लग्न मुलाचं, पण आई मरियम नवाज यांच्या नावाची पाकिस्तानात चर्चा का होतेय?

मरियम नवाज मुलाच्या लग्नात

फोटो स्रोत, MARIYAM NAWAZ

पाकिस्तानात PML-N या राजकीय पक्षाच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांचा मुलगा जुनैद सफदर यांचा विवाह नुकताच पार पडला. पण गेल्या एका आठवड्यापासून या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो तुफान शेअर केले जात आहेत.

लग्नातील सजावट, संगीत, वर-वधू आणि देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती यांच्या बातम्या सुरू आहेत. पण यामध्ये सर्वाधिक चर्चा होत असलेली गोष्ट म्हणजे नवऱ्या मुलाची आई मरियम यांचा पोशाख.

स्थानिक मीडिया असो वा सोशल मीडिया नवविवाहित जोडप्याशिवाय लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात मरियम नवाज यांची शैली, कपडे, दागिने आणि व्यक्तीमत्व यांच्या बातम्यांचं सत्र सुरूच आहे.

मरियम नवाज या लग्नात प्रत्येक फोटोत एका वेगळ्या शैलीत दिसून येत आहेत. तर त्यांनी परिधान केलेले कपडेही लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनल्याचं दिसून येतं.

कव्वाली नाईटमध्ये त्यांनी परिधान केलेली गुलाबी साडी, मेहंदी कार्यक्रमात त्यांनी घातलेले नीळे-पिवळे कपडे, वरातीत त्यांनी घातलेला लेहंगा सर्वांनाच आवडल्याचं दिसून येतं.

या सर्व गोष्टींमधून मरियम यांनी जुनैद यांच्या लग्नासाठी विशेष प्रयत्न करून योग्य नियोजन केल्याचं दिसत आहे.

मरियम नवाज यांच्या डिझायनर ड्रेसचं भारत कनेक्शन

जुनैद सफदर यांच्या लग्नात मरियम नवाज यांनी घातलेले बहुतांश कपडे पाकिस्तानी डिझायनर्सनी बनवलेले आहेत. पण त्याचसोबत भारतीय डिझायनर अभिनव मिश्रा यांनी डिझाईन केलेला एक ड्रेसही त्यांनी यावेळी घातला होता.

मरियम नवाज मुलाच्या लग्नात

फोटो स्रोत, MARYAM NAWAZ

जुनैद सफदर यांच्या मेहंदी कार्यक्रमात मरियम नवाज यांनी निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

बीबीसीशी बोलताना अभिनव मिश्रा म्हणाले, "मी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात लाहोरमध्ये एका शोसाठी गेलो होतो. तेव्हापासूनच मरियम नवाज मला फॉलो करत आहेत."

ते म्हणाले, "त्यांच्या टीमने आमच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना आमच्या ब्रायडल कलेक्शनमधील निळ्या रंगाचा पोशाख आवडला होता. फक्त त्याच्यामध्ये त्यांना काही बदल अपेक्षित होते.

"आम्ही मरियम नवाज यांच्यासाठी बनवलेल्या कपड्यांमध्ये रेशमी धाग्यासह शीश-गोटे यांचं काम केलेलं आहे."

अभिनव मिश्रा मरियम नवाज यांच्या ड्रेसिंग स्टाईलबाबत सांगतात, "मी डिझाईन केलेल्या कपड्यांमध्ये मरियम नवाज अत्यंत सुंदर दिसत आहेत. त्यांच्यावर तो शोभून दिसत आहे."

मरियम नवाज मुलाच्या लग्नात

फोटो स्रोत, MARYAM NAWAZ

या लेहंग्याची किंमत काय आहे, असं विचारताच अभिनव उत्तरले, त्याची किंमत आमच्या वेबसाईटवर लिहिलेली आहे.

अभिनव मिश्रा यांच्या वेबसाईटवर निळ्या लेहंग्याची किंमत चार लाख पाकिस्तानी रुपयांपेक्षाही जास्त असल्याचं दिसून येतं.

अभिनव मिश्रा म्हणतात, "मरियम नवाज यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यांना आमचं काम आवडत राहील, अशी अपेक्षा आहे."

पाकिस्तानी डिझायनर

मरियम नवाज यांचा पिवळा लेहंगा पाकिस्तानी डिझायनर खदीजा शा यांच्या इलान या ब्रँडने बनवला आहे.

अनेक दिवस चाललेल्या या विवाह समारंभातील एका कार्यक्रमात त्यांनी सायरा शकीरा या पाकिस्तानी डिझायनरने बनवलेला एक ड्रेस घातला होता.

मरियम नवाज मुलाच्या लग्नात

फोटो स्रोत, Twitter

तर मुलाच्या लग्नाच्या वरातीत त्यांनी नाओमी अन्सारी यांनी बनवलेला हिरवा लेहंगा घातलेला होता.

जुनैद सफदर यांच्या लग्नाची शेरवानी बनवणाऱ्या हसन शहरयार यासीन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "मरियम नवाज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रामुख्याने पाकिस्तानी डिझायनर्सनी बनवलेले कपडे निवडले. त्या जुनैद यांच्या कपड्यांसाठी माझ्याकडे आल्या त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की पाकिस्तानी परंपरा आणि संस्कृती दर्शवणारी शेरवानी बनवा."

ट्विटर

फोटो स्रोत, Twitter

हसन शहरयार सांगतात, "त्यामुळे आम्ही शेरवानीच्या खाली कुर्ता-पायजमा यांच्याऐवजी सलवार-कमीज बनवली. शेरवानीचे बटण सोन्याऐवजी धातूपासून बनवलेले होते. मरियम नवाज यांनी कपड्यांची किंमत प्रमाणाबाहेर नसावी, अशी सूचना दिली होती."

मुलाच्या लग्नात सुंदर दिसली आई

जुनैद सफदर यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया युझर्स शेअर करू लागले.

बहुतांश लोकांनी लग्नाच्या फोटोंवर अभिनंदन देणारे कमेंट दिले. पण त्याचसोबतच काही लोकांनी मरियम यांच्यावर टीकाही केली. मरियम आपल्या मुलाच्या लग्नात एका वधूप्रमाणेच तयार झाली आहे, असंही काहींनी म्हटलं.

ट्विटर

फोटो स्रोत, Twitter

सफीना खान नामक एका युझरने म्हटलं, "मरियम नवाज आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीही हे सारे शौक पूर्ण करू शकतात."

पण सिंध विधानसभा सदस्य शर्मिला फारूकी यांनी ट्विटवरून मरियम यांचं कौतुक केलं. एक आई आपल्या मुलाच्या लग्नात किती सुंदर दिसत आहे, असं त्या म्हणाल्या.

इतर अनेक महिलांनीही फेसबुकवर लिहिलं की त्यांनासुद्धा आपल्या मुला-मुलींच्या लग्नात असंच सुंदर दिसायचं आहे.

माहिन गनी यांनी म्हटलं, "मला वाटतं मुलाचं लग्न कोणत्याही आईसाठी एक आनंदाचा क्षण असतो. मरियन यांनी या क्षणाचा आनंद घेतला, मला त्याचा आनंद वाटतो."

मरियम मुलाच्या लग्नात सुंदर दिसत आहेत. चांगले कपडे परिधान करण्याचं कोणतंही वय किंवा बंधन नसतं, असं म्हणत तहरिम नामन युझरने मरियम नवाज यांच्या शैलीचं तोंडभरून कौतुक केलं.

त्या म्हणाल्या, "त्यांचं वय वाढण्याऐवजी कमी होत असल्याचंच वाटत आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)