'ते' 33 सेकंद आणि सुरू झाला 40 वर्षांहूनही अधिक काळ चाललेला संघर्ष

ट्रुमन

कॅपिटल हिलवरील खचाखच भरलेल्या प्रतिनिधी सभागृहात गोल चष्मा, काळ्या रंगाचा सूट आणि एक पट्टेदार टाय घातलेले अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष 62 वर्षीय हॅरी ट्रुमन यांनी काळ्या रंगाचे फोल्डर उघडले. या फोल्डरमधील भाषण त्यांना वाचायचे होते.

ते एक घोट पाणी प्यायले. या प्रतिनिधीगृहात उपस्थित असलेल्या लोकांवर एक नजर टाकली, पोडियमवर आपला हात ठेवला आणि म्हणाले - "आज जगासमोर जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात माझी उपस्थिती आवश्यक आहे. यात परराष्ट्र धोरण आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा समावेश आहे."

12 मार्च 1947 ही घटना आहे.

फक्त दोन वर्षांपूर्वी अशी धारणा निर्माण झाली होती की, हिटलरच्या जर्मनीविरुद्ध विजय मिळवल्यामुळे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा भक्कम झाली आहे. पण त्याच वेळी राष्ट्राध्यक्षांनी त्याहूनही गंभीर धोक्याकडे लक्ष वेधले.

त्यांनी केलेल्या भाषणाला नंतर 'ट्रुमन सिद्धांत' म्हटले जाऊ लागले. या भाषणात त्यांनी साम्यवाद आणि सोव्हिएत संघाला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिका आणि दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेच्या सहकाऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

शीतयुद्धाची सुरुवात कधी झाली हा एक गुंतागुंतीचा आणि वादाचा मुद्दा आहे आणि ट्रुमन सिद्धांत हे त्यांचे कारण नव्हते हे निश्चित आहे. पण काही इतिहासकारांच्या मते जेव्हा ही घोषणा झाली तीच शीतयुद्धाची सुरुवात होती.

इतक्या लवकर आशेचे पर्यवसान भीतीमध्ये कसे झाले?

कोणता बदल झाला होता?

व्हर्जिनिया विद्यापीठातील प्राध्यापक, शीतयुद्ध आणि अमेरिकेचे परराष्ट्र धोरण या विषयांवर लिहिल्या गेलेल्या अनेक पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे लेखक मेल्विन लेफलर यांच्यानुसार फार काही बदल झाला नव्हता. त्यांच्या मते सोव्हिएत संघाच्या स्थापनेपासूनच पाश्चात्य देशांशी त्यांचे तणावपूर्ण संबंध राहिले आहेत.

"अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने 1917, 1918, 1919 मध्ये रशियामध्ये हस्तक्षेप केला होता."

ट्रुमन सिद्धांत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रुमन सिद्धांत

"दुसऱ्या महायुद्धादरम्यान पश्चिम युरोपात दुसरी आघाडी उघडण्याबद्दल तणाव होता. स्टॅलिनना 1942 मध्ये अशी आघाडी स्थापन करायची होती, आणि 1944 पर्यंत असे निश्चितपणे झाले नाही."

ट्रुमन सिद्धांताच्या परिणाममुळे ओढवलेल्या संकटाचे स्टालिनकाळातील एक व्यंगचित्र

"या व्यतिरिक्त, अमेरिकनांनी आणि इंग्रजांनी अणुबॉम्बची निर्मिती केली होती आणि ही बाब त्यांनी स्टॅलिनपासून लपवून ठेवली होती. स्टॅलिनला ही बातमी त्यांच्या हेरांकडून समजली. किंबहुना हेरगिरी सुरू आहे हे अमेरिकनांना माहीत होते."

"पण नाझी जर्मनी, इटली आणि जपानचा पराभव करण्याच्या गरजेपोटी बाकी सगळ्या मुद्यांकडे काहीशी डोळेझाक केली होती."

डॉमिनो सिद्धांत

युद्ध संपल्यावर अमेरिकन धोरणकर्त्यांची प्राथमिकता ही होती की, कोणत्याही विरोधकाकडे युरोप आणि आशियाच्या साधनस्रोतांवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता राहता कामा नये.

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

इतिहासकार लेफलर स्पष्टपणे म्हणतात की, "स्टॅलिनचा यूएसएसआर लष्करी हल्ल्यात सहभागी होईल, ही भीती 1946 व 1947 मध्ये नव्हती."

या इतिहासकाराने 'बीबीसी द फोरम'ला सांगितले, "त्याहून जास्त भीती ही होती की, युरोपातील वर्तमान सामाजिक उलथापालथ आणि राजकीय उलथापालथीचा तो फायदा घेऊ शकेल. त्याचे सैनिक असलेल्या केवळ पूर्व युरोप किंवा मध्य युरोपातील काही भागात नव्हे, तर जिथे कम्युनिस्ट पक्षांनी इटली व फ्रान्समध्ये यशस्वीपणे सत्ता गाजवली होती तिथे स्टॅलिनकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे, अशी भीती अमेरिकनांना वाटत होती."

या व्यतिरिक्त कम्युनिस्टांनी चीनमध्ये यादवी युद्ध सुरू केले होते. तिथे त्यांचा विजयाचा अर्थ हाच होता की, स्टॅलिन पूर्व आशियात आपले पाय रोवण्यात यशस्वी झाले असते.

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर अनेक दशके प्रभाव असलेल्या डॉमिनो सिद्धांतानुसार अजून एक भयानक शक्यता होती. ती म्हणजे साम्यवादाने गैर-साम्यवादी देशाचा 'पराभव' झाल्यास शेजारच्या गैर-साम्यवादी देशांमध्ये साम्यवादाला चालना मिळू शकते.

शाब्दिक बाण

अगणित कारवायांव्यतिरिक्त, जी गोष्ट प्रत्येक पक्षाला त्रास देत होती, ती होती शाब्दिक बाणांच्या फैरी, ज्याने 'ट्रुमन सिद्धांता'साठी एक मार्गच तयार केला.

स्टॅलिनने 1946च्या सोव्हिएत संघाच्या संसदीय निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भाषण केले होते

केनन हे 'द वाइझ मेन' या पररराष्ट्र धोरणांच्या सन्मानित गटातील सदस्यांपैकी एक होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केनन हे 'द वाइझ मेन' या पररराष्ट्र धोरणांच्या सन्मानित गटातील सदस्यांपैकी एक होते.

9 फेब्रुवारी 1946 रोजी मॉस्कोमध्ये स्टॅलिनने युद्धानंतरच्या आपल्या पहिल्या महत्त्वपूर्ण भाषणात अजून एका मोठ्या युद्धाची शक्यता बोलून दाखवली. त्यांनी या युद्धाला अप्रत्यक्षपणे 'जगाच्या अर्थव्यवस्थेतील भांडवलशाही व्यवस्था' म्हटले.

त्यांनी जाहीर केले की, मोठा 'लष्करी हल्ला' अपरिहार्य आहे. काऱण देशांमध्ये 'समन्वयाने आणि शांतीपूर्ण निर्णयांच्या' माध्यमातून कारवाई करण्याची कोणतीही पद्धत नाही.

"भांडवलशाही देशांचा अनियमित विकास कालानुक्रमे त्यांच्या संबंधांना गंभीर संघर्षाच्या दिशेने घेऊन जातो. जे देशांच्या समूहांना वाटत असते की, त्यांना कच्चा माल आणि निर्यात बाजारपेठ पुरशा प्रमाणात प्राप्त झालेली नाही, ते देश परिस्थिती बदलण्यासाठी आणि हत्यारांच्या बळाने हे घटक आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करतात."

म्हणूनच, येणाऱ्या काळात "सर्व संकटांविरुद्ध" यूएसएसआरला आपल्या संसाधनांना आणि ऊर्जेला पायाभूत उद्योगांच्या विकासासाठी सज्ज करण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

एक मोठी तार

अमेरिकेतील ओहायो येथील वूस्टरमधील 'द कॉलेज ऑफ एज्युकेशन'मधील कम्युनिकेशन स्टडीज विषयाचे प्राध्यापक डेनिस बोस्टडॉर्फ यांनी बीबीसीच्या द फोरमला सांगितले, "ट्रुमनसह अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. इतरांनी या भाषणाला तिसऱ्या महायुद्धाची घोषणा म्हणून पाहिले."

उदाहरणार्थ- स्टॅलिन म्हणाले होते की, "वैज्ञानिक शोधांना देशाबाहेर पोहोचविण्यासाठी ते विज्ञानाला निधी पुरवू इच्छितात. अनेकांनी याचा संदर्भ अणुबॉम्बशी लावला. आणि जेव्हा ते म्हणाले की, यूएसएसआर आपल्या स्टीलचे उत्पादन तिप्पट करेल तेव्हा काही अमेरिकन अधिकारी आणि काही माध्यम संस्थांनी अर्थ काढला की, ते पाश्चिमात्यांशी युद्धाची तयारी करत आहेत."

परराष्ट्र व्यवहारांची जबाबदारी असलेल्या अमेरिकन परराष्ट्र विभागाने मॉस्कोमधील आपल्याला दूतावासाला सोव्हएत विस्तारवाद आणि जगाबद्दल त्यांच्या असलेल्या भूमिकेचे विश्लेषण करण्यास सांगितले.

तत्कालीन, तुलनेने कमी प्रसिद्ध असलेले मुत्सद्दी जॉर्ज केनन यांची प्रतिक्रिया स्फोटक होती.

फुल्टन, मिसौरी येथे चर्चिल आणि ट्रुमन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फुल्टन, मिसौरी येथे चर्चिल आणि ट्रुमन

केनन हे 'द वाइझ मेन' या पररराष्ट्र धोरणांच्या सन्मानित गटातील सदस्यांपैकी एक होते.

केनन यांनी 8 हजार शब्दांची एक तार तयार केली. यात त्यांनी अनेक रुपकांचा वापर केला : साम्यवाद हा एक मोठ्या आजारासारखा आहे. तो शरीराच्या पावित्र्याचे उल्लंघन करतो आणि त्याचा आतून नाश करतो.

"कामगार संघटना, नागरी हक्क संघटना, सांस्कृतिक गटांमध्ये कम्युनिस्टांच्या संभाव्य घुसखोरीचीही त्यांना चिंता होती. त्या परिस्थितीत शत्रू आत होता आणि ही घुसखोरी जवळजवळ बलात्कारासारखीच आहे."

त्यांनी इशारा दिला होता की, सोव्हिएत धोरणांनी पाश्चिमात्य देशांशी वैर निर्माण केले आहे आणि सोव्हिएत विस्तारवादाला टाळले जाऊ शकत नाही. त्यांच्या मते प्रखर विरोधाने मॉस्को पिछाडीवर जाऊ शकेल, मग तो विरोध राजकीय पातळीवर असो वा लष्करी पातळीवर. "दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णावर काटेकोर व सतर्क राहून नियंत्रण ठेवण्याच्या" धोरणाची शिफारस केली होती.

'द लाँग टेलिग्राम' या नावाने प्रसिद्ध झालेली ही तार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली आणि या तारेने दुसऱ्या प्रकारच्या अधिक तर्कसंगत विश्लेषणांना आवाज बंद केला.

शांतीचे स्तंभ

काही आठवड्यांनी 1946 च्या सुरुवातीला मिसोरीमधील फुल्टनमध्ये दिलेल्या एका भाषणात तत्कालीन ब्रिटिश युद्धकालीन नेते विन्स्टन चर्चिल यांनी या शाब्दिक युद्धात उडी घेतली. ते म्हणाले, 'युरोपातील विद्यमान परिस्थितीबद्दल काही तथ्ये समोर ठेवत आहे.'

डाव्याबाजूने उजवीकडे: 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रात नोविकोव, अँड्री विशिंस्की आणि परराष्ट्रमंत्री वियाचेस्लाव मोलोटोव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डाव्याबाजूने उजवीकडे: 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रात नोविकोव, अँड्री विशिंस्की आणि परराष्ट्रमंत्री वियाचेस्लाव मोलोटोव

"बाल्टिक समुद्रातील स्टेटिनपासून अॅड्रियाटिक समुद्रातील ट्रायस्टेपर्यंत लोखंडी भिंत बांधण्यात आली आहे."

"या मागे मध्य व पूर्व युरोपातील प्राचीन देशांच्या सर्व राजधान्या आहेत. मला असे म्हणावे लागते की, वरसॉ, बर्लिन, प्राग, व्हिएन्ना, बुडापेस्ट, बेलग्रेड, बुकारेस्ट आणि सोफिया ही सर्व प्रसिद्ध शहरे आणि तेथील नागरिक आणि त्यांच्या आजुबाजूला असलेले देश कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोव्हिएत प्रभावाखाली आहेत. केवळ सोव्हिएतचा प्रभावच नव्हे तर अनेक बाबतीत त्यांच्यावर मॉस्कोचे नियंत्रण वाढतच चालले आहे."

त्यांच्या 'पिलर्स ऑफ पीस' या भाषणात स्टॅलिन यांनी चर्चिलवर युद्ध-पिपासू असल्याचा आरोप केला.

मिसोरी येथील फुल्टन येथे चर्चिल आणि ट्रुमन, जिथे चर्चिल यांनी आपले प्रसिद्ध भाषण केले होते.

"स्टॅलिन प्रचंड रागावले होते."

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधील आंतरराष्ट्रीय इतिहास विषयाचे प्राध्यापक व्लादिल्साव्ह जुबोक म्हणताता,

"काही महिन्यांपूर्वीपर्यंत चर्चिल विस्मृतीत गेले आहेत असे वाटत होते, पण ते आता अमेरिका-यूके यांच्यातील लष्करी युती सादर करत होते."

"त्यामुळे स्टॅलिन यांचा संशय वाढत गेला. त्यांनी सोव्हिएत लोकांना अजून जास्त स्टीलची निर्मिती करण्याचे आवाहन केले आणि सोव्हिएत शास्त्रज्ञांना गुप्तपणे अणुबॉम्बची निर्मिती करण्याचे आवाहन केले. त्यांना तिसरे महायुद्ध सुरू करायचे नव्हते, पण त्यांना असुरक्षित वाटत होते आणि जिंकायचे असेल तर अणुबॉम्बची शक्ती असेल असे त्यांनी स्वतःला ठासून सांगितले."

नोव्हिकोव्ह तार

एकीकडे पाश्चिमात्य देश पुढील महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये सोव्हिएतच्या हेतूंबद्दल एक स्पष्ट चित्र प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे सोव्हिएतसुद्धा आपल्या माजी सहकाऱ्यांचा मानस समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.

ट्रुमन

केनन लाँग टेलिग्रामप्रमाणेच त्याचाच सोव्हिएत अवतार असलेला अमेरिकेतील सोव्हिएत राजदूत निकोलाय नोव्हिकोव्हने एक तार लिहिली होती. ती सप्टेंबर 1946 रोजी पाठवली.

त्यांनी लिहिले होते की, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आर्थिकदृष्ट्या भक्कम झाली आहे आणि तो देश जगावर नियंत्रण ठेवण्यास इच्छुक आहे.

"अमेरिकन परराष्ट्र धोरण अमेरिकन मक्तेदारीवादी भांडवलाची साम्राज्यवादी वृत्ती दर्शवते. युद्धोत्तर काळात जागतिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उद्देश या वृत्तीमधून दिसून येतो."

"राष्ट्राध्यक्ष ट्रुमन आणि अमेरिकन सत्ताधारी मंडळांच्या प्रतिनिधींच्या अनेक विधानांचा गर्भित अर्थ हाच निघतो की, जगाचे नेतृत्व करण्याचा अधिकार अमेरिकेला आहे. अमेरिकन सैन्य, हवाई दल, नौदल, उद्योग आणि विज्ञान ही सर्व शक्ती या परराष्ट्र धोरणासाठी कार्यरत आहे."

नोव्हिकॉव्हच्या तारेने आपल्या प्रभावाचा विस्तार करण्यासाठी आणि पूर्व युरोपमध्ये आपल्या बफर झोनला सुरक्षित करण्यासाठी सोव्हिएत दृढ संकल्पाची पुष्टी केली.

यामुळे पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या दोन्ही पक्षांमध्ये शंका, संशय आणि विश्वासर्हतेची उणीव पुन्हा एकदा दिसून आली.

मृत्यूचे भय

21 फेब्रुवारी 1947 रोजी परराष्ट्र विभागाला ब्रिटिश परराष्ट्र कार्यालयाकडून एक संदेश मिळाला. युद्धामुळे उभ्या राहिलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे लाचार झालेला ब्रिटन आपल्या डळमळीत औद्योगिक अर्थव्यवस्थेमुळे आणि प्रचंड थंडीनंतर आता मदत करण्यास सक्षम नसेल.

ग्रीस आणि तुर्कीला ब्रिटनने दिलेली सुरक्षेची हमी काढून घेतली गेल्यानंतर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असती.

एकोणीस दिवसांनंतर, त्या ऐतिहासिक भाषणात, त्या दोन देशांना मदत करण्यासाठी आणि सर्व आघाड्यांवर साम्यवादाशी लढण्यासाठी ट्रुमन यांनी काँग्रेसकडे ४० कोटी डॉलची मागणी केली.

मधल्या काळात जे काही घडले तो अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात अचानक झालेला आणि आमूलाग्र बदल नव्हता.

या आधी उच्चारण्यात आलेल्या हजारो शब्दांनी भविष्यकाळासाठी मार्ग आखून दिलेला होता. डेमोक्रॅट असलेल्या ट्रुमन यांना बऱ्याच आघाड्यांना जावे लागले. पूर्णपणे निरंकुश परराष्ट्र धोरणातून माघार घेण्यास तयार असलेले नवनिर्वाचित रिपब्लिकन काँग्रेस आणि युद्धाला कंटाळलेली आणि घरातील तरुणांच्या घरवापसीसाठी काळजी करणारी अमेरिकन जनता यांना ट्रुमन यांना तोंड द्यावे लागले.

मिखाइल गोर्बाचेव्ह यांच्या गावातून

या व्यतिरिक्त अमेरिकेत दुसऱ्या देशांना आर्थिक मदत करण्याची कोणतीही परंपरा नव्हती.

राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची वैयक्तिक भेट घेतली. सिनेट परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष आणि अमेरिकेच्या एकांतवादी धोरणाचे समर्थक सिनेटर आर्थर वॅन्डनबर्ग यांनी त्यांना सांगितले. की, कम्युनिस्ट बंडखोरांसोबत गृहयुद्ध सुरू असलेल्या ग्रीसला आणि डार्डानेलेस सामुद्रधुनी ताब्यात घेण्यासाठी यूएसएसआरकडून दबाव येत असलेल्या तुर्कस्तानला मदत करण्याचे धोरण जगजाहीर केले तर रिपब्लिकन त्यांना पाठिंबा देतील.

वँडनबर्ग म्हणाले, "त्यांना जनतेचा पाठिंबा हवा असेल तर त्यांना अमेरिकी नागरिकांना मृत्यूचे भय दाखवावे लागेल."

या गोष्टीने एखाद्या जादूसारखा परिणाम केला.

ट्रुमन यांनी सिनेटरांचा सल्ला ऐकून एक भाषण दिले. 19 मिनिटांच्या या भाषणातील 33 सेकंदांमध्ये उद्धृत केलेल्या शब्दांचे सार आहे :

"माझी अशी धारणा आहे की अमेरिकेचे धोरण अशा स्वतंत्र लोकांच्या समर्थनार्थ असले पाहिजे जे सशस्त्र अल्पसंख्याकांचा वा बाहेरील दबावाचा विरोध करतात. मला असे वाटते की, आपण स्वतंत्र लोकांना त्यांच्या मार्गाने त्यांचे भाग्य बदलण्यासाठी मदत केली पाहिजे. माझ्या मते, आपली मदत आर्थिक आणि वित्तीय असली पाहिजे. कारण अशा प्रकारची मदत आर्थिक व राजनैतिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे."

"ट्रुमन यांनी परकीय सहाय्य कायद्यावर स्वाक्षरी केली. या स्वाक्षरीने ग्रीस आणि तुर्कीला परदेशी मदत कार्यक्रम दिला."

वस्तुस्थिती ही आहे की ट्रुमन या प्रसंगी शब्दांचा जादुगार असलेल्या वक्त्याच्या भूमिकेतून बोलत नव्हते. पण काळ त्यांच्या बाजूने होता. ती 'भाषणबाजी' नव्हती आणि त्यामुळे ते अधिक परिणामकारक झाले होते.

त्यांच्या भाषणाचे खासदारांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. पण त्यांना भक्कम साथ मिळाली नाही. पुढील काही आठवडे या मुद्यावरून चर्चा होत राहिली.

दरम्यान, दोन्ही सभागृहांना प्रस्ताव पारित केला आणि 22 मे 1947 रोजी ट्रुमन यांनी स्वाक्षरी केल्यावर हे विधेयक कायदा म्हणून संमत झाले. "कम्युनिस्टांचा मोर्चा बिनदिक्कतपणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, याची ही एक चेतावनी आहे., असे ते म्हणाले.

सोव्हिएत इतिहासकार आंद्रे शेस्ताकोव्ह यांनी लिहिलेले 'यूएसएसआरच्या इतिहासाचा संग्रह' या शिक्षण अभ्यासक्रमात असलेल्या पुस्तकात याचा उलट लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, "राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांनी दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याच्या अमेरिकेच्या अधिकाराची घोषणा केली."

ट्रुमन सिद्धांताने मार्शल योजना, नाटो संघटनेला पाठबळ दिले आणि त्या युद्धाच्या ४० हून अधिक वर्षांपर्यंत आणि त्यानंतरही अमेरिकी परराष्ट्र धोरणाला आकार दिला.

जगाला विभागणाऱ्या महाकाव्यातील पात्रांद्वारे वापरली गेलेली वक्तव्ये आणि रुपके कायम जिवंत राहतील.

बॉस्टडॉर्फ म्हणाले होते, "काही वेळा आपण भाषेचा वापर करतो आणि काही वेळा भाषा आपला वापर करते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)