युक्रेन-रशिया वाद : व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय? युक्रेनमध्ये व्हॅक्यूम बॉम्बचा वापर होतोय का?

रशियन लष्कराचे व्हॅक्यूम बॉम्ब लॉन्चर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियन लष्कराचे व्हॅक्यूम बॉम्ब लॉन्चर

रशिया आणि युक्रेन यांच्यात आठ दिवस सुरू असलेल्या युद्धाचा जोर वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

या युद्धात आत्तापर्यंत 498 सैनिकांचा मृत्यू झाला असून 1597 सैनिक जखमी झाले आहेत, असं बुधवारी (2 मार्च) संध्याकाळी रशियाने सांगितलं.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, रशियाने केलेल्या हल्ल्यात दोन हजारांहून अधिक युक्रेनियन नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. युक्रेनमधील मारियुपोल या शहरासह इतर शहरांमध्ये दोन्ही देशांची सैन्यदलं भयंकर युद्ध लढत आहेत.

दरम्यान, रशियाने थर्मोबेरिक अस्त्रांचा वापर केल्याचा आरोप होत आहे. या अस्त्राला 'व्हॅक्यूम बॉम्ब' असंही संबोधलं जातं.

जगभरात व्हॅक्यूम बॉम्बचा वापर वादग्रस्त मानला गेलेला आहे. सर्वसामान्य बॉम्बच्याच आकाराचा हा बॉम्ब असला तरी त्याची विध्वंसक क्षमता खूप जास्त असते.

व्हॅक्यूम बॉम्ब कसा वापरला जातो?

व्हॅक्यूम बॉम्बला एओरोसोल बॉम्ब किंवा फ्यूएल एअर विस्फोटक असंही म्हटलं जातं. या बॉम्बमध्ये इंधनासाठीचा एक कंटेनर असतो, त्यात दोन वेगवेगळे स्फोटक चार्ज लावलेले असतात.

रॉकेटमधून किंवा विमानातून इतर बॉम्बप्रमाणेच हा बॉम्ब टाकला जातो. निश्चित लक्ष्य असणाऱ्या ठिकाणावर हा बॉम्ब पडला की आधी इंधनाचा कंटनेर उघडतो आणि इंधन पसरून वातावरणात त्याचा ढग निर्माण होतो.

हा ढग पूर्णतः बंदिस्त नसलेल्या कोणत्याही इमारतीत घुसू शकतो. त्यानंतर बॉम्बचा दुसऱ्यांदा स्फोट होतो आणि या ढगाला आग लागते, त्यातून आगीचा मोठा लोट निर्माण होतो.

युक्रेन-रशिया वाद, प्रातिनिधिक फोटो,

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर एक मोठी स्फोटक लाट उसळते आणि आसपासचा सर्व ऑक्सिजन त्यात शोषून घेतला जातो. या बॉम्बस्फोटात सैनिक साधनसामग्रीसोबतच मजबुत बांधकाम असणाऱ्या इमारती कोसळू शकतात आणि मानवी जीवितहानीसुद्धा होऊ शकते.

हे अस्त्र वेगवेगळ्या उद्देशाने वापरलं जातं, त्याचा आकारही वेगवेगळा असतो. सैनिकांकडून हाताने फेकता येईल अशा ग्रेनेडच्या रूपात किंवा खांद्यावर ठेवून रॉकेट लाँचरद्वारे डागता येईल अशा आकारात व्हॅक्यूम बॉम्ब तयार केले जातात.

अणुबॉम्बव्यतिरिक्तचा सर्वांत मोठा बॉम्ब

हवाई मार्गाने टाकता येतील असे महाकाय आकाराचे व्हॅक्यूम बॉम्बही तयार केले जातात. या बॉम्बचा वापर करून गुहेत किंवा बोगद्यात लपलेल्या लोकांनाही मारता येतं. विशेषतः बंदिस्त जागी या बॉम्बचा अधिक विध्वंसक परिणाम दिसतो.

अमेरिकेने 2003 साली 9800 किलो वजनाच्या व्हॅक्यूम बॉम्बची चाचणी केली होती. या बॉम्बला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब्स' असं संबोधण्यात आलं. त्यानंतर चार वर्षांनी रशियानेसुद्धा असंच उपकरण तयार केलं आणि त्याला 'फादर ऑफ ऑल बॉम्ब्स' असं संबोधलं.

या बॉम्बद्वारे झालेला स्फोट पारंपरिक 44 टनी बॉम्बइतका मोठा होता. अणुबॉम्बव्यतिरिक्तचा सर्वांत विघातक अस्त्र म्हणून हा बॉम्ब ओळखला जातो.

युक्रेन-रशिया वाद, प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

या बॉम्बचा विध्वंसक परिणाम आणि इमारतींमधील बंकरांमध्ये लपलेल्या लोकांनाही लक्ष्य करण्याची त्याची क्षमता यामुळे व्हॅक्यूम बॉम्बचा वापर मुख्यतः शहरी वातावरणात केला जातो.

युक्रेनमध्ये रशियाने किव्हसह अनेक शहरं जिंकण्याचा प्रयत्न चालवल्यामुळे तिथे या बॉम्बचं महत्त्व आणखीच वाढलं आहे.

युक्रेनमध्ये व्हॅक्यूम बॉम्बचा वापर होतोय का?

रशियाने युक्रेनच्या भूमीवर व्हॅक्यूम बॉम्ब वापरल्याचा आरोप युक्रेनच्या अमेरिकेमधील राजदूत ओक्साना मारकारोवा यांनी केला आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

वास्तविक गेल्या काही दिवसांत युक्रेनमध्ये थर्मोबेरिक बॉम्ब डागणारे रॉकेट लाँचर नजरेस पडलेले आहेत.

व्हॅक्यूम बॉम्बच्या वापरासंबंधीचे नियम काय आहेत?

या बॉम्बच्या वापरासंदर्भात अजूनपर्यंत कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा करण्यात आलेला नाही. परंतु, एखाद्या देशाने निवासी भागांमध्ये, शाळांच्या ठिकाणी किंवा रुग्णालयांमध्ये याचा वापर केला, तर 1899 व 1907 सालच्या 'हेग नियमावली'नुसार असं कृत्य युद्ध गुन्हा मानलं जातं आणि त्यावर खटला चालवता येऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातील वकील करीम खान यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या न्यायालयाद्वारे युक्रेनमधील संभाव्य युद्ध गुन्ह्यांची चौकशी केली जाईल.

याआधी व्हॅक्यूम बॉम्बचा वापर कुठे झाला आहे?

व्हॅक्यूम बॉम्बचा वापर पहिल्यांदा जर्मन सैन्याने दुसऱ्या महायुद्धावेळी केला होता. परंतु, 1960 सालापर्यंत या बॉम्बचा पूर्ण विकास झाला नव्हता. त्यानंतर अमेरिकेने व्हिएतनाममध्ये हे बॉम्ब वापरले.

रशियन लष्कराचे व्हॅक्यूम बॉम्ब लॉन्चर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियन लष्कराचे व्हॅक्यूम बॉम्ब लॉन्चर

अफगाणिस्तानात 2001 साली तोरा बोरा डोंगरभागांमध्ये लपलेल्या अल-कायदाच्या अतिरेक्यांना संपवण्यासाठी आणि 2017 साली इस्लामिक स्टेटच्या दलांविरोधात अमेरिकेने हे बॉम्ब वापरले.

रशियाने 1999 साली चेचेन्या युद्धात हा बॉम्ब पहिल्यांदा वापरला आणि ह्यूमन राइट्स वॉच या संस्थेने त्या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला होता.

रशियन बनावटीचे व्हॅक्यूम बॉम्ब अल-असद यांच्या सरकारने सिरियातील यादवी युद्धातही वापरले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)