IPL 2022: CSK ची जबाबदारी पुन्हा एकदा धोनीकडे

धोनी जडेजा

फोटो स्रोत, Mike Hewitt

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेपूर्वी महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपरकिंग संघाचं कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे दिलं होतं. पण अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अयशस्वी ठरल्याने रविंद्र जडेजाने संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग संघाचं कर्णधारपद पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे सोपवण्यात आलं आहे.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा 2008 ते 2011 ही तीन वर्षे तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. 2012 पासून चेन्नई सुपरकिंग संघाचं प्रतिनिधीत्व करतो. यंदाचा IPL हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. पण जडेजाला सुरुवातीपासूनच आपल्या नेतृत्व सिद्ध करता आलं नाही.

या हंगामातील 8 पैकी 2 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंगला पराभव पत्करावा लागला. याशिवाय, जडेजाची वैयक्तिक कामगिरीही काही खास राहिली नाही. त्यामुळे आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जडेजाने घेतला, अशी माहिती समोर आली आहे.

लिलावात जडेजापेक्षा कमी रक्कम घेतली

आयपीएलच्या मेगा लिलावाच्या वेळी प्रत्येक संघाला रिटेन खेळाडूंची यादी देणं बंधनकारक होतं. स्वाभाविकपणे चेन्नई सुपर किंग संघाने कर्णधार महेंद्रसिंह धोनीला रिटेन केलं. धोनीसोबतच रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड तसंच मोईन अली या खेळाडूंनी चेन्नई संघाने रिटेन केलं.

धोनी जडेजा

फोटो स्रोत, ANI

धोनी जडेजाच्या तुलनेत ज्येष्ठ तसंच कर्णधार असल्यामुळे त्याला चेन्नई संघाकडून जास्त रक्कम मिळणं अपेक्षित होतं. मात्र धोनीने स्वतः कमी रक्कम घेऊन जडेजाला जास्त रक्कम देऊ केली होती

या लिलावात धोनी रिटेन करण्यासाठी चेन्नई संघाने 12 कोटी तर जडेजाला 16 कोटी इतकी रक्कम दिली. तर मोईन अलीला 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटी रुपये देण्यात आले होते, हे विशेष.

चारवेळा आयपीएल विजेतेपद

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने 2021 मध्ये आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या जेतेपदावर नाव कोरलं.

धोनी

फोटो स्रोत, Getty Images

अंतिम लढतीत कोलकाता नाईट रायडर्सला नमवत चेन्नईने चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. याआधी चेन्नईने 2010, 2011, 2018 मध्ये जेतेपद पटकावलं होतं.

रवींद्र जडेजाची कारकीर्द

अंडर-19 भारतीय संघ, भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघ, कसोटी अशा विविध स्तरावर आणि फॉर्मॅटमध्ये जडेजाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

रवींद्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रवींद्र जडेजा

मलेशियामध्ये 2008 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय अंडर-19 क्रिकेट संघाचा खेळाडू सुध्दा होता. जडेजा हा डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज असा अष्टपैलू खेळाडू आहे.

2008 मध्ये सुरवातीला इंडियन प्रीमियर लीगच्या उद्घाटन साली राजस्थान रॉयल्सचा खेळाडू म्हणून जडेजाची निवड करण्यात आली होती. संघाचा कर्णधार शेन वॉर्नने आयपीएल सामन्यांमध्ये केलेल्या शानदार कामगिरीबद्दल त्याचं कौतुक केलं. 2008 च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात त्यानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

IPL सीझन 9 मध्ये आणि 10 मध्ये गुजरात लायन्सचं प्रतिनिधित्व केलं होतं.

2009 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी जडेजाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण 8 फेब्रुवारी 2009 रोजी या मालिकेच्या अंतिम सामन्यात झाले होते तिथे त्याने उत्कृष्ठ फलंदाजी करत 60 धावा केल्या होत्या परंतु तरीही भारत हा सामना हरला होता.

2009 च्या वर्ल्डकप 20-20 स्पर्धेत, जडेजावर इंग्लंडविरुद्धच्या 2009 सामन्यात भारतासाठी आवश्यक रनरेट न केल्याबद्दल टीकाही झाली होती. परंतु, 2009 मध्येच काही सामन्यानंतर जडेजाने वनडे संघात सातव्या क्रमांकाची जागा घेतली.

21 डिसेंबर 2009 रोजी, जडेजाला कटक येथे श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट घेतल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)