April Fool: 2 हजार वर्षांपूर्वी ही लोक करायचे अश्लील जोक: त्या काळात लोकांना कशाने हसू यायचं?

स्माईली

फोटो स्रोत, Getty Images

'दोन माणसं रस्त्याने जात असतात. त्यातला एक दुसऱ्याला विचारतो - नक्की कशात जास्त मजा आहे? सेक्स करण्यात की शौचाला जाण्यात?

दुसरा म्हणतो - थांब, एखाद्या वेश्येला सकाळी सकाळी जाऊन विचारू.'

भंगार, फालतू टाईप वाटणारा हा जोक आजचा नाहीये, तब्बल दोन हजार वर्षं जुना आहे.

हे आणखी एक उदाहरण -

'काळाच्या आदिपासून अंतापर्यंत कोणती गोष्ट घडलेली नाहीये?

तरुण बायको नवऱ्याच्या मांडीवर पादली नाहीये.'

हे हजारो वर्षं जुने पीजे आज सांगण्याचं कारण म्हणजे एक रिसर्च. मार्था बेलीस प्राचीन साहित्याचा अभ्यास करतात.

त्या एकदा ट्रेनची वाट पाहत असताना 1983 साली प्रसिद्ध झालेलं 'ट्रूली टेस्टलेस जोक्स' (अतिशय भंगार विनोद) नावाचं पुस्तक चाळत होत्या आणि त्यात त्यांना तो 'सेक्स की शौच' वाला जोक दिसला.

तो पाहून त्यांना धक्का बसला कारण आदल्याच दिवशी त्या एका प्राचीन पुस्तकाच अभ्यास करत होता आणि हा जोक त्या पुस्तकात होता.

म्हणजे आज वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सांगितले जाणारे अश्लील किंवा भंगार जोक कालातीत आहेत. हजारो वर्षांपासून ते चालत आलेले आहेत.

विनोद

फोटो स्रोत, Getty Images

मार्थांच्या लक्षात आलं की बरेचसे जोक लॅटिनमध्ये लिहिले गेले होते, तेही कॅथलिक स्कॉलर्सनी आणि नंतर तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाले.

गंमत म्हणजे कित्येक शतकं हे जोक्स कधीच लिखित स्वरुपात नव्हते. एकाने दुसऱ्याला सांगितले, दुसऱ्याने तिसऱ्याला अशा मौखिक स्वरुपात ते संस्कृतीत झिरपत राहिले.

समर्थांनी 'टवाळा आवडे विनोद' असं म्हटलं असलं तरी त्यांच्याही आधीच्या काळापासून असे अनेक टवळे होते जे पीजे मारत होते, एकमेकांना सांगत होते आणि ते पीजे ओव्या, श्लोक आणि कथा, कवितांच्या बरोबरीने समाजात रुजले होते.

मार्था म्हणतात की त्याकाळातले जोक फारच अश्लील, उद्धट आणि असभ्य प्रकारचे होते. आजच्या काळात असे जोक सांगणं म्हणजे अवघडच. आजचे अश्लील जोक त्यामानाने फारच सभ्य म्हणायला हवे.

मार्था यांचं म्हणणं पटण्याचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी मी उत्तर महाराष्ट्रातल्या एका गावात लग्नासाठी गेले होते. तेव्हा नवरीची हळद झाल्यानंतर तिला बाजूला घेऊन आया-बाया वेगवेगळी गाणी म्हणत होत्या. त्या गाण्यातल्या प्रणयाचं, श्रृंगाराचं आणि पहिल्या रात्री नवऱ्याची कशी फजिती होते याचं वर्णन ऐकून कानाला झिणझिण्या आल्या होत्या.

आज या गाण्यांचं प्रमाण कमी झालं असलं तरी आपल्या मौखिक लोकसंस्कृती अशी गाणी आणि अशा जोक्सचं एक स्थान होतंच.

काय आहे अशा जोक्समध्ये की हजारो वर्षं ते लोकांना हसवत आहेत? बीबीसी रेडियो 4 चे विनोदी लेखक मॅट केनियन यांनी शोधण्याचा प्रयत्न केलाय.

विनोद

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेच्या NPR (नॅशनल पब्लिक रेडियो) ने 2016 मध्ये असं म्हटलं होतं की, "जगातला नोंद झालेला सगळ्यांत जुना जोक म्हणजे ताम्रयुगातला आहे. म्हणजे अगदी ख्रिस्तपूर्व 3000 ते 1200 वर्षं या काळातला. कोणता जोक विचाराल तर तोच वर सांगितलेला - काळाच्या आदिपासून अंतापर्यंत कोणती गोष्ट घडलेली नाहीये? तरुण बायको नवऱ्याच्या मांडीवर पादली नाहीये.'

आता जोक काही खूप भारी नाहीये. पण मॅट केनियन म्हणतात की, "विनोद म्हणजे शारीरिक व्यंगावरचा, किंवा शरीर ठेवणीवरचा, अश्लील असतो अशी विचारसरणी हजारो वर्षं लोकांची आहे."

बेलिस ऑरगॉन विद्यापीठात लोकसंस्कृतीच विभागाच्या संचालक आहेत. त्या म्हणतात, "जगातले पहिले जोक हे अश्लील किंवा घाणरडेच होते. लोक अशा जोक्सपासून लांबच राहू शकत नव्हते."

पादण्याचं उदाहरण घ्या. "लोकांना त्यावर हसू येतं कारण ती अशी शारीरिक क्रिया आहे ज्यावर कोणताही कंट्रोल नाही," फिनलंडमधल्या हेलसिंकी विद्यापीठात कल्चरल स्टडीजच्या प्राध्यापक असलेल्या अनू कोरहोनन म्हणतात.

त्यांच्या मते पादण्याच्या सुरुवातीच्या विनोदांमध्ये होणारा उल्लेख आपल्या मानवी समाजाची समानता दाखवतो. आता पादणं ही क्रिया - यातून कोणताच माणूस, अनादि काळापासून सुटलेला नाही.

विनोद

फोटो स्रोत, Getty Images

काही अभ्यासकांना वाटतं की विनोद आपल्याला माणूस म्हणून एकत्र बांधतो. विनोदाची उत्क्रांतीतही महत्त्वाची भूमिका आहे. अवघड प्रसंगात हसण्याची जी मानवी वृत्ती आहे तिनेच आपल्याला एकत्र आणलं, आणि अडचणींमधून बाहेर काढलं.

काही अभ्यासकांना असंही वाटतं की मानवाचे पूर्वज असलेल्या माकडांमध्ये, खासकरून चिंपाझींमध्ये एकमेकांना चिडवण्याची पद्धत आहे. इथूनच मानवी विनोदाचा पण उगम झालेला असावा.

अर्थात जे प्राणी संग्रहालयात किंवा पिंजऱ्यात बंद असतात आणि त्यांना आपण हसताना पाहातो ते फक्त मानवी स्वभावाचं अनुकरण करत असतात.

बेलिस यांना काही प्राचीन जोक सोनरी बांधणीच्या लॅटिन बायबल्सच्या समासांमध्ये खरडलेले सापडले. ज्या काळात लिहिण्या वाचण्याची परवानगी फक्त काही थोडक्या उच्चभ्रू लोकांना होती तेव्हाही धर्माचे हे अभ्यासक समासात जोक लिहून एकमेकांना हसवत होते.

मध्ययुगीन काळात जोक मारणं म्हणजे जरा अवघडच कारभार होता. मार्था बेलिस एक कथा सांगतात. इंग्लंडचा राजा रिचर्डची (पहिला) दोन लोक थट्टा करत होते.

"ते दोघं एका दारू पार्टीत राजाचीच खेचत होते. राजाने हे ऐकलं तेव्हा तो चिडला आणि त्या दोघांना बोलावून घेतलं. या दोघांचं काही खरं नाही असंच सगळ्यांना वाटलं. पण त्या दोघांपैकी एकजण पटकन म्हणाला. 'आम्ही त्या गोष्टी बोललो, तुमची थट्टा केली हे बरोबर आहे. पण विचार करा जर आमची वाईन संपली नसती तर आम्ही अजून काय काय बोललो असतो!' यावर राजाला हसू आलं आणि त्या दोघांना सोडून दिलं."

विनोद

फोटो स्रोत, Getty Images

विनोद म्हणजे खूप सभ्य बोलणं आणि खूप असभ्य बोलणं यातला समतोल असतो. लोकांना अश्लील जोक यासाठी आवडतात कारण एकाच वेळेस ते तुम्हाला हसवतातही आणि त्याची वेळी 'श्शी! काय हे? अशी प्रतिक्रियाही लोकांकडून येते. त्यामुळेच ते लोकप्रिय आहेत आणि हजारो वर्षांपासून लोकप्रिय ठरलेत असं मत कॉलोरॉडो विद्यापीठाचे प्राध्यापक पीटर मॅकग्रू व्यक्त करतात.

आपले पूर्वज विनोद करत असतील तो काळ पहा कसा होता. आयुर्मान कमी होतं, लोक कमी जगत होती, अडचणी प्रचंड होत्या आणि पदोपदी धोका होता. त्या पूर्वजांपैकी जे जोक मारायचे त्यांना आपल्या आसपासच्या वातावरणाची चांगली जाण होती, त्या वातावरणावर त्यांचा कंट्रोल होता. विनोद हा त्या धोक्याचा सामना करण्याचा किंवा अजून स्षष्ट सांगायचं तर त्या धोक्यांचा सामना करण्यासाठी मानसिकता तयार करण्याचा रस्ता होता.

मॅकग्रू म्हणतात की, "आज तशी परिस्थिती नसली तरी तुम्हाला विनोदी व्यक्तीसोबत वेळ घालवायला आवडतं. आपल्या परिस्थितीवर हसू शकणारी माणसं जगातल्या अडचणींचा जास्त चांगल्या पद्धतीने सामना करू शकतात."

जोक मानसिक तणाव कमी करतातच, पण एखाद्या परिस्थितीत दोन किंवा जास्त माणसांमध्ये असलेल्या आक्रमक किंवा दुःखद भावनाही कमी करतात. अशा परिस्थितीत एखादी विनोदी पंचलाईनही आपल्याला नकारात्मक भावनांपासून दूर नेते.

दोन-पाच हजार वर्षांपूर्वी हसणाऱ्या आपल्या पूर्वजांना आताचे स्टँडअप कॉमेडीचे व्हीडिओ सापडले तर ते काय म्हणतील कोणास ठाऊक. कदाचित त्यांना ते तेवढे विनोदी वाटणार नाहीत किंवा कदाचित त्यांना ते आपल्या पादण्याच्या जोकसारखे वाटतील. त्यात अभिव्यक्ती किंवा बौद्धिक विनोद नाहीये पण हसण्याचं मुळ तत्त्व कायम आहे.

(या लेखाला बीबीसी रेडियो 4 चे विनोदी लेखक मॅट केनियन यांच्या लेखाचा संदर्भ आहे.)

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)