IPL: पैशासाठी देशाकडून न खेळणं या दक्षिण अफ्रिकन खेळाडूंना महागात पडणार का?

फोटो स्रोत, Getty/facebook
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा म्हणजे कोटीच्या कोटी उड्डाणं. दीड महिना खेळून वर्षभराची पुंजी मिळवण्याचं व्यासपीठ. जगभरातले खेळाडू म्हणूनच आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आतूर असतात. शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला बांगलादेशविरुद्ध मायदेशात पहिल्यांदाच वनडे सीरिजमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. बांगलादेशने तीन वनडे सामन्यांची मालिका 2-1ने जिंकली.
बांगलादेशविरुद्ध वनडेत घरच्या मैदानावर मालिका गमावण्याची नामुष्की दक्षिण आफ्रिकेवर ओढवली आहे. या दोन देशांदरम्यान आता दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. पण त्यांचे प्रमुख खेळाडू आयपीएलसाठी भारतासाठी रवाना होणार आहेत. यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दुय्यम संघ उतरवणार आहे.
काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीन एल्गरने संघातील खेळाडूंना देशासाठी खेळण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आयपीएलमध्ये विविध संघाचा भाग असलेल्या खेळाडूंनी आयपीएलला प्राधान्य देत वनडे मालिकेनंतर भारतात जाण्याचा निर्णय घेतला.
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना पैसा मिळतोच पण त्याहीपेक्षा मोलाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एनओसी म्हणजेच 'ना हरकत' प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित बोर्डाला 20 टक्के रक्कम मिळते. ज्या देशाचे आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू जास्त तेवढं त्या बोर्डाची एनओसीद्वारे कमाई जास्त.
यंदाच्या हंगामात दक्षिण आफ्रिकेचे 11 खेळाडू आहेत. प्रत्येकामागे क्रिकेट साऊथ आफ्रिकेला आर्थिक फायदा होणार आहे. आयपीएलसाठी खेळाडूंना रिलीज करणं फायदेशीर आहे पण त्याचवेळी मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी कमकुवत संघ उतरवणं नैतिकदृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं. दक्षिण आफ्रिकेने वनडे सीरिज गमावली आहे. टेस्ट सीरिज ड्रॉ किंवा गमवावी लागल्यास त्याचं खापर आयपीएलसाठी भारतात गेलेल्या खेळाडूंवर फुटू शकतं.
यंदाच्या आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे मार्को यान्सन (4.2 कोटी, हैदराबाद), एडन मारक्रम (2.65 कोटी, हैदराबाद), लुंगी एन्गिडी (50 लाख, दिल्ली), कागिसो रबाडा (9.25 कोटी, पंजाब), रासी व्हॅन डर डुसे (1 कोटी, राजस्थान), ड्वेन प्रिटोरस (50 लाख, दक्षिण आफ्रिका), डेव्हिड मिलर (3 कोटी, गुजरात), डेवाल्ड ब्रेव्हिस (3 कोटी, मुंबई), क्विंटन डी कॉक (6.25 कोटी, लखनऊ), फॅफ डू प्लेसिस (7 कोटी, बंगळुरू), अँनरिक नॉर्किया (6.5 कोटी, दिल्ली) हे खेळाडू खेळताना दिसतील.

फोटो स्रोत, Mumbai indians twitter
यापैकी यान्सन, रबाडा, एन्गिडी आणि नॉर्किया दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचा कणा आहेत. मारक्रम, डुसे, प्रिटोरस कसोटी संघाचा भाग असतात. काही महिन्यांपूर्वी झालेल्या U19 विश्वचषक स्पर्धेत डेवाल्ड ब्रेव्हिसने दिमाखदार कामगिरी केली होती. त्याला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ब्रेव्हिस हा दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्सचा शिष्य आहे. त्याला 'बेबी एबी' म्हटलं जातं.
बांगलादेशने या मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेत 10 वनडे खेळल्या होत्या. यापैकी 9 मध्ये बांगलादेशला पराभवाला सामोरं जावं लागलं तर एक वनडे रद्द झाली होती. 2002 मध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश आफ्रिकेच्या संघाने मिळवलं होतं. 2003 मध्ये विश्वचषकाच्या लढतीतही आफ्रिकेने बांगलादेशवर विजय मिळवला होता. 2008 मध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय आफ्रिकेने मिळवला होता. तिसरी वनडे पावसामुळे रद्द झाली. 2017 मध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने 3-0 असं निर्भेळ यश मिळवलं होतं.
या मालिकेद्वारे बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका विजयाचा पराक्रम केला.
काही दिवसातच बांगलादेश-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका सुरू होत आहे. बांगलादेशने आफ्रिकेत आतापर्यंत 6 कसोटी खेळल्या आहेत पण सहाही गमावल्या आहेत. पण आता आफ्रिकेचा दुय्यम संघ मैदानात उतरणार असल्याने बांगलादेशला इतिहास बदलण्याची संधी आहे. याच वर्षी बांगलादेशने न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये कसोटीत हरवण्याचा पराक्रमही केला आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








