जागतिक पर्यावरण दिनः हवामान बदल रोखून पृथ्वी वाचवण्याचे हे आहेत 6 अनोखे मार्ग

हवामान बदल

मानवजातीसमोर सध्या असणारं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे हवामानात झालेले बदल रोखणं आणि ही हानी भरून काढणं. यासाठीचे वेगवेगळे मार्ग शोधण्यासाठी सध्या जगभरातून प्रयत्न केले जात आहेत.

बीबीसीच्या '39 Ways to Save the Planet' (पृथ्वी वाचवण्याचे 39 मार्ग) या सीरिजमधले हे आहेत 6 एकदम हटके मार्ग

1. मुलींचं शिक्षण

जगभरातली शिक्षण व्यवस्था सुधारणं महत्त्वाचं आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यातही विशेषतः मुलींसाठीच्या शिक्षण व्यवस्थांमध्ये सुधारणा करणं हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं आहेच पण त्याने हवामान बदलाविरोधताल्या लढ्यालाही मदत होणार आहे.

3 शाळकरी मुली दाखवणारं इलस्ट्रेशन

फोटो स्रोत, Amelia Flower @ameliaflower

फोटो कॅप्शन, प्राथमिक शिक्षण घेण्याच्या वयात असणाऱ्या मुलांच्या तुलनेत 55 लाख अधिक मुली या जगभरात शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर आहेत. (स्रोत : Unicef, March 2020)

याच कारण म्हणजे जर मुली दीर्घकाळ शाळेत राहिल्या तर त्यांना मुलं होण्याचा काळ तितका पुढे जाईल. जर सगळ्या मुलींना हायस्कूलचं शिक्षण जरी पूर्ण करता आलं तर 2050 पर्यंत जगभरामध्ये सध्याच्या अंदाजापेक्षा 840 दशलक्ष लोकसंख्या कमी असेल.

हवामान बदलाच्या बाबत बोलताना लोकसंख्या हा नेहमीच वादग्रस्त विषय राहिलेला आहे. कारण श्रीमंत देशातल्या लोकांपेक्षा गरीब देशांमध्ये राहणाऱ्यांचं कार्बन उत्सर्जन (कार्बन फुटप्रिंट) कमी आहे. पण पृथ्वीवरच्या सगळ्याच स्रोतांवर ताण आल्याने वाढती लोकसंख्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

तीन विविध पेशांतल्या महिला.

फोटो स्रोत, Amelia Flower @ameliaflower

फोटो कॅप्शन, देशांच्या संसदेमध्ये जर महिलांची संख्या वाढली तर त्याची परिणीती अधिक कठोर पर्यावरण विषयक धोरणं आणि कमी उत्सर्जनात होऊ शकते, असं संशोधनात आढळलंय.

पण मुलींचं शिक्षण हे लोकसंख्येच्या आकडेवारीसाठीच नाही, तर इतर गोष्टींसाठीही महत्त्वाचं आहे. ज्या स्त्रिया काम, उद्योग वा राजकारणात सहभागी होऊ शकतात त्या पर्यावरण संरक्षणासाठीची पावलं उचलू शकतात.

महिलांच्या हाती नेतृत्त्वं दिल्यास त्याचा परिणाम चांगली पर्यावरण विषयक धोरणं तयार करण्यात होईल असं संशोधनात आढळलंय. कारण महिलांचा कल हा वैज्ञानिक सल्ले घेण्याकडे जास्त असतो. सध्याच्या कोव्हिड काळातली जगाची परिस्थिती पाहिल्यास हे लक्षात येईल.

आज अनेक समाजसेवी संस्था शिक्षणासाठी निधी देत आहेत आणि त्याचा फायदाही होतोय. जगभरामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढतंय. बांगलादेशसारख्या देशातही माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींचं प्रमाण 1980च्या दशकातल्या 39 टक्क्यांवरून वाढून आज सुमारे 70 टक्क्यांवर आलंय.

2. बांबूचं उत्पादन

बांबू हे जगातलं सर्वाधिक वेगाने वाढणारं झाड आहे. बांबूची दिवसाला मीटरभर वाढ होऊ शकते आणि इतर झाडांच्या तुलनेत बांबू जास्त वेगाने कार्बन शोषून घेतो. बांबूंचा वापर हा काही बाबतीत स्टीलपेक्षाही मजबूत ठरू शकतो.

बांबू खाणारे पांडा

फोटो स्रोत, Rohan Dahotre @rohandahotre

फोटो कॅप्शन, बांबू हे जगातलं सर्वाधिक वेगाने वाढणारं झाड आहे

या सगळ्यामुळे बांबू हा फर्निचर आणि इमारती उभ्या करताना वापरण्याजोगा पर्यावरणस्नेही घटक ठरू शकतो.

चीनमध्ये एकेकाळी बांबूला गरीबाचं लाकूड म्हटलं जाई. पण आता मात्र ही संकल्पना बदलली आहे. बांबू वापरून केलेली उत्पादनं ही पर्यावरणपूरक, स्टील, PVC, अॅल्युमिनियम आणि काँक्रीटसाठीचा कमी कार्बन उत्सर्जन करणारा पर्याय ठरू शकतात.

बांबूची पैदास केल्याने जमिनीची धूप कमी होईल आणि पूर येण्याचा धोकाही कमी होईल,

फोटो स्रोत, Rohan Dahotre @rohandahotre

फोटो कॅप्शन, बांबूची पैदास केल्याने जमिनीची धूप कमी होईल आणि पूर येण्याचा धोकाही कमी होईल,

बांबूची पैदास करण्याचे पर्यावरणासाठी इतरही काही फायदे आहेत. बांबू कीड प्रतिरोधक असतात आणि त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो, धूप कमी होते आणि म्हणून पूर येण्याचा धोका कमी होतो.

आरिफ राबिक इंडोनेशियामध्ये इन्व्हायर्नमेंटल बांबू फाउंडेशन चालवतात. एक हजार बांबू व्हिलेजेस म्हणजे बांबूचं उत्पादन आणि वापर करणारी गावं निर्माण करून जमीन पुन्हा सकस करण्याचं, कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं त्यांचं ध्येय आहे.

या प्रत्येक वस्तीच्या भोवती 20 चौरस फुटांच्या बांबूच्या जंगलाचा वेढा असेल. यामध्ये पिकं घेण्यासाठी, गुरं पाळण्यासाठीही जागा असेल. इतर 9 देशांमध्ये ही संकल्पना राबवण्याचा त्यांचा मानस आहे.

"हे सगळे बांबू मिळून एकत्रितपणे वातावरणातून अब्जावधी टनांचा कार्बन डायऑक्साईड दलवर्षी शोषून घेतील आणि काढून टाकतील," आरिफ सांगतात.

3. जास्त प्रदूषण करणाऱ्यांशी कायदेशीर लढा

वातावरण बदलासाठीचा लढा देताना हे लढा देणारे वकील आता कायद्यांचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. खरंतर कायदा आणि न्याय व्यवस्था हे प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आणि सरकारांना आळा घालण्यासाठीचं सर्वात शक्तीशाली शस्त्रं आहे.

पर्यावरण बदलासाठी कायद्याचा वापर

फोटो स्रोत, Rohan Dahotre @rohandahotre

तेल उत्पादन करणाऱ्या शेल (Shell) या कंपनीने उत्सर्जन कमी करावं आणि त्यांच्या धोरणांमध्ये पॅरिस हवामान करारानुसार बदल करावेत असा निकाल नुकताच नेदरलँड्सच्या कोर्टाने दिला होता. ही केस महत्त्वाची मानली जाते.

आणि या हेतूसांठी फक्त पर्यावरण विषयक कायदेच वापरे जाऊ शकतात, असं नाही. काही हुशार वकील वेगळा विचार करत मानवाधिकार कायदे, रोजगार कायदे आणि अगदी कंपनी लॉचा वापरही पर्यावरणासाठीच्या लढ्यात करत आहेत.

फक्त 35 डॉलर्स मूल्याचे शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदारांच्या एका गटाने 2020 वर्षामध्ये पोलंडमध्ये उभारण्यात येणारा एक कोळसा प्रकल्प थांबवला.

हे त्यांनी कसं केलं ?

क्लायंट अर्थ नावाच्या या पर्यावरणविषयक गटाने एनिआ (Enea) नावाच्या पोलंडमधल्या ऊर्जानिमिर्ती करणाऱ्या कंपनीचे त्यांच्या मालकीचे शेअर्स आणि कॉर्पोरेट लॉ याच्या मदतीने कंपनीच्या प्रकल्प उभारण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं.

आणि अशा प्रकारने नवीन कोळसा प्रकल्प उभारणं बेकायदेशीर असल्याचा निकाल कोर्टाने दिला.

4. गॅस सोडणारे फ्रिज शोधणं

प्रत्येक फ्रिज, फ्रीझर आणि वातानुकूलन यंत्रात (एअर कंडिशनर) थंडावा देण्यासाठी हायड्रोफ्लुरोकार्बन्स (hydrofluorocarbons ) म्हणजे HFC सारखी रसायनं वापरली जातात.

जुन्या उपकरणांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर त्याचा मोठा फायदा होईल

फोटो स्रोत, Dandy Doodlez @dandydoodlez

फोटो कॅप्शन, जुन्या उपकरणांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर त्याचा मोठा फायदा होईल

पण फ्रिजमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणारे हे HFC जगाभोवती धोक्याची चादर निर्माण करत आहेत.

कार्बन डायऑक्साईड पेक्षाही हे HFC जास्त धोकादायक ग्रीनहाऊन गॅसेस आहेत. त्यामुळे या प्रकारची रसायनं वापरातून बाद करण्याचं 2017मध्ये जगभरातल्या नेत्यांनी ठरवलं.

हे पाऊल उचचल्याने जगभरातलं तापमान 0.5 अंशांनी कमी होईल असा अंदाज वर्तवला जातोय.

पण सध्या वापरात वा अस्तित्त्वात असणाऱ्या फ्रीज आणि एसींची संख्या प्रचंड आहे. ही उपकरणं जुनी झाल्यानंतर यातून धोकादायक वायू बाहेर पडत असल्याने या उपकरणांचं रिसायकलिंग होणं वा त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाणं गरजेचं आहे.

सुदैवाने जगभरात अशी अनेक पथकं सध्या काम करत आहेत, जी अशा प्रकराची उत्सर्जनं शोधून ती नष्ट करतात.

मारिया गुटिरेझ या ट्रेडवॉटर या कंपनीच्या आंतरराष्ट्रीय योजनांसाठीच्या संचालक आहेत. ही कंपनी उत्सर्जनं शोधून ती योग्य पद्धतीने थांबवते. अनेकदा त्यांना जुनी गोदामं किंवा भंगार टाकण्यात आलेल्या ठिकाणी अशाप्रकारचे वायू सोडणारे फ्रीज वा एसी सापडतात.

5. जहाजांची खालची बाजू अधिक गुळगुळीत करणं

जगभरातल्या व्यापाराबद्दल बोलायचं झालं तर शिपिंग म्हणजे जल वाहतूक उद्योग हा जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. जगाच्या एकूण व्यापाराच्या 90 टक्के दळणवळण हे बोटींनी वा जहाजांनी होतं. आणि माणसाद्वारे होणाऱ्या एकूण कार्बन उत्सर्जनाच्या जवळपास 2 टक्के उत्सर्जन या जहाजांद्वारे होतं. आणि येत्या काही दशकांमध्ये हे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.

कार्गो जहाज

फोटो स्रोत, Kingsley Nebechi @kingsleynebechi

फोटो कॅप्शन, इंधन वापर कमी करण्यासाठी बोटींचा तळ गुळगुळीत कसा ठेवता येईल याचे मार्ग तज्ज्ञ शोधतायत.

आपली जहाजांवरची भिस्त पाहता या जहाजांसाठी अडचणीचा ठरणारा Barnacle म्हणजे कालव्यांसारखा जलचर महत्त्वाचा मुद्दा आहे. हे बारनॅकल्स जहाजांच्या वा बोटींच्या पाण्यातल्या तळांशी चिकटून राहतात.

बारनॅकल्स, लिम्पेट (Limpets) आणि मसल्स (Mussels) म्हणजे शिंपले हे बोटींच्या तळाशी चिकटल्याने अशा बोटींकडून गुळगुळीत तळ असणाऱ्या बोटींच्या तुलनेत 25 टक्के जास्त इंधन वापरलं जातं. यामुळे उत्सर्जनही वाढत आणि दरवर्षी तब्बल 31 अब्ज डॉलर्स इंधनावर जादा खर्च होतात.

खास UV रंग वापरण्यापासून ते क्लोरीनचा वापर करण्यापर्यंत आणि बोटीचा तळ साफ करणारे रोबो वापरण्याच्या पर्यायांचा विचार केला जातोय.

फोटो स्रोत, Kingsley Nebechi @kingsleynebechi

फोटो कॅप्शन, खास UV रंग वापरण्यापासून ते क्लोरीनचा वापर करण्यापर्यंत आणि बोटीचा तळ साफ करणारे रोबो वापरण्याच्या पर्यायांचा विचार केला जातोय.

म्हणूनच हा इंधन वापर कमी करण्यासाठी बोटींचा तळ गुळगुळीत कसा ठेवता येईल याचे मार्ग तज्ज्ञ शोधतायत. यामध्ये अगदी खास UV रंग वापरण्यापासून ते क्लोरीनचा वापर करण्यापर्यंत आणि बोटीचा तळ साफ करणारे रोबो वापरण्याच्या पर्यायांचा विचार केला जातोय.

यामागचा विचार अगदी सरळ साधा आहे. जर बोटींचा तळ गुळगुळीत राहिला, तर कमी इंधन वापरलं जाईल, परिणामी कमी उत्सर्जन होईल.

6. कमी उत्सर्जन करणाऱ्या तांदळाची निर्मिती

भात शेतीमुळे कार्बन उत्सर्जन होतं, हे तुम्हाला माहिती आहे का? खरं म्हणजे विमान वाहतुकीमुळे जेवढं कार्बन उत्सर्जन होतं, तितकंच भात शेतीमुळे होतं!

तांदूळ

फोटो स्रोत, Sarina Mantle @wildsuga

फोटो कॅप्शन, जगभरातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येसाठी भात हा रोजचा आहार आहे.

कारण सध्या भातशेतीमध्ये तण उगवू नयेत म्हणून पूर्ण शेतात पाणी सोडलं जातं. या पाण्यामुळे ऑक्सिजन खालच्या मातीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि विषाणूंना मिथेन गॅसची निर्मिती करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होतं.

एक किलो मिथेन गॅस हा कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत 25 पटींनी अधिक ग्लोबल वॉर्मिंग निर्माण करतो.

म्हणूनच आता भात शेतीमध्ये काही बदल करता येतील का याचा शोध घेतला जातोय. कोरड्या शेतीमध्ये, कमी पाण्याचा वापर करून पीक घेता येईल असं वाण संशोधक शोधत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही मदत होईल आणि मिथेनचं उत्सर्जनही कमी होईल.

इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटने यासाठी भाताच्या 650 वाणांचा अभ्यास केला असून कोणती प्रजाती उत्तम आहे याची चाचणी केली जातेय.

अशी अपेक्षा आहे की दशकभरामध्ये आपण कमी गॅस उत्सर्जन करणाऱ्या पद्धतीने भातशेती करू शकू.

बीबीसीच्या क्लायमेट सोल्यूशन्स प्रोजेक्टसाठी द ओपन युनिव्हर्सिटीच्या सोबत ही चित्रं तयार करून घेण्यात आली होती.

चित्रांचे आर्टिस्ट - अमिलिया फ्लॉवर (@ameliaflower), रोहन दाहोत्रे (@rohandahotre),डँडी डूडल्झ(@dandydoodlez),किंग्सले नेबेची (@kingsleynebechi)आणि सरीना मँटल

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)