हिटलरच्या 'त्या' 10 चुका ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धाची दिशाच बदलली

जर्मनी - सोव्हिएत संघ युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

22 जून 1941. नाझी जर्मनीने सोव्हिएत संघाविरुद्ध ऑपरेशन बार्बरोसा नावाची आक्रमक कारवाई सुरू केली होती. त्यावेळी सोव्हिएत संघाची सूत्र होती स्टॅलिन यांच्या हाती.

इतिहासातला हा सर्वांत मोठा सैनिकी हल्ला होता. असं करण्यात खरंतर खूप मोठी जोखीम होती, पण दुसरं महायुद्ध आपल्या बाजूने निर्णायकरित्या वळवण्याचा अॅडॉल्फ हिटलरचा हा प्रयत्न होता.

आक्रमक वृत्तीचे प्रमुख असणाऱ्या दोन महाशक्तींमध्ये या ऑपरेशन बार्बरोसामुळे एक भीषण युद्ध सुरू झालं, जे पुढे सहा महिने चाललं. याच स्पर्धेमुळे दुसऱ्या महायुद्धाचा निकाल लागणार होता.

12 व्या शतकातील रोमन सम्राट फ्रेडरिक बार्बरोसाच्या नावावरून या मोहीमेला ऑपरेशन बार्बरोसा हे नाव देण्यात आलं. जर्मनीने सोव्हिएत संघावर हल्ला केला आणि यामुळे 1939मध्ये झालेला जर्मनी - सोव्हिएत संघ सामंजस्य करार संपुष्टात आला.

अक्ष राष्ट्रांच्या (जर्मनी, इटली, जपान आणि इतर) सैन्यांनी 30 लाख सैन्याची तीन गटांत विभागणी करत लेनिनग्राड, कीफ आणि मॉस्कोला लक्ष्य केलं.

अचानक झालेल्या या हल्ल्याने सोव्हिएत लष्कर बेसावध पकडलं आणि पहिल्या युद्धात त्यांचं मोठं नुकसान झालं. अनेक लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं मानलं जातं. कीफ, स्मोलेन्स्क आणि व्याजमा या शहरांवर नाझींनी ताबा मिळवला.

पण त्यांनाही यासाठी मोठी किंमत मोजावी लागली. सोव्हिएत संघाच्या लष्करी तुकड्या हळुहळू बळकट होत गेल्या. दुसरीकडे रशियातली कडाक्याची थंडी वाढत गेली आणि डिसेंबरमध्ये जर्मनीच्या सैन्याला पायी पुढे जाणं अशक्य झालं.

पण तोपर्यंत जर्मन लष्कर मॉस्कोपर्यंत पोहोचलं होतं. दरम्यान जर्मन तुकड्या लेनिनग्राडमध्ये आक्रमक कारवाई न करता दीर्घ काळासाठी वेढा देतील, असा निर्णय हिटलरने घेतला.

जर्मन हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सगळे सोव्हिएत नागरिक एकत्र आले. अवजारांच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जर्मन हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सगळे सोव्हिएत नागरिक एकत्र आले. अवजारांच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिला.

सोव्हिएत तुकड्या सुरुवातीच्या हल्ल्यांपासून तर बचावल्या पण 1942मध्ये जर्मन सैन्याने नव्याने हल्ला सुरू केला आणि ते सोव्हिएत संघाच्या भूभागात आतपर्यंत घुसले. 1942 ते 1943 दरम्यान स्टालिनग्राडच्या लढाईचं चित्र पालटलं आणि शेवटी जर्मन सैन्याला माघार घ्यावी लागली.

जर्मन हल्ल्यांदरम्यान सोव्हिएत संघाच्या नागरिकांचा मोठा छळ करण्यात आला. यामध्ये ज्यूंचा सगळ्यांत जास्त छळ झाला आणि 10 लाखांपेक्षा जास्त ज्यू मारले गेले. ज्यूंचा नायनाट करण्यासाठीची योजनाच हिटलरने आखली होती.

युद्धांचा इतिहास आणि दुसऱ्या महायुद्धाविषयीचे जाणाकार असणाऱ्या ब्रिटनच्या इतिहासकार अँथनी बीवर यांनी या मोहीमेच्या जवळपास 80 वर्षांनंतर बीबीसी हिस्ट्रीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. या दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरकडून झालेल्या मोठ्या चुका समजून घेऊयात.

1. हिटलरकडे सोव्हिएत संघावर हल्ला करण्यासाठीची दीर्घकालीन योजना होती का?

अनेक मोठ्या बाबींबद्दल हिटरलची मतं झपाट्याने बदलली होती. पण माझ्यामते सोव्हिएत संघावरच्या त्यांच्या हल्ल्याचं मूळ हे पहिल्या महायुद्धाच्या शेवटी रुजलं असावं.

हिटलरला बोल्शेविझमचा (1917च्या बोल्शेव्हिक क्रांतीनंतर रशियात अस्तित्वात आलेला कम्युनिस्टवादाचा एक प्रकार) तिटकारा होता. 1918मध्ये जर्मनीने युक्रेनवर ताबा घेतला आणि भविष्यात बोल्शेविझम आणखीन वाढू शकतो, असं हिटलरला वाटलं.

एक विचार असाही होता ही हा प्रदेश नियंत्रणाखाली आला तर ब्रिटनला नाकाबंदी करण्यापासून थांबवलं जाऊ शकतं. कारण पहिल्या महायुद्धादरम्यान याच कारणामुळे जर्मनीचे हाल झाल झाले होते. म्हणूनच हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.

पण प्रत्यक्षात डिसेंबर 1940पर्यंतही ही योजना पूर्णपणे तयार नव्हती. ब्रिटनला या युद्धातून बाहेर करण्यासाठीचा हा एकमेव पर्याय असल्याचं सांगत हिटरलने सोव्हिएत संघावर हल्ला करण्याच्या निर्णयाचं आपल्या जनरल्ससमोर समर्थन केलं होतं.

सोव्हिएत संघ हरल्यास ब्रिटनकडे आत्मसमर्पण करण्याखेरीज इतर पर्याय उरणार नसल्याचं हिटलरचं म्हणणं होतं. त्यावेळच्या परिस्थितीचं हे एक खास विश्लेषण होतं.

2. जर्मनी - सोव्हिएत संघ करार हा हिटलरसाठी तात्पुरत्या उपाययोजनेपेक्षा अधिक काही होता का?

हे जाणीवपूर्वक करण्यात आलं होतं. आपल्याला पश्चिमेतल्या मित्रराष्ट्रांना आधी हरवायला हवं, हे हिटलरच्या लक्षात आलं होतं.

23 ऑगस्ट 1939 रोजी करारावर सह्या करताना जोकिम वॉन रिबेंट्रॉप (डावीकडे), स्टॅलिन आणि वियाचेस्लाव्ह मोलोटोव्ह (उजवीकडे)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 23 ऑगस्ट 1939 रोजी करारावर सह्या करताना जोकिम वॉन रिबेंट्रॉप (डावीकडे), स्टॅलिन आणि वियाचेस्लाव्ह मोलोटोव्ह (उजवीकडे)

यामधून त्यांच्यातला असामान्य आत्मविश्वास दिसून येतो.

नाझी आणि सोव्हिएत संघामध्ये रिबेनत्रोप - मोलोतोव्ह करार झाल्याने अर्ध्यापेक्षा जास्त युरोपाला अनेक दशकं वेदना सहन कराव्या लागल्या होत्या.

भांडवलशाहीवादी देश आणि नाझी हे एकमेकांमध्येच भांडून एकमेकांना संपुष्टात आणतील अशी स्टालिनना आशा होती.

स्टालिनसाठीही जर्मनी - सोव्हिएत संघ करार एकप्रकारे गरजेचा होता कारण त्यांनी त्यावेळी नुकतीच त्यांची रेड आर्मी संपुष्टात आणली होती आणि जर्मनीसोबत कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणं, त्यांना टाळायचं होतं.

3. जर्मनीने हल्ला करायला फार वेळ घेतल्याची टीका अनेकदा केली जाते. तुम्हाला असं वाटतं का?

अर्थातच. हे खरं आहे की ऑपरेशन बार्बरोसा सुरू व्हायला उशीर झाला आणि या हल्ल्याला इतका वेळ का लागला याविषयी चर्चा होत असते.

एक जुना मतप्रवाह असं मानतो की एप्रिल 1941मध्ये ग्रीसवर हल्ला झाल्याने ही मोहीम थांबवावी लागली. पण मूळ कारण वेळ हे असल्याचं पुढे आलं.

1940-41च्या थंडीच्या काळात भरपूर पाऊस पडला आणि यामुळे 2 अडचणी निर्माण झाल्या. पहिली अडचण म्हणजे जर्मनीचं हवाई दल असणाऱ्या लुफ्तवाफेचा हवाई तळ पाण्याने भरून गेला आणि हा तळ कोरडा होईपर्यंतच विमानं येणं वा जाणं शक्य नव्हतं.

दुसरी अडचण म्हणजे खराब हवामानामुळे पूर्वेकडच्या तळांवर वाहतूक करणारी वाहनं तैनात करायला उशीर झाला. यातली रंजक बाब म्हणजे जर्मनीच्या मोटर ट्रान्सपोर्ट डिव्हिजनमधले 80टक्के जण हे हरलेल्या फ्रेंच सैन्यातले होते.

जर्मन सेना युक्रेनमध्ये

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जर्मन लष्कर युक्रेनमध्ये

याचमुळे स्टालिनना फ्रेंचांचा तिटकारा होता. या फ्रेंचांना फितूर आणि शत्रूला सहाय्य करणारे ठरवण्यात यावं अशी मागणी त्यांनी 1943 च्या तेहराण बैठकीत केली होती. फ्रेंचांनी आत्मसमर्पण करताना आपली वाहनं नष्ट केली नाहीत, त्यांची ही गोष्ट स्टॅलिन यांच्यामते अतिशय गंभीर होती.

4. जर्मनीकडून हल्ला होऊ शकतो याविषयीच्या खबरदारीच्या इशाऱ्यांकडे स्टॅलिन यांचं दुर्लक्ष कसं झालं?

इतिहासातल्या सर्वांत मोठ्या विरोधाभासांपैकी हा एक आहे. प्रत्येक गोष्टीवर संशय घेणाऱ्या स्टॅलिन यांना हिटलरने धोका दिला. याविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. यापैकी एक म्हणजे स्टॅलिन आधीपासूनच जर्मनीवर हल्ला करण्याची योजना आखत होते.

पण या दाव्यात फारसं तथ्य दिसत नाही. ही गोष्ट सोव्हिएत संघ्याच्या 11 मे 1941च्या आपत्कालीन कागदपत्रांवर आधारित आहे. नाझींच्या हल्ल्याची कल्पना असणारे जनरल जुखोव आणि इतरांनी अशा परिस्थितीत प्रत्युत्तर कसं द्यायचं यावर चर्चा केल्याचं या कागदपत्रांत म्हटलंय.

ज्या पर्यायांचा त्यांनी विचार केला होता, त्यापैकी एक होता आधीच जर्मनीवर हल्ला करणं. पण त्यावेळी स्टॅलिनची रेड आर्मी असं करण्याच्या परिस्थितीत नव्हती. त्यांच्यासमोरची आणखी एक अडचण म्हणजे त्यांच्या तोफा ज्या ट्रॅक्टर्सवर चढवून नेल्या जात ते ट्रॅक्टर्स त्यावेळी शेतांमध्ये कापणीसाठी वापरले जात होते.

जर्मन सैनिकांवरच्या हल्ल्यानंतर त्यांच्याकडून सापडलेल्या वस्तू पाहताना सोव्हिएत सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जर्मन सैनिकांवरच्या हल्ल्यानंतर त्यांच्याकडून सापडलेल्या वस्तू पाहताना सोव्हिएत सैनिक

पण ज्याप्रकारे स्टॅलिनने प्रत्येक इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं ते रंजक आहे. त्यांना खबरदारीचा हा इशारा फक्त ब्रिटननेच नाही त्यांच्या राजदूतांनी आणि हेरांनीही दिला होता. कदाचित स्पॅशिन गृहयुद्धानंतर त्यांना असं वाटू लागलं होतं की परदेशात राहणारी प्रत्येक व्यक्ती भ्रष्ट आणि सोव्हिएत विरोधी असते.

म्हणूनच सतर्क करणाऱ्या या सगळ्यांकडे त्यांनी दुलर्क्ष केलं. अगदी जर्मन सैनिकांकडून पाठवण्यात आलेल्या सूचक शब्दांची डिक्शनरीही त्यांना इंग्रजांनी चिथावणीसाठी पाठवल्यासारखी वाटली.

अगदी ब्रिटीश बॉम्बर्सच्या नजरेपासून दूर पूर्वेकडे काही सैनिक नेत असल्याचं हिटलरचं म्हणणंही त्यांनी मानलं.

5. जर्मनीचा काय हेतू होता? खरंच जर्मनीला संपूर्ण सोव्हिएत संघ ताब्यात घ्यायचा होता का?

अर्खंगेलपासून अस्त्रखानपर्यंत एए रेषेच्या दिशेने पुढे सरकण्याची योजना आखण्यात आली होती. असं झालं असतं तर जर्मन सैनिकांना मॉस्को आणि व्होल्गातून पुढे जाण्यास मदत मिळाली असती.

म्हणूनच जेव्हा स्टॅलिनग्राडचं युद्ध झालं तेव्हा अनेक जर्मन सैनिकांना असं वाटलं की फक्त या शहरावर ताबा मिळवून आणि व्होल्गापर्यंत पोहोचलं की ही लढाई आपण जिंकली.

स्टॅलिनग्राडची लढाई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टॅलिनग्राडची लढाई

लढाईच्या सुरुवातीला हल्ल्यातून बचावलेले सोव्हिएत सैनिक बॉम्बहल्ला करत एका जागी आणण्याची योजना होती.

या सगळ्यादरम्यान रशिया आणि युक्रेनमधली जिंकलेली ठिकाणं ही जर्मनांसाठी राहण्यासाठी खुली करण्याचा विचार होता. अनेक मोठया शहरांतली लोक उपासमारीने मरतील आणि ही संख्या 3.5 कोटींच्या आसपास असेल, असा अंदाज होता.

पण एए लाईनवर झपाट्याने पुढे सरकण्यावर आणि वेढा घालत रेड आर्मीला संपुष्टात आणण्यावर ही सगळी योजना अवलंबून होती.

यातल्या काही गोष्टी योजनेप्रमाणे घडलयाही. म्हणजे युद्धादरम्यान पकडल्या जाणाऱ्या कैद्यांचं प्रमाण कीफमध्ये सर्वांत जास्त होतं.

6. जर्मनीकडे जिंकण्याची संधी होती का?

कदाचित मॉस्कोवरही जर्मन सैन्य ताबा मिळवेल आणि सगळं काही संपुष्टात येईल असं भीतीच्या एका क्षणी आपल्याला वाटल्याचं स्टॅलिन यांनी 1941मध्ये बल्गेरियाच्या राजदूतांना सांगितलं होतं.

पण राजदूत स्टॅमनॉव्ह उत्तरले, "ते सणकी आहेत. जर ते मागे हटत युराल्सच्या दिशेने गेले तर त्यांचा विजय होईल."

हिटलर

फोटो स्रोत, Getty Images

ऑपरेशन बार्बरोसा अपयशी का ठरणार होतं याकडे हे विधान इशारा करतं. या देशाचा आकार पाहिल्यास हे स्पष्ट होतं की इतका मोठा भूभाग असणाऱ्या देशाला जिंकण्यासाठी जर्मन लष्कर आणि त्यांना साथ देणाऱ्या रोमानिया आणि हंगेरीकडे पुरेसे सैनिक नव्हते.

दुसरी गोष्ट म्हणजे हिटलरने जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यापासून कोणताही धडा घेतला नव्हता. अत्याधुनिक यंत्रं आणि तंत्रज्ञान असणाऱ्या जपानने आकाराने अवाढव्य असणाऱ्या चीनवर हल्ला केला होता.

यावरून असं दिसून येतं की कदाचित सुरुवातीला तुम्हाला यश मिळेल, पण अराजकता किंवा दहशतवादामुळे जितका विरोध निर्माण होतो, तसाच विरोध हिटलरने सोव्हिएत संघाबद्दल दाखवलेलं क्रौर्य, त्यामुळे निर्माण झालेल्या वेदना आणि दहशत यातून निर्माण झाला.

हिटलरने याबद्दल कधी विचारही केला नसेल. हिटलर नेहमी म्हणत असे - दरवाजावर अशी लाथ मारा की पूर्ण इमारत कोसळेल. पण सोव्हिएत संघातल्या बहुतेक लोकांची देशभक्ती, त्यांचं वय आणि युद्ध सुरू ठेवण्याची त्यांची क्षमता या गोष्टींना हिटलरने कमी लेखलं.

7. स्टॅलिन हे सोव्हिएत संघाच्या सुरक्षेच्या रस्त्यातील अडथळा होते, असं म्हणता येईल का?

कीफच्या वेढ्यातून मागे हटण्याची परवानगी न दिल्याने लाखोंचा जीव गेला. विरोध करा वा मरा असे आदेश देण्यात आले होते आणि या आदेशांमध्ये बदल करण्यात आला नाही.

मॉस्कोच्या दिशेने मागे जातानाच्या शेवटच्या टप्प्यातच स्टॅलिनने थोडीशी उसंत दिली. असं केल्याने हे शहर वाचवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे सैनिक उरले.

8. हल्ल्याच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत सरकार कोसळण्याचा धोका होता का?

बंडखोरी होऊन सोव्हिएत सरकार कोसळण्याचा कोणताही धोका वा शक्यता नव्हती.

स्टॅलिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टॅलिन

खरंतर सोव्हिएत सरकारचा कोणी टीकाकार वा विरोधकही नव्हता कारण नेमकं काय घडतंय हे कोणालाच माहिती नव्हतं. त्यावेळी जर्मनी-सोव्हिएत संघ कराराचा भंग आणि जर्मनीने केलेला विश्वासघात याविषयी लोकांमध्ये जास्त राग होता.

एकदा काही सोव्हिएत नेते स्टॅलिनला भेटायला आले होते. त्यावेळी स्टॅलिन घाबरेलेल होते. त्यामुळे हे सोव्हिएत नेते आपल्या पकडायला येत असल्याचं त्यांना वाटलं होतं. पण हे नेतेही आपल्या प्रमाणेच घाबरलेले असल्याचं स्टॅलिनच्या लवकरच लक्षात आलं. प्रत्यक्षात हे नेते स्टॅलिनना पाठिंबा द्यायला आले होते.

9. मॉस्कोच्या युद्धात रशियातली थंडी किती महत्त्वाची ठरली?

गोठवणाऱ्या थंडीची या युद्धात महत्त्वाची भूमिका होती, यात शंकाच नाही.

त्यावेळी भरपूर गारठा होता आणि अनेकदा तापमान शून्याखाली 40 डिग्रींपर्यंत जात होतं. जर्मन सैनिकांना याची सवय नव्हती, यासाठी त्यांची तयारी नव्हती. त्यांच्याकडची अवजारं आणि कपडेही या वातावरणामध्ये उपयोगी पडत नव्हते.

म्हणजे या थंडीमुळे जर्मन मशीनगन्स गोठून चालत नसत. या बंदुका चालाव्यात यासाठी सैनिकांना त्यावर लघवी करावी लागत असे.

रशियातल्या कडाक्याच्या थंडीमुळे जर्मन सैनिकांच्या अडचणींत वाढ झाली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशियातल्या कडाक्याच्या थंडीमुळे जर्मन सैनिकांच्या अडचणींत वाढ झाली.

जर्मन सैन्याकडचे पॅजर रणगाडे बर्फामध्ये नीट चालू शकत नव्हते. तर दुसरीकडे सोव्हिएत संघाकडे असणाऱ्या टी-34 रणगाड्यांमुळे त्यांना सहजपणे आघाडी घेता येत होती.

पाऊस पडल्याने जर्मन सैनिकांचा पायी पुढे जाण्याचा वेग आधीच कमी झाला होता. त्यातच थंडीमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. पायी पुढे सरकणाऱ्या जर्मन पायदळांचा वेग रशियातल्या कडाक्याच्या थंडीमुळे मंदावला.

अगदी विमानाचं इंजिन दुसऱ्या दिवशी सुरू व्हावं म्हणून रात्रभर या विमानाच्या इंजिनच्या खालच्या बाजूस त्यांना जाळ पेटवून ठेवावा लागे.

10. सोव्हिएत संघावर हल्ला करणं ही हिटलरची सर्वात मोठी चूक होती का?

अर्थातच हो. फ्रान्सकडून पराभव झाल्यानंतर जर जर्मनीने आहे ती स्थिती कायम ठेवली असती, आणि हिटलरने आधीच जिंकलेल्या देशांमधले स्रोत वापरत आपल्या देशाचं सैन्य मजबूत केलं असतं तर जर्मनीची स्थिती बरीच चांगली झाली असती.

म्हणूनच जर स्टॅलिनने 1942 आणि 1943मध्ये आधी हल्ला केला असता, तर ते सोव्हिएत संघासाठी विनाशाचं ठरलं असतं.

दुसऱ्या महायुद्धातला हा टर्निंग पॉइंट होता. पूर्वीकडच्या आघाडीवर जर्मन सैन्याचं 80 टक्के नुकसान झालं. याच ऑपरेशन बार्बरोसामुळे जर्मन सैन्याचा कणा मोडला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)