You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इथिओपियाः 'माझ्या आजोबांनाच माझ्यावर बलात्कार करायला लावला'
इशारा: हा वृत्तान्त आपल्याला विचलित करण्याची शक्यता आहे
इथिओपियातील या विद्यार्थिनीची कहाणी प्रचंड शोकात्म आहे.
एक सैनिक तिच्यावर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात होता, तेव्हा स्वतःला वाचवण्याच्या खटपटीमध्ये तिला स्वतःचा हात गमवावा लागला, असं या विद्यार्थिनीने बीबीसीशी बोलताना सांगितलं. तिच्या आजोबांवर स्वतःच्या नातीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सक्ती केली गेली.
या विद्यार्थिनीचं वय साधारण 18 वर्षं आहे. तिचं नाव आम्ही इथे नोंदवत नाही आहोत. गेले दोन महिने ती इथिओपियाच्या उत्तरेतील टिग्रे प्रांतामध्ये एका रुग्णालयात उपचार घेते आहे. हळूहळू तिची तब्येत सुधारतेय.
टिग्रेमधील संघर्षाची सुरुवात नोव्हेंबर 2020मध्ये झाली. या प्रांतातील सत्तारूढ टीपीएलएफ या पक्षाला हटवण्यासाठी देशाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी आक्रमक मोहीम सुरू केली. त्यानंतर टीपीएलएफच्या कार्यकर्त्यांनी सरकारी सैन्याचे तळ काबीज केले. ट्रिगेमध्ये सुरू झालेल्या या संघर्षामध्ये या 18 वर्षीय विद्यार्थिनीसह इतर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींची स्वप्नं होरपळून गेली.
यातील बहुतांश मुलंमुली आपल्या गावातील दुसऱ्या लोकांसह डोंगराळ भागांकडे पळून गेली. यानंतर अबी अहमद यांनी टिग्रेची राजधानी मेकेल ताब्यात घेऊन आपल्या विजयाची घोषणा केली. सरकारी सैन्याने 29 नोव्हेंबरला इथे वर्चस्व प्रस्थापित केलं.
दरम्यान, टीपीएलएफच्या ज्या कार्यकर्त्यांनी शरण यायला नकार दिला, त्यांना लक्ष्य करणारी मोहीम सैन्यदलांनी उघडली. या मोहिमेमध्ये टिग्रेतील रहिवाशांच्या मानवाधिकारांचा भंग करणाऱ्या अनेक घटनाही समोर आल्या. परंतु, सरकारी अधिकारी हे आरोप फेटाळून लावतात.
वर उल्लेख आलेली शालेय विद्यार्थिनी आणि तिचे आजोबा अजूनही गावातील आपल्या घरात राहतात. त्यांचं घर अबीय अदी गावामध्ये आहे. हे गाव मेकेलच्या पश्चिमेला सुमारे 96 किलोमीटरांवर आहे. तिथून ते हलूही शकले नाहीत, कारण कुठेही दूर जाण्यासाठी प्रवास करणं अवघड होतं.
तीन डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेबद्दल ही किशोरवयीन मुलगी म्हणाली- इथिओपियाई सैन्याचा गणवेश घातलेला एक सैनिक त्यांच्या घरात घुसला. तो सतत टिग्रेमधील बंडखोरांबद्दल प्रश्न विचारत होतो. यानंतर सैनिकाने त्यांच्या घराची छाननी केली आणि घरात कोणी सापडलं नाही तेव्हा या मुलीला पलंगावर झोपायचा आदेश दिला. त्यानंतर त्याने चारही दिशांना गोळीबार सुरू केला.
ही मुलगी सांगते, "त्याने माझ्या आजोबांना माझ्याशी शारीरिक जवळीक करायला सांगितली. हे ऐकल्यावर माझे आजोबा चिडले आणि त्या दोघांमध्ये भांडण झालं."
"तो सैनिक माझ्या म्हाताऱ्या आजोबांना घेऊन खोलीबाहेर गेला आणि त्यांच्या खांद्यावर गोळी मारली. एक गोळी मांडीवर मारली. थोड्या वेळाने तो परत आला तेव्हा त्याने मला सांगितलं की, माझ्या आजोबांना त्याने मारून टाकलंय."
"आता मला कोणीही वाचवू शकणार नाही, असंही तो म्हणाला. मग त्याने मला कपडे काढायला सांगितले. मी वारंवार त्याची करुणा भाकत होते. पण तो नुसता मला मारतच राहिला."
एक-दोन मिनिटं हा झगडा सुरू राहिला. पण शेवटी तो सैनिक एवढा चिडला की त्याने या विद्यार्थिनीवर गोळी झाडली.
ती पुढे सांगते, "त्याने माझ्या उजव्या हातावर तीन गोळ्या मारल्या. माझ्या पायावरही तीन गोळ्या मारल्या. मग बाहेरून गोळीबाराचा आवाज आला तेव्हा तो निघून गेला."
"नशिबाने आजोबा जिवंत होते. पण त्यांची अवस्थाही बिकट होती, ते बेशुद्ध पडलेले होते."
न्याय नाही
या विद्यार्थिनीचा काळीज हेलावून टाकणारा अनुभव प्रकाशात आल्यानंतर टिग्रे संघर्षामधील कथित लैंगिक हिंसेबद्दल चिंता व्यक्त केली जाते आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लैंगिक हिंसाचारासंदर्भातील दूत प्रमिला पट्टन यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, "अशा अनेक घटनांची माहिती मिळते आहे- कुटुंबातीलच लोकांना आपल्या नात्यातील व्यक्तीवर बलात्कार करण्याची सक्ती करण्यात आल्याच्या घटना घडल्याचं कळतं. यासाठी लोकांना धमकावण्यात आलं, हिंसाचाराचा वापर करण्यात आला."
पट्टन पुढे म्हणाल्या, "गरजेच्या वस्तू देण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती स्त्रियांवर झाल्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. शिवाय, वैद्यकीय केंद्रांवर गर्भनिरोधक साधनांची आणि लैंगिक संक्रमण आजारांच्या चाचणीसाठी लागणाऱ्या उपकरणांची मागणीही अचानक वाढल्याचं कळतं. या सगळ्या घटना व साक्षी सशस्त्र संघर्षांदरम्यानच्या लैंगिक हिंसाचाराचे संकेत देणाऱ्या आहेत."
टिग्रेमध्ये सरकारच्या नजरेखालीच खून आणि सामूहिक बलात्काराच्या घटना रोज घडत आहेत, असा आरोप तीन विरोधी पक्षांनी केला आहे. टिग्रेमध्ये एका पित्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या मुलीवर बलात्कार करण्याची सक्ती करण्यात आली, अशीही घटना विरोधकांनी नमूद केली आहे.
एका स्त्रीहक्क संघटनेच्या सदस्य व डॉक्टर असलेल्या व्यक्तीने स्वतःचं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, या काळात त्यांनी जवळपास 200 मुलींचे अनुभव नोंदवून घेतले. यातील मुलींचं वय साधारण १८ वर्षं होतं. या प्रकरणांची नोंद वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये व उपचारकेंद्रांमध्ये झालेली आहे. आपल्यावर बलात्कार झाल्याचं या सर्व मुलींनी म्हटलं आहे.
आपल्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्ती इथिओपियिन सैन्याचा गणवेश घातलेल्या होत्या, असं बहुतांश मुलींनी सांगितलं. शिवाय, वैद्यकीय मदत घ्यायची नाही, अशीही धमकी या मुलींना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
या डॉक्टरने सांगितलं, "या मुलींच्या शरीरावर ओरखडे होते. यातील काहींवर तर सामूहिक बलात्कार झाला होता. एका मुलीवर आठवडाभर बलात्कार होत होता. तिथे पोलीसही नाहीत आणि न्यायही नाहीये."
एका स्त्रीहक्क कार्यकर्तीने सांगितलं, "टिग्रेच्या दुसऱ्या भागांमधूनही बलात्काराच्या अशाच धक्कादायक घटना आमच्या कानावर आल्या आहेत. परंतु, वाहतुकीच्या अडचणींमुळे आम्हाला त्यांची मदत करता येत नाहीये."
मेकेल इथल्या रुग्णालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की गेल्या काही काळात पाच ते सहा महिला बलात्कारानंतर एचआयव्हीरोधक औषधं आणि गर्भधारणा होऊ नये यासाठी उपचार घेण्यासाठी आल्या आहेत.
टिग्रे येथील महिलांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या यिकोनो (आता बास!) या संस्थेच्या वेयनी अब्राहा गेल्या वर्षअखेरपर्यंत मेकेलमध्ये होत्या. त्यांनी बीबीसीशी बोलताना बलात्कार हे युद्धात शस्त्र म्हणून वापरलं जातं असं सांगितलं.
त्या म्हणाल्या, "मेकेलमध्ये अनेक महिलांवर बलात्कार झालाय. लोकांच्या मनावर आघात व्हावा व त्यांनी लढणं सोडून द्यावं यासाठी त्याचा हेतुपुरस्सर वापर होतो."
इथिओपियाचे लष्करप्रमुख बिर्हानू युला गेलाल्चा यांनी याप्रकारचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
"आमचे सैनिक बलात्कार करत नाहीत. ते काही गुंड नाहीयेत. ते सरकारी फौजांमध्ये आहेत...आणि सरकारी फौजांना नियमावलींचं पालन करावं लागतं", असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. मानवाधिकार संघटनांनी सांगितलेले आकडे फुगवून सांगितलेले आहेत असं मत मेकेलचे नवनियुक्त अंतरिम महापौर अताकिल्टी हेलेसिलास यांनी सांगितले.
या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने नुकताच एक टास्कफोर्स टिग्रेला पाठवला. त्यामध्ये महिला आणि आरोग्य मंत्रालयातील लोकांसह, महान्यायवादींच्या कार्यालयातील अधिकारी सहभागी होते. त्यांनी बलात्काराच्या घटना घडल्याचं मान्य केलं आहे पण पूर्ण अहवाल अजून समोर आलेला नाही.
गेल्या आठवड्यात इथिओपियन मानवाधिकार आयोगाने टिग्रेमध्ये गेल्या 2 आठवड्यांमध्ये 108 बलात्कार झाल्याचं सांगितलं. तसेच या घटनांना बळी पडलेल्या व्यक्तींना मदतीसाठी पोलीस आणि आरोग्यसेवा नसल्याचंही त्यांनी मान्य केलंय.
'मला इंजिनियर व्हायचं होतं'
अबी अद्दीच्या या तरुणीवर शस्त्रक्रीया करून हात काढणाऱ्या डॉक्टरांशी बीबीसीने संपर्क केला. तिनं आणि तिच्या आजोबांनी या डॉक्टरांना काही माहिती दिली होती.
इरिट्रियाच्या सैनिकांनी हल्ला केल्यानंतर तिला आणि तिच्या आजोबांना त्यांनी इथिओपियाच्या सैनिकांच्या हाती सुपुर्द केले. अबी अद्दीचे हॉस्पिटल बंद असल्यामुळे इथिओपियन सैनिकांनी त्यांना मेकेलच्या रुग्णालयात दाखल केले.
आता आजोबांच्या जखमा भरुन आल्या आहेत. परंतु त्यांच्या नातीला अॅम्प्युटेशन नंतरच्या उपचारांची गरज आहे. तिचा उजवा पाय अजूनही प्लॅस्टरमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपूनच रडतरडत तिनं बीबीसीला आपल्यावर कोसळलेल्या संकटाची माहिती दिली.
आईच्या मृत्यूनंतर तिच्या आजोबांनीच तिला वाढवलं आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी तिचं शिक्षण सुरू होतं. तिला विद्यापीठात शिक्षण घेऊन इंजिनियर व्हायचं होतं आणि आपल्या आजोबांची काळजी घेण्याचं तिचं स्वप्न होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)