अलिफिया पठाण: मेरी कोमवरील चित्रपट पाहून तिने बॉक्सर बनण्याचा केला निश्चय

फोटो स्रोत, boxing federation of India
- Author, दिप्ती पटवर्धन
- Role, क्रीडा पत्रकार, बीबीसीसाठी
कोणत्याही खेळात कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात संक्रमण हे कौशल्याचा कसं पाहणारं असतं. नागपूरच्या अलिफिया पठाणने गेल्या महिन्यात कझाकिस्तान इथे झालेल्या एलोरडा चषक स्पर्धेत माजी विश्वविजेत्या खेळाडूला चीतपट केलं तेव्हा तिच्या खेळात कोणतंही नवखेपण जाणवलं नाही. अलिफियाने 81 किलो वजनी गटात लझ्झत कुंगइबायेचा 5-0 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
19वर्षीय अलिफियाच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा टप्पा होता. अलिफियाचा भाऊ शाकीब बॉक्सिंग खेळतो. तो खेळत असताना अलिफिया पाहत असे. दोन भावांच्या पाठीवर असलेल्या अलिफियाला खेळांचा वारसा लाभला आहे.
शाळेत असताना अलिफियाने स्केटिंग, गोळाफेक, थाळीफेक तसंच बॅडमिंटन अशा विविध खेळांमध्ये स्वत:ला आजमावलं.
दोनपेक्षा जास्त वर्षं अलिफिया नागपूरमधल्या माणकपूर इथल्या डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे भाऊ शाकीबबरोबर जात होती.
आम्ही स्टेडियमला जायचो आणि यायचो. माझ्या बॅडमिंटनचे क्लास संपल्यावर भावाला बॉक्सिंग खेळताना पाहत असे असं अलिफिया यांनी सांगितलं.
भावाला खेळताना पाहणाऱ्या अलिफियाला पाहून बॉक्सिंग प्रशिक्षक गणेश पुरोहित यांनी तुला बॉक्सिंग खेळायला आवडेल का? असं विचारलं. उंचीपुरी आणि सदृढ असं तिचं व्यक्तिमत्व होतं. ती चांगलं बॉक्सिंग खेळू शकते असं पुरोहित यांना वाटलं.
त्याच सुमारास म्हणजे 2014 मध्ये महान बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रदर्शित झाला. अलिफियाने हा चित्रपट पाहिला आणि ती प्रेरित झाली. मेरी यांच्या प्रशिक्षकांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर विश्वास ठेवला ते अलिफियासाठी मोलाचं होतं.
"मी घरच्यांना बॉक्सिंग खेळणार असं सांगितलं तेव्हा ते फारसे राजी नव्हते. मी माझ्या पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मी रडले. माझे बाबा खेळायला परवानगी देतील यासाठी जे करता येईल ते केलं.
"मुस्लीम समाजात महिलांना खेळू दिलं जात नाही विशेषत: बॉक्सिंगसारख्या पुरुषबहुल क्षेत्रात तर नाहीच. नातेवाईकांचाही पाठिंबा नाही. मला बॉक्सिंग खेळण्यापासून रोखावं असाच त्यांचा प्रयत्न होता. हेच सगळीकडे घडतं. दीड आठवड्यानंतर बाबांचा विचार बदलला आणि त्यांनी मला बॉक्सिंग खेळायला परवानगी दिली.
माझा भाऊ बॉक्सिंग खेळतो. तुम्हाला वेडेपणा वाटेल पण जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा मोठा भाऊ किंवा बहीण जे करतात ते तुम्हाला करायचं असतं. त्यामुळे मला बॉक्सिंग खेळायचं होतं.
बाबांची परवानगी मिळाल्यानंतर अलिफियाने औपचारिक प्रशिक्षण सुरू केलं. तिचे वडील अक्रम पठाण असिस्टंट सबइन्स्पेक्टर म्हणून काम करतात. सराव असो किंवा स्पर्धा, ते अलिफियाला घेऊन जात. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अक्रम यांच्यावर आहे. अलिफियाबरोबर जाता यावं यासाठी त्यांनी नाईट शिफ्टची ड्युटी केली.
अलिफियाच्या कारकीर्दीत तिच्या वडिलांची भूमिका मोलाची आहे असं प्रशिक्षक पुरोहित सांगतात.
अलिफियाकडे ताकद आणि गुणवत्ता होती. तिची शिकण्याची तयारी होती. तिला जे काही सांगत असे त्याचं ती काटेकोरपणे पालन करत असे. दिलेलं काम झालं की आता काय करू असा तिचा प्रश्न असे. अलिफिया डावखुरी आहे. आपल्याकडे डावखुरे बॉक्सिंगपटू ही दुर्मीळ प्रजात आहे. ती ज्या वजनी गटातून खेळतो गट म्हणजे 81 किलो वजनी गट- या गटातून खेळणारी महिला बॉक्सिंगपटू दुर्मीळ आहे.
भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर जे यश मिळालं आहे ते प्रामुख्याने हलक्या वजनी गटांमध्ये मिळालं आहे. मेरी कोम असो किंवा निखात झरीन- दोघींनीही तुलनेने कमी वजनी गटात यश मिळवलं आहे.

फोटो स्रोत, IBA
गेल्या वर्षी टोकियो इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमधले वजनी गट वाढवण्यात आले आणि 5 विविध गटांमध्ये स्पर्धा झाली. मिडलवेट 75 किलो हा सर्वाधिक वजनी गट होता. 81+ वजनी गटात तुमच्यासमोर कितीही वजनाचा बॉक्सर प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्यासमोर उभा ठाकू शकतो. म्हणजे माझं वजन 83 किंवा 84 किलो असेल तर माझ्यासमोर 95-96 वजनाचा खेळाडू प्रतिस्पर्धी असू शकतो. हा गट म्हणजे एकप्रकारे खुला गट आहे. शक्तीप्रमाणेच वजन हा मुद्दाही निर्णायक ठरतो.
तिला चांगला सराव मिळावा यासाठी अलिफिया मुलांबरोबर खेळत असे. अलिफियाला अधिक वयाच्या वयोगटातून खेळावं लागत असे कारण तिच्या वजनी गटात प्रतिस्पर्धीच मिळत नसत.
गेल्यावर्षी एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अलिफियाच्या वडिलांनी सांगितलं होतं की अलिफियाला U-17 वयोगटातून खेळावं लागलं होतं जेव्हा ती U14 वयोगटात होती.

फोटो स्रोत, Boxing Federation of India
अलिफिया अनुभवी बॉक्सर्सविरुद्ध खेळू शकते हा विश्वास प्रशिक्षक पुरोहित यांनी तिच्या वडिलांना, घरच्यांना दिला.
2016 मध्ये झालेल्या ज्युनियर नॅशनल स्पर्धेने अलिफियाला पहिल्यांदा नाव मिळवून दिलं.
"माझ्या पहिल्या नॅशनल्समध्ये मी रौप्यपदकाची कमाई केली. मी 3-2 असा मुकाबला जिंकले होते. नागपूरमध्ये बॉक्सिंगसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत पण शहरात या खेळासाठी मोठी आवड अशी दिसत नाही."
"हरियाणात जसं बॉक्सिंगपटू घडतात तसं इथे नाही. नॅशनल्स स्पर्धेत हरयाणाच्या बॉक्सिंगपटूंविरुद्ध खेळताना मी थोडी दडपणाखाली होते. पण मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं. माझ्यासाठी तो मोठा क्षण होता. मी सुवर्णपदकाच्या अगदी समीप आले होते. माझ्याकडे कोणताही अनुभव नव्हता. तरीही पहिल्याच नॅशनल्समध्ये मी पदकाची दावेदार होते. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण या खेळात कारकीर्द करू शकतो," अलिफिया पठाण.

फोटो स्रोत, IBA
राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर अलिफियाने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली. अलिफियाने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत तसंच जागतिक युथ चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर या वजनी गटात अनेक पदकं पटकावणं सुखद आहे. अलिफिया सध्या हरियाणातल्या रोहतक इथल्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स याठिकाणी सराव करते. "अधिक वजनी गटातही भारताचे खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात हे मला पटवून द्यायची संधी आहे. एलोरडा चषकातल्या सुवर्णपदकाने याची सुरुवात झाली आहे," असं अलिफियाने सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








