महाराष्ट्र लॉकडाऊन : तुमच्या मनातले 9 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images

राज्य सरकारच्या 'ब्रेक द चेन' या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातले निर्बंध अजूनच कडक करण्यात आले आहेत.

नव्या नियमांची अंमलबजावणी 22 एप्रिल, रात्री 8 वाजेपासून सुरू झालेली आहे. पण यासंदर्भात सर्वसामान्य लोकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत.

त्यातलेच 9 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं इथे देत आहोत.

1. डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास करू शकतात का?

उत्तर - होय. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या ओळखपत्राचा वापर करून जिल्हांतर्गत प्रवास करू शकतात. या प्रवासासाठी ते खाजगी/वैयक्तिक किंवा सार्वजनिक वाहानांचा वापर करू शकतात. पण त्यांच्या प्रवासाचं निमित्त वैद्यकीय आणि आरोग्यशी संबंधित असणे अपेक्षित आहे.

2. लोकल ट्रेनचा वापर कोण करू शकतं?

उत्तर - मुंबईत लोकल ट्रेनचा वापर फक्त सरकारी कर्मचारी/ अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी करू शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त लोकलने प्रवास करण्याची मुभा कोणालाही नाही. शासनाच्या आदेशाप्रमाणे अपवादात्मक स्थितीत सूट दिलेल्या आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही लोकल ट्रेनने प्रवास करता येणार नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

3. टॅक्सी किंवा रिक्षाची सेवा कोण कोण घेऊ शकतात?

उत्तर- शासनाच्या आदेशानुसार ज्या लोकांना आवश्यक सेवा किंवा सवलत वर्गात सामील केलं आहे, ते लोक तसंच काही रास्त कारणांसाठी उदाहरणार्थ परीक्षेला जाणं, विमानतळावर जाणं आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्यासाठी रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकावर जाणं यासाठी टॅक्सी किंवा रिक्षाचा वापर करता येऊ शकतो.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतही टॅक्सी किंवा रिक्षाचा वापर केला जाऊ शकतो.

4. आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी आहे का?

उत्तर - बस आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त अतिशय आवश्यक कारणासाठीच खाजगी कार किंवा इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी असेल. आवश्यक कारणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन अशा कारणांचा समावेश होतो. पण आदेशात नमूद केल्याप्रमाणे त्यांना गृह विलगीकरणात राहावं लागेल.

याबरोबरच इतर राज्यांमध्ये अडकलेले लोक विमान, लांब पल्ल्यांच्या रेल्वे, बस, खाजगी वाहनं किंवा टॅक्सीने आपल्या शहरात परत येऊ शकतात.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातल्या विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सीचा वापर करता येईल. पण त्यासाठी प्रवाशांच्या मूळ शहरात विमानतळ नाही, हे सिद्ध करावं लागेल. टॅक्सीमधल्या प्रत्येक प्रवाशाकडे बोर्डिंग पास असणं गरजेचं आहे. या नियमाचा दुरुपयोग होताना आढळला तर कडक कारवाई करण्यात येईल.

व्यापारासाठी आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी नाही.

5. आंतरजिल्हा प्रवासासाठी पोलीस कोणते पुरावे ग्राह्य धरतील?

उत्तर - नव्या नियमांमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी कोणती कारणं रास्त ठरतील याचा उल्लेख केला आहे. पण त्यासाठी कोणते पुरावे पोलिसांना दाखवावे लागतील याचा उल्लेख नाहीये. अजून तरी पास सिस्टिम बनवण्यात आलेली नाही. पण पोलीस योग्य पुरावे स्वीकारू शकतील, उदाहरणार्थ वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करत असाल तर त्या संबंधित कागदपत्रं. रास्त कारण आणि त्याचे पुरावे यांची शहानिशा करण्याची जबाबदारी नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला देण्यात आली आहे.

6. शाळा/महाविद्यालय/विद्यापीठ यांच्या कर्मचाऱ्यांचं काय?

उत्तर - शाळा /महाविद्यालय व विद्यापीठ बंद करण्यात आली आहेत. पण संबंधित शाळा/ महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या प्रशासनाला गरज पडली तर ते कर्मचाऱ्यांना शाळा/महाविद्यालयात बोलवू शकतात. 15 टक्के उपस्थितीची अट इथेही लागू पडेल.

लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images /NurPhoto

7. सक्तीची RT-PCR, RAT किंवा ट्रू नेट चाचणी करणं कोणासाठी अनिवार्य असेल?

उत्तर - परीक्षा प्रक्रियेत सहभागी असणारे कर्मचारी/अधिकारी, लग्न समारंभ असेल त्या ठिकाणच्या हॉलचे कर्मचारी, वेटर, केटरर अशा लोकांना सक्तीची RTPCR, RAT किंवा ट्रू नेट चाचणी करणं अनिवार्य असेल. होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या चाचण्या करण्याचा सल्ला देण्यात आला असला तरी यापुढे ते आवश्यक राहणार नाही. त्याचप्रमाणे 13 एप्रिल 20 21 च्या आदेशामध्ये आवश्यक नसलेल्या अधिकारी कर्मचारी व इतर लोकांना ही चाचणी गरजेची नसेल.

8. होम डिलिव्हरी कोण करू शकतात?

उत्तर - कोणत्याही आस्थापनेद्वारा अधिकृतरित्या जबाबदारी दिलेल्या व्यक्ती होम डिलिव्हरी करू शकतात. अशा व्यक्ती ई-कॉमर्स कंपनीशी संबधित असायलाच हव्या असं नाही. पण या लोकांना आपण कुठे होम डिलिव्हरी करत आहोत हे सिद्ध करावं लागेल.

होम डिलिव्हरी रात्री 8 पर्यंत करता येईल. खाद्य पदार्थांची होम डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटोसारख्या संस्थांना 8 पर्यंतच डिलिव्हरी करावी हा नियम लागू करावा की नाही हा निर्णय स्थानिक प्रशासनाला घेता येईल. त्यांना या वेळेत वाढ करण्याचे अधिकार आहेत. पण एकसारखी सेवा पुरविणाऱ्या सर्व आस्थापनांना एकसारखी वेळ मर्यादा दिलेली असेल.

9. वकील आणि कोर्टात काम करणारे लिपीक यांच्या प्रवासाबाबत संदिग्धता आहे, ती स्पष्ट करावी.

उत्तर - वकिलांची कार्यालयं आवश्यक सेवेचा भाग म्हणून उघडी असतील आणि म्हणून त्यांनी केलेला प्रवास हा रास्त कारणासाठी असल्याचे गृहीत धरले जाईल. पण त्यांना लोकल ट्रेन, मेट्रो किंवा मोनो रेलने प्रवासाची मुभा नसेल. ते खाजगी कार, टॅक्सी किंवा खाजगी व सार्वजनिक बसने प्रवास करू शकतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)