म्यानमार : आंदोलनकर्तीच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी, लष्करी नेत्यांवर फेसबुककडून बंदी

म्यानमार

फोटो स्रोत, Reuters

म्यानमारमधील लष्करी उठावाविरुद्ध आंदोलन करत असताना मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीच्या अंत्यविधीला म्यानमारची राजधानी नेपिटो मध्ये प्रचंड गर्दी जमा झाली होती.

म्या थॉ थॉ खेंगला तिच्या विसाव्या वाढदिवसाच्या अगदी काही दिवस आधी आंदोलनादरम्यान गोळी मारण्यात आली होती. आंदोलनादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

रविवारी (21 फेब्रुवारी) तिला मानवंदना देण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर जमा झाले होते. अनेकांनी तिला तीन बोटांनी दिला जाणारा सॅल्यूटही केला.

या महिन्याच्या सुरूवातीला म्यानमारमध्ये लष्करानं निवडून आलेलं सरकार उलथवून लावलं होतं.

लवकरात लवकर निवडणूक घेण्याचं आश्वासनही आंदोलकांना थांबवू शकलं नाही. आँग सान सू ची यांची तसंच नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅटिक (NLD) पक्षाच्या सदस्यांचीही सुटका करावी, अशी आंदोलकांची मागणी होती.

गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत NLD नं मिळवलेला विजय हा मतदानात झालेल्या फेरफारामुळे असल्याचा आरोप लष्करानं केला होता. पण त्यासाठी कोणताही पुरावा दिला नव्हता.

आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेली म्या थॉ थॉ खेंग ही सुपरमार्केटमध्ये काम करणारी तरूणी होती. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ती जखमी झाली होती. तिला दहा दिवस लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी (20 फेब्रुवारी) तिचा मृत्यू झाला होता. अंत्ययात्रेला तिच्या शवपेटीला सोबत करण्यासाठी शेकडो मोटरबाइक्सही रस्त्यावर उतरल्या होत्या. आदल्या दिवशीच आंदोलनादरम्यान हिंसाचार झालेला असतानाही शेकडो लोक जमले होते.

पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात इतर दोन आंदोलकांचाही मृत्यू झाला होता.

म्यानमार

फोटो स्रोत, Getty Images

या मृत्युंचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं, "शांततापूर्ण मार्गानं सुरू असलेल्या आंदोलकांवर बळाचा वापर, धाकदपटशा आणि त्रास देणं हे स्वीकारार्ह नाही."

रविवारी (21 फेब्रुवारी) प्रसिद्ध अभिनेता लू मिन यांच्या पत्नीनंही म्हटलं होतं की, लष्करी नेतृत्वाचा निषेध करणारा व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा विचार

म्यानमारमध्ये दोन आठवड्यांपासून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली होती. या चळवळीतील सभेदरम्यान पोस्टर्सवर हुतात्म्यांचे फोटो, पेंटिंग्ज, कार्टून्स लावण्यात आले होते.

आंदोलन

फोटो स्रोत, Reuters

त्यामुळे आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यूंमुळे लोकांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

आता दररोज होणाऱ्या आंदोलनांची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यांपासून म्यानमारमध्ये देशव्यापी संपही पुकारला गेला आहे.

कोव्हिडच्या संसर्गात आधीच भरडल्या गेलेल्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो.

लष्करी न्यूज साइटवर फेसबुककडून बंदी

म्यानमारमध्ये इंटरनेट बंद करूनही दोन आठवडे झाले असल्याचं नेटब्लॉक्सनं म्हटलं आहे.

आंदोलनाशी संबंधित बातम्यांची माहिती देणाऱ्या वेबसाइट लष्करी राजवटीकडून नियमितपणे ब्लॉक केल्या जात आहेत.

दुसरीकडे लष्कराकडून पोस्ट केल्या जाणाऱ्या बातम्या फेसबुककडून डिलीट केल्या गेल्या होत्या.

म्यानमार

फोटो स्रोत, EPA

आमच्या जागतिक धोरणानुसर आम्ही फेसबुकवरून Tatmadaw True News Information Team Page हटविलं आहे. हिंसाचाराला चिथावणी देण्यासंबंधीच्या आमच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे.

लष्कराकडून चालविली जाणारी ही मुख्य साइट होती. ज्यावरून आंदोलकांना इशारे दिले जात होते तसंच निवडणूक निकालांबद्दलही आरोप करण्यात येत होते.

म्यानमारमध्ये फेसबुक हा सध्या माहिती आणि बातम्यांचा मुख्य स्त्रोत आहे. म्यानमारमध्ये जवळपास 22 दशलक्ष लोक फेसबुक वापरत असल्याचा अंदाज आहे.

लष्कराचे नेते मिन आँग लेंग आणि अन्य महत्त्वाच्या लष्करी नेत्यांवर फेसबुकनं रोहिंग्या मुसलमानांच्या मानवी अधिकाराच्या उल्लंघनाच्या आरोपावरून बंदी घातली आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)