इम्रान खान यांनी भारताबरोबर अणुयुद्धाच्या शक्यतेवर म्हटलं...

फोटो स्रोत, Reuters
भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यास त्याला आक्रमकपणे उत्तर दिलं जाईल असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
कतार येथील अल-जजिरा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. ''जर भारताच्या फॅसिस्ट विचारसरणीच्या भाजप सरकारनं असं केलं तर आण्विक शक्ती असलेले दोन देश आमने-सामने असतील अशी मला भीती आहे,'' असं ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्धाच्या शक्यतांवर बोलताना त्यांनी या मुलाखतीत मतं मांडली. ''भारतानं जर एअर स्ट्राइक केलं तर त्याचं उत्तर आम्ही तशाच आक्रमक पद्धतीनं देऊ, अगदी फेब्रुवारी 2019 मध्ये दिलं होतं त्याप्रमाणे उत्तर देऊ.
भाजपच्या फॅसिस्ट सरकारनं अशा प्रकारचा हल्ला केला तर मला आण्विक अस्त्रांनी सज्ज असलेले दोन देश आमने-सामने असतील अशी भीती आहे, आणि त्याचे परिणाम वाईट होतील. कट्टरतावादी विचारसरणी असलेलेच असं करू शकतात,'' असं त्यांनी म्हटलं.
भारतातील लोक संवेदनशील आणि समजूतदार आहेत, मात्र त्याठिकाणी कट्टरतावाद्यांची सत्ता आहे, असं ते म्हणाले.
भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरबाबतही त्यांनी मत मांडलं. त्याठिकाणी तुरुंगासारखी परिस्थिती आहे. लष्कराच्या भीतीनं 80 लाख काश्मिरी नागरिकांना, खुल्या तुरुंगात राहावं लागत आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
''आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेपासून ते मुस्लीम देशांच्या फोरमपर्यंत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, प्रत्येक मुस्लीम देशाचे भारताबरोबर वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवू शकत नाही. मात्र हे पाकिस्तानचं कर्तव्य आहे. आम्ही काश्मिरींसाठी आवाज उठवत राहू," असं इम्रान म्हणाले.
काश्मीरचा मुद्दा प्रत्येक व्यासपीठावर उपस्थित करत राहू, असं इम्रान खान म्हणाले.
अफगाणिस्तानच्या संकटाबाबतही त्यांनी मत मांडलं. त्या देशात भूकबळींची समस्या निर्माण झाली आहे अमेरिकेनं त्यांना मदत करायला हवी, असं ते म्हणाले.
"अमेरिकेला अफगाणिस्तानात काय मिळवायचं होतं, हेच माझ्या लक्षात येत नाही. त्यांनी तथाकथित दहशतवादाच्या विरोधात युद्धाच्या नावाखाली 20 वर्षे देशावर ताबा ठेवला होता," असं ते म्हणाले.
भुत्तो आणि शरीफ कुटुंबामुळे आर्थिक संकट
इम्रान खान यांनी पाकिस्तानला उध्वस्त करण्यासाठी आणि देशाला सध्या असलेल्या संकटात ढकलण्यासाठी भुत्तो आणि शरीफ कुटुंबीय जबाबदार असल्याचं म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत समृद्ध होता. मात्र भुत्तो आणि शरीब कुटुंबांनी त्याचा गैरवापर केला, असंही ते म्हणाले.
''पाकिस्ताननं समृद्ध देश बनावं अशी आमच्या सरकारची इच्छा आहे आणि आम्ही दोन प्रचंड धनाढ्य कुटुंबांच्या विरोधात लढत आहोत.''
दोन्ही कुटुंबं त्यांच्या वारसांची व्यवस्था करण्यासाठी काम करत होते आणि देशाच्या समोर असलेल्या सध्याच्या समस्येसाठी तेच जबाबदार आहेत, असा आरोप इम्रान खान यांनी लावला.
"भ्रष्टाचार अशी गोष्ट आहे जी कोणत्याही देशाला उध्वस्त करू शकते. गरीब देश हे त्यांच्याकडे पुरेशी साधनं नसल्यामुळं गरीब नाहीत, तर त्यांचं नेतृत्व भ्रष्ट असल्यामुळं गरीब आहेत," असंही ते म्हणाले.
''माझ्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर मी स्वतः त्याची पारदर्शक चौकशी करेल.''
ब्रिटनमध्ये दीर्घकाळ प्रवासादरम्यान पाश्चिमात्य राजकारणाला जवळून पाहिलं असं इम्रान खान म्हणाले. तसंच त्यांनी कायम पाश्चिमात्य शक्तींच्या राजकारणावर टीका केली आहे, असंही ते म्हणाले.
पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अणुबॉम्ब
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये अणुबॉम्बची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्ताननं भारताच्या तुलनेत अधिक अणुबॉम्ब तयार केले आहेत.
जगातील शस्त्रांची स्थिती आणि जागतिक सुरक्षेबाबत विश्लेषण करणारी स्वीडनची संस्था 'स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' नं 2019 च्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली होती.
अण्वस्त्रांचं एकूण उत्पादन कमी झालं आहे, मात्र दक्षिण आशियामध्ये ते वाढत आहे, असं या संस्थेच्या अणु निरस्त्रीकरण, शस्त्र नियंत्रण आणि अप्रसार कार्यक्रमाचे संचालक शेनन काइल यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं होतं.
"2009 मध्ये आम्हाला सांगितलं होतं की, भारताकडे 60 ते 70 अणुबॉम्ब आहेत. त्यावेळी भारताकडे 60 अणुबॉम्ब होते. पण गेल्या दहा वर्षांमध्ये दोन्ही देशांनी अणुबॉम्बची संख्या दुपटीवर नेली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पाकिस्तानकडे आता भारतापेक्षा अधिक अणुबॉम्ब आहेत, असं शेनन काइल यांनी म्हटलं होतं. विविध सूत्रांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या माहितीवरून भारताकडे सध्या 130 ते 140 अणुबॉम्ब आहेत आणि पाकिस्तानकडे 150 ते 160 अणुबॉम्ब आहेत, हे आम्ही सांगू शकतो असं ते म्हणाले होते.
सध्याच्या स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव हा शिगेला पोहोचला आहे. त्यावरून अणुबॉम्बची संख्या वाढल्याकडे इशारा होतो, असं शेनन यांनी म्हटलं.
मात्र, अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्धादरम्यान जशी स्पर्धा पाहायला मिळाली होती, तशी स्पर्धा या दोन्ही देशांदरम्यान नाही, असंही ते म्हणाले होते.
"मी याला स्ट्रॅटेजिक आर्मी कॉम्पिटिशन किंवा रिव्हर्स मोशन न्युक्लिअर आर्मी रेस म्हणेल. मला वाटतं, नजीकच्या भविष्य काळात या स्थितीत काही बदल पाहायला मिळणार नाही," असं ते म्हणाले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








