जो रूट: 10 वर्षं, 10000 धावा, आयपीएल न खेळणाऱ्या रूटची अविश्वसनीय भरारी

जो रूट, इंग्लंड, क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जो रूट
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये जो रूटने 26वं शतक झळकावताना 10,000 धावांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा तो केवळ 14वा बॅट्समन आहे.

2008 मध्ये आयपीएल सुरू झालं. दीड महिना खेळून वर्षभराची पुंजी मिळवून देणारी स्पर्धा असं याचं वर्णन केलं जाऊ लागलं. साप-हत्ती-मांत्रिकांचा देश म्हणून भारताला हिणवणारे आता भारतीय संस्कृतीचं गुणगान गाऊ लागले. विदेशी सुपरस्टार कधी नावही न ऐकलेल्या भारतीय खेळाडूशी हितगुज करताना दिसू लागले. भारत दौऱ्यात पॅक्ड फूड आणि तिकडचंच पाणी घेऊन येणारे आता इथली रोटी-नान, बटर चिकन चापू लागले.

क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांचे सर्व प्रमुख खेळाडू, प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर्स, अंपायर्स, कॉमेंटेटर्स, तंत्रज्ञ एप्रिल-मे महिन्यात भारतात तळ ठोकून राहू लागले. आयपीएलमधल्या धावांची-विक्रमाची चर्चा होते, विकेट्सची चर्चा होते.

पूर्वी आयपीएल पार्टी चर्चेत असायच्या. खेळाडूंचे नखरे चर्चेत असतात. बक्षीसांची होणारी लयलूट डोळे दिपवून टाकते. पिपाण्या फुंकत मैदानं भरून टाकणारे चाहते अचंबित करतात. टेलिव्हिजन राईट्स मिळवण्यासाठी चॅनेल जेवढा पैसा देतात ते ऐकून दिग्मूढ व्हायला होतं.

2008 पूर्वीचं क्रिकेटविश्व आणि 2008नंतरचं म्हणजे आयपीएल सुरू झाल्यानंतरचं क्रिकेटविश्व असे थेट दोन तट उभे राहतात. आयपीएलोत्तर काळात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटलावर आला. खेळू लागला.

त्याने कसोटी प्रकाराची कास धरली. सगळे समकालीन आयपीएलच्या बाजारात कोटीच्या कोटींना विकले जात असताना तो दूरवरून पाहत राहिला. इंग्लंडचं अतिव्यग्र वेळापत्रक लक्षात घेऊन इंग्लंड क्रिकेट बोर्डानेच रुटला आयपीएल न खेळण्याची सूचना केली होती. काहीवेळेस त्याने लिलावासाठी दिलेलं नाव मागे घेतलं. आजूबाजूचा प्रत्येकजण

आयपीएलच्या दिशेने धाव घेत असताना या स्पर्धेच्या निव्वळ प्रेक्षक या भूमिकेत राहिलेल्या जो रूटने आज टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा ओलांडला. 26वं शतक झळकावताना रूट दहा हजारी मनसबदार झाला. महत्त्वाचं हे की रूट जेमतेम 10 वर्षं खेळलाय आणि या दहा वर्षात त्याने या विक्रमाला गवसणी घातलेय. तगडा फिटनेस आणि कमाल सातत्य याशिवाय हे जमू शकत नाही. रूट दोन्ही आघाड्यांवर एकदम खंबीर आहे.

जो रूट, इंग्लंड, क्रिकेट

फोटो स्रोत, STU FORSTER

फोटो कॅप्शन, जो रूट

या दहा वर्षांपैकी शेवटची चार-पाच वर्षं त्याने कर्णधारपदाचा काटेरी मुकूटही पेलला. कर्णधारपदाला न्याय देता येत नाही हे समजल्यावर रूट बाजूला झाला. कर्णधारपदाचं जोखड बाजूला झाल्यानंतर रूटची बॅट त्वेषाने तळपली. फलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या खेळपट्टीवर रूटने टेस्टच्या चौथ्या डावात शतक झळकावत इंग्लंडला शानदार विजय मिळवून दिला.

एकाच कालखंडात खेळायला सुरुवात केलेले आणि दमदार प्रदर्शनासह आपापल्या संघांचे आधारवड झालेल्या चार खेळाडूंना फॅब फोर म्हटलं जातं. विराट कोहली, केन विल्यमसन, स्टीव्हन स्मिथ, जो रूट या चौकडीला फॅब फोर म्हणतात. सातत्य, स्टाईल, फिटनेस या बाबतीत कोहलीचा हात कोणी धरू शकत नाही. संतपदी पोहोचल्यावर जसं वागतात तसं वर्तन असणारा केन विल्यमसन मखमली बॅटिंगसाठी ओळखला जातो.

अनाकर्षक आणि तुडतुड पद्धतीने बॅटिंग करणारा स्टीव्हन स्मिथ बॉलर्सना वात आणून रन्स करतो. जो रूटचा खेळ पाहिला तर अचंबित व्हावं, भान हरपून जावं असं चित्ताकर्षक काही नाही पण कष्टाने धावा जोडणारा कार्यकर्ता अशी त्याची ओळख. फॅब फोर दरम्यानच्या स्पर्धेत रूट नेहमी मागे असायचा. पण ससा-कासव शर्यतीसारखं रूटने बाकी तिघे संथ झालेले असताना जोरदार मुसंडी मारली आहे.

बॅटपॅड एकत्र घेऊन सरळ बॅटने डोकं स्थिर स्थितीत ठेऊन खेळणारा भिडू अशी रूटची ओळख आहे. बॅट आणि मनगट योग्य कोनात वाकवून बॉल थर्डमॅनला डॅब करणं ही रूटची खासियत. त्याचा बॅकफूट पंच खणखणीत असतो.

पदलालित्य उत्तम असल्यामुळे स्पिनरला स्वीप करणं, पट्ट्यात म्हणजे मिडविकेटला पिटाळणं, डाऊन द ट्रॅक येत साईटस्क्रीनवर फेकून देणं, कट करणं हे सगळं रूट लीलया करतो. तंत्र उत्तम असल्यामुळे पूल आणि हूक या कठीण फटक्यांवरही रूटचं प्रभुत्व आहे. मोठी स्ट्राईड घेऊन गवताच्या ठिकऱ्या उडवणारा कव्हर ड्राईव्हही त्याच्या भात्यात आहेत.

जो रूट, इंग्लंड, क्रिकेट

फोटो स्रोत, DAN MULLAN

फोटो कॅप्शन, जो रूट

फटकेबाजीच्या आधी रूट भरपूर एकेरी-दुहेरी धावांचा रतीबच मांडतो. रनिंग बिटवीन द विकेट्स सफाईदार आहे. शतक झाल्यानंतरही थकलाय, मरगाळला असं रूटचं होताना दिसत नाही. रूटला द्विशतक खुणावत असतं.

डॅडी हंड्रेडचा रूटचा प्रयत्न असतो. अशी खेळी खेळायची की संघाच्या विजयाचा पायाच रचून द्यायचा हाच रूटचा दृष्टिकोन असतो. कुक आणि पीटरसन यांच्यानंतर इंग्लंडला तंत्रशुद्ध बॅट्समन हवा होता, रूटने ती गरज हेरली आणि ती भूमिका दशकभर चोखपणे सांभाळली.

ट्वेन्टी20च्या आक्रमणामुळे इंग्लंडच्या संघात बरेच स्ट्रोकमेकर आहेत. पण खेळपट्टी रागरंग दाखवत असताना तब्येतीत इनिंग्ज उभारणारे दुर्मीळ आहेत. रूट त्यात अव्वल आहे. गेल्या दोन तीन वर्षात रूटवगळता इंग्लंडच्या बाकी बॅट्समनची अधोगतीच चालली आहे. बाकी मंडळी ढेपाळत असतानाही रूटची बॅट म्यान झाली नाही, ती तळपतेच आहे.

घरच्या मैदानावर शेर असणारे मातब्बर बॅट्समन परदेशात गेल्यावर एकदम अण्णू होतात. रूटचं तसं कधीच झालं नाही. त्याने घरी रन्स केल्या, प्रतिस्पर्ध्यांच्या घरात जाऊनही केल्या. आग ओकणाऱ्या बॉलर्सचा सामना करून रन्स केल्या, हातभर बॉल वळवणाऱ्या स्पिनर्ससमोरही केल्या. जर्सीचा चिखल होणाऱ्या उकाड्यात केल्या, हुडहुडी भरवणाऱ्या थंडीतही केल्या.

जो रूट, इंग्लंड, क्रिकेट

फोटो स्रोत, GARETH COPLEY

फोटो कॅप्शन, जो रूट

इंग्लंडमधल्या ढगाळ वातावरणात बॉल मस्त स्विंग होत असताना रूटने आपलं कौशल्य सिद्ध केलं. रूट स्वत:साठी खेळत नाही. म्हणूनच रूट खेळला की इंग्लंड जिंकतं. अलिस्टर कुककडून कर्णधारपद मिळाल्यानंतरही बॅट्समन रूटची भूक कमी झाली नाही. जे आव्हान समोर ठेवलं ते रूटने समर्थपणे पेललं.

दशकभरात इंग्लंडची टेस्ट असली की रूट त्या टीममध्ये असतोच. रूटने दुखापतीमुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे 5-6 टेस्ट खेळू शकला नाही.

रूट आयपीएल खेळत नसला तरी इंग्लंडसाठी वनडे आणि ट्वेन्टी-20 खेळतो. इंग्लंडकडे ट्वेन्टी20 फॉरमॅट स्पेशालिस्ट खेळाडू तयार झाल्याने रूट या प्रकारापासून दूर झाला. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये 50 ओव्हरचा वर्ल्डकप झाला. त्यात इंग्लंडतर्फे सर्वाधिक रन्स रूटनेच केले होते.

जग प्रत्येक क्षेत्रात वेगवान होत असताना रूट टेस्टमध्येच रमला. किराणा दुकानात जाऊन यादी टाकणे हा एक रंजक उपक्रम असतो. आता कोणी 30 मिनिटात वस्तू घरी देतं, कोणी 20 मिनिटात. काहींनी तर 10 मिनिटात धडकतो घरी अशी जाहिरात केलेय. काही तर तुमच्या मनात आलं की गाडीवानाला पिटाळतात. अशा सुपरडुपर काळात रूट दिवसदिवस खेळपट्टीवर नांगर टाकून असतो.

आयपीएलसारख्या जगभरात चालणाऱ्या लीगमधील संघांच्या जर्सी पाहिल्यात तर तुम्हाला सर्कसची आठवण येईल. डोळ्यात घुसतील अशा रंगांचे कपडे घालून मित्रमंडळी खेळत असताना रूटने व्हाईट्समध्येच राहणं पसंत केलं. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेत सिडनी थंडर संघाकडून रूटने खेळून बघितलं पण दोन हंगामातच तो बाजूला झाला.

जो रूट, इंग्लंड, क्रिकेट

फोटो स्रोत, VISIONHAUS

फोटो कॅप्शन, जो रूट

प्रवाहाविरुद्ध पोहा. वेगळी वाट निवडा. रूटीन जगू नका. हे सांगोवांगी छान वाटतं ऐकायला. जेव्हा खरंच अशी वाट निवडायची वेळ येते तेव्हा पाय लटपटू लागतात. रूटने स्वेच्छेने ही वाट निवडली, त्यावर नुसता चालत राहिला नाही तर स्वत:च्या कामगिरीने ती वाट उजळवून टाकली.

रूटच्या या धाडसामुळे या वाटेवर जाऊया असं म्हणणाऱ्यांना एक भक्कम आधारवड रुटच्या रुपात उभा राहिला. चमको जगापासून दूर राहूनही रूट कालबाह्य झाला नाही.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुटचं वय आहे फक्त 31. त्याचा फिटनेस बघता तो आणखी पाच वर्ष सहज खेळू शकतो. टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 रन्सचा ओलांडणारा तो फक्त 14वा खेळाडू आहे. या मांदियाळीत स्थान पटकावणारा तो सगळ्यांत तरुण कार्यकर्ता आहे.

10,000 धावा रूटने 9 वर्षं आणि 171 दिवसांतच केल्या आहेत. हाही एक विक्रमच आहे. या यादीतलं कोणीच सर्वसाधारण नाही. रूटचा खेळ सरळ, सोपा वाटतो. कठीण काम तो सोपं करून दाखवतो.

रूटने कारकीर्दीची सुरुवात नागपुरात केली होती. निळे डोळे, ब्राऊन रंगाचे केस, मिश्कील हसणारा, शिडशिडीत बांध्याचा हा पोरगेला तरुण टेस्ट क्रिकेटसाठी तय्यार आहे का अशी टीकाही झाली होती. रूटने आपल्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिलं.

गंमत म्हणजे दहा वर्षानंतरही रूट तसाच दिसतो. खंडप्राय अशा आपल्या देशाच्या मध्यबिंदूतून रूटचा प्रवास सुरू झाला. आज या प्रवासातलं उत्तुंग शिखर रूटने गाठलं. रुट नावाची पताका यापुढेही शिखरांवर फडकत राहील याची खात्री वाटते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)