प्रिन्स फिलीप यांना जागतिक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रिन्स फिलीप

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, प्रिन्स फिलीप

राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. बकिंगहॅम पॅलेसने याची घोषणा केल्यानंतर जगभरातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

जगभरातील नेत्यांनी प्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहिली असून राजघराण्याचं सांत्वन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहिली. प्रिन्स फिलीप यांच्या निधनामुळे रॉयल कुटुंबाला तसंच ब्रिटिश नागरिकांना झालेल्या दुःखात मी सहभागी आहे.

"प्रिन्स फिलीप यांची संपूर्ण कारकीर्द अतिशय लक्षवेधी होती. अनेक सामाजिक बदलांमध्ये प्रिन्स फिलीप यांचा पुढाकार होता. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो," असं मोदी ट्विट करून म्हणाले.

इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांच्या कित्येक परदेश दौऱ्यांमध्ये प्रिन्स फिलीप यांनी सहभाग नोंदवला होता.

प्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, "त्यांनी एका संपूर्ण पिढीला आपलंसं केलं होतं. हे पुन्हा पाहायला मिळणार नाही.

ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनीही रॉयल कुटुंबाचं सांत्वन केलं. प्रिन्स फिलीप यांना आदरांजली वाहताना त्या म्हणाल्या, "प्रिन्स फिलीप हे अत्यंत कर्तव्यशील होते. तसंच त्यांचं व्यक्तीमत्त्व अतिशय आनंदी असं होतं."

बेल्जियमच्या किंग फिलीप यांनी इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांना एक खासगी संदेश पाठवला. जेव्हा शक्य होईल, तेव्हा राणी एलिझाबेथ यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

माल्टाचे पंतप्रधान रॉबर्ट अबेला यांनीही प्रिन्स फिलीप यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.

"प्रिन्स फिलीप यांच्या निधनामुळे मला अतीव दुःख झालं आहे. ते माल्टामध्ये नेहमी यायचे. त्यांच्यासाठी माल्टा हे घराप्रमाणेच होतं. देशातील नागरिकांना त्यांची आठवण सतत येत राहील," असं रॉबर्ट अबेला म्हणाले.

त्याचप्रमाणे लिथुनियाचे राष्ट्राध्यक्ष गिटानास नौसेडा यांनीही राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचं सांत्वन केलं आहे. या दुखःद प्रसंगी आमच्या भावना आणि प्रार्थना तुमच्यासोबत तसंच युकेच्या नागरिकांसोबत आहेत, असं नौसेडा म्हणाले आहेत.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त