Tokyo Olympic डायरी : माणसाला माणूस बनवणारे क्षण आणि वादळाची चाहूल

फोटो स्रोत, JANHAVEE Moole
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी
प्रत्येक ऑलिंपिकमध्ये असे काही क्षण असतात जे खेळाच्या आणि कुठल्याही स्पर्धेच्या पलीकडे असतात. काही आठवणी कायम मनात घर करून राहतात.
टोकियोमध्येही पहिल्या तीन दिवसांत असे काही क्षण जगानं अनुभवले आहेत.
मग तो ट्युनिशायाचा जलतरणपटू अहमद हफनावीचा सनसनाटी विजय असो, अवघ्या तेरा वर्षांच्या मोमिजी निशियानं स्केटबोर्डिंगमध्ये जपानसाठी मिळवलेलं सुवर्ण असो किंवा ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू एरियन टिटमसनं दिग्गज केटी लेडेकीला हरवून सुवर्णपदक जिंकल्यावर तिच्या प्रशिक्षकांनी केलेलं भन्नाट सेलिब्रेशन असो.
पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटवतील असेच हे सगळे क्षण आहेत. असे क्षण माणसाला माणूस बनवतात.
तुम्ही कुठल्या देशाचे, धर्माचे, वंशाचे आहात? कुठली भाषा बोलता? कुठे राहता? कसे कपडे घालता? या सगळ्याच्या पलीकडे खेळ तुम्हाला घेऊन जातात.
कालच असा एक अनुभव आला. शूटिंग रेंजवरून हॉटेलला परतले आणि समजलं की पाकिस्तानचा त्लहा तालिब वेटलिफ्टिंगमध्ये पदकाच्या शर्यतीत आहे.

फोटो स्रोत, JANHAVEE Moole
सगळा थकवा विसरून त्याची स्पर्धा पाहू लागले. तल्हा एका क्षणी टॉप पोझिशनवर पोहोचला होता. पण अखेर त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण पाकिस्तानला पदक मिळणार यासाठी भारतीय उत्सुकतेनं वाट पाहातायत, असं चित्र खेळातच दिसू शकतं.
म्हणून तर खिलाडूपणा किंवा खिलाडू वृत्ती असे शब्द वापरतो आपण. ऑलिंपिकमध्ये असे शब्द जीवंत होताना पाहते आहे वारंवार. जगातलं सगळं दुःख, त्रास अशावेळी मागे पडल्यासारखा वाटतो.
अर्थात चेहऱ्यावरचा मास्क लगेच स्वप्नातून बाहेर यायला लावतो आणि रोज सकाळी पेपरमधल्या बातम्या कोव्हिडच्या केसेस वाढत असल्याचं सांगतात.
हे असं दोन्ही गोष्टी एकत्र अनुभवणं सुरू आहे सध्या. त्यात आता वादळाची भर पडेल अशी शक्यता आहे.
रँकिंग
आज सकाळपासून टोकियोमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि मधूनच वाराही जोर धरतो आहे. हवामान खात्यानं आधी टायफूनचा (पॅसिफिक महासागरातलं चक्रीवादळ) इशारा दिला होता. पण नंतर वादळाची तीव्रता कमी झाल्याचं सांगितलं आहे.
तरीही टोकियोत उद्या पाऊस पडेल आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे.
त्याचा परिणाम ऑलिंपिकच्या वेळापत्रकावर झाला आहे. तिरंदाजीत वाऱ्याच्या वेगावर बरंच काही अवलंबून असतं आणि रोईंग तर खुल्या खाडीमध्ये होतं. त्यामुळे या खेळांचं वेळापत्रक आता थोडं बदलावं लागलं आहे.
पण आशा करतो आहोत की यापलीकडे कुठल्या गोष्टीला उशीर होणार नाही आणि कुणाचंही फारसं नुकसान होणार नाही. बाकी काय होतं, हे उद्या सांगेनच. आता मात्र रजा घेते.
सायोनारा..!
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








