अमेरिकेतील मुस्लीम नागरिक हे शहर कसं 'चालवतात'?

    • Author, झाओयिन फेंग
    • Role, बीबीसी न्यूज, मिशिगन

मिशिगनच्या हॅम्ट्रॅम्क शहराच्या गल्ल्यांमधून फिरताना आपल्याला जणू काही आपण संपूर्ण जग फिरत आहोत, असं वाटतं.

याठिकाणी पोलंडचं सॉसेज स्टोअर, पूर्व युरोपातील बेकरी, येमेनमधील डिपार्टमेंटल स्टोअर आणि बंगाली कपड्यांची दुकानं असं सर्वकाही एका रांगेत दिसतं. तर चर्चची घंटा आणि अजान यांचा आवाजही एकाचवेळी ऐकायला मिळतो.

हॅम्ट्रॅम्कच्या 5 चौरस किलोमीटरच्या परिसरात तीसपेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. तर दोन किलोचौरस मीटर परिसरातील हे शहर म्हणजे संपूर्ण जग आहे असं म्हटलं जातं आणि इथं आल्यानंतर त्याची जाणीवही होते.

28 हजार लोकसंख्या असलेल्या या मध्य-पश्चिमेतील शहरानं या आठवड्यात एक इतिहास रचला आहे. येथील सिटी काऊन्सिलमध्ये सर्व मुस्लीम सदस्यांची निवड झाली आहे. याठिकाणचे महापौरही मुस्लीम आहेत. मुस्लिमांच्या हाती प्रशासन असलेलं हे अमेरिकेतील पहिलं शहर बनलं आहे.

एक काळ असा होता जेव्हा याठिकाणी मुस्लिमांना भेदभावाचा सामना करावा लागला. पण आता ते याठिकाणच्या विविध समुदाय असेलल्या समाजाचा एक प्रमुख भाग बनले आहेत. या शहराची अर्धी लोकसंख्या मुस्लीम आहे.

आर्थिक आव्हानं आणि गंभीर सांस्कृतिक वाद असूनही या शहरातील लोक शांतता आणि प्रेमानं वागतात.

अमेरिकेत आता सामाजिक विविधता वाढत आहे आणि हे शहर भविष्यात आणखी चांगलं उदाहरण ठरेल, असं समजलं जात आहे. पण हॅम्ट्रॅम्क हे केवळ एक अपवादच ठरणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

जर्मन प्रवाशांचं हे शहर अमेरिकेतील पहिलं मुस्लिमबहुल शहरही आहे.

याठिकाणी दुकानांबाहेर अरबी आणि बंगाली भाषेतील फलक असतात. बांगलादेशी कपडे याठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होतात. एवढंच नाही तर मुस्लीम नागरिक पोलंडचे कस्टर्ड भरलेले डोनट पाज्खी खाण्यासाठी रांगाही लावतात.

'वेगळी ओळख'

डेट्राइटच्या सीमेला लागून असलेली ही शहरं एकेकाळी अमेरिकेच्या कार उद्योगाची केंद्र होती. याठिकाणी जनरल मोटर्सचे मोठे प्लांट होते. ते 'मोटरसिटी'च्या सीमेला लागून होते. कॅडिलॅकची एल्डोराडो ही लक्झरी कार 80 च्या दशकात हॅम्ट्रॅम्क प्लांटमधूनच निघाली होती.

विसाव्या शतकात याठिकाणी पोलंडहून आलेले लोक स्थायिक झाले. त्यांना लिटिल वॉरसॉ म्हटलं जाऊ लागलं. 1987 मध्ये पोलंडमध्ये जन्मलेल्या पोप जॉन पॉल द्वितीय यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी ते याठिकाणीही आले होते. 1970 च्या दशकात या शहरात राहणारे 90 टक्के लोक हे पोलंड वंशाचे होते.

पण त्यानंतर काही दशकांत अमेरिकेत कार उद्योग अधोगतीला जाऊ लागला, तेव्हा पोलंड वंशाचे अमीर तरुण या शहरातून बाहेर जाऊ लागले. या बदलामुळं हॅम्ट्रॅम्कता समावेश सर्वात गरीब शहरांत झाला. पण याठिकाणच्या स्वस्त जीवनशैलीनं पर्यटकांना याठिकाणी आकर्षित केलं.

गेल्या 30 वर्षांमध्ये या शहरानं पुन्हा कूस बदलली आहे. याठिकाणी अरबी आणि आशियाई वंशाचे पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत. विशेषतः येमेन आणि बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत.

सध्या शहराची 42 टक्के लोकसंख्या अमेरिकेच्या बाहेर जन्मलेली आहे. शहरातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या इस्लाम मानणारी आहे, असं म्हटलं जातं.

हॅम्ट्रॅम्क मधील नवं प्रशासनं शहरातील लोकसंख्येबाबतही संकेत देतं. काऊन्सिलमध्ये सध्या दोन बंगाली सदस्य आहेत. तीन येमेन वंशाचे अमेरिकन आणि एक पोलंड वंशाचा असून त्यांनी नुकताच इस्लाम स्वीकारला आहे.

68 टक्के मतं मिळवून अमीर गालिब अमेरिकेतील येमेनी वंशाचे पहिले महापौर बनले आहेत. "मला याचा अभिमान वाटत आहे, मात्र ही मोठी जबाबदारी आहे, असं 41 वर्षीय गालिब म्हणतात.

येमेनच्याच एका गावात जन्मलेले गालिब 17 वर्षांचे असताना अमेरिकेत आले होते. त्यांनी हॅम्ट्रॅम्कजवळ कारचे सुटे भाग तयार करणाऱ्या एका कारखान्यात काम सुरू केलं होतं. नंतर ते इंग्रजी शिकले आणि वैद्यकीय प्रशिक्षण घेऊन सध्या ते आरोग्य क्षेत्रात काम करत आहेत.

"हा मेल्टिंग पॉट किंवा सॅलडचा बाऊल नाही, तर हे शहर सात थरांच्या केक सारखं आहे. त्याच्या प्रत्येक थराची वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. तरीही येथील लोक एकमेकांबरोबर प्रेमाने आणि मिळून मिसळून राहत आहेत," असं काऊन्सिलसाठी निवड झालेल्या अमांडा जॅकोव्हस्की म्हणाल्या.

'लोकांमध्ये मतभेदही आहेत'

"तुम्ही एकमेकांच्या एवढे जवळ आल्यानंतर आपसांतील मतभेदांना स्थान राहत नाही," असं 29 वर्षांच्या जॅकोव्हस्की सांगतात.

पण हे शहर 'डिस्नेलँड सारखं' नाही. हे एक असं लहानसं शहर आहे, ज्याठिकाणी लोकांमध्ये मतभेदही आहेत, असं 15 वर्षे महापौर पदावर राहिलेल्या कॅरेन माजेव्हस्की म्हणाल्या.

2004 मध्ये मतदानाद्वारे या शहरात अजानला अनुमती देण्यात आली होती. त्यावेळी काही प्रमाणात तणावही निर्माण झाला होता. काही शहरवासीयांनी मशिदींच्या जवळच्या बारवर बंदी लावल्यानं स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्याचंही म्हटलं आहे.

6 वर्षांपूर्वी हॅम्ट्रॅम्कमध्ये पहिल्यांदा मुस्लिमबहुल सरकार निवडून आल्यानंतर जगभरातील माध्यमं इथं पोहोचली होती. त्यावेळी काही वृत्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणाऱ्या या शहरात तणावाचं वातावरण असल्याचं म्हटलं होतं.

एका अँकरनं तर माजी महापौर माजेव्हस्की यांना त्यांना महापौर बनत असल्याची भीती वाटते का? असंही विचारलं होतं. काहींनी तर असा अंदाजही वर्तवला होता की, मुस्लीम बहुल प्रशासन शहरात शरिया कायदा लागू करू शकते.

"पण याठिकाणचे लोक अशा गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाहीत," असं माजेव्हस्की सांगतात.

'मुस्लिमांबाबत नकारात्मक मत'

याठिकाणी लोक एकमेकांचा आदर करतात याबाबत त्या समाधानी आहेत. जे लोकांची संस्कृती आणि भाषा अधिक चांगल्याप्राकरे समजतात त्यांनाच नागरिकांनी निवडलं हे साहजिक असल्याचं त्या म्हणाल्या.

अमेरिकेच्या जनगणना विभागातर्फे धार्मिक आकडेवारी काढली जात नाही. मात्र, प्यू रिसर्च सेंटरच्या अंदाजानुसार अमेरिकेत सुमारे 38.5 लाख मुस्लिम राहतात. म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 1.1 टक्के आहे.

एका अंदाजानुसार 2040 पर्यंत अमेरिकेत ख्रिश्चनांनंतर मुस्लीम हा दुसरा सर्वात मोठा समुदाय बनेल, अशी शक्यता आहे.

प्रमाण वाढत असूनही अमेरिकेतील मुस्लिमांना अनेक पूर्वग्रहदूषित गोष्टींचा सामना करावा लागतो. 9/11 च्या हल्ल्याच्या 20 वर्षांनंतरही मुस्लिमांना इस्लामप्रती असलेल्या द्वेषाचा सामना करावा लागतो.

प्यू च्या संशोधनात सहभागी झालेल्या जवळपास अर्ध्या मुस्लिमांच्या मते, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमबहुल देशांमधून पर्यटकांच्या अमेरिकेत येण्यावर बंदी लावल्यानंतर त्यानाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने भेदभावाचा सामना करावा लागला होता.

धार्मिक समुहांचा विचार करता अमेरिकेतील नागरिकांची मुस्लिमांबाबत सर्वाधिक नकारात्मक मतं असल्याचं अभ्यासकांच्या लक्षात आलं.

अर्ध्याहून अधिक अमेरिकन नागरिकांच्या मते, ते वैयक्तिकरित्या मुस्लिमांना ओळखत नाहीत. मात्र, जे मुस्लिमांना वैयक्तिकरित्या ओळखतात त्याच्या मते, इस्लाम इतर धर्मांच्या तुलेनत हिंसाचाराला अधिक प्रोत्साहन देत नाही.

वैयक्तिक सबंध इस्लामोफोबियाला नष्ट करू शकतात, हे हॅम्ट्रॅम्क शहरानं सिद्ध केलं आहे.

9/11 च्या हल्ल्यांनंतर काही दिवसांनी शहाब अहमद यांनी काऊन्सिलच्या सदस्यपदाचा अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता.

"मी विमानापर्यंत पोहोचू न शकलेला 20 वा अपहरणकर्ता आहे, असे पोस्टर शहरात लावण्यात आले होते," असं बंगाली वंशाचे अमेरिकन नागरिक शहाब अहमद सांगतात.

अहमद त्या निवडणुकीत पराभूत झाले, मात्र त्यांनी घरोघरी जाऊन स्वतःची ओळख करून दिली. दोन वर्षांनी त्यांची काऊन्सिलमध्ये निवड झाली. शहरातील काऊन्सिलचे ते पहिले मुस्लिम सदस्य होते. त्यानंतर शहरात मुस्लिमांना पाठिंबा वाढत गेला.

लोक एकवटले

ट्रम्प यांनी 2017 मध्ये मुस्लिमबहुल देशांच्या नागरिकांवर पर्यटनाची बंदी घातली त्यावेळी हॅम्ट्रॅम्कमधील लोकांनी याचा विरोध केला.

यामुळं लोक एकप्रकारे एकवटले गेले. कारण हॅम्ट्रॅम्कमध्ये राहाचे असेल तर, एकजुट राहावं लागेल, असं लोकांना वाटल्याचं 'हॅम्ट्रॅम्क यूएसए' या माहितीपटाचे सहदिग्दर्शक रझी जाफरी यांनी म्हटलं.

देशाच्या राष्ट्रीय राजकारणातही आता मुस्लिमांची संख्या वाढली आहे. 2007 मध्ये डेमोक्रॅट नेते कीथ एलिसन मिनोसेटामधून काँग्रेसमध्ये पोहोचणारे पहिले मुस्लिम सदस्य बनले. पण इतर शहरांप्रमाणे याठिकाणीही गंभीर आणि चिथावणी देणाऱ्या सांस्कृतिक चर्चा सुरू आहेत.

शहराच्या प्रशासनानं जूनमध्ये सिटी सेंटर बाहेर समलैंगिकांचा झेंडा फडकावण्याची परवानगी दिली, तेव्हा अनेकांनी याचा विरोध केला.

त्यावेळी घरं आणि दुकानांबाहेरच्या असे अनेक सप्तरंगी झेंडे फाडून फेकण्यात आले.

माजी महापौर मेजेव्हस्की यांच्या कपड्याच्या स्टोअरबाहेर लावलेला झेंडाही फाडण्यात आला. त्यावर "यातून लोकांना चिंता करावी अशा एक संदेश पोहोचतो," असं त्या म्हणाल्या.

गांजाच्या मुद्द्यावरूनही इथं वाद झाला आहे. हॅम्ट्रॅम्कमध्ये गांजाची विक्री सुरू झाल्यानं केवळ मुस्लिमच नव्हे तर कॅथलिक ख्रिश्चनही नाराज झाले.

तर काही लोक, मुस्लिम समुदायातील महिलांच्या राजकारणातील, सहभागामुळंही चिंतेत आहेत.

महापौर पदाची निवडणूक जिंकल्यानंतरच्या जल्लोषात लोक कबाब आणि बकलावा खात नव्या महापौरांबरोबर आनंद साजरा करत होते. पण या 100 लोकांमध्ये एकही महिला नव्हती.

गालिब यांच्या प्रचारात महिलांनी सहभाग घेतला होता. पण महिला आणि पुरुषांनी वेग-वेगळं राहणं इस्लामी संस्कृतीचा एक भाग आहे, असं गालिब सांगतात.

मात्र, आता मोठ्या प्रमाणावर तरुण मुस्लिम अमेरिकन जीवनशैली अवलंबत असल्याचंही ते म्हणाले.

हॅम्ट्रॅम्कसमोर अनेक आर्थिक आव्हानंही आहेत. शहराची जवळपास अर्धी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. याठिकाणच्या पायाभूत सुविधा जुन्या होत आहेत. त्यामुळं नव्या सरकारला या आव्हानांचा सामना करावा लागेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)