अफगाणिस्तान : तालिबानचा सर्वोच्च नेता हिब्तुल्लाह अखुंदजादा जिवंत असल्याचा दावा

फोटो स्रोत, AFGHAN ISLAMIC PRESS
तालिबानने काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी दावा केला आहे की त्यांचे सर्वोच्च नेते हिब्तुल्लाह अखुंदजादा अजून जिवंत आहेत आणि काही दिवसातच सार्वजनिकरित्या दिसून येतील.
तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यांनंतर प्रश्न उपस्थित केला जात होता की, त्यांचे सर्वोच्च नेते कुठे आहेत आणि सार्वजनिकरित्या समोर का येत नाहीत.
मे 2016 मध्ये अखुंदजादा तालिबानचे सर्वोच्च कमांडर बनले होते. त्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. ते बऱ्याच वर्षांपासून अफगाणिस्तानात रहातात.
विश्लेषक सांगतात, पाकिस्तानातील क्वेटा शहरातील 'क्वेटा शूरा'सोबत अफगाण-तालिबान नेत्यांचे तथाकथित जवळचे संबंध आहेत.
तालिबानचे सुप्रीम कमांडर या नात्याने अखुंदजादा राजकीय, लष्करी आणि धार्मिक विषयांचे प्रमुख आहेत.
कोण आहे हिब्तुल्लाह अखुंदझादा?
हिब्तुल्लाह अखुंदझादा हे अफगाणी तालिबानचे नेते असून, इस्लामी धर्मपंडीत आहेत आणि ते मूळचे कंदहारचे आहेत. त्यांनी तालिबानला नवीन दिशा दिली आणि सध्याच्या परिस्थितीपर्यंत संघटनेला मजल मारता आली, असं ममानलं जातं.
तालिबानचा बालेकिल्ला राहिलेल्या कंदहारशी त्यांचा संबंध असल्यामुळे त्यांना संघटनेवर स्वतःची पकड मजबूत करायला मदत झाली.
1980 च्या दशकात त्यांनी सोव्हिएत संघाविरोधात बंडखोर दलांच्या कमांडरची भूमिका निभावली होती, पण सशस्त्र दलांचा कमांडर यापेक्षा धार्मिक विद्वान म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक आहे.

फोटो स्रोत, @SecKermani
ते अफगाणी तालिबानचे प्रमुख होण्याच्या आधीही संघटनेतील उच्चनेतृत्वफळीचा भाग होते. तालिबानचे धर्माशी निगडीत आदेश तेच देत असत.
खुनाचा आणि अवैध लैंगिक संबंधांचा गुन्हा सिद्ध झालेल्यांना देहदंड देणं किंवा चोरी करणाऱ्यांचे हात कापणं, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
हिब्तुल्लाह हे तालिबानचे माजी प्रमुख अख्तर मोहम्मद मन्सूर यांचे सहायक होते. मन्सूर मे 2016 मध्ये अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात मरण पावले. मन्सूर यांनी त्यांच्या मृत्युपत्रात हिब्तुल्लाह यांना आपला वारसदार म्हणून निवडलं होतं.
पाकिस्तानातील क्वेटा इथे हिब्तुल्लाह यांचा संपर्क तालिबानी नेत्यांशी आला आणि त्यांनीच त्यांना तालिबानचं प्रमुख केलं, असं सांगितलं जातं. एएफपी या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मन्सूर यांचं मृत्युपत्र हिब्तुल्लाह यांच्या नियुक्ताला वैधता देण्यासाठी होतं.
तालिबानने हिब्तुल्लाह यांची निवड सर्वसंमतीने झाल्याचं सांगितलं होतं.
सुमारे साठ वर्षांच्या मौलवी हिब्तुल्लाह यांनी त्यांचं बहुतांश आयुष्य अफगाणिस्तानात काढलं आहे.
'अल्लाकडून मिळालेली भेट' असा हिब्तुल्लाह या नावाचा अर्थ होतो. ते मूळचे नूरझाई कबिल्यातील आहेत.
तालिबानमधील नेतृत्त्वाची रचना अशी आहे :

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








