मलाला युसुफझाईनं सांगितलं लग्नाबाबतचा विचार बदलण्यामागचं कारण

पाकिस्तानातील महिला अधिकार कार्यकर्त्या आणि शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या मलाला युसुफझाई यांनी लग्नाबाबतचा पहिला लेख ब्रिटिश फॅशन मॅगझिन वोगसाठी लिहिला आहे. 24 वर्षीय मलाला यांनी असर मलिक यांच्याशी 9 नोव्हेंबरला बर्मिंघममध्ये निकाह केला.

खरं तर मलाला यांना विवाह संस्थेवर विश्वास नव्हता, पण त्यांचे पार्टनर असर मलिक यांनी त्यांच्या विचारात परिवर्तन घडवलं, याबाबत मलाला यांनी वोग मॅगझिनमधील लेखात सांगितलं आहे.

वाचा, मलाला यांनी नेमकं काय म्हटलं -

''मला वयाच्या 35 वर्षाच्या आधीपर्यंत लग्नच करायचं नाही,'' असंच उत्तर मी गेल्या काही वर्षात मला रिलेशनशिपबाबत विचारलेल्या प्रश्नावर देत होते.

मी विवाह करण्याच्या विरोधात नव्हते, मात्र मी त्याबाबत खूपच सतर्क होते. समाजातील एक संस्था म्हणून याच्या पितृसत्ताक पद्धतीबाबत माझे कायम अनेक प्रश्न असायचे. लग्नानंतर महिलांकडून असलेल्या अपेक्षांचाही त्यात समावेश होता. जगातील अनेक भागांमध्ये या नात्याशी संबंधित कायदे आणि संस्कृतीवर महिला विरोधी विचारसरणीचा प्रभाव असतो.

मला कायम माझी माणुसकी, स्वातंत्र्य आणि स्त्रीत्व गमावण्याची भीती वाटायची. त्यामुळं विवाहाकडे दुर्लक्षच केलं जावं हा तोडगा मी स्वतः शोधला होता.

जर माझ्या मनातच काही शंका किंवा प्रश्न असतील तर मी स्वतःला स्त्रीवादी कशी म्हणणार होते. गर्ल्स नॉट ब्राइड्स या संस्थेच्या एका अहवालानुसार दरवर्षी 1.2 कोटी मुलींचे विवाह वयाच्या 18 वर्षापेक्षा कमी वयात होतात. त्यात बहुतांश महिलांसाठी लग्न ही फार आनंदाची गोष्ट नसते तर गुलामीसारखा प्रकार असतो.

मी उत्तर पाकिस्तानात लहानाची मोठी झाले आहे. त्याठिकाणी विवाह हा स्वतंत्र जीवन जगण्याचा एक पर्याय आहे असं शिकवलं जात होतं. तुम्ही शिक्षण पूर्ण केलं नाही आणि नोकरी करून स्वतःला सिद्ध केलं नाही, तर तुम्ही लवकर लग्न करायला हवं, असं सांगितलं जात होतं. तुम्ही परीक्षेत नापास झाल्या असाल आणि नोकरी मिळत नसेल, तर तुम्ही लग्न करायला हवं, असं म्हटलं जायचं.

मी ज्यांच्याबरोबर मोठी झाले त्यांच्यापैकी अनेक मुलींना त्यांच्या करिअरबाबत स्वतःचे निर्णय घेण्याची संधीही न देता, त्यांना लग्न लावण्यात आलं.

माझी एक मैत्रीण 14 वर्षांची असताना आई बनली होती. काही मुलींना कुटुंबाला त्यांचं शिक्षण शक्य होत नव्हतं म्हणून शिक्षण सोडावं लागलं. काही शाळेत जात होत्या, पण कुटुंबाच्या अपेक्षा त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. पैसे खर्च करण्याइतपत त्यांचं शिक्षण महत्त्वाचं नसल्याचं त्यांच्या आई वडिलांनी ठरवलं.

या मुलींसाठी विवाहाचा अर्थ त्यांच्या जीवनातील अपयश हे आहे. त्यांचं वय अजूनही शिक्षण घेण्याचं आहे, मात्र त्यांना स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळणार नाहीच, हे त्यांना चांगलं माहिती आहे.

विवाह आणि नात्यांची रचना बदलावी लागेल- मलाला

सिरिन केल यांनी मला जुलै महिन्यात ब्रिटिश वोगच्या कव्हर स्टोरीसाठी घेतलेल्या मुलाखतीत माझ्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारला, तेव्हा मी त्यांनी पूर्वी अनेकदा दिलेलं उत्तरच दिलं होतं. माझ्या बहिणींच्या जीवनातील अंधकारमय वास्तविकता माहिती असल्याने विवाहाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी म्हटलं होतं, कदाचित विवाह ही गोष्ट माझ्यासाठी नाहीच.

पण जर दुसरा एखादा मार्ग असेल तर? शिक्षण, जागरुकता आणि सबलीकरण याद्वारे आपण अनेक सामाजिक नियम आणि प्रथांबरोबर विवाहाशी संबंधित सिद्धांतांचीही नवी व्याख्या तयार करू शकतो. तसंच नात्याचीही एक नवी रचना तयार करू शकतो. संस्कृती लोकांद्वारे तयार होते आणि लोकच ती बदलूही शकतात.

माझे मित्र, माझे मार्गदर्शक आणि आता माझे पार्टनर असलेले असर यांच्याशी चर्चेमुळं मला विवाहाच्या नात्यात असतानाही आपली मूल्य म्हणजेच समानता, निःपक्षपणा आणि अखंडता यांच्याशी मी प्रामाणिक राहू शकते, याची मला जाणीव झाली.

2018 च्या उन्हाळ्याच्या काळात असर त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी ऑक्सफर्डला आले होते. त्याठिकाणी आम्ही भेटलो. ते क्रिकेटच्या क्षेत्रात काम करतात. त्यामुळं त्यांच्याबरोबर चर्चेसाठी भरपूर विषय होते. त्यांना माझा गमतीशीर स्वभाव आवडला आणि आम्ही चांगले मित्र बनलो.

आमची मूल्यं सारखीच असल्याचं आमच्या लक्षात आलं. शिवाय आम्हाला एकमेकांबरोबर राहणंही आवडत होतं. आम्ही आनंद आणि निराशेच्या क्षणीही एकमेकांबरोबर अगदी मजबूतपणे उभे राहिलो.

आम्ही जीवनातील चढ-उतारांच्या क्षणांमध्येही एकमेकांशी चर्चा केली आणि एकमेकांचं म्हणणं ऐकलं. जेव्हा शब्दानं काम होत नव्हतं, तेव्हा मी त्यांना माझी एक लिंक पाठवायचे. त्यात राशींच्या आधारे आम्ही एकमेकांसाठी किती अनुकूल आहोत, हे सांगितलेलं असायचं. कदाचित आमच्या राशी आणि ग्रह यामुळं आमचं नातं अधिक दृध होईल, असं तेव्हा वाटत होतं.

चांगला मित्र आणि साथीदार

असरच्या रुपात मला अत्यंत चांगला मित्र आणि साथीदार मिळाला आहे. महिलांना सामोरं जावं लागणाऱ्या आव्हानांबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र, विवाहाच्या या नात्यात मला मैत्री, प्रेम आणि समान वागणूक मिळेल याची मला खात्री आहे. त्यामुळं मंगळवारी 9 नोव्हेंबरला आम्ही कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत बर्मिंघममध्ये निकाह केला.

हा अगदी छोटा सोहळा होता. सर्वांच्या मदतीनं तो संपन्न झाला. माझी आई आणि त्यांच्या मैत्रिणीनं लाहोरहून लग्नाचे कपडे आणले. असरची आई आणि बहिणीनं मला दागिने दिले. तेच मी निकाहच्या दिवशी परिधान केले. वडिलांनी सजावट आणि जेवणाची व्यवस्था केली. तर माझ्या सहकाऱ्याने फोटोग्राफर आणि मेकअपची व्यवस्था केली.

ऑक्सफर्ड आणि शाळेतील माझ्या तीन जवळच्या मित्र मैत्रीणींनी सुटी घेत सोहळ्याला उपस्थिती लावली. मी स्वतःच स्वतःच्या हातावर मेंदी काढली. कुटुंब आणि मित्रांमध्ये केवळ मलाच मेंदी चांगली काढता येते, हे मला त्यामुळं लक्षात आलं. असर आणि मी लग्नाच्या एका दिवसापूर्वी त्यांच्यासाठी गुलाबी टाय, पॉकेट स्वायर आणि माझी सँडल खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये एक तास खरेदी केली.

आमची काळजी असणाऱ्यांना हा सुखद धक्का देण्याबाबत आम्ही उत्साही होतो. तसंच पुढच्या प्रवासासाठीही आम्ही प्रचंड उत्साही आहोत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)