टोकियो ऑलिम्पिक डायरी : क्वारंटाईनबाहेरचा पहिला दिवस

टोकियो डायरी
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

टोकियोत आल्यापासून तीन दिवसांनी आमचं क्वारंटाईन संपलं तेव्हा एवढं हायसं वाटलं… तसं एका रूमध्येच काही दिवस राहण्याची लॉकडाऊननंतर सवय झाली आहे.

पण टोकियोतल्या बहुतांश हॉटेल्ससारख्या आमच्या हॉटेलमधल्या खोल्याही लहान आहेत. जेमतेम आठ बाय बाराची मुख्य खोली. तिला बाथरूम, पँट्री आणि मग दरवाजाशी जोडणारा लहानसा पॅसेज.

माझ्या काही सहकाऱ्यांना तेवढ्याशा जागेत घुसमटल्यासारखं वाटू लागलं होतं. मी मुंबईत राहिलेली असल्यानं मला बहुधा तेवढा फरक पडला नसावा. (अनेक मुंबईकरांसारखा लगेच मुंबई कशी कणखर बनवते, असा विचार आलाच मनात...)

ही खोली अगदी छोटी असली, तरी त्यातही अनेक सोयीसुविधा आहेत. मायक्रोवेव्ह, चहाची किटली, फ्रिज, वॉशिंगमशिन, डेस्क, खुर्ची असं सगळं काही. मोठा वॉर्डरोब नसला तरी हँगर्स आहेत. तुम्ही विचारण्याआधीच सांगते, होय, हायटेक टॉयलेटही आहे.

या खोलीला न उघडणारी एकच खिडकी आहे, ज्यातून गिंझा भागातल्या उंच इमारती दिसतात. पहिले तीन दिवस विलगीकरणात असताना मी रोज संध्याकाळी इथे बसून काम करायचे आणि समोर कमी होत जाणाऱ्या सूर्यप्रकाशात बदलत जाणारे आकाशाचे रंग पाहायचे.

कितीही छान असली, तरी त्या खोलीत राहणं एका आरामदायी तुरुंगापेक्षा कमी वाटत नव्हतं. मला कधी एकदा बाहेर पडतोय असं झालं होतं.

साहजिकच क्वारंटाईन संपलं, त्या दिवशी सर्वात आधी जिथे सामन्यांचं आयोजन होणार आहे, त्यातली काही स्टेडियम्स आणि व्हेन्यूज पाहून यायचं आम्ही ठरवलं होतं.

आमच्या बीबीसीच्या टीममध्येही आम्ही वेगवेगळे 'बायो बबल' केले आहेत. म्हणजे एका गटातल्या लोकांनी दुसऱ्यांशी जवळचा संपर्क ठेवायचा नाही, एकत्र प्रवास करायचा नाही आणि एका ठिकाणी असलो की सतत मास्क घालूनच राहायचं. असे बरेच नियम आहेत.

जाह्नवी मुळे, बीबीसी प्रतिनिधी

तर माझ्या बबलमध्ये मी आणि सेलेस्टिन कॅरोने अशा दोघीच आहोत. सेलेस्टिन केनियाच्या नैरोबीमधील आहे, आणि माझ्यासारखीच खेळांची चाहती आहे. साहजिकच आमच्या गप्पाही रंगतात. साहजिकच दोघींनाही सर्वात आधी ऑलिंपिक स्टेडियम - जपान नॅशनल स्टेडियम - पाहायचं होतं.

पण तिथे गेल्यावर कळलं की स्टेडियममध्ये पत्रकारांना अजूनही प्रवेश नाही. तरीही इथे एक वेगळं दृष्य पाहायला मिळालं आणि ऑलिंपिकविषयी जपानमधल्या मिश्र भावनांची जाणीव झाली.

या स्टेडियमबाहेरच जपानच्या ऑलिंपिक चळवळीला वाहिलेलं एक संग्रहालय आहे. स्टेडियम आणि या संग्रहालयादरम्यानच्या जागेत ज्युदो खेळाचे संस्थापक कानो जिगोरो यांचा पुतळा आहे. त्याच्या शेजारीच

ऑलिंपिक प्रतिक असलेल्या पाच रिंगांची प्रतिकृती आहे.

त्या रिंगांपाशी तिथे अनेक जपानी नागरीक आपल्या मुलाबाळांसह रांगेत उभे होते. अनेकजण फोटो, सेल्फी काढत होते.

टोकियो डायरी

फोटो स्रोत, BBC Sport

ते दृष्य पाहिल्यावर मला आपण एका ऑलिंपिक नगरीत असल्याची जाणीव झाली.

आणि हेही जाणवलं, की इथले सामान्य नागरिक गळ्यात ऑलिंपिकचं आयकार्ड असलेल्या व्यक्तींपासून काही फूट लांबच राहतात. नियमच आहे तसा, आणि वातावरणात चिंताही आहे.

टोकियोत अनेकांचा कोव्हिडच्या साथीमुळे या खेळांच्या आयोजनालाच विरोध आहे. एकीकडे ऑलिंपिकच्या खेलग्रामात कोव्हिडच्या केसेस समोर येत असल्यानं वातावरणात चिंता जाणवते आहे.

इथे आल्यापासून स्वयंसेवक आणि अधिकारी सोडले, तर सामान्य जपानी नागरीकांशी थेट बोलता आलेलं नाही. पण दुपारच्या उन्हात ऑलिंपिक रिंगांसमोर उभं राहून फोटो काढणाऱ्या मुलांचा उत्साह नवं बळ देऊन गेला.

तिथून आमची गाडी मेन प्रेस सेंटरकडे निघाली आणि टोकियोच्या प्रसिद्ध रेनबो ब्रिजवरून जाताना माझ्या मनात एकच विचार आला.

आता खेळ कधी सुरू होतायत आणि आपण खेळाविषयी कधी बोलतो आहोत, असं झालं आहे. बराच काळ झाला, जगाला या नव्या उर्जेची गरज आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)