Canada Election : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो अडचणीत का सापडलेत?

फोटो स्रोत, AFP via Getty Image
- Author, जेसिका मर्फी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो प्रचार मोहिमेत असताना अज्ञात व्यक्तीने दगडांची बारीख खडी त्यांच्यावर फेकली. प्रचारमोहिमेदरम्यान ते बसने प्रवास करत असताना ही घटना घडली. यात त्यांना इजा झालेली नाही.
ट्रुडो यांनी कॅनडात मुदतपूर्व निवडणुका घोषित केल्या आहेत. आपल्या पक्षाला या निवडणुकीत बहुमत मिळेल अशी ट्रुडोंना आशा आहे. पण त्यांच्या प्रचारमोहिमेत आता कोव्हिड-19 च्या विरोधात लागू केलेल्या निर्बधांना विरोध करणाऱ्या आंदोलकांमुळे अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
ऑगस्ट महिन्यात जेव्हा जस्टीन ट्रुडो यांनी वेळेआधी निवडणुका घोषित केल्या होत्या, तेव्हा ते म्हणाले होते, "कॅनडाच्या जनतेला आता हे ठरवायचं आहे की आपली कोव्हिड-19 च्या विरोधातली लढाई कशी संपवायची आहे."
राजकीय वारे तेव्हा ट्रुडो यांच्या बाजूने वाहत होते असंच वाटत होतं. त्यांच्या उदारमतवादी पक्षाला चांगलं यश मिळेल अशीही अटकळ होती. ट्रुडो आणि त्यांच्या उदारमतवादी सरकारच्या धोरणावर कॅनडातली बहुतांश माणसं खूश होती.
कॅनडात लसीकरणाची मोहीम सुरू झाली, तेव्हा काही अडचणी आल्या खऱ्या, पण अपेक्षेपेक्षा कॅनडातल्या लोकांचं लसीकरण जलद गतीने झालं. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे लोक उन्हाळ्याचाही आनंद घेताना दिसत होते.
"तीन आठवड्यांपूर्वी याची खात्रीच होती म्हणा ना, किमान ज्या लोकांशी मी बोललो त्यावरून तरी की ट्रुडो यांचा उदारमतवादी पक्ष आरामात सत्ता हस्तगत करेल असं वाटत होतं," असं राजकीय विश्लेषक आणि पुराणमतवादी पक्षाच्या प्रचाराच्या व्यवस्थापक जेनी बायरन म्हणतात.
पण सप्टेंबर येता येता ट्रुडो आणि त्यांच्या पक्षाच्या अडचणीत वाढ झाली.

फोटो स्रोत, Getty Images
मेमोरियल विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले अॅलेक्स मार्ललँड म्हणतात की वेळेआधी दोन वर्षं निवडणुका जाहीर करायची काय गरज होती बरं? याचा विचार सध्या कॅनेडियन लोक करताहेत.
"निवडणुका कधी घ्यायच्या यावर पंतप्रधानाचा कंट्रोल असेल पण त्या वेळेआधी का घ्यायला हव्या याचं मात्र समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत त्यामुळे मतदार आता रागवलेत," ते म्हणतात.
राष्ट्रीय पातळीवर होणारे सर्व्हे आता असं सांगताहेत की उदारमतवादी पक्ष लोकांचं सर्मथन गमावतोय. उजव्या बाजूला झुकलेल्या पुराणमतवादी पक्ष आता त्यांच्या बरोबरीला आलाय.
जेनी बायरन म्हणतात, "सत्तारूढ पक्ष कधीकधी मतदारांना बदल हवा असू शकतो हे ध्यानात घेत नाही."
सहा वर्षं सत्तेत घालवल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान आता तितके लोकप्रिय नाहीत जितके आधी होते.
ट्रुडो यांनी दोनदा निवडणुका जिंकल्या. 2015 साली बहुमताने तर 2019 साली अल्पमताने. "त्यांना यश मिळालं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तसा प्रभाव लोकांवर पडायचा," असं मतदान क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था अॅगस रीड इंस्टिट्युटच्या शची कुर्ल म्हणतात.
पण अॅगस रीडच्याच या आठवड्याच्या सर्व्हेत दिसून आलंय की या 49 वर्षीय नेत्याची लोकप्रियता सर्व थरांमधल्या लोकांमध्ये कमी होत चालली आहे. ट्रुडो यांच्या कट्टर समर्थक असणाऱ्या महिलाही आता त्यांच्यापासून लांब जात आहेत.
त्यामुळे राजकारणात जस्टीन ट्रुडो यांना जे देवत्व लाभलं होतं, ते हळूहळू विरतंय का असा प्रश्नही राजकीय विश्लेषक विचारत आहेत.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात असं काय बदललं?
विरोधकांवर हल्ला करण्यात उदारमतवादी पक्ष कमी पडतोय. विरोधक पुराणमतवादी पक्षाचे नवे नेते एरिन ओटुले आहेत जे याआधी वकील आणि वायूसेनेत पायलट होते.
प्रा मार्ललँड यांच्यामते विरोधी पक्षनेत्याला कुठला तरी 'गुप्त हेतू असलेला दैत्य' असं दर्शवण्याचं उदारमतवादी पक्षाचं प्रचारतंत्र कामी येत नाहीये.
दुसरीकडे ओटुले यांनी पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्यांनी याआधीच LGBT हक्कांना तसंच गर्भपाताचा अधिकार महिलांना असावा या मताला पाठिंबा दिलाय. त्यांनी कामगार संघटनांनाही पाठिंबा दिलाय.
"डाव्या विचारांच्या लोकांना उजव्या लोकांची भीती दाखवून मत मिळवता येणार नाहीत जर उजवा पक्ष त्याच विचारांना पाठिंबा देतोय," मार्ललँड म्हणतात.
ओटूवे यांनी अतिशय शिस्तबद्ध रितीने आपली प्रचारमोहीम चालवली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उदारमतवादी पक्षांची वाटचाल मात्र अडखळत होतेय. आरोग्यविषयक धोरणावरून उदारमतवादी पक्षाने पुराणमतवादी पक्षावर जी टीका केली त्याला ट्विटरने 'मॅनिप्युलेटेड' असा टॅग लावला. म्हणजे यातली सगळी माहिती खरी असेलच असं नाही असं म्हटलं.
उदारमतवादी पक्षाने या टॅगच्या विरोधात तक्रार केली खरी पण त्यांना यश आलं नाही.
परत ट्रुडो यांचं एक वक्तव्य त्यांना महागात पडेल असं दिसतंय. त्यांनी म्हटलं की 'महागाईबद्दल काहीतरी आर्थिक धोरण आणावं ही माझी प्राथमिकता नव्हती.' यामुळे असा संदेश गेला की वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर जो परिणाम होतोय त्याची काहीच काळजी ट्रुडो यांना नाहीये.
अर्थव्यवस्था सुधाराची मंदावलेली गती आणि कोव्हिडच्या नव्या लाटेत शाळा उघडल्यामुळे परत आलेले विद्यार्थी यावरूनही कॅनडात अस्वस्थता आहे.
दरम्यान, लेफ्ट विंग डेमोक्रॅटिक पार्टीला आता 20 टक्के लोकांचा पाठिंबा मिळालाय. पुढारलेल्या मतदारांसाठी त्यांनी उदारमतवादी पक्षाला पर्याय उभा केलाय.
तर ब्लॉक क्युबेकोईस पक्ष, जो आपले उमेदवार फक्त क्युबेक प्रांतात देतो, त्यांनाही मतदारांचं समर्थन मिळतंय.
कॅनडापासून हजारो मैल लांब असणाऱ्या अफगाणिस्तानात काय घडतंय हेही कॅनडाचे लोक पाहाताहेत. ज्या दिवशी काबूल तालिबानच्या हातात गेलं त्याच दिवशी कॅनडात निवडणुका जाहीर झाल्या होत्या.
एरवी आंतराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र धोरण आणि संरक्षण याचा परिणाम देशांतर्गत निवडणुकांवर होत नाही.
पण निवृत्त सैन्याधिकारी आणि ट्रुडो यांच्या पक्षाचे माजी खासदार अँड्र्यू लेस्ली यांच्यामते, "अशा घटनांचे दूरगामी परिणाम होऊ शकतात." ते 2015 च्या एका घटनेकडे लक्ष वेधून घेतात, जेव्हा अयलान कुर्दी या सीरियन निर्वासित बाळाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यामुळे आंतराष्ट्रीय समुदाय हळहळला होता आणि यामुळेच कॅनडाच्या त्यावर्षाच्या निवडणुकीचा निकाल फिरायला मदत झाली.

फोटो स्रोत, Getty Images
लेस्ली 2003-04 या काळात अफगाणिस्तानात नाटो फौजांचे डेप्युटी कमांडर होते. त्यांनी कॅनडाच्या अफगाणिस्तानविषयक धोरणावर सडकून टीका केली.
त्यांच्या मते सरकारला कोणतीच गोष्ट नीट हाताळता येत नाही, मग काबूलमध्ये आपण पाहिलेल्या जीवन-मरणाचा प्रश्न असो किंवा सुरुवातीला पुरेशा लशी न उपलब्ध करून देणं असो.
यापैकी कोणतीच गोष्ट उदारमतवादी पक्षासाठी चांगली नसली तरी त्यांच्या हातातून सत्ता गेलीच आहे असं समजायचं कारण नाही असं कुर्ल यांना वाटतं.
2019 सालीही त्यांनी अल्पमतातलं सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा पॉप्युलर व्होट (मतदान केलेल्या व्यक्तींची जास्तीत जास्त मतं) पुराणमतवादी पक्षाला गेली होती.
पण प्रचारमोहीम शिगेला पोहचली की टीव्ही चॅनल्सवर वादविवाद होतील. राष्ट्रीय स्तरावरचे नेते आपल्या भूमिका मांडतील आणि तेव्हा मतदार याकडे लक्ष केंद्रित करतील अशी शक्यता आहे.
कुर्ल म्हणतात की ट्रुडो यांनी याआधीही सिद्ध केलंय की ते पिछाडीवर असले तरी मुसंडी मारून विजय मिळवू शकतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








