बांगलादेश हिंसाचार : दुर्गा मंडपात कुराण ठेवणाऱ्याची ओळख पटवण्यात यश

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टीम बीबीसी
- Role, बांगला सेवा
बांगलादेशातील कुमिल्ला शहरात दुर्गा मंडपात कुराण ठेवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे.
परिसरातील सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात यश आलं आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोहिम उघडली आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीला दिली.
दुर्गा मंडपात कुराण ठेवल्यानंतर बांगलादेशात अनेक अनेक हिंदू मंदिरं, दुर्गा मंडप आणि हिंदू नागरिकांच्या घरांवर हल्लेही करण्यात आले होते.
गेल्या एका आठवड्यात झालेल्या हिंसाचारात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.
कुमिल्लाचे पोलीस उपायुक्त मोहम्मद कामरूल हसन आणि पोलीस अधीक्षक फारुक अहमद यांनी बीबीसी बांग्लाशी बोलताना म्हटलं की या प्रकरणात सहभाग असलेल्या एका व्यक्तीची ओळख पटवली असून त्याचा शोध सुरू आहे.
दुर्गा मंडपात कुराण ठेवणारा व्यक्ती कोण आहे?
हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीची पोलिसांनी ओळख पटवली असली तरी त्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.
पण बांगलादेशातील स्थानिक माध्यमांनी पोलिसांच्याच हवाल्याने आरोपीचं नाव छापलं आहे.
बांगलादेशमधील डेली ऑब्झर्व्हर या वृत्तपत्राने आरोपीचं नाव इकबाल हुसैन असून त्याच्या वडिलांचं नाव नूर अहमद आलम असल्याचं म्हटलं आहे.
आरोपी कुमिल्ला शहरातील सुजाननगर परिसरातील रहिवासी आहे. द डेली स्टार वृत्तपत्राने इकबाल हुसैनचं वय 30 असल्याची माहिती दिली.
इकबालची कोणतीही कायम नोकरी नसून तो इथं-तिथं फिरत असतो, असं ढाका ट्रायब्यूनने म्हटलं. इकबालचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षासोबत आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

फोटो स्रोत, EPA
आई अमीना बेगम यांच्या मते, इकबालला ड्रग्जचं व्यसन आहे. शिवाय त्याला गेल्या 10 वर्षांपासून मानसिक आजारही आहे. 10 वर्षांपूर्वी काही शेजाऱ्यांनी इकबालच्या पोटात चाकू खुपसला तेव्हापासून त्याची स्थिती बिघडली, असं अमीना बेगम यांनी सांगितलं.
तो दोषी असल्यास त्याला नक्कीच शिक्षा मिळावी, असं सांगत त्याचा लहान भाऊ रेहान त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मदत करत असल्याची माहिती मिळाली आहे.
हिंदू मंदिरं आणि दुर्गापूजा मंडप हल्ल्यात नेमकं काय काय घडलं?
कुमिल्ला इथं एका दुर्गापूजा मंडपात कुराण सापडल्यानंतर ढाका, कुमिल्ला, फेनी, किशोरगंज, चांदपूरसहित बांगलादेशातील अनेक ठिकाणी मंदिरं आणि पूजा मंडपांवर हल्ले झाले. पोलिसांसोबत झटापटीही पाहायला मिळाल्या. याप्रकरणी वेगवेगळ्या जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी काही जणांची नावं समोर आली आहेत, तर हजारो अज्ञात लोकांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
बुधवारी (13 ऑक्टोबर) सुरू झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो जणांना दुखापत झाली आहे.
ढाकामध्ये 4 हजारांहून अधिक आरोपी
शुक्रवारी (15 ऑक्टोबर) ढाकातल्या काकराईलमध्ये पोलिसांसोबत झालेल्या झटपटीविरुद्ध रमना आणि पलटन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणात 21 जणांची नावं समोर आली आहेत, तर 4000 अज्ञांताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारचा नमाज झाल्यानंतर शेकडो लोकांनी बैतुल मुकर्रम मशिदीहून मार्च काढला होता आणि ते पोलिसांसोबत भिडले. पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराचा मारा केला. यानंतर गोळीबार केला.
याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणं आणि पोलिसांवर हल्ला करणं याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमना ठाण्यात दाखल केलेल्या प्रकरणात 10 जणांची नावं समोर आली आहे, तर 1500 अज्ञातांना आरोपी बनवण्यात आलंय.
रमना पोलीस स्टेशनचे प्रभारी मोनिरुल इस्लाम यांनी सांगितलं की, शुक्रवारी झटापटीदरम्यान ज्यांना अटक केली त्यातल्या 10 जणांची नावं समोर आली आहे.

फोटो स्रोत, EPA
त्यादिवशीच्या घटनेविरोधात पलटन ठाण्यात दाखल प्रकरणात 11 जणांची नावं समोर आली आहे, तर दोन ते अडीच हजार अज्ञातांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
ठाण्याचे प्रभारी सलाउद्दीन मियां यांनी सांगितलं, "शुक्रवारी दुपारचा नमाज सुरू असताना 6 जणांना अटक करण्यात आली. बाकी 5 जण फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत."
चटगावमध्ये 500हून अधिक आरोपी, 84 अटक
चटगावमध्ये पूजा मंडपातील हल्ल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यात 84 जणांची नावं समोर आली आहेत, तर 500 इतर अज्ञात लोकांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
शुक्रवारी चटगावमधील जेएम सेन हॉलमध्ये हा हल्ला झाला होता. कुराणच्या कथित अपमानाविरोधात कुमिल्ला येथील अंदरकिला शाही जामा मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर जेएम सेन पूजा मंडपात हल्ला झाला होता.
कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी निझामुद्दीन यांनी सांगितलं, तिथली सीसीटीव्ही फुटेज आणि फोटोंच्या आधारे हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
धार्मिक भावनांचा अपमान, पोलिसांवर हल्ला आणि विशेष अधिकार अधिनियमांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.
कुमिल्लामध्ये 40 जण अटकेत
कुमिल्ला येथील प्रकरणात 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली आहे.
कुमिल्ला कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अनवारूल अझीम यांनी सांगितलं, कुराणचा अपमान आणि मूर्ती तोडल्याप्रकरणी पोलसांनी 4 गुन्हे दाखल केले आहेत.

फोटो स्रोत, EPA
यात धार्मिक भावना दुखावणं, डिजिटल सुरक्षा अधिनियम आणि विशेष अधिकार अधिनियम यांचा समावेश आहे. याप्रकरणी आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली आहे आणि शेकडो अज्ञातांना आरोपी बनवण्यात आलं आहे.
ज्या व्यक्तीच्या मोबाईल फोनहून मंडपात कुराण ठेवण्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, त्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
हाजीगंजमध्ये 2 हजारांहून अधिक आरोपी
चांदपूरच्या हाजीगंजमध्ये बुधवारी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 2 हजारांहून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे.
हाजीगंज पोलीस स्टेशनवर हल्ला आणि पोलीस जखमी होण्याच्या प्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय दोन मंदिरांमधील अधिकाऱ्यांनीही 2 गुन्हे दाखल केले आहेत.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहम्मद सोहेल महमूद यांनी बीबीसी बांगला सेवेला सांगितलं की, "एक मोठा मोर्चा काढत पोलीस स्टेशन आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी 2 हजार अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मंदिर प्रशासनानं 2 गुन्हे दाखल केले आहेत."
पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे.
किशोरगंज
शुक्रवारी संध्याकाळी किशोरगंजमध्ये करीमगंज जिल्ह्यातल्या गुंधार यूनियनच्या कादिम माईझाटी गावातील मंदिरावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. या घटनेत धार्मिक भावना दुखावणं, मूर्ती तोडणं, चोरी करणं असे आरोप करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
करीमगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी मोमिनुल इस्लाम यांच्या मते, याप्रकरणी 9 जणांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे आणि 30 ते 35 अज्ञातांना आरोपी करण्यात आलं आहे. यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
फेनी
फेनी पोलीस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद मोनिर हुसैन यांनी म्हटलं की, शुक्रवारच्या झडपेसंदर्भात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावणं, पोलिसांसावर हल्ले आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.

पहिल्या प्रकरणात अडीचशे आणि दुसऱ्या प्रकरणात 150 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. असं असलं तरी अद्याप कुणाचीही अटक झालेली नाहीये. शुक्रवारी सेंट्रल जामा मशिदीसमोर दुपारच्या नमाजानंतर निदर्शनं सुरू झाली.
तिकडे दुर्गापूजा मंडपातील हल्ला आणि तोडफोडप्रकरणी हिंदू समाजातील लोकांनी निदर्शनं केली आहे. हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराचा मारा केला आणि लोकांना नियंत्रित केलं.
नोआखाली
नोआखालीतील बेगमगंज परिसरातील चौमुहानी येथे शुक्रवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी इस्कॉन मंदिरातील अधिकाऱ्यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मंदिरावर हल्ला आणि तोडफोड प्रकरणी आरोप करण्यात आला आहे. इथं 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
नोआखालीतील बेगमगंज सर्कलच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक शाह इम्रान यांनी सांगितलं, इस्कॉनच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला आहे. यात काही नावांसोबत 200 ते 250 जणांना आरोपी करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय पोलिसांनी मारपीट, तोडफोड आणि जाळपोळप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांत 200 जणांचे नावं घेण्यात आले आहेत आणि 2 ते अडीच हजार अज्ञातांना आरोपी करण्यात आलं आहे.
इम्रान यांनी म्हटलं, "ज्या मंदिरांवर हल्ला झाला आहे, त्या सगळ्यांना गुन्हा दाखल करण्यास सांगत आहोत. पण, बहुतेक मंदिरांचे पदाधिकारी गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीयेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








