कोरोना व्हायरस : भारतातला विषाणूचा प्रकार काय आहे? तो किती धोकादायक आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, इंडिया करस्पाँडंट
कोरोना व्हायरसच्या भारतात सापडलेल्या नव्या प्रकाराबद्दल जगभरातले शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. पण तो किती दूरवर पसरलाय आणि त्याचा भारतातील कोव्हिडच्या दुसऱ्या, अधिक घातक लाटेशी नेमका किती संबंध आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय.
भारतातील व्हेरियंट काय आहे?
सगळ्याच विषाणूंमध्ये बदल होत असतात त्यांना म्युटेशन किंवा उत्परिवर्तन असं म्हणतात. यातून त्या विषाणूचे अनेक व्हेरियंट तयार होत असतात. भारतात आढळलेल्या व्हेरियंटना जागतिक आरोग्य संघटनेनं 'डेल्टा' आणि 'कपा' अशी नावं दिली आहेत.
जगभरात आढळलेल्या विविध व्हेरियंटना अशी ग्रीक नावं देण्यात आली आहेत.

यातील अनेक म्युटेशन्स ही दखलपात्रही नसतात, काही म्युटेशन्समुळे व्हायरस कमकुवत होतो पण काही त्याला अधिक संसर्गजन्य बनवतात ज्यामुळे त्यावर लशींचा परिणाम होणं कठीण होऊन बसतं.
भारतातील व्हेरियंट- B1617 - पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात पाहायला मिळाला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
भारताचा व्हेरियंट कुठे कुठे पसरलाय?
भारतात सँपल टेस्टिंगची व्याप्ती हे सांगण्यासाठी पुरेशी नाहीय की कोरोनाचा हा व्हेरियंट कुठवर आणि किती वेगाने पसरलाय?
जानेवारी आणि मार्च महिन्यादरम्यान महाराष्ट्रात जिनोम सिक्वेन्सिंग केलेल्या 361 कोव्हिड नमुन्यांपैकी 220 नमुन्यांमध्ये, म्हणजे 61% नमुन्यांमध्ये, हा सापडला होता.
GISAD या डेटाबेसमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार 21 देशांमध्ये हा भारतीय कोरोना सापडलाय.

फोटो स्रोत, EPA
युकेच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय की युकेमध्ये भारतात सापडलेल्या म्युटेशनच्या 103 केसेस सापडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे हे घडलं असण्याची शक्यता आहे. भारतातून येणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांना आता युकेने बंदी घातलीय.
पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेने भारतीय व्हेरियंटला 'संशोधन सुरू असलेले व्हेरियंट' या गटात टाकलंय, 'चिंताजनक व्हेरियंट' असं त्याचं वर्गीकरण अद्याप तरी त्यांनी केलेलं नाही.
भारताचा कोरोना अधिक संसर्गजन्य किंवा धोकादायक आहे?
लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटीमधील विषाणूतज्ज्ञ डॉ. जेरेमी कामिल म्हणतात, "भारतीय व्हेरियंटमधील एक म्युटेशन हे दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये सापडलेल्या म्युटेशनसारखं आहे. लस घेतल्यामुळे किंवा पूर्वी कोव्हिड होऊन गेल्यामुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजना चकवा देण्यात हे म्युटेशन मदत करू शकतं, असंही त्यांचं मत आहे."
भारतातील कोरोनाचा व्हेरियंट युकेच्या म्युटेशनपेक्षा अधिक घातक आहे का हे आत्ताच सांगणं थोडं घाईचं ठरेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. युकेचा व्हेरियंट 50 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे.
भारतीय व्हेरियंटबद्दल इतकी कमी माहिती का?
तज्ज्ञ सांगतात की भारतीय व्हेरियंटबद्दलची माहिती अजूनही अपूर्ण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय व्हेरियंटचे भारताकडून 298 तर जगभरातून 656 नमुने आले आहेत, याउलट युके व्हेरियंटचे 3,84,000 नमुने उपलब्ध आहेत.
भारतात या व्हेरियंटच्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर जगभरात या व्हेरियंटच्या 400 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाल्याचं डॉ. कामिल सांगतात.
दुसऱ्या लाटेला नवा व्हेरियंट जबाबदार?
15 एप्रिलपासून भारतात दररोज दोन लाखाच्या वर रुग्ण सापडत आहेत, पहिल्या लाटेत रुग्णांचा उच्चांकी आकडा 93 हजार इतका होता. मृत्यूंचा आकडाही सातत्याने वाढतोय.
केंब्रिज विद्यापीठातील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक रवी गुप्ता म्हणतात, "भारताची विशाल लोकसंख्या आणि घनता हे व्हायरसच्या म्युटेशन्ससाठी पोषक आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
पण कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेमागे मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र जमणं तसंच मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या गोष्टींचं पालन न करणं हेदेखील महत्त्वाचं कारण असू शकतं.
वेलकम सँगर इन्स्टिट्यूटचे डॉ, जेफरी बॅरेट म्हणतात, "नवा व्हेरियंट रुग्णवाढीला कारणीभूत असू शकतो, पण यासाठी ठोस पुरावे मिळायला हवे."
2020 च्या शेवटापासून हा व्हेरियंट अस्तित्वात असल्याचं डॉ बॅरेट म्हणतात. "जर दुसऱ्या लाटेमागे हा व्हेरियंट असेल तर तसं घडण्यासाठी त्याला अनेक महिने लागले आहेत ज्यावरून आपण असं म्हणू शकतो की केंटच्या B117 या व्हेरियंटपेक्षा हा कमी संसर्गक्षम आहे."
नवीन व्हेरियंटवर लस काम करेल का?
कोरोनाची लस या सगळ्या नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूंमुळे होऊ शकणारं गंभीर आजारपण रोखण्यात मदत करेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
काही व्हेरियंट्स हे सध्याच्या लशींना बगल देतील पण त्यासाठी लशींच्या रचनेत काही बदल करावे लागतील असंही प्रा. गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'नेचर' या नियतकालिकात प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटलं आहे.
सध्या असलेल्या लशी व्हायरसचा प्रसार मंदावण्यात मदत करतील, असंही तज्ज्ञ म्हणतात.
डॉ. जेरेमी कामिल म्हणतात, "तुम्हाला आजार झालाच नाही किंवा सौम्य लक्षणं दिसली की मृत्यूचा धोका उत्पन्न होऊन रुग्णालयात भरती व्हायची वेळ येतेय हे लसीकरण होतंय की नाही यावर अवलंबून आहे. तुम्हाला सर्वप्रथम मिळेल ती लस घेऊन मोकळे व्हा. मनात शंका ठेवून कोणत्यातरी आदर्श लशीची वाट पाहण्याची चूक करू नका."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








