बाबासाहेब पुरंदरे: ‘शिवाजी महाराजांच्या नावाने हलकल्लोळ केला’

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

'वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पावसाळा सुरू झाला होता. वरंध घाट बंद झाल्यामुळे महाडहून पुण्यास परततांना महाबळेश्वरमार्गे यावे लागत असे. मोटार महाबळेश्वरी थांबली होती. पावसामुळे झडपा बंद करून घेतल्या होत्या. कुतुहलामुळे मी माझ्या मागची झडप उचलून पावसाचे झरपणे पाहत बसलो होतो. तो, वाईकडच्या रस्त्याने कुणी सायकलस्वार चिंब भिजून आलेला दिसला. एकटाच होता. अंगातले कुडते अंगाशी अगदी चिकटून गेले होते. मस्तकावरून पाणी निथळत होते. दात थडथडत होते.

पाहिले, तर गडी ओळखीचा वाटला. मी तिथल्या तिथून जोरजोराने हाक मारू लागलो.

ऐकून तो काकडलेला सायकलस्वार मोटारीकडे वळला.

मी आश्चर्यानं विचारले, "बाबा, कुणीकडे?'

स्मित करून बाबासाहेबांनी म्हटलं, "प्रतापगडावर."

"एवढ्या पावसात अन् एकटे? मोटारीने का गेला नाही?"

"तिथं एक कागद आढळात आला, असा सांगावा पोहोचला. निघालो, झालं!"

एक जुना कागद आढळात आला असा म्हणे सांगावा आला. तेवढ्यासाठी हा माणूस पुणे ते प्रतापगड हा प्रवास वाटेतले तीन घाट चढून या लागल्या पावसाळ्यात सायकलवरून करायला निघाला होता.'

बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरेंच्या झपाटलेपणाचा हा प्रसंग त्यांचे इतिहासप्रेमातले आणि दुर्गभ्रमणातले घनिष्ठ साथीदार गो. नी. दांडेकरांनी सांगितलाय. 'गोनिदां'नी त्यांच्या 'त्रिपदी' या पुस्तकात तो लिहिलाय.

सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या पुरंदरेंच्या लिखाणाने, व्याख्यानांनी, नाटकांनी, चित्रपटांनी शिवचरित्र घराघरात पोहोचलं. बाबासाहेबांनी स्वत:च 'राजा शिवछत्रपती'च्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे त्यांनी हयातभर 'शिवाजीमहाराजांच्या नावाने हलकल्लोळ केला'.

आयुष्याच्या पूर्वार्धात त्यांना निर्विवाद आणि निर्भेळ लोकप्रियता मिळाली. पण नंतर त्यांच्या लिखाणावर आणि विचारांवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पुरंदरेंनी केलेलं शिवाजी महाराजांचं वर्णन वास्तवापासून दूर असलेलं होतं, असा आरोप करत काही संघटनांनी त्यांना विरोध केला.

'राजा शिवछत्रपती' ते गावागावांतली व्याख्यानं

पण पुरंदरेंचं कार्य आणि त्याला झालेला विरोध या दोन्ही गोष्टी पाहण्याआधी शंभर वर्षं मागे जावं लागेल. 'पुरंदर' हा किल्लाच नावात असणाऱ्या बाबासाहेबांच्या घरातच इतिहासाची आवड होती हे त्यांनीही अनेकदा सांगितलं आहे.

पण पुण्यात तरुणपणातच त्यांच्या इतिहास संशोधनाला मिळालेली दिशा निर्णायक ठरली. वि. का. राजवाडेंसारख्या इतिहासकारांनी ज्या संस्थेत संशोधन केलं, त्या पुण्याच्या 'भारत इतिहास संशोधक मंडळा'त पुरंदरेंचंही काम सुरू झालं. ग. ह. खरेंसारखे संशोधक त्यांचे गुरू होते.

1958 मध्ये त्यांच्या 'राजा शिवछत्रपती'ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यावेळेस 10 खंडामध्ये प्रकाशित झालेलं शिवचरित्र होतं. त्यानंतर आजच्या १६ व्या आवृत्तीपर्यंत मराठीतलं हे सर्वाधिक खपाच्या ग्रंथांपैकी एक आहे.

बाबासाहेबांनी 'राजा शिवछत्रपती' साठी संशोधकी शैली टाळून शाहिरी शैली स्वीकारली. सोप्या भाषेत, खिळवून ठेवेल अशा नाट्यपूर्ण पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सांगितली.

त्यांचे भाषालालित्य आणि शब्दसंभार वाचकांवर भुरळ घालणाऱ्या कादंबरीकारासारखे होते. अल्पावधितच हे पुस्तक लोकप्रिय झालं.

पुरंदरे महाराष्ट्राला परिचित झाले. पण त्यांनी इतिहासकार असं स्वत:ला न म्हणता 'शाहीर' असंच म्हटलं. तशाच बाजात नंतरही त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. पुढे जेव्हा लिखाणावरून काही वाद झाले तेव्हाही हीच भूमिका कायम राहिली.

आपल्या लिखाणाबद्दल सागर देशपांडे लिखित 'बेलभंडारा' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब लिहितात, "मी जे काही केलं ते टीपकागदाप्रमाणे आहे. माझी स्वतःची बुद्धिमत्ता वा प्रतिभा मला स्वतःला कुठेच जाणवत नाही. जुन्या कागदपत्रातील आणि मावळी खेड्यापाड्यातील लोकांची भाषा मी जरा आलटून पालटून लिहिली आहे. लिहिलं आहे ते सत्यच आहे. पण माझं काय आहे? मी टीपकागद आहे. हा माझा विनय नाही, प्रामाणिकपणा आहे."

'जाणता राजा'

बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांची कथा सांगण्यासाठी केवळ पुस्तक हे एकमेव माध्यम ठेवलं नाही. त्यातलं सर्वाधिक प्रभावी ठरलं आणि ज्यानं बाबासाहेब गावागावात पोहोचले ते म्हणजे व्याख्यानं.

त्यांच्या आवेशपूर्ण, नाट्यपूर्ण, शाहिरी बाजातल्या कथनशैलीनं त्यांना लोकप्रिय केलं. संपूर्ण शिवकाल सांगणारी आठवड्याभरापासून दोन-तीन दिवस सलग चालणाऱ्या त्यांच्या व्याख्यानमाला प्रसिद्ध झाल्या.

हजारो लोक ती व्याख्यानं ऐकायला यायचे. ही व्याखानं केवळ गावांमध्येच नाही तर देशभर, जगभर अनेक ठिकाणी होत गेली.

इतिहासातल्या सनावळ्या, घटना, तारखा,व्यक्तींची नावं असे तपशील हातावरच्या रेषांसारखे मुखोद्गत असणाच्या त्यांच्या कसबानं श्रोते विस्मयचकित न होते तरच नवल. वृद्धापकाळात उशिरापर्यंत त्यांची व्याख्यानं सुरू होती.

बाबासाहेबांच्या भाषेत, आवेशात, मांडणीत एक भव्यता होती. तीच भव्यता त्यांनी केलेल्या नाटकांतही आली. 'जाणता राजा' या कलाकृतीची चर्चा जगभरात झाली आहे. 'शिवाजी महाराजांवरचं नाटक हे त्यांच्या कार्यासारखंच भव्य-दिव्य असावं' हा आपलं स्वप्न होतं असं बाबासाहेब अनेक ठिकाणी म्हणाले आहेत.

त्यातूनच मराठी वा अन्य रंगमंचावर यापूर्वी न झालेला प्रयोग 'जाणता राजा'च्या रूपानं पुरंदरेंनी मराठीत केला. भव्य रंगमंचावर, दोनशेहून अधिक कलाकारांसह, हत्ती-घोडे-उंट अशा प्राण्यांसह, युद्धप्रसंगांसह एक नाटक उभं करणं हा एक जागतिक विक्रम झाला. देशा-विदेशात मिळून 'जाणता राजा'चे जवळपास हजार प्रयोग आजवर झाले आहेत.

शिवाजी महाराजांची कथा हेच जगण्याचं सूत्र असल्यानं बाबासाहेबांसाठी माध्यमांतर ही कधीच कष्टाची गोष्ट बनली नाही.

पं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांच्या सोबत त्यांनी 'शिवकल्याणराजा' या शिवाजी महाराजांवर रचलेल्या काव्यकृतींचा एक कार्यक्रम केला. सावरकर, गोविंद्राग्रज, कुसुमाग्रज अशा अनेक नामवंत कवींनी लिहिलेल्या या कविता होत्या, ज्यांची गीतं झाली. महाराष्ट्रातल्या अनेकांना ती मुखोद्गत आहेत.

बाबासाहेबांच्या कादंबऱ्यांचे चित्रपट झाले. काहींसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. 'सर्जा' या गाजलेल्या चित्रपटाची कथा त्यांचीच. चित्रपट माध्यमाची भव्यताही त्यांना शिवाजी महाराजांची कथा सांगण्यासाठी जवळची वाटली. पुण्यातल्या कात्रज इथे त्यांनी उभारलेल्या 'शिवसृष्टी'कडे पाहूनही या भव्यतेच्या वेडाची जाणीव व्हावी.

अजून एका गोष्टीसाठी, वा संस्कृतीसाठी, महाराष्ट्रानं बाबासाहेब पुरंदरेंना आणि त्यांच्या सोबत इतरांनाही श्रेय द्यायला हवं ते म्हणजे दुर्गभ्रमण.

आज महाराष्ट्रात हजारो ट्रेकिंग ग्रुप, किल्ल्यांची भ्रमंती करणारे ग्रुप्स, गडसंवर्धन करणाऱ्या संस्था आहेत. पण त्याच्या मुळाशी आहे दुर्गभ्रमण करण्याची आवड. ती वाढीस लावली बाबासाहेब पुरंदरे आणि गो. नी. दांडेकर यांच्यासारख्या भटक्यांनी.

इतिहास हा पुस्तकात वाचण्यासोबत तो जिथे घडला तिथं जाऊन तो समजून घेणं, अनुभवणं हेही समृद्ध करणारं आहे. तरुणांच्या अशा अनेक गटांना बाबासाहेब, गोनिदा किल्ल्यांवर घेऊन जायचे. अनेकांनी हे अनुभव लिहून ठेवले आहेत. त्यामुळे दुर्गभ्रमणाची एक संस्कृती महाराष्ट्रात रुजायला मदत झाली.

पुरंदरे आणि वाद

एवढ्या दशकांच्या आणि विविध माध्यमांमध्ये विस्तारलेल्या बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्यकाळात वाद हेही काही अपवाद नव्हते. विशेषत: आयुष्याच्या उत्तरार्धात, शेवटच्या काळात त्यांना त्याला अधिक सामोरं जावं लागलं.

इतिहास आणि ऐतिहासिक तथ्य यांची कायम काळानुसार चिकित्सा होत असते. त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या वर्तमानात राजकारणाचे आणि अस्मितेचे केंद्रबिंदू ठरू लागले. त्यामुळे बाबासाहेबांच्या लिखाणाची चिकित्सा झाली, टीका झाली, काही वादही झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले त्यांचे संबंध त्यांनी नाकारले नाहीत ना सावरकरांच्या त्यांच्यावर असलेला प्रभावाला. इथं एक नोंदही करण्यासारखी की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दादरा नगरहवेलीच्या मुक्तीसाठी जो सशस्त्र संग्राम झाला, त्यात बाबासाहेब त्यांच्या तारुण्यात सहभागी होते. शिवाय पोर्तुगिज सरकारविरुद्ध जो आंतरराष्ट्रीय लवादात लढा झाला, त्यासाठी भारताच्या बाजूनं पुरावे गोळा करण्याच्या समितीतही पुरंदरे होते.

पण बाबासाहेबांच्या लिखाणावर ते हिंदुत्ववादी पद्धतीनं लिहिलेलं आहे अशी टीका कायम झाली. हिंदू राजा विरुद्ध मुस्लीम आक्रमक अशा आवेशपूर्ण रंजित कथनानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक नरेटिव्ह तयार झालं आणि ते हिंदुत्ववादी राजकारणासाठी पोषक ठरलं, असं त्यांचे काही टीकाकार म्हणतात.

भाजप आणि शिवसेनेसोबत बाबासाहेब पुरंदरे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरही पहिल्यापासून चांगले संबंध राहिले होते. त्यांची व्याख्यानं वा 'जाणता राजा'चे प्रयोग सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आयोजित केले.

पण 2004 मधल्या महाराष्ट्रातल्या जेम्स लेन प्रकरणानंतर मात्र महाराष्ट्रातली बरीच समीकरणं, संबंध बदलले. लेननं आपल्या पुस्तकात जे दावे केले त्यावरून महाराष्ट्रात वादंग उठला, आंदोलनं झाली. पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला झाला. त्यानं महाराष्ट्राचं राजकारणही बदललं.

'संभाजी ब्रिगेड' आणि इतर संघटना या आंदोलनात पुढे होत्या. त्यांच्या टीकेचा रोख बाबासाहेब पुरंदरेंकडे वळला. पुरंदरेंनी या लेखक वा पुस्तकाशी आपला काहीही संबंध नाकारला, पण तरीही टीका होत राहिली. बाबासाहेबांनी या टीकेबद्दल नंतर बहुतांशी मौन बाळगलं.

बाबासाहेब पुरंदरेंना विरोध का याबद्दल त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार मिळाल्यावर 'बीबीसी मराठी'शी बोलतांना 'संभाजी ब्रिगेड'चे प्रविण गायकवाड म्हणाले होते,

"राजाशिवछत्रपती हा इतिहास नसून ती कादंबरी आहे. इतिहासाची उपलब्ध पुस्तकं असताना त्यांनी राजाशिवछत्रपतीसाठी त्यांचा वापर केला नाही. 'राधामाधवविलासचंपू', 'बुधभूषण', 'शिवभारत', 'जेधेशकावली' यांसारखी पुस्तकं आणि इतर पत्रव्यवहार उपलब्ध असूनही त्यांचा वापर या पुस्तकासाठी केला नाही. तसंच जेम्स लेनच्या लिखाणासाठी पूरक असं वातावरण त्यांनी तयार केले."

"जेम्स लेन आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचं प्रकरण झाल्यावर त्यांनी आजवर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्यावेळेस राज्यभरात आम्ही 28 शिवसन्मान परिषदा घेतल्या होत्या. परंतु इतकं होऊनही पुन्हा त्यांना पुरस्कार देणं म्हणजे विशिष्ट विचारसरणीला पाठिंबा दिल्यासारखं मला वाटतं," असं गायकवाड त्यावेळी म्हणाले होते.

जेव्हा 2015 मध्ये तत्कालीन भाजप सरकारनं बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला, त्यावेळेसही वादंग उठला होता. राज ठाकरेंनी मात्र स्पष्टपणे बाबासाहेब पुरंदरेंच्या बाजूनं भूमिका घेतली होती. बाबासाहेबांच्या समर्थकांनी हा विरोध जातीय दृष्टिकोनातून होतो आहे, असं म्हटलं होतं.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे म्हणतात, "ज्याला आपण मिशन किंवा कार्यव्रत म्हणतो, तसं बाबासाहेबांनी शिवचरित्र हे आपलं कार्यव्रत म्हणून घेतलं होतं. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्याचा प्रचार प्रसार केला. व्याख्यानं दिली. शिवशक्ती प्रकल्प केला.

अशी माणसं दुर्मिळ असतात. टीका होत असते. तुम्ही सगळ्या माणसांना सगळ्या काळात खूष ठेवू शकत नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्रात एक साखर कारखाना असा नव्हता की जिथे गाळप हंगामाची सुरुवात बाबासाहेबांच्या हस्ते झाली नाही. आता दुसरा काळ आहे आणि आपल्या समाजाच्या इतिहासात हे चालू असतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)