You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मलेरियाच्या लशीला परवानगी, आफ्रिकेतील चिमुकल्यांसाठी ठरणार वरदान
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
मलेरियाच्या जीवघेण्या आजारापासून चिमुकल्यांचा बचाव करणाऱ्या ऐतिहासिक अशा मोहिमेमध्ये आफ्रिकेतील बहुतांश मुलांचं लसीकरण केलं जाणार आहे.
हजारो वर्षापासून मलेरिया हे मानवासमोरचं एक मोठं संकट ठरलेलं असून, यामुळे प्रामुख्यानं लहान मुलं आणि नवजात बालकांचा मृत्यू होतो.
जवळपास एका शतकाच्या संशोधन आणि प्रयत्नानंतर लस शोधण्यात मिळालेलं हे यश वैद्यकीय क्षेत्राच्या आजवरच्या सर्वांत मोठ्या यशांपैकी एक आहे.
RTS,S नावाची ही लस असून, ती प्रभावी असल्याचं सहा वर्षांपूर्वी स्पष्ट झालं होतं.
मात्र, आता घाना, केनिया आणि मालावी याठिकाणी राबवलेल्या पथदर्शी लसीकरण कार्यक्रमाच्या यशानंतर यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मलेरियाच्या मध्यम ते उच्च संक्रमणाचं प्रमाण अधिक असलेल्या आफ्रिकेत आणि इतर भागांमध्येदेखील या लशीचा वापर सुरू करायला हवा, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)म्हटलं आहे.
WHO चे महासंचालक डॉ. ट्रेड्रोस यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे.
"मलेरियावरील बहुप्रतिक्षित लस ही चिमुकल्यांच्या दृष्टीनं विज्ञानाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसंच बाल आरोग्य आणि मलेरिया नियंत्रणासाठीही याचा मोठा फायदा होणार असून, त्यामुळे दरवर्षी हजारो चिमुकल्यांचे प्राण वाचू शकतील," असं ट्रेड्रोस म्हणाले.
जीवघेणा परजिवी
मलेरिया हा एक जीवघेणा परजीवी आहे. पुनरुत्पादनासाठी तो मानवी रक्तपेशींवर हल्ला करून, त्या नष्ट करतो. रक्त शोषणाऱ्या डास चावल्यानं त्याचा संसर्ग आणि प्रसार होतो.
परजीवींचा नाश करणारी औषधं, मच्छरदानी आणि डास मारणारी किटकनाशकं यामुळं मलेरियाचं प्रमाण कमी करण्यात आजवर मदत केली आहे.
मात्र, आफ्रिकेत या आजाराचा क्रूर चेहरा पाहायला मिळतो. याठिकाणी 2019 या एका वर्षामध्ये मलेरियामुळं 2 लाख 60 हजारांपेक्षा अधिक चिमुकल्यांनी प्राण गमावल्याचं समोर आलं आहे.
वारंवार संसर्ग होऊन त्यामाध्यमातून या आजाराच्या विरोधात रोगप्रतिकार शक्ती तयार होण्यासाठी अनेक वर्षं लागतात. ती तयार झाल्यानंतरही केवळ गंभीर आजारी पडण्याचा धोका कमी होतो.
या लसीचं मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणं प्रभावी आणि योग्य आहे का, हे जाणून घेण्यासाठी डॉ.क्वामे अॅम्पोन्सा-अचिनो यांनी घानामध्ये सर्वांत आधी प्रयोग केले.
"हा आमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असा क्षण आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यामुळं मलेरियाचं प्रमाण बरंच खाली येण्यास मदत होऊ शकेल याची मला खात्री आहे," असं ते म्हणाले.
डॉ. अॅम्पोसा-अचिनो यांना बालपणी अनेकवेळा मलेरियाची लागण होत होती. त्यातूनच त्यांना डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली.
"ही परिस्थिती अत्यंत तणाव देणारी होती. जवळपास प्रत्येक आठवड्यात शाळेला सुटी मारावी लागायची. मलेरियानं दीर्घकाळासाठी आपलं प्रचंड नुकसान केलं आहे," असं ते म्हणाले.
मुलांचे जीव वाचवणे
मलेरियाचे जवळपास 100 पेक्षा अधिक प्रकार आहे. मात्र त्यापैकी आफ्रिकेत सर्वाधिक जीवघेणा ठरणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या Plasmodium falciparum या प्रकाराला लक्ष्य करणारी RTS,S ही लस आहे.
2015 मध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षावरून असं लक्षात आलं की, या लशीमुळं 10 पैकी 4 जणांचा मलेरियापासून बचाव होऊ शकतो. तर गंभीर प्रकरणांत 10 पैकी 3 जणांना याचा फायदा होतो. तसंच चिमुकल्यांना रक्ताची आवश्यता भासण्याचं प्रमाणदेखील एक तृतीयांश एवढं कमी झालं.
मात्र, प्रत्यक्षात ही लस प्रभावी ठरेल की नाही याबाबत शंका होती, कारण लशीचा परिणाम होण्यासाठी चार डोस देणं गरजेचं होतं. पहिले तीन डोस पाचव्या, सहाव्या आणि सातव्या महिन्यात तर अखेरचा बूस्टर डोस हा जवळपास 18 व्या महिन्यात देणं गरजेचं आहे.
या पथदर्शी मोहीमेतून समोर आलेल्या निष्कर्षांवर WHO च्या दोन तज्ज्ञ सल्लागार गटांनी बुधवारी चर्चा केली.
23 लाखांपेक्षा अधिक डोस दिल्यानंतर खालील बाबी आढळल्या :
- लस सुरक्षित असून मलेरियाचे गंभीर परिणाम 30% पर्यंत कमी करण्यात प्रभावी आहे.
- झोपण्यासाठी जाळ्यांची सोय नसलेल्या बालकांपैकी जवळपास दोन तृतीयांश मुलांपर्यंत ही लस पोहोचवण्यात आली.
- लहान मुलांच्या इतर नियमित लसी किंवा मलेरियाच्या इतर उपचारांवरही याचा काहीही नकारात्मक परिणाम आढळून आला नाही.
- ही लस किफायतशीर होती.
"वैद्यकीय दृष्टीकोनानं विचार केला तर हे अत्यंत मोठं यश आहे, आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं विचार करता ही ऐतिहासिक अशी कामगिरी आहे," असं WHO च्या जागतिक मलेरिया कार्यक्रमाचे संचालक डॉय पेड्रो अलोन्सो म्हणाले.
"आम्ही जवळपास 100 वर्षांपासून मलेरियाच्या लशीच्या प्रतिक्षेत होतो. आता यामुळे आफ्रिकेतील चिमुकल्यांचं रोगापासून संरक्षण होईल आणि त्यांचे प्राण वाचू शकतील."
मलेरियावर नियंत्रण मिळवणं एवढं कठीण का?
कोव्हिड सारख्या आजारावर जगभरात अत्यंत विक्रमी वेळेत लशी तयार करण्यात आल्याचं आपण पाहिलं. मग मलेरियाची लस तयार करण्यासाठी एवढा काळ का लागला? याचं आश्चर्य तुम्हाला वाटत असेल.
मलेरियाची लागण एका परजीवीच्या माध्यमातून होते. कोरोनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूच्या तुलनेत तो अत्यंत वेगळा आणि गुंतागुंतीचा आहे. त्यांची तुलना करणं म्हणजे मानव आणि कोबी यांची तुलना केल्यासारखं आहे.
मलेरियाचा परजीवी हा आपल्या रोगप्रतिकार यंत्रणेपासून बचाव करण्याच्या दृष्टीनं विकसित झालेला आहे. त्यामुळे पुरेशी प्रतिकारशक्ती अथवा संरक्षण प्राप्त होईपर्यंत, वारंवार आपल्याला मलेरियाची लागण होण्याची शक्यता असते.
या परजीवीचं दोन प्रजातींमध्ये (मानव आणि डास) गुंतागुंतीचं असं जीवनचक्र आहे. शिवाय आपल्या शरिरातही तो विविध रुपं बदलत असतो. कारण तो आपल्या यकृत आणि तांबड्या रक्तपेशींवर हल्ला करून त्या संक्रमित करत असतो.
मलेरियाची लस तयार करणं म्हणजे अत्यंत कठीण असं काम आहे. त्यामुळंच RTS,S ही लस केवळ या परजीवीच्या स्पोरोझॉईट (sporozoite) या रुपाला लक्ष्य करते. sporozoite म्हणजे डास चावल्यापासून ते हा परजीवी यकृताकडं जाण्याच्या दरम्याची पातळी.
यामुळंच ही लस केवळ 40 टक्केच प्रभावी आहे. मात्र तसं असलं तरीही हे मोठं यश असून या दिशेनं अधिक प्रभावी लस तयार करण्याचा मार्ग त्यामुळे सुकर होणार आहे.
औषधनिर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या GSK नं ही लस विकसित केली आहे. मात्र, मलेरियापासून बचावाच्या इतर सर्व उपाययोजना म्हणजे मच्छरदानी, किटकनाशकं याला ही लस पर्याय नाही. तर या सर्वांच्या मदतीनं मलेरियाचा पूर्णपणे नाश करण्यासाठी या लशीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
तसंच आफ्रिकेबाहेर या लशीचा वापर केला जाणार नाही. कारण याठिकाणी मलेरियाची आणखी वेगळे प्रकार असून त्यापासून ही लस अधिक प्रमाणात संरक्षण देऊ शकणार नाही.
लस तयार होणं हा एक ऐतिहासिक क्षण असून त्यामुळे अनेक कुटुंबांची भीती कमी होण्यास मदत होईल, असं पाथ मलेरिया व्हॅक्सिन इनिशिएटिव्हच्या डॉ. अॅश्ले बर्केट म्हणाल्या.
"कल्पना करा की, तुमचं बाळ हे अत्यंत निरोगी आणि सुदृढ आहे. मात्र, मित्रांरोबर खेळताना किंवा झोपलेलं असताना त्याला एका संक्रमित मच्छरानं चावा घेतला तर, दोन आठवड्यांत त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो," असं या आजाराचं गांभीर्य सांगताना त्या म्हणाल्या.
"मलेरिया ही अत्यंत मोठी समस्या आहे. तसंच ती अत्यंत भयावहदेखील आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)