म्यानमार लष्कराकडून 82 जणांची हत्या, मृतदेह एकावर एक रचल्याचा माध्यमांचा दावा

म्यामांर

फोटो स्रोत, Stringer/Anadolu Agency via Getty Images

म्यानमारमधील यंगून शहराजवळ सुरक्षा दलांनी आंदोलकांवर रायफल ग्रेनेडने हल्ला केला ज्यात 80 हून जास्त लोक ठार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (9 एप्रिल) घडली. म्यानमारच्या एका वृत्तसंस्थेने आणि 'असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्स' (एएपीपी) नावाच्या संस्थेने ही माहिती दिली आहे.

म्यानमारमधील स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, यंगूनच्या बगो शहरात सुरक्षा दलांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या सुरुवातीला सांगता येत नव्हती.

सुरक्षा दलांनी झियार मुनी पागोडाच्या आवारात मृतदेह एकावर एक रचले होते आणि परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला असं प्रत्यक्षदर्शी सांगतात.

स्थानिक वृत्तसंस्था 'म्यानमार नाऊ' आणि एएपीपीने शनिवारी (10 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी लष्करी उठावाचा निषेध करणाऱ्या 82 जणांचा बळी घेतला.

'म्यानमार नाऊ'च्या वृत्तानुसार, "लष्कराने शुक्रवारी (9 एप्रिल) सकाळ होण्यापूर्वीच गोळीबार सुरू केला आणि तो दुपारपर्यंत सुरू होता."

म्यांमार

फोटो स्रोत, Stringer/Getty Images

आंदोलनाच्या एका आयोजकांनी हुतूत वृत्तसंस्थेला सांगितलं, "हे म्हणजे एखादा नरसंहार केल्यासारखे आहे. ते सगळ्यांवर गोळ्या झाडत होते. अगदी सावलीवर सुद्धा."

आतापर्यंत एकूण 618 लोकांना आपले प्राण गमवावे लागले- अहवाल

अनेक लोक शहर सोडून गेल्याची चर्चा म्यानमारमधील सोशल मीडियावर सुरू आहे. या संदर्भात म्यानमारच्या लष्कराशी संपर्क साधता आला नाही, असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

एएपीपी ही संस्था सुरक्षा दलांकडून अटक आणि मृत्यू झालेल्या लोकांची एक यादी तयार करत आहे. फेब्रुवारी महिन्यात उठावानंतर लष्कराने 618 जणांचा बळी घेतल्याचा दावा या संस्थेने केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचा बळी घेतल्याचा दावा म्यानमारच्या लष्कराने फेटाळून लावला आहे.

फ़ाइल फ़ोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फ़ाइल फ़ोटो

आँग सान सू ची यांच्या पक्षाने नोव्हेंबर महिन्यात फेरफार करून निवडणूक जिंकली असा दावा करत लष्कराने देशात सत्तापालट केले. म्यानमारच्या निवडणूक आयोगाने मात्र लष्कराचा हा दावा फेटाळून लावला आहे.

म्यानमार सेनेच्या जुंताचे प्रवक्ते मेजर जनरल झो मिन टुन यांनी शुक्रवारी (9 एप्रिल) पत्रकार परिषदेत सांगितलं की, लष्कराने दिलेल्या माहितीनुसार 248 नागरिक आणि 16 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर कोणतीही स्वयंचलित शस्त्रे वापरली नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील वांशिक आर्मीच्या एका गटाने शनिवारी जुंटाच्या निषेधार्थ एका पोलिस ठाण्यावर हल्ला केला, ज्यात 10 पोलिस ठार झाले.

म्यानमार 'विनाशाच्या मार्गावर'

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारच्या पूर्वेकडील शान प्रांतातील एका पोलिस ठाण्यावर लष्करी गटांनी हल्ला केला. या हल्ल्यात 10 पोलीस ठार झाले असं 'शान न्यूज'ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. तर 'श्यू फी म्याय न्यूज'नुसार एकूण 14 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

लष्करी राजवटीच्या विरोधातले आंदोलन आता थंड पडले असून लोकांना शांतता हवी आहे असंही म्यनामारच्या लष्कराने शुक्रवारी सांगितलं. आगामी दोन वर्षांत ते निवडणुकाही घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्यानमार

फोटो स्रोत, Reuters

सत्तेतून बेदखल करण्यात आलेल्या म्यानमारच्या नेत्यांनी संयुक्त राष्ट्रसुरक्षा परिषदेत लष्करावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

खासदारांच्या वतीने कार्यवाहक परराष्ट्र मंत्री म्हणून निवडून आलेले झिन मार आँग म्हणाले, "आमचे लोक त्यांच्या हक्कांची आणि स्वातंत्र्याची कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत. त्यांनी थेट आणि अप्रत्यक्ष दबाव आणण्यासाठी त्यांनी यूएनएससीला आवाहन केले.

म्यानमारच्या 'विद द इंटरनॅशनल क्रायसिस समूहा'चे वरिष्ठ सल्लागार रिचर्ड होर्सी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनौपचारिक बैठकीत सांगितलं, "म्यानमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे."

म्यानमारमध्ये नागरिक सातत्याने लष्करी उठावाचा निषेध करत आहेत. यादरम्यान सुरक्षा दलांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना ठार मारले असून लोकांना ताब्यातही घेतले आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)