प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल : जोडप्याला पैसा मिळतो कुठून?

मी आणि माझी पत्नी मेगन मर्कल राजघराण्याच्या ज्येष्ठ सदस्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत कॅलिफोर्नियाला रहायला आलो तेव्हाच राजघराण्याने आम्हाला आर्थिक मदत करणं बंद केल्याचं प्रिन्स हॅरी यांनी अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर ऑप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

त्यामुळे प्रिन्सेस डायनांचे धाकटे चिरंजीव आणि ब्रिटीश राजघराण्याचे ज्येष्ठ सदस्य असलेले प्रिन्स हॅरी यांना राजघराण्याकडून खर्चाचे पैसे मिळत नसतील तर त्यांना पैसा मिळतो कुठून? ते काय करतात ज्यातून त्यांची कमाई होते? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

राजघराण्यातून पैसे मिळणं बंद झालंय का?

ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स ही पदवी असलेले प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आपण यापुढे राजघराण्याचे ज्येष्ठ सदस्य रहाणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी स्वतः काम करू, अशी घोषणा केली होती.

त्यावेळी असं कळलं होतं की नव्या करारानुसार या जोडप्याला प्रिन्स हॅरी यांचे वडील प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून काही काळासाठी पैसे मिळतील. मात्र, हा पैसा गडगंज मालमत्ता आणि गुंतवणूक असणाऱ्या 'डची ऑफ कॉर्नवॉल'कडून येणार की त्यांच्या खाजगी संपत्तीतून तो देण्यात येईल की दोघांमधून संयुक्तरित्या देण्यात येईल, हे मात्र स्पष्ट नाही. डची (Duchy) म्हणजे ड्यूकच्या अखत्यारितलं क्षेत्र. यामध्ये तिथल्या मालमत्तेसोबतच प्रिन्स चार्ल्स यांची आर्थिक गुंतवणूक आणि संपत्तीही येते.

मार्च 2020 ला संपलेल्या आर्थिक वर्षात प्रिन्स चार्ल्स यांच्या खात्यातून दोन्ही जोडप्यांच्या खर्चासाठी (ड्यूक आणि डचेस ऑफ कॅम्ब्रिज आणि ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स) 56 लाख युरो देण्यात आलेत.

मात्र, त्यानंतर राजघराण्याने "मला आर्थिक मदत पुरवणं पूर्णपणे बंद केल्याचं" प्रिन्स हॅरी यांनी ऑप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

पण हॅरी याचं हे वक्तव्य प्रिन्स चार्ल्स यांच्या डची ऑफ कॉर्नवॉलमधून येणाऱ्या उत्पन्नातून मिळणाऱ्या खर्चाबाबत होतं की करदात्यांच्या अनुदानाबाबत की दोघांहीबाबत, हे स्पष्ट नाही.

या कालावधीसाठी प्रिन्स चार्ल्स यांच्या खात्याचा तपशील अजून जाहीर झालेला नाही आणि क्लॅरेन्स हाउसनेही यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स श्रीमंत आहेत का?

ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स या दोघांकडेही स्वतःची बरीच संपत्ती आहे.

प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी या दोघांसाठी त्यांची आई प्रिन्सेस डायना यांनी 13 दशलक्ष युरोंची संपत्ती मागे ठेवली आहे.

अमेरिकेत ऑप्रा विन्फ्रेशी बोलताना "माझी आई माझ्यासाठी जे सोडून गेली, ते मला मिळालं आणि ते होतं म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलू शकलो," असं प्रिन्स हॅरी यांनी सांगितलं.

इतकंच नाही तर प्रिन्स हॅरी यांच्यासाठी त्यांच्या पणजीने (क्वीन मदर) म्हणजेच महाराणी एलिझाबेथ यांच्या आईने लाखो पौंडांची संपत्ती मागे ठेवल्याचं समजतं, असं बीबीसीचे राजघराण्याचे प्रतिनिधी निक विचेल यांनी सांगितलंय.

डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्कल लग्नाआधी अभिनेत्री होत्या. त्यावेळी त्या 'Suits' (सूट्स) मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 50 हजार डॉलर्स मानधन घ्यायच्या, असं म्हटलं जातं. त्या एक लाईफस्टाईन ब्लॉगही चालवायच्या आणि कॅनडाच्या एका ब्रँडसाठी फॅशन डिझाईनरही होत्या.

उत्पन्नाचे इतर स्रोत आहेत का?

हॅरी आणि मेगन आता 'राजघराण्याचे सक्रिय सदस्य' नसल्यामुळे ते स्वतः कमाई करण्यास मोकळे आहेत.

ऑप्रा यांना दिलेल्या मुलाखतीसाठी त्यांनी कुठलंही मानधन घेतलेलं नाही. मात्र, अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी 'नेटफ्लिक्स' आणि 'स्पॉटिफाय' या स्ट्रिमिंग सर्व्हिसेसशी करार केले आहेत. हे दोघंही स्पॉटिफायवर एक पॉडकास्ट चालवतात. हे करार लाखो डॉलर्सचे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

या दोघांनी 'आर्चवेल' नावाची संस्थाही स्थापन केली आहे. ही एक NGO तर आहेच. मात्र, याअंतर्गत एक प्रॉडक्शन हाउसही चालवण्यात येतं.

या जोडप्याच्या सुरक्षेचा खर्च कोण उचलतं?

हॅरी आणि मेगन राजघराण्याशी संबंधित असल्याने सहाजिकचं त्यांना विशेष सुरक्षा पुरवण्यात येते. दोघे ब्रिटनला रहायचे त्यावेळी त्यांना ब्रिटनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची सुरक्षा प्राप्त होती. मात्र, त्याचा खर्च किती होता, याची माहिती नाही.

ब्रिटनहून दोघेही आधी कॅनडाला गेले होते. मात्र, कॅनडाच्या सरकारने दोघांनाही सुरक्षा पुरवणं बंद करणार असल्याचं जाहीर केल्यावर दोघांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला.

हॅरी आणि मेगन अमेरिकेला गेल्यावर कोव्हिडमुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यावेळी सुरुवातीच्या दिवसांत अमेरिकेचे अब्जाधीश आणि मीडिया टायकून, टायलर पेरी यांनी स्वतःचं घर या जोडप्याला रहायला दिल्याचं हॅरी यांनी सांगितलं होतं. त्यांनीच सुरक्षाही पुरवली होती.

तुमच्यावर 'पैशाचा हव्यास असणारे', असा आरोप होतो. त्याला तुम्ही काय उत्तर द्याल, असा प्रश्न ऑप्रा विन्फ्रे यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना प्रिन्स हॅरी म्हणाले, "नेटफ्लिक्स आणि स्पॉटिफाय यांच्याशी करार करायचा, हे काही आधीच ठरवलं नव्हतं. मात्र, ते गरजेचं होतं."

पुढे ते म्हणतात, "मला फक्त माझं कुटुंब सुरक्षित रहावं, यासाठी सुरक्षेसाठी जो खर्च येईल, तेवढा पुरेसा पैसा हवा होता."

राजघराण्याचे सदस्य असताना यांचा खर्च कोण करायचं?

राजघराण्याच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देण्याआधी प्रिन्स चार्ल्स यांना डची ऑफ कॉर्नवॉलमधून जे उत्पन्न मिळायचं, त्यातून या जोडप्याचा 95% खर्च भागवला जायचा.

तर उर्वरित 5% खर्च करदात्यांच्या पैशातून मिळाणाऱ्या अनुदानाच्या रूपात मिळायचा.

हा पैसा ब्रिटन सरकारकडून राजघराण्याला त्यांची कर्तव्य आणि राजमहालांच्या देखभालीसाठी दिला जातो. यावर्षीसाठी हा खर्च आहे एकूण 85.9 दशलक्ष युरो.

दरम्यान, विंडसरमधल्या फ्रॉगमोर कॉटेज या घराच्या डागडुजीसाठी युकेच्या करदात्यांच्या पैशांतून मिळालेली 24 लाख युरोंची रक्कम परत केल्याचं या जोडप्याने सप्टेंबरमध्ये जाहीर केलं होतं. करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो, असा आरोप त्यांच्यावर झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)