घेऊया…
कॉमनवेल्थ गेम्स म्हणजे काय?
कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धा. ही एक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.
दर चार वर्षातून एकदा या स्पर्धेचं आयोजन होतं. कॉमनवेल्थ राष्ट्रांमुळे या स्पर्धेचं नाव कॉमनवेल्थ पडलं.
कधीकाळी ब्रिटिश साम्राज्य एवढ्या देशात पसरलेलं होतं की ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नाही, असं म्हटलं जाई. याच सर्व देशांना घेऊन या स्पर्धेची सुरुवात झाली.

फोटो स्रोत, Getty Images
आज ही ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेनंतरची सर्वात मोठी जागतिक स्पर्धा आहे.
1930 साली कॅनडातील हॅमिल्टन शहरात पहिल्या कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याकाळी ही स्पर्धा 'ब्रिटिश एम्पायर गेम्स' नावाने ओळखली जायची.
1954 ते 1966 पर्यंत कॉमनवेल्थ गेम्सना ' ब्रिटिश एम्पायर अँड कॉमनवेल्थ गेम्स' म्हटलं गेलं.
पुढे 1970 आणि 1974 मध्ये या स्पर्धेचं नाव 'ब्रिटन कॉमनवेल्थ गेम्स' होतं.

फोटो स्रोत, RYAN PIERSE
1978 साली या स्पर्धेला 'कॉमनवेल्थ गेम्स' हे नाव पडलं आणि ते अजूनही कायम आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची एन्ट्री कधी झाली?
1934 साली दुसरी कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच त्यावेळची ब्रिटीश एम्पायर गेम्स स्पर्धा लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत भारतासह एकूण 16 देशांचे 500 खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, त्यावेळी भारत पारतंत्र्यात असल्याने ब्रिटीशांच्या झेंड्याखाली खेळला होता.

फोटो स्रोत, HUDSON
भारताने केवळ कुस्ती आणि अॅथलेटिक्स या दोनच क्रीडा प्रकार भाग घेतला होता.
17 देशांमध्ये भारताने ब्रॉन्झ मेडल पटकावत खातं उघडलं. त्यावेळी भारत बाराव्या स्थानावर होता.
पुरूष कुस्तीच्या 74 किलो वजनी गटात भारताच्या राशीद अन्वर यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 : केव्हा आणि कुठे होणार?
यंदा कॉमनवेल्थ गेम्स इंग्लडच्या बर्मिंघममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. यात एकूण 72 देशांचे खेळाडू सहभागी होत आहेत.
19 क्रीडा प्रकारांमध्ये 283 मेडल इव्हेंट्स होतील ज्यात 4500 हून अधिक अॅथलिट्स भाग घेतील.

फोटो स्रोत, ADRIAN DENNIS
24 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेत क्रिकेटची एन्ट्री होणार आहे. यंदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आणि T20 क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे.
29 जुलै रोजी महिला क्रिकेटचा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगेल.
बर्मिंघममध्ये कुठे-कुठे रंगणार सामने?
- अॅलेक्झँडर स्टेडिअम - अॅथलेटिक्स, पॅरा अॅथलेटिक्स, सुरुवात आणि सांगता समारोह
- अॅरिना बर्मिंघम - जिमनॅस्टिक
- कॅनक चेस फॉरेस्ट - सायकलिंग
- कोवॅन्ट्री अॅरिना - ज्युडो, कुस्ती
- कोवॅन्ट्री स्टेडिअम - रग्बी
- अॅजबेस्टन स्टेडिअम - क्रिकेट T-20
- ली व्हॅली वेलोपार्क - सायकलिंग
- द एनआयसी - बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेटबॉल, टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग
- सेंडवेल अॅक्वेटिक्स सेंटर - डायव्हिंग, स्विमिंग, पॅरा-स्विमिंग
- स्मिथफिल्ड - बास्केटबॉल, बीच बास्केटबॉल, व्हिलचेअर बास्केटबॉल
- सटन पार्क - ट्रायथलॉन, पॅरा-ट्रायथलॉन
- युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंघम - हॉकी, स्क्वॅश
- व्हिक्टोरिया पार्क - लॉन बॉल्स, पॅरा लॉन बॉल्स
- व्हिक्टोरिया स्क्वेअर - अॅथलेटिक्स
- वॉरविक - सायकलिंग
- वेस्ट पार्क - सायकलिंग
भारतीय संघाची वैशिष्ट्ये
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताकडून एकूण 215 खेळाडू सहभागी होत आहेत. या संघात नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहाई, पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, निखत जरीन यासारखे नावाजलेले खेळाडू आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय संघ कुस्ती, बॉक्सिंग, हॉकी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, महिला क्रिकेट, टेबल टेनिस यासारख्या क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेईल.
अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने नुकतीच कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या 37 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघाचं नेतृत्त्व ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेते नीरज चोप्रा करणार आहेत.
1930 साली कॅनाडातील हॅमिल्टन शहरात पहिल्या कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी या स्पर्धेचं नाव होतं - ब्रिटीश एम्पायर गेम्स. या पहिल्या स्पर्धेत 11 देशांच्या 400 अॅथलिट्सने भाग घेतला होता. महिला खेळाडूंनी केवळ स्विमिंग या क्रीडाप्रकारात सहभाग नोंदवला होता. मात्र, यावर्षीच्या स्विमिंग स्पर्धेत भारत नसणार आहे.
या खेळांकडून असतील अपेक्षा
कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग या क्रीडाप्रकारांमध्ये भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे यंदाही या खेळांमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळतील, अशी अपेक्षा असणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नीरज चोप्रा दुखापतीमुळे यंदाच्या गेम्समध्ये सहभागी होणार नाहीये. त्यामुळे त्याच्याकडून असलेल्या जॅवलीन प्रकारातील पदकाची अपेक्षा संपुष्टात आली आहे.
हॉकी आणि बॅडमिंटन या खेळामध्येही भारत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा
- पी. व्ही. सिंधू
- लक्ष्य सेन
- किदाम्बी श्रीकांत
- अमित पंघल
- निखत जरीन
- लवलीना बोरगोहाई
- मीराबाई चानू
- विनेश फोगाट
- साक्षी मलिक
- रवी कुमार दहिया
- बजरंग पुनिया
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आजवर किती पदकं जिंकली?
1934 ते 2018 पर्यंत भारातने एकूण 503 पदकांची कमाई केली. यात 181 गोल्ड, 173 सिल्व्हर आणि 149 ब्रॉन्झ आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताने बहुतांश अॅथलेटिक्स प्रकारांमध्ये भाग घेतला आणि अनेकदा भारताला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही.
मात्र, पुढे भारताच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली. 2010 साली झालेल्या 19व्या कॉमनवेल्थ गेम्सची जबाबदारी भारताने स्वीकारली. या गेम्समध्ये भारताने 38 गोल्ड, 27 सिल्व्हर आणि 36 ब्रॉन्झ मेडलसह एकूण 101 मेडल पटकावत पदकांचं शतक पार केलं. या स्पर्धेत भारताला दुसरं स्थान मिळालं. तर 74 गोल्ड आणि एकूण 180 मेडल्ससह ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान पटकावलं होतं.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सर्वाधिक पदकं कुठल्या खेळात मिळाली?
1934 सालापासूनची आकडेवारी बघितली तर भारताला सर्वाधिक पदकं शूटिंगमध्ये मिळालेली आहेत. त्यानंतर वेटलिफ्टिंग आणि कुस्तीचा क्रमांक येतो. बॉक्सिंग आणि बॅडमिंटन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
भारताने शूटिंगमध्ये आतापर्यंत 135 पदकांची कमाई केली आहे. यात 63 गोल्ड, 44 सिल्व्हर आणि 28 ब्रॉन्झ आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने आजवर 43 गोल्ड, 48 सिल्व्हर आणि 34 ब्रॉन्झसह एकूण 125 पदकं पटकावली आहेत. भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्सचं पहिलं पदक आणणाऱ्या कुस्ती या क्रीडाप्रकारत भारताने आतापर्यंत 43 गोल्ड, 37 सिल्व्हर आणि 22 ब्रॉन्झ असे एकूण 102 पदकं जिंकली आहेत.
कॉमनवेल्थ गेम्समधील सर्वात यशस्वी भारतीय खेळाडू
ऑलिम्पिक्सच्या ऑफिशिअल वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार पिस्टल शूटर नेमबाज जसपाल राणा कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे सर्वात यशस्वी खेळाडू आहेत. त्यांनी एकूण 15 पदकं जिंकली आहेत ज्यात 9 गोल्ड, 4 सिल्व्हर आणि 2 ब्रॉन्झ मेडल आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








