Christian Eriksen : युरो कप सामन्यादरम्यान बेशुद्ध झालेल्या खेळाडूला मैदानावरच द्यावा लागला सीपीआर

फोटो स्रोत, Tim Goode/PA Wire
डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिस्टियन एरिक्सन मैदानात कोसळला आणि जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. एरिक्सन शुद्धिवर असून त्याची तब्येत स्थिर असल्याचं डेन्मार्कच्या फुटबॉल असोसिएशननं जाहीर केलं आहे.
कोपनहेगनमध्ये डेन्मार्क आणि फिनलंडच्या संघांमधल्या युरो कपच्या लढतीदरम्यान ही घटना घडली. नेमकं काय झालं होतं, याचं कारण अजून स्पष्ट नाही.
काही क्षणांतच परिस्थिती गंभीर असल्याचंही स्पष्ट झालं. एरिक्सनच्या टीममेट्सनी त्याच्याकडे धाव घेतली. कर्णधार सिमोन केयानं एरिक्सनच्या श्वसनमार्गात थेट अडथळा येत नसल्याची काळजी घेतली. तोवर वैद्यकीय पथकही तिथे पोहोचलं आणि त्यांनी प्रथमोपचार सुरू केले.
एरिक्सनचे सर्व सहकारी त्याच्याभोवती कडं करून थांबले होते आणि एकमेकांना धीर देत होते. एरिक्सनच्या पत्नीसह अनेक चाहते आणि खेळाडूंनाही अश्रू आवरता येत नव्हते. सामनाधिकाऱ्यांनीही सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.
जवळपास पंधरा मिनिटांनी एरिक्सनला तिथून हॉस्पिटलला नेण्यात आलं, तोवर तो शुद्धीत आल्याचं उपस्थित फोटोग्राफर्सनी सांगितलं. स्पर्धेचे आयोजकांनुसार (युईएफए) 29 वर्षीय एरिक्सनची प्रकृती सध्या 'स्थिर' आहे.
एरिक्सन बेशुद्ध झाल्यानंतर कोपनहेगनमधील सामना मध्येच थांबवण्यात आला आणि एरिक्सनला मैदानावर तातडीचे वैद्यकीय उपचार देण्यात आले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
थोड्या वेळात सामना पुन्हा सुरू झाला. फिनलँडने ब गटातील सामना 1-0 असा जिंकला.

फोटो स्रोत, REUTERS/Friedemann Vogel
सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर डेन्मार्कचे खेळाडू जेव्हा मैदानात उतरले तेव्हा फिनलँडच्या संघाने टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
युईएफएने सांगितलं की, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी निवेदन केल्याने सामना पुन्हा सुरू करण्यास त्यांनी सहमती दर्शवली. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर पूर्वार्धाच्या आधीचा पाच मिनिटांचा खेळ, हाफ टाईम ब्रेक आणि खेळाच्या उत्तरार्धाच्या आधीच्या पाच मिनिटांचा खेळ खेळला गेला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
डेन्मार्क फुटबॉल असोसिएशनचे पीटर मॅलर यांनी डेन्मार्क रेडिओला सांगितले की, "आम्ही एरिक्सनच्या सतत संपर्कात आहोत आणि खेळाडूंनीही त्याच्याशी चर्चा केली आहे. त्याची तब्येत ठीक आहे. खेळाडूंनी एरिक्सनसाठी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला."
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत डेन्मार्क संघाचे मुख्य प्रशिक्षक कॅस्पर हेजुलमन म्हणाले, "संघासाठी ही संध्याकाळ खूप कठीण होती जेव्हा आमच्या सर्वांच्या लक्षात आले की, आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातेसंबंध आहेत. आम्ही एरिक्सन आणि त्याच्या कुटुंबासमवेत आहोत."
यूईएफएचे अध्यक्ष अलेक्झांडर शेफेरिन म्हणाले, "अशा घटना तुम्हाला पुन्हा एकदा जीवनाचा विचार करण्याची संधी देतात. फुटबॉल खेळांमध्ये किती ऐक्य आहे याची साक्ष अशा घटना देत असतात. मी ऐकले की दोन्ही संघांचे चाहते एरिक्सनचे नाव घेत होते. एरिक्सन हा एक सर्वोत्तम खेळाडू आहे आणि तो सर्वोत्तम फुटबॉल खेळतो."
डेन्मार्कचा पराभव
ख्रिस्टियन एरिक्सन बेशुद्ध झाला तेव्हा सामन्याच्या पूर्वार्धाचा 40 वा मिनिट सुरू होता. त्यानंतर सामना बराच काळ स्थगित होता. त्यानंतर दोन्ही संघांनी विनंती केल्याने सामना पुन्हा सुरू झाला.

फोटो स्रोत, EPA
अखेर हा सामना फिनलँडने डेन्मार्कचा 1-0 असा पराभव करून जिंकला. सामन्यातील एकमेव गोल 59 व्या मिनिटाला फिनलँडकडून पोहजंपालोने केला.
त्यानंतर 74 व्या मिनिटाला डेन्मार्कला बरोबरी करण्याची सुवर्णसंधी मिळाली, पण होझबर्गने पेनल्टी गमावली. फिनलँडचे गोलकीपर लुकास हरडिकेला त्यांचा गोल रोखण्यात यश आले.
दरम्यान, युरो कपच्या कालच्या (12 जून) दुसऱ्या बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूनं आपला गोल एरिक्सनला समर्पित केला. लुकाकू आणि एरिक्सन क्लब फुटबॉलमध्ये इंटर मिलानसाठी एकत्र खेळतात. लुकाकूच्या गोलच्या जोरावर बेल्जियमनं रशियाला 2-0 असं हरवलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








