Climate Change: कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी जाणून घ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॅनियल क्रिमर आणि जो व्हाईटवेल
- Role, बीबीसी न्यूज
हवामान बदल म्हटलं की आपल्याला वाटू शकतं की जागतिक स्तरावरील नेत्यांना समोर येऊन एक धोरण आखावे आणि या समस्येवर तोडगा काढावा.
पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपणही कार्बन उत्सर्जन रोखण्यास मदत करू शकतो हे देखील तितकेच खरे आहे.
जर आपण आपल्या आयुष्यात, सवयींमध्ये जर थोडा बदल घडवला तर आपण पर्यावरणाचे संरक्षक होऊ शकते. त्या चार गोष्टी कोणत्या आहेत?
1. आपले घर इन्सुलेट करा
उष्णता कमी करण्यासाठी पर्यायी हिट पंप बसवण्यासारखे अनेक बदल आपण करू शकतो, त्याचा आपल्या पृथ्वीला मोठा फायदा होऊ शकतो.
"गॅस किंवा तेलावर चालणाऱ्या हिटिंग सिस्टीमऐवजी इलेक्ट्रिक हिट पंप बसवणं, यामुळं खूप फरक पडू शकतो," असं मत इम्पेरियल कॉलेज लंडनमधील डॉ. नील जेनिंग्स यांनी व्यक्त केलं आहे.
"दैनंदिन जीवनात गरज नसताना वापरात नसलेले दिवे आणि इतर उपकरणांचे स्विच बंद ठेवल्यास, त्याची पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळण्याबरोबरच पैशाची बचत होण्यासही मदत होऊ शकते," जेनिंग्स सांगतात.
इंग्लंड सरकारनं एप्रिल 2022 नंतर हिट पंप बसवण्यासाठी 5 हजार पाऊंड स्टर्लिंगचं अनुदान जाहीर केलं आहे.
शिवाय आपण भिंती, छत आणि खिडक्यांवरील इन्सुलेशनमध्येदेखील सुधारणा करून बदल करू शकतो.

फोटो स्रोत, Ryan forde
त्यासाठी ड्राफ्ट प्रुफिंग हा अत्यंत प्रभावी, स्वस्त आणि ऊर्जा बचत करणारा पर्याय असल्याचं एनर्जी सेव्हिंग ट्रस्ट (EST)नं म्हटलं आहे.
या प्रक्रियेत खिडक्या, दारे किंवा इतर ठिकाणी असलेल्या फटी बंद केल्या जातात. या फटींमधून उष्ण हवा बाहेर जाते आणि थंड हवा घरात प्रवेश करत असते.
ड्राफ्ट प्रुफिंग केल्यास घरगुती वीजबिलात दरवर्षी 25 पाऊंड स्टर्लिंगची बचत होऊ शकते, असं अंदाज EST नं व्यक्त केला आहे.
हरित ऊर्जेचा वापर सुरू केल्यास आपल्यामार्फत होणाऱ्या किंवा घरगुती कार्बन उत्सर्जनामध्ये मोठी घट होऊ शकते. मात्र अलीकडच्या काळात झालेल्या दरवाढीमुळं अनेक पुरवठादारांनी याबाबतच्या योजना मागं घेतल्या आहेत.
2. अन्नाची नासाडी आणि लाल मांस
पशुधनामुळं 14% हरितगृह वायूंची निर्मिती होते. त्यात मोठा वाटा हा गुराढोरांचा असतो.
याचं प्रमाण कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचं आहारातील सेवन कमी करणं. विशेषतः लाल मांस म्हणजे बकरी, मेंढींचं मटण किंवा बीफ.
ही शाकाहारी लोकांसाठी चांगली बातमी असली, तरी इतरही अनेक गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, AFP
हा केवळ काही ठराविक पदार्थांना चांगले किंवा वाईट ठरवण्याचा विषय नाही, असं युनिव्हर्सिटी ऑफ अबरदीनच्या जीवशास्त्रज्ज्ञ प्राध्यापिका मार्गारेट गिल म्हणाल्या.
कोणताही अन्न पदार्थ हा कशाप्रकारे उत्पादित केला आहे, तो कुठून आला आणि तो त्याच हंगामातील आहे का? यावरही या अन्न पदार्थांचा हवामानावर किती दुष्परिणाम होणार हे ठरत असतं.
कमी प्रमाणात किंवा हवं तेवढंच अन्न शिजवणं आणि उरलेलं नंतर खाणं, या माध्यमातून आपण पैशाची बचत करण्याबरोबरच कचराही कमी करू शकतो, असं मत हवामान बदलावर उपाय शोधण्याबाबत अभ्यास करणारे डॉ. जोनाथन फॉली म्हणाले.
जगात एकूण अन्नापैकी 25% ते 30% टक्के अन्नाची नासाडी होत असते, अशी माहिती वेस्ट अँड रिसोर्सेस अॅक्शन प्रोग्रामद्वारे समोर आली आहे.
3. वाहनांचा वापर, विमान प्रवास कमी करा
जगातील एकूण कार्बन उत्सर्जनापैकी 25 टक्के उत्सर्जन हे वाहतुकीमुळं होतं.
वाहतुकीद्वारे उत्सर्जन कमी करण्यासाठी कारचा वापर न करणं हे कदाचित सर्वांत प्रभावी पाऊल ठरू शकतं असं मत, डॉ. जेनिंग्स यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, कारचा वापर बंद करणं हे अगदीच प्रत्येकासाठी शक्य नाही. विशेषतः तुमच्या भागात चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसेल किंवा तुम्ही रात्रपाळी करत असाल तर ते शक्य होत नाही.
मात्र तरीही काही लहान पावलंदेखील फायदेशीर ठरू शकतात. त्यात स्थानिक बाजारात खरेदीला जाताना सायकलचा वापर करणं, शेजारी मित्र यांच्याबरोबर कार शेअर करणं, याचा त्यात समावेश असू शकतो.
इलेक्ट्रिक कार सध्या लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. मात्र किमतींचा विचार करता त्या अजूनही आवाक्याबाहेर आहेत. शिवाय जर ही इलेक्ट्रिक वाहनं वापरण्यासाठीची ऊर्जा किंवा वीज सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा अशा हरित ऊर्जा स्त्रोतांद्वारे निर्मित असेल, तरच ही वाहनं खऱ्या अर्थानं पर्यावरणाला फायदेशीर ठरतील.
इग्लंडमध्ये 2020 मध्ये 58 टक्के ऊर्जा निर्मिती ही कमी कार्बनचे स्त्रोत वापरून तयार करण्यात आली. त्यात अणुऊर्जेचाही समावेश आहे.
विमान प्रवासामुळं होणारं उत्सर्जन कमी करणं हे एक व्यक्ती म्हणून आपण उचलू शकणारं सर्वांत प्रभावी पाऊल आहे.
प्रति व्यक्ती प्रतिकिलोमीटर उत्सर्जनाचं प्रमाण हे देशांतर्गत उड्डाणांमध्ये सर्वाधिक आहे.
देशांतर्गत उड्डाणांचा विचार करता रेल्वे प्रवासामुळं होणारा दुष्परिमाण हा देशांतर्गत विमान प्रवासापेक्षा जवळपास पाच पटीनं कमी आहे. शिवाय रेल्वे प्रवास स्वस्तही आहे.
"विमान प्रवास अधिक करणाऱ्यांनी, प्रवासाची संख्या घटवणं हा देखील वैयक्तिक दृष्ट्या मोठा सकारात्मक परिणाम ठरू शकतो," असं डॉ. जेनिंग्स यांनी म्हटलं आहे.
4. खरेदीपूर्वी विचार करा
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार जीन्सची एक जोडी तयार करण्यासाठी तब्बल 3,781 लीटर पाणी लागतं. त्यात कापसाचं पिक घेणं, जीन्सचं उत्पादन, वाहतूक आणि धुणं या सर्वांचा समावेश आहे.
या दृष्टीनं विचार करता, जुने किंवा किरकोळ फाटलेले खराब झालेले कपडे लगेच फेकून देण्याऐवजी ते व्यवस्थित करून दान करावेत. शिवाय दीर्घकाळ टिकतील अशा वस्तूंची निवड करून खरेदी करणं, अशी पावलंदेखील वैयक्तिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी ठरू शकतात.
अनेक कंपन्या सध्या कपडे भाड्यानंदेखील देत आहेत. त्यामुळं फॅशन क्षेत्रातला कचरा कमी होण्यास मोठी मदत मिळते. शिवाय तुम्ही सेकंड हँड कपडेदेखील खरेदी करू शकता.
योग्य घरगुती उपकरणांची निवड हीदेखील तुमच्या कार्बन फूटप्रिंटचा विचार करता सकारात्मक ठरू शकते. आपण वीजेची अधिकाधिक बचत करणारी उपकरणे खरेदी करत आहोत याची खात्री करून, गरज असेल तेव्हाच ती बदलावी असं डॉ. जेनिंग्स यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








