चीन की अमेरिका? लढाऊ विमानं बनवण्याच्या स्पर्धेत कोण पुढे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, उमर फारूख
- Role, संरक्षण तज्ज्ञ
वायूसेनेच्या सिक्स्थ जनरेशनच्या 'स्टेल्थ' लढाऊ विमानं बनवण्याच्या तयारीत अमेरिका आणि चीनकडून एक नवी शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झालीये का?
या प्रश्नाचं उत्तर 'हो' असंच आहे.
जून 2021 मध्ये अमेरिकन वायूसेनेने घोषणा केली की 'सिक्स्थ जनरेशन' च्या लढाऊ विमानं बनवली जातील ज्यात 'नेक्स्ट जनरेशन एअर डॉमिनन्स सिस्टिम' (एनजीएडी) वापरली जाईल. ही विमानं येत्या 10 वर्षांत वापरात येतील.
अमेरिकन वायूसेनेचे चीफ ऑफ स्टाफ जनरल चार्ल्स क्यू ब्राऊन ज्यूनियर यांनी हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीला सांगितलं की ही नवीन लढाऊ विमानं आता वापरात असलेल्या एफ-22 रॅप्टरची जागा घेईल.
या नवीन विमानाचा उद्देश हवाई क्षेत्रात अमेरिकेचं प्रभुत्व राखणं हाच आहे. या विमानात हवेतून जमिनीवर मारा करण्याचीही क्षमता आहे.
ब्राऊन यांनी असंही म्हटलं की, "एफ -22 विमानांच्या तुलनेत एनजीएडी विमानांची मारा करण्याची क्षमता जास्त आहे. यात लढाऊ विमानांमध्ये जास्त प्रमाणात शस्त्रं, दारूगोळा घेऊन जाण्याची क्षमता आहे त्यामुळे हिंदी महासागर, आशिया, ऑस्ट्रेलिया ते पूर्व अमेरिका या पट्ट्यात मारा करता येऊ शकतो."

फोटो स्रोत, US AIRFORCE
एनजीएडी तंत्रज्ञानाला कायम 'फॅमिली सिस्टिम' म्हणून सादर केलं गेलं आहे. म्हणजे असं तंत्रज्ञान जे पायलट नसतानाही शत्रूवर हल्ला करू शकतं, त्यांची प्रतिहल्ला करण्याची क्षमता नष्ट करू शकतं आणि अतिरिक्त हत्यारंही चालवू शकतं. पण अमेरिकेच्या वायू अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की याचा मूळ ढाचा विमानाचाच आहे.
चीनचा धोका?
इंडो-पॅसिफिक भागात चिनी वायूसेनेची ताकद वाढतेय. चिनी सैन्याने हवेतून जमिनीवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रही तयार केली आहे. चीनकडून वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने हे नवं तंत्रज्ञान आणलं आहे.
चीफ ऑफ स्टाफ फॉर स्ट्रॅटेजी, इंटिग्रेशन अँड रिक्वायरमेंट्सचे लेफ्टनंट जनरल एस क्लिंटन हायनोट यांनी मे महिन्यात म्हटलं होत की चीनच्या लांब पल्ल्याचा मारा करू शकणाऱ्या नेक्स्ट जनरेशन विमानांनी जे आव्हान उभं केलं आहे त्याला परतवून लावण्याची क्षमता या नव्या विमानांमध्ये आहे.

फोटो स्रोत, CONTRINUTOR
हायनोट यांनी म्हटलं की, "चीनची J-20 सारखी अत्याधुनिक क्षेपणास्त्र अमेरिकन वायूसेनेसाठी धोका बनतील अशी वेळ येऊन ठेपलेली आहे."
चीनची J-20 विमानं पहली 'स्टेल्थ' (लपून राहाणारी, रडार किंवा आधुनिक उपकरणांना न दिसणारी) प्रकारची विमानं आहेत जी सध्या वापरली जात आहे.
हायनोट म्हणतात की, "यामुळे (चीनचं विमान) आपल्याला धोका आहे आणि यावर आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल."
चिनी वायुसेना आणि अमेरिकन वायुसेनेत आधीच वाक-युद्ध सुरू झालेलं आहे.
मागच्या वर्षी चीनमधलं इंग्लिश वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, "चीन सिक्स्थ जनरेशन लढाऊ विमानांच्या स्पर्धेत मागे राहाणार नाही आणि 2035 पर्यंत आपले अत्याधुनिक लढाऊ जेट बनवेल."
वांग हेफेंग चेंगदू एअरक्राफ्ट अँड डिझाईन इंस्टिट्यूटचे चीफ आर्किटेक्ट आहेत. त्यांनी चीनची J-20 आणि J-10 विमानं बनवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या मते चीनची अत्याधुनिक सिक्स्थ जनरेशन विमानं 2035 पर्यंत लाँच होतील.
संरक्षण क्षेत्रासंबधित सायन्स आणि टेक्नोलॉजीविषयावर प्रसिद्ध होणाऱ्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या नवीन लेखात म्हटलंय की सिक्स्थ जनरेशन लढाऊ विमानात नवीन तंत्रज्ञान वापरलंय ज्यामुळे ड्रोन्सला सुचना देता येणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि एरोडायनॅमिक (हवेचा विरोध कमी करून अधिक वेगाने उडायची क्षमता) डिझाईनव्दारे स्टेल्थ क्षमता मिळवणं शक्य आहे.
चीन यातले काही फिचर्स स्वीकारेल आणि आपल्या गरजेनुसार विमानात बसवेल.
पाकिस्तानचे तज्ज्ञ याबद्दल काय म्हणतात?
इस्लामाबादमधले संरक्षणतज्ज्ञ शाहिद रझा यांनी बीबीसीला सांगितलं की, "हे विमान अमेरिकेत तैनात केलं जाईल.
पण जर चीनसोबत संबंध ताणले गेले तर या विमानांना इंडो-पॅसिफिक भागात तैनात केलं जाऊ शकतं. असं झालं तर चीन स्वतःची सिक्स्थ जनरेशन लढाऊ विमानं बनवायला लागेल."
रझा यांच्यामते हे तंत्रज्ञान दक्षिण आशियायी क्षेत्रात पाकिस्तानवर काही परिणाम करणार नाही.
ते म्हणतात, "अमेरिका हे तंत्रज्ञान भारतासहित आपल्या सहकाऱ्यांना कदाचित देणार नाही. जसं अमेरिकेने सध्या आपल्या मित्र देशांना एफ-ए-22 रॅप्टर विमानं निर्यात करायला बंदी घातली आहे."
पाकिस्तानातले आणखी एक तज्ज्ञ आणि पाकिस्तानी वायुसेनेचे माजी पायलट कैसर तुफैल यांनी बीबीसीला सांगितलं की, "सिस्क्थ जनरेशन विमान एफ - 22 वेगवान किंवा मंद गतीच्या (लढाऊ विमानाचं) संयोजन एक मोठी भूमिका बजावेल जसं 'एफ - 15 E' ने 'एफ - 16' सोबत मिळून केलं होतं."
अमेरिकन वायुसेनेची अत्याधुनिक लढाऊ विमानं म्हणून या विमानांना नेटो देशांमध्ये निर्यात केलं जाऊ शकतं.
पण जोपर्यंत दक्षिण आशियायी भागात काही मोठी भू-राजकीय घटना घडत नाही तोवर त्यांच इथे काम पडेल असं वाटत नाही.
अमेरिकेची भूमिका
अमेरिकी वायूसेनेच्या प्रमुखांनी आर्थिक वर्ष 2022 चा अर्थसंकल्प मांडताना म्हटलं होती की या लढाऊ विमानाचा मुख्य हेतू हवाई क्षेत्रात अमेरिकेचं प्रभुत्व प्रस्थापित करणं हा असला तरी या विमानांमध्ये जमिनीवर मारा करण्याची क्षमता असेल.
ब्राऊन यांनी म्हटलं की मे महिन्यात अमेरिकेने आपल्या लढाऊ विमानांच्या दलात चार प्रकारची लढाऊ विमानं ठेवण्याचा निर्णय घेतला.
या विमानांमध्ये एफ - 35, एफ - 15 ईएक्स, एफ - 16 आणि एनजीएडी या विमानांचा समावेश होतो.
ब्राऊन यांनी म्हटलं की एनजीएडी लढाऊ विमान आधी फायटर एफ - 35च्या बरोबर उड्डाण करेल.
सुरुवातीला आमचं मुख्य विमान एफ - 15 ईएक्स आणि यानंतर एफ - 16 ही आपल्यासोबत असेल.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने 2022 च्या अर्थसंकल्पासाठी आपल्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. त्यांनी एनजीएडीसाठी निधीची मागणी केली आहे.
अमेरिकेच्या वायूसेनेने एनजीएडी योजनेसाठी 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मागणी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही मागणी 623 मिलियन डॉलर्स (62 कोटी 30 लाख) डॉलर्सने जास्त आहे.
ब्राऊन यांनी जून महिन्यात हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीला सांगितलं की, "आम्ही बदलाच्या दिशेने जात आहोत."
त्यांचं म्हणणं आहे की, "वायूसेनेतली सध्याची काही विमानं वापरणं थांबवून पैशांची बचत केली जाऊ शकते आणि त्या पैशांचा वापर नवीन विमानं बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. या नव्या विमानांमध्ये चीनसारख्या प्रतिस्पर्ध्याला हरवण्याची ताकद असेल."
आताच ठोस पावलं उचलली नाहीत तर भविष्यात चीन कोणत्याही हवाई युद्धात अमेरिकेला हरवू शकेल अशी शक्यता आहे असा इशाराही त्यांनी दिला.
काही नवीन तथ्यंही समोर आली आहेत.
वायूसेनेचे माजी अधिकारी विल रूपर यांनी सप्टेंबर 2020 मध्ये म्हटलं होतं की पहिलं एनजीएडी लढाऊ विमान 2020 साली उडवण्यात आलं होतं.
या विमानाने तेव्हा सर्वाधिक उंचीवरून उडण्याचा विक्रम केला होता. पण या प्रकारची विमान यापेक्षा जास्त उंचीवरूनही उडू शकतात.
ब्राऊन यांनी जून महिन्यात हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीला सांगितलं होतं की एनजीएडी विमान वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतील. हे विमान जमिनीवर तर मारा करू शकेलच पण हवेतल्या हवेतही लक्ष्यावर मारा करू शकेल.
रूपर यांनी म्हटलं की या लढाऊ विमानांमध्ये रडारपासून लपण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली हवी.
रूपर यांनी म्हटलं की एनजीएडीच्या मागची संकल्पना अशीये की लवकरात लवकर याचं डिझाईन बनवलं जावं आणि मग आधुनिक संचार प्रणालीच्या माध्यमातू सध्या फील्डवर अस्तित्वात असलेल्या विमानांमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जावं. पण अशा विमानांची संख्या 50-100 यामध्येच मर्यादित असावी.
या विमानांचं तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी नवं प्रतिस्पर्धी डिझाईन पाच ते बारा वर्षांच्या कालावधीत आणलं जावं आणि जुने मॉडेल निवृत्त करावेत.
अमेरिकी वायूसेनेच्या उच्चाधिकाऱ्यांननी असाही सल्ला दिलाय की एनजीएडीमध्ये दोन प्रकार असावेत - एक प्रशांत महासागर क्षेत्रात लांब पल्ल्याचा मारा करू शकणारी आणि दुसरा युरोपियन प्रदेशात तुलनेने कमी पल्ल्याचा मारा करू शकणारी.
पहिलं एनजीएडी लढाऊ विमान सक्रियरित्या मैदानात येण्यासाठी कमीच कमी 10 वर्ष लागतील असं हायनोट यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








