बनावट पिस्तुल, विमान अपहरण आणि 2 काश्मिरी तरूण असे ठरले बांगलादेशच्या निर्मितीचं कारण

विमान

फोटो स्रोत, ZAHID HUSSEIN

    • Author, शाहिद असलम
    • Role, पत्रकार, लाहोर

जानेवारीतली थंडी. सकाळची वेळ. सगळ्या शहरावर बर्फाची चादर पांघरलेली आहे. दोन काश्मिरी तरुण हातात एक अटॅची बॅग घेऊन इतर २६ प्रवाशांसोबत छोट्याशा फोकर विमानात बसतात. थोड्याच वेळत हे विमान हवेत झेपावून आपल्या इच्छित स्थळाच्या दिशेने प्रवास करू लागतं.

एकमेकांच्या शेजारी बसलेले हे तरुण अस्वस्थ आहेत, पण तरीही त्यांचं एकमेकांशी बोलणं सुरू आहे. विमान आता इच्छित स्थळाच्या अगदी जवळ आलंय, लँडिंगपूर्वी सर्व प्रवाशांनी सीट-बेल्ट बांधावेत, अशी सूचना एअर-होस्टेस करते.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

पण त्याच वेळी त्या दोन तरुणांपैकी एक जण धावत कॉकपिटमध्ये घुसतो, कॅप्टनच्या मस्तकावर पिस्तूल रोखतो आणि विमान एका दुसऱ्या देशाच्या दिशेने वळवायला सांगतो.

दरम्यान, दुसरा तरुण हातात एक हँड-ग्रेनेड घेऊन इतर प्रवाशांच्या दिशेने वळतो आणि कोणी काही चलाखपणा दाखवायचा प्रयत्न केला तर बिनदिक्कत हँड-ग्रेनेडचा वापर केला जाईल असा इशारा देतो.

खेळण्यातली पिस्तूल आणि लाकडापासून बनवलेला हँड-ग्रेनेड यांच्या मदतीने विमानाचं अपहरण करण्यात हे दोन तरुण यशस्वी होतात. ते जबरदस्तीने विमान शेजारच्या देशात नेतात, तिथे जाऊन ते आपल्या काही साथीदारांना तुरुंगातून सोण्याची मागणी करतात.

हे दृश्य हॉलिवूडच्या एखाद्या थरारक मारधाडपटामधील आहे, असं तुम्हाला वाटत असेल, पण असं नाहीये. पन्नास वर्षांपूर्वी वास्तवात घडलेल्या एका विमानअपहरणामधील हे प्रसंग आहेत. या घटनाक्रमाविषयीचे अनेक प्रश्न अनेक दशकं उलटल्यानंतर अजूनही अनुत्तरितच राहिले आहेत.

पन्नास वर्षांपूर्वी, ३० जानेवारी १९७१ रोजी दोन काश्मिरी तरुणांनी (जम्मू-काश्मीर डेमॉक्रेटिक लिबरेशन पार्टीचे अध्यक्ष मोहम्मद हाशिम कुरेशी आणि त्यांचे दूरचे नातेवाईक अशरफ कुरेशी) 'गंगा' हे भारतीय फेंडशिप फोकर विमान श्रीनगरहून जम्मूला जात असताना त्याचं अपहरण केलं होतं. त्यानंतर ते सक्तीने पाकिस्तानातील लाहोरला घेऊन गेले.

विमान

फोटो स्रोत, ZAHID HUSSEIN

त्या वेळी हाशिम कुरेशी केवळ १७ वर्षांचा होता, तर अशरफ कुरेशी १९ वर्षांचा होता.

'गंगा' विमान सेवेतून निवृत्त झालेलं होतं. पण अपहरण झालं त्याच्या काहीच आठवडे आधी अचानक या विमानाला पुन्हा उड्डाणाची परवानगी देण्यात आली.

या अपहरणामागची संभाव्य कारणं कोणती होती आणि भविष्यातील घडामोडींवर याचा कोणता परिणाम झाला, हे जाणून घेण्यापूर्वी ही अपहरणाची योजना कधी आणि कशी आखण्यात आली हे जाणून घेणं आवश्यक आहे.

विमानाचं अपहरण करण्याची योजना कशी आणि कोणी तयार केली?

1968 साली जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष मकबूल भट हे काश्मिरी स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या सशस्त्र संघर्षात आघाडीवर होते. अमरचंद या भारतीय अधिकाऱ्याच्या खूनप्रकरणात मकबूल भट यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, पण ते तुरुंगातून पळून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले.

या घटनेनंतर काहीच काळाने १६ वर्षीय तरुण हाशिम कुरेशी त्याच्या जवळच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेला होता.

पेशावरमध्ये वास्तव्यास असताना हाशिम कुरेशी आणि मकबूल भट यांची भेट झाली. मकबूलपासून प्रेरणा घेत हाशिमदेखील जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटमध्ये औपचारिकरित्या सामील झाला. काश्मीरला पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांपासून स्वतंत्र ठेवणं, हा या संघटनेचा उद्देश होता.

तर, हे तरुण पक्षसंदेशाचा प्रसार करण्यासाठी श्रीनगरमध्ये परतले. काही महिन्यांनी हे तरुण सियालकोटच्या वाटेने पाकिस्तानात गेले. पण या वेळी पाकिस्तानात जाताना त्यांनी वापरलेली पद्धत बेकायदेशीर होती. यासाठी त्यांना भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका अधिकाऱ्याने मदत केली.

हा अधिकारी हाशिम कुरेशीला श्रीनगरमधील लाल चौकात भेटला आणि मकबूल भटसंबंधी माहिती देण्याच्या बदल्यात त्याने कुरेशीला सीमापार जायला मदत केली.

बीएसएफच्या मदतीने सीमा ओलांडल्यानंतर हाशिम कुरेशी मकबूल भटला भेटला आणि ते भविष्यातील योजना आखू लागले.

18 जून 1969 रोजी मकबूल भट, हाशिम कुरेशी आणि अमानुल्लाह खान रावळपिंढीत डॉक्टर फारूख हैदर यांच्या घरी टेबलापाशी बसले होते. अचानक रेडिओवरून बातमी ऐकू आली की, इरिट्रियाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तीन तरुणांनी इथिओपियाच्या एका प्रवासी विमानावर हँड-ग्रेनेड आणि टाइम-बॉम्बद्वारे हल्ला केला.

त्यावेळी इथिओपियाने इरिट्रियावर ताबा मिळवला होता आणि तिथे सशस्त्र स्वातंत्र्यसंघर्ष सुरू होता.

तिथे बसल्या-बसल्याच मकबूल भटच्या मनात विचार आला की, त्यांनीही स्वतःच्या स्वातंत्र्याचा मुद्दा जगासमोर आणण्यासाठी अशाच रितीने योजना आखण्याची गरज आहे आणि त्यांनीदेखील विमानाचं अपहरण करायला हवं.

सध्या श्रीनगरमध्ये राहणारे हाशिम कुरेशी यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं की, तिथे हजर असलेल्या चार लोकांपैकी सर्वां कमी वयाची व्यक्ती ते स्वतः (हाशिम कुरेशी) होते, त्यामुळे मकबूल भटने त्यांच्याकडे बघत विचारलं, "हाशिम, तुला हे करायला जमेल का?"

"हो, जमेल की, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी मी स्वतःचा जीव द्यायलाही तयार आहे," असं उत्तर हाशिम कुरेशी यांनी दिलं. त्यावर त्यांचं कौतुकही झालं. त्यानंतर विमान अपहरणाची योजना आखायला सुरुवात झाली.

विमान अपहरणाची तयारी

योजना आखून झाल्यावर हाशिम कुरेशी यांना विमान अपहरणाचं प्रशिक्षण द्यावं लागणारं होतं. त्यासाठी डॉक्टर फारूख हैदर यांचा मेव्हणा जावेद मंटो (जो आधी वैमानिक होता) याने हाशिम कुरेशी यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

.

फोटो स्रोत, ZAHID HUSSEIN

जावेद मंटो फोकर विमानाबद्दल सर्व माहिती देण्यासाठी हाशिम कुरेशी यांना रावळपिंडीमधील चकलाला विमानतळावर घेऊन जाऊ लागला. वैमानिक कुठे बसतो, कॉकपिटमध्ये वैमानिकाला ताब्यात कसं ठेवायचं आणि विमानात बसलेल्या प्रवाशांना कसं हाताळायचं, हे सगळं त्यांना सांगण्यात आलं.

या व्यतिरिक्त हाशिम कुरेशी यांना हँड-ग्रेनेड चालवणं आणि बॉम्ब बनवणं यासंबंधीचंही प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ठरलेल्या योजनेनुसार एक हँड-ग्रेनेड आणि एक पिस्तूल देऊन त्यांना श्रीनगरला परत पाठवण्यात आलं.

हाशिम कुरेशी यांनी श्रीनगरला परतण्यासाठी पुन्हा सियालकोट सीमाभागाची वाट धरली, तेव्हा बीएसएफने त्यांना पकडलं आणि त्यांच्याकडील पिस्तूल आणि हँड-ग्रेनेड ताब्यात घेतलं.

अटक झाल्यावर हाशिम कुरेशी यांनी मकबूल भटच्या योजनेविषयी बीएसएफला माहिती दिली. भारतीय विमानाचं अपहरण करण्यासाठी आपल्याला पाकिस्तानात प्रशिक्षण मिळालं आहे आणि श्रीनगरमधील आणखी दोन लोक या योजनेत त्यांना मदत करणार आहेत, असं त्यांनी बीएसएफला सांगून टाकलं.

हाशिम कुरेशी सांगतात त्यानुसार, "खरं म्हणजे श्रीनगरला परतताना मला सीमेवर पकडलं तर आमच्या योजनेबद्दल सगळी माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देऊन टाकावी आणि माझ्या सोबत आणखी दोन जण यात सहभागी आहेत ते श्रीनगरमध्ये आहेत, असंही सांगावं, ही सूचना मकबूल भटनेच केली होती. असं सांगितलं तर बीएसएफवाले मारणार नाहीत, तर बाकीच्या साथीदारांना शोधण्यासाठी माझ्याशी नरमाईने वागतील, असं भट म्हणाला होता."

भट यांनी सांगितलं तसंच घडलं आणि बीएसएफसाठी काम करण्यासाठी सहमती दर्शवल्यानंतर हाशिम यांना सोडून देण्यात आलं, एवढंच नव्हे तर त्यांना बीएसएफमध्ये उप-निरीक्षक म्हणून भरती करवून घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं.

हाशिम म्हणाले, "बीएसएफमध्ये भरती करवून घेतलं वगैरे अर्थातच खोटं होतं. पण त्या दोन अज्ञात अपहरणकर्त्यांची ओळख पटावी यासाठी बीएसएफने मला श्रीनगर विमानतळावर पाळतीसाठी ठेवलं." हाशिम कुरेशी वारंवार तिथे जात राहिले आणि अपहरणाची योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने विमानात कशा रितीने प्रवेश करायचा याबद्दल अंदाज घेऊ लागले.

दुसऱ्या बाजूला, तुरुंगातून सुटल्यावर लगोलग हाशिम यांनी त्यांचा दूरचा नातेवाईक अशरफ कुरेशीला या सर्व प्रकल्पाची माहिती दिली, एवढंच नव्हे तर व्यायामाच्या नावाखाली हरिपर्वतावर नेऊन विमानअपहरणाचं प्रशिक्षणही दिलं.

यात आणखी एक अडचण होती. पिस्तूल आणि हँडग्रेनेड बीएसएफने जप्त केलं होतं आणि मकबूल भटकडून पुन्हा शस्त्रं मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे हाशिम कुरेशी यांनी शस्त्रांसंबंधी आणखी एक क्लृप्ती लढवली.

त्या काळी श्रीनगरमधील वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात यायची- चोर आणि लुटारूंपासून बचाव करण्यासाठी खऱ्या पिस्तुलासारखं दिसणारं पिस्तूल विकणाऱ्या कोणाचीतरी ती जाहिरात होती.

त्यानुसार वर्तमानपत्रात जाहिरातीसोबत दिलेल्या पत्त्यावर हाशिम यांनी पिस्तुलाची ऑर्डर दिली, डिलिव्हरीसाठी जवळच्या एका दुकानाचा पत्ता दिला. दहा-बारा दिवसांनी खोटं पिस्तूल त्यांच्या हाती आलं, त्याला काळा रंग दिल्यानंतर ते रिव्हॉल्वरसारखं दिसू लागलं, असं हाशिम सांगतात.

पण हँड-ग्रेनडची तजवीज कशी करायची? अशरफ कुरेशीला हँड-ग्रेनेड कसा दिसतो हे दाखवण्यासाठी हाशिम यांनी कागदावर हँड-ग्रेनेडची चित्रं काढली होती. ते चित्र बघितल्यावर अशरफ म्हणाला की, "हे तर लाकडी बिअरच्या मगसारखं दिसतंय. हे आपणही बनवू शकतो. त्यात काही अवघड नाही."

काही दिवसांनी त्यांनी लाकडाचा एक हँड-ग्रेनेड तयार केला आणि तीन-चार वेगवेगळे रंग एकत्र मिसळून लोखंडाचा रंग तयार केला. हा रंग त्या लाकडी हँड-ग्रेनेडवर फासला, मग तो खरोखरचा हँड-ग्रेनेड वाटायला लागला.

त्या काळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव गांधी वैमानिक म्हणून श्रीनगरला येत-जात असत. त्या दरम्यान आलेल्या बातम्यांनुसार, 30 जानेवारीला राजीव गांधी वैमानिक म्हणून श्रीनगरला येणार होते.

हाशिम कुरेशी सांगतात त्यानुसार, त्यांनी अपहरणासाठी 30 जानेवारीचीच निवड केली होती, जेणेकरून राजीव गांधी वैमानिक असतील त्याच विमानाचं अपहरण त्यांना करता यावं. पण बीएसएफची त्यांच्यावर करडी नजर होती, त्यामुळे त्यांना चकवा देऊन विमानात घुसण्यासाठी मोहम्मद हुसैन या नावाने त्यांच्यासाठी अशरफने तिकीट काढलं आणि दुसरं तिकीट स्वतःसाठी काढलं.

विमानाचं अपहरण

30 जानेवारी 1971 रोजी शनिवार होता. तेव्हा हे दोन तरुण सुसज्ज होऊन विमानतळावर पोहोचले, पण काही कारणाने राजीव गांधी आज येणार नसल्याचं त्यांना कळलं आणि ते निराश झाले. पण ठरल्यानुसार ते विमानात गेले.

अशरफकडे एका ब्रीफकेसमध्ये बनावट हँड-ग्रेनेड आणि पिस्तूल होतं, ही बॅग सहजपणे विमानात गेली. हाशिम कुरेशींनी आधीच सगळं पाहून ठेवलेलं असल्यामुळे विमानात चढताना प्रवाशांची विशेष तपासणी होत नाही, हे त्यांना माहीत होतं.

विमान सकाळी साडेअकरा वाजता श्रीनगर विमानतळावरून जम्मूच्या दिशेने झेपावलं. त्या काळी श्रीनगर ते जम्मू हवाई अंतर अर्ध्या तासात पार होत असे.

तर, 'प्रवाशांनी आपले सीट-बेल्ट बांधून घ्यावेत, लवकरच विमान जम्मू विमानतळावर उतरणार आहे', अशी घोषणा एअरहोस्टेसने केल्यावर हाशिम कुरेशी वेगाने सीटवरून उठून कॉकपिटमध्ये गेले. तिथे त्यांनी बनावट पिस्तूल बाहेर काढलं आणि कॅप्टन एम.के. काचरो यांच्या मस्तकावर रोखून धरलं. विमान पाकिस्तानात घेऊन जावं, अशी सूचना त्यांनी काचरो यांना केली.

वैमानिक ओबेरॉय उजव्या बाजूला बसले होते, पण पिस्तूल खरं आहे की खोटं याचा पत्ता त्यांना लागला नाही.

विमान ठरलेल्या ठिकाणी उतरण्यासाठी वळलं होतं.

हाशिम कुरेशी सांगतात, "मी कॉकपिटमध्ये गेलो, तेव्हा अशरफ त्याच्या सीटवरून उठून हँड-ग्रेनेड हातात धरून कॉकपिटच्या दरवाज्यापाशी आला, तिथे आम्ही दोघं एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे राहिलो. मी पायलटच्या दिशेने होतो नि अशरफ प्रवाशांवर लक्ष ठेवून होता."

हाशिम यांच्या म्हणण्यानुसार, अशरफने हँड-ग्रेनेड हातात धरला आणि सर्व प्रवाशांना हात वर करायला सांगितलं. तसं न केल्यास हँड-ग्रेनेड फोडण्याची धमकी त्याने दिली.

विमानात भारतीय लष्कराचे कॅप्टन बसलेले होते. 'हा कोणत्या प्रकारचा ग्रेनेड आहे,' असं त्यांनी अशरफला विचारलं. त्यावर, 'आता फोडून दाखवतो, मग तुमचं तुम्हालाच कळेल कोणता हँड-ग्रेनेड आहे ते,' असं अशरफ म्हणाला. त्यानंतर संबंधित कॅप्टन व्यक्ती घाबरली आणि मग ते काही बोलले नाहीत.

"विमान झेलमवरून रावळपिंडीच्या दिशेने न्यायची माझी इच्छा होती, पण हिवाळ्याचे दिवस होते आणि बर्फ पडलेला असल्यामुळे नदी कोणाला दिसत नव्हती. विमान रावळपिंडीकडे न्यावं असं मी पायलटला सांगितलं. पण विमानात पेट्रोल कमी असल्याचं तो म्हणाला. फारतर लाहोरपर्यंत विमान जाऊ शकेल, ते अंतर कमी आहे, असंही त्याने सांगितलं. मग आपण विमान लाहोरला न्यायला सहमती दर्शवली," असं हाशिम सांगतात

एका टप्प्यावर तर त्यांना खालचे लोकही दिसत होते, तेव्हा हाशिम यांनी विमान कुठे जातंय असं वैमानिकाला विचारलं. त्यावर वैमानिक पंजाबीत म्हणाला, "मुंडिया गुस्सा न कर मैं तुवान्नू धोखा नी दित्ता, अस्सी लाहौर ही जांदे वां पे." म्हणजे, 'अरे, रागावू नकोस, मी काही धोकेबाजी करत नाहीये, तुला लाहोरलाच घेऊन चाललोय.'

विमान उडत राहिलं. थोड्या वेळाने वैमानिक ओबेरॉय यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला वायरलेसद्वारे सांकेतिक भाषेत संदेश पाठवला: लाहोर, लाहोर. दुसऱ्या बाजूने एका सरदार माणसाचा आवाज आला: हे लाहोर नाहीये, अमृतसर आहे.

हाशिम कुरेशींच्या म्हणण्यानुसार, ही अशी चलाखी केल्याबद्दल त्यांनी ओबेरॉय यांच्या कानाखाली भडकावली. ते फसवून विमान अमृतसरला नेण्याचा प्रयत्न करत होते. "मग मी त्यांच्याकडचा वॉकी-टॉकीसुद्धा खेचून घेतला," असं हाशिम सांगतात.

विमान पाकिस्तानात उतरलं

लाहोरमध्ये उतरण्यासाठी पाकिस्तानी कंट्रोल-टॉवरशी संपर्क झाला तेव्हा, आम्ही 'काश्मिरी मुजाहिदीन आहोत' असं आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही भारतीय विमानाचं अपहरण केलं आहे, त्यात प्रवासी आणि वैमानिक उपस्थित आहेत, तर आम्हाला लँडिंगची परवानगी द्यावी, असं आम्ही त्यांना सांगितलं.

कंट्रोल टॉवरने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आम्हाला लँडिंगची परवानगी दिली आणि दीड वाजण्याच्या सुमारास विमान खाली उतरलं. तिथे विमानाला सर्व सुरक्षादलांनी घेराव घातला होता.

लाहोर पोलिसांचे तत्कालीन एसएसपी अब्दुल वकील खान आणि डीएसपी नासिर शाह यांच्यासह सुरक्षा आणि प्रशासन यंत्रणेचे इतर लोकही तिथे आले होते.

"सुरक्षाव्यवस्थेमधील काही लोक आमच्यापाशी आले, त्यांना आम्ही हे लाहोर आहे का, असं विचारलं, तर त्यांनी यावर होकारार्थी उत्तर दिलं", असं हाशिम सांगतात. "तुम्ही खरं सांगताय यावर मी विश्वास कसा ठेवू?" असं हाशिम यांनी त्यांना विचारलं.

मग त्या लोकांनी स्वतःची सर्व्हिस-कार्ड दाखवायला सुरुवात केली, शिवाय पाकिस्तानचा झेंडाही दिसायला लागला, असं हाशिम सांगतात. "हे सगळंच बनावट असू शकतं, असं मी त्यांना म्हटलं. त्यावर त्यांनी कलमा म्हणायला सुरुवात केली, मग मला आपण लाहोरमध्ये उतरलोय याची खात्री वाटली."

अपहरणकर्त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत, असं विचारण्यात आल्यावर हाशिम यांनी सांगितलं की, त्यांनी हे सगळं 'काश्मीरच्या स्वातंत्र्या'साठी केलं आहे. शिवाय, त्यांचे काही साथीदार भारतातील तुरुंगात आहेत, त्यांना सोडून देण्यात यावं, तरच विमान आणि त्यातील प्रवाशांना सुरक्षितपणे सोडण्यात येईल.

हाशिम कुरेशी सांगतात, "महिलांना आणि लहान मुलांना सोडून द्यावं, बाकीच्या लोकांना वाटल्यास ताब्यात ठेवावं, असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही याला नकार दिला आणि आधी मकबूल भटशी आमचा संपर्क करून द्यावा, असं त्यांना सांगितलं."

"तिथले सिक्युरिटीगार्ड मला लाउंजमध्ये भेटले, पण मकबूल भटशी संपर्क होत नव्हता, म्हणून मला डॉक्टर फारूख हैदर यांच्याशी बोलायला देण्यात आलं. ते त्या वेळी रावळपिंडीला होते. मी 'फिरोज' आहे आणि आम्ही 'परिंदा' घेऊन आलोय, तुम्ही लाहोरला या, असं मी त्यांना सांगितलं."

हाशिम कुरेशी यांचं सांकेतिक नाव फिरोज होतं आणि त्यांच्या योजनेचं सांकेतिक नाव परिंदा असं होतं.

विमानातील महिला घाबरून रडत होत्या, तर मुलं भुकेने आणि तहानेने रडू लागली होती. प्रशासनाने प्रवाशांना तत्काळ पाणी आणून द्यावं, अशी विनंती केली. हाशिम आणि अशरफ यांनी एकमेकांशी सल्लामसलत केली आणि लँडिंग झाल्यानंतर दोनच तासांमध्ये महिलांना आणि मुलांना सोडून दिलं.

हाशिम कुरेशीच्या म्हणण्यानुसार, साधारण दीड तासाने सुरक्षाकर्मी डॉक्टर फारूख हैदर यांचा संदेश घेऊन परत आले. बाकीच्या प्रवाशांनाही सोडून द्यावं आणि विमान फक्त ताब्यात ठेवावं, असा संदेश त्यांनी पाठवला होता.

"ते काही आमच्याशी दगाफटका करणार नाहीत, असं वाटून आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार केलं. संध्याकाळपर्यंत सगळ्या प्रवाशांना सोडून दिलं. आता फक्त 'गंगा' हे विमान आमच्या ताब्यात होतं."

हाशिम कुरेशी सांगतात, "सगळ्या प्रवाशांना सोडून देऊन फक्त विमान ताब्यात ठेवण्याचा भाग अर्थातच बालिशपणाचा होता. त्यामुळे आम्ही सौदेबाजीच्या स्थितीत उरलो नाही, पण तेव्हा आम्ही लहानच होतो."

सर्व प्रवाशांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत लाहोरच्या एका हॉटेलात घेऊन जाण्यात आलं. तिथे काही दिवस ते राहिले आणि मग त्यांना भारतात पाठवण्यात आलं.

रात्री सुमारे नऊ वाजता, मकबूल भट, जावेद सागर, के. खुर्शीद आणि इतर लोक लाहोरला पोहोचले. हाशिम कुरेशी सांगतात त्यानुसार, विमानतळावर इतकी गर्दी जमा झालेली की, लोकांना विमानापासून दूर हटवण्यासाठी दोन-तीन वेळा लाठीमार करावा लागला.

विख्यात कायदेतज्ज्ञ आणि गंगा विमान प्रकरणात हाशिम कुरेशीचे वकील राहिलेले आबिद हसन मंटो बीबीसीशी बोलताना म्हणाले, "30 जानेवारीला संध्याकाळपर्यंत लाहोरसह संपूर्ण पाकिस्तानात अपहरणाची बातमी पसरली होती."

दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पाकिस्तानातील दूरदूरच्या भागांमधले आणि पाकीस्तान प्रशासित काश्मीरमधले लोकही विमानतळावर आले. एका भारतीय विमानाचं अपहरण करून ते लाहोरला आणणाऱ्या तरुणांना बघण्यासाठी ही गर्दी जमा झाली होती.

आबिद हसन मंटो यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाशी संबंधित असलेले डॉक्टर फारूख हैदर हे त्यांच्या चुलतबहिणीचे पती होते, त्यामुळेही त्यांनी यात अधिक रस घेतला.

"31 जानेवारीला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जावेद सागर आणि आमच्या आणखी एका साथीदारालाही विमानाच्या आत यायची परवानगी दिली, जेणेकरून आम्हाला रात्री झोप लागली तरी हे लोक विमान ताब्यात ठेवू शकतील," असं हाशिम कुरेशी सांगतात.

हाशिम सांगतात त्यानुसार, 31 जानेवारीला पाकिस्तानी सुरक्षासंस्थांचे लोक आले आणि त्यांनी विमानातील पत्रांचं पोतं उचलून नेलं. हे विमान दिल्लीहून श्रीनगरला आलेलं असल्यामुळे भारतीय सैन्यदलाचा पत्रव्यवहारही त्यातून होत असे. त्यामुळे कदाचित ती पत्रं पाकिस्तानी सुरक्षासंस्थांना न्यावीशी वाटली असतील, असं हाशिम म्हणतात.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे 1 फेब्रुवारीला दोन पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी पत्रांसह परत आले आणि म्हणाले की, याचं सील परत नीट बंद होत नाहीये, त्यामुळे पोतं उघडल्याचं सहजच कळेल, त्यापेक्षा हे जाळून टाका. मग त्यांनीच ती पत्रं जाळून टाकली. 'वाजवान' हा प्रसिद्ध काश्मिरी पदार्थ गरम करून दोन अधिकाऱ्यांसह अपहरणकर्त्यांनीही भोजन केलं.

हाशिम कुरेशी सांगतात त्यानुसार, त्याच दिवशी त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाच्या पोटावर पिस्तूल ठेवून गंमतीत 'हँड्स अप' असं म्हटलं, तर त्या अधिकाऱ्याने घाबरून हात वर केले. "अरे, दोस्ता, हे खोटं पिस्तूल आहे," असं त्यांनी नंतर त्या अधिकाऱ्याला सांगितलं.

हे ऐकल्यावर पाकिस्तानी सेनाधिकारी चकित झाले. "खरोखरच हे बनावट पिस्तूल आहे का?" असं त्यांनी विचारलं. त्या दिवशी पहिल्यांदा हाशिम यांनी स्वतः पाकिस्तानी सुरक्षासंस्थांना सांगितलं की, बनावट पिस्तूल आणि हँड-ग्रेनेड वापरून गंगा विमानाचं अपहरण झालेलं आहे. तोवर कोणालाही याचा पत्ता लागलेला नव्हता.

2 फेब्रुवारीच्या रोचक घडामोडी

पीपल्स पार्टीचे संस्थापक झुल्फिकार अली भुत्तो यांना 1970 सालच्या निवडणुकांमध्ये पश्चिम पाकिस्तानात बहुमत मिळालं होतं. सत्तेच्या संभाव्य हस्तांतरणाबद्दल चर्चा करण्यासाठी ते पूर्व पाकिस्तानात बहुमत मिळवणारे अवामी लीगचे अध्यक्ष शेख मुजीब यांना भेटायला ढाक्याला गेले होते.

झुल्फिकार अली भुत्तो 2 फेब्रुवारी 1971 रोजी ढाक्याहून लाहोरला परतले तेव्हा, दोन काश्मिरी तरुणांनी भारतीय विमानाचं अपहरण करून लाहोरमध्ये आणल्याचं त्यांना सांगितलं गेलं.

जुल्फ़िकार अली भुट्टो

फोटो स्रोत, ZAHID HUSSEIN

विख्यात वरिष्ठ पत्रकार खालिद हसन यांनी एप्रिल 2003 मध्ये 'फ्रायडे टाइम्स'मध्ये एका लेखात लिहिलं होतं की, या वेळी ते झुल्फिकार अली भुत्तोंसोबत होते.

खालिद हसन यांच्या म्हणण्यानुसार, भुत्तो लाहोरला पोहोचले तेव्हा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक विमानतळावर आले होते. भुत्तोंनी अपहरणकर्त्यांची भेट घ्यावी, असा आग्रह लोकांकडून वारंवार होत होता.

त्या वेळी भुत्तो स्वतः खालिद हसन यांना म्हणाले, "हे बघ, खालिद, हे काय चाललंय याचा मला काहीच पत्ता नाहीये. हे कोण लोक आहेत, तेही मला माहीत नाही. त्यामुळे मी काही त्यांच्याशी जाऊन बोलणार नाही." पण गर्दीने त्यांना अपहरणकर्त्यांच्या दिशेने जवळपास ढकललंच, मग त्यांनी अपहरणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचा हालावाल विचारला.

पाकिस्तानच्या संस्थापकांचे माजी प्रमुख सचिव एच. खुर्शिद (ते नंतर पाकिस्तान प्रशासित काश्मीरचे अध्यक्षही झाले) यांना 2 फेब्रुवारी रोजी लाहोर विमानतळावर बोलावण्यात आलं. तिथे ते मकबूल भटसह हाशिम कुरेशी यांना भेटले. विमानाला आग लावून टाकावी, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं त्यांनी अपहरणकर्त्यांना सांगितलं.

तर आता, विमानाची काच तोडून खाली यावं, म्हणजे काच दुरुस्त करून घ्यायला चार-पाच दिवस लागतील, तेवढ्या दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांमधून अधिकाधिक प्रसिद्धी मिळत राहील, असा सल्ला मकबूल भट यांनी दिल्याचं हाशिम कुरेशी यांनी सांगितलं.

हे संभाषण संपल्यावर लगेचच ते लोक बाहेर आले. तिथे एसएसपी अब्दुल वकील आणि इतर सुरक्षा कर्मचारी परत हाशिम कुरेशी यांच्यापशी आले आणि मकबूल भटने विमानाला आग लावण्यासाठी पेट्रोल पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.

हाशिम कुरेशी सांगतात त्यानुसार, हे लोक खोटं बोलत असतील असं त्यांना एक क्षणभरही वाटलं नाही आणि 80 तास विमान ताब्यात ठेवल्यावर अखेरीस त्याला आग लावण्यात आली.

आग लावत असताना अशरफ कुरेशीचे हात जळाले. बाहेर पडण्याचा दरवाजा वेळेत उघडला नाही, तेव्हा हाशिम कुरेशी यांनी आगीपासून बचाव करण्यासाठी विमानातून बाहेर उडी मारली. दोघेही जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपहरणाच्या या 80 तासांदरम्यान पाकिस्तानी संस्थांनी अथवा प्रशासनाने त्यांच्या बाजूने अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न एकदाही केला नाही.

विमानाला आग लावल्यानंतर हे तरुण विमानतळावरून बाहेर पडले, तेव्हा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी प्रचंड गर्दी लाहोरच्या रस्त्यांवर उतरली होती. जागोजागी त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावलेले होते. जागोजागी फुलं उधळून, घोषणा देऊन या तरुणांचं स्वागत केलं गेलं.

.

फोटो स्रोत, ZAHID HUSSEIN

पीपल्स पार्टीचे नेते अहमद रझा कसूरी आणि इतर नेते खास ट्रकवर उभे होते आणि ते उपस्थित तरुणांना प्रोत्साहन देत होते.

अहमद रझा कसूरी बीबीसीशी बोलताना म्हणाले की, अपहरणकर्त्यांच्या स्वागतासाठी पक्षाने त्यांना पाठवलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, मॉल रोड, पंजाब विद्यापीठाच्या जुन्या आवारासमोर आणि इस्तंबूल चौक इथे मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. जणू काही सगळं लाहोर शहरच रस्त्यावर उतरलं असावं, अशी परिस्थिती होती.

मकबूल भट, हाशिम कुरेशी आणि अहमद रझा कसूर यांच्यासह इतरही लोकांची भाषणं यावेळी झाली.

विमान जाळत असताना हाशिम कुरेशी जखमी झाले होते, त्यामुळे त्यांना लाहोरला घेऊन जाण्यात आलं, तिथे काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते सांगतात त्यानुसार, पाकिस्तानातील प्रत्येक स्तरामधले लोक त्यांना बघण्यासाठी रुग्णालयात येत होते आणि विमानाचं अपहरण केल्याबद्दल प्रशंसा करून जात होते.

हाशिम कुरेशींना रुग्णालयातून सोडल्यावर ते मकबूल भट आणि इतर नेत्यांसह विविध शहरांमधून दौरे करत पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील मीरपूर जिल्ह्याकडे रवाना झाले. वाटेत गुजरांवाला आणि रावळपिंडी इथे हजारो लोकांनी त्यांचं स्वागत केलं. पण उत्साहाचं हे वातावरण फार काळ टिकलं नाही.

पाकिस्तानचा कट की पाकिस्तानविरोधातील कट?

सर्व बाजूंनी या अपहरणकर्त्यांची स्तुती होत होती, त्याच वेळी 4 फेब्रुवारी 1971 रोजी भारताने 'गंगा' विमान अपहरणाचं कारण देऊन आपल्या हवाई हद्दीतून पूर्व पाकिस्तानला जाण्यासाठी पश्चिम पाकिस्तानवर बंदी घातली. ही बंदी 1976 सालापर्यंत कायम होती.

विमान

फोटो स्रोत, ZAHID HUSSEIN

आपलं विमान पाकिस्तानच्या मदतीनेच अपहृत करण्यात आलं आणि मग लाहोरमध्ये ते जाळून टाकण्यात आलं, असा आरोप भारताने केला.

निवडणुकीनंतर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात सत्ताप्राप्तीसाठी चढाओढ सुरू होती, नेमकी त्याच वेळी हवाई प्रवासावर वरीलप्रमाणे बंदी घालण्यात आली. पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्याचं आंदोलनही जोर पकडत होतं.

स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही आवामी लीगला सत्ता दिली जात नव्हती, त्यामुळे पूर्व पाकिस्तानात यादवीसदृश परिस्थिती निर्माण झाली.

या परिस्थितीचा निपटारा करण्यासाठी पश्चिम पाकिस्तानातून सैनिक आणि इतर संसाधनं पाठवणं अवघड झालं होतं. हवाई क्षेत्रावर प्रतिबंध असल्यामुळे पाकिस्तानी विमानांना हिंद महासागरावरून जाऊन इंधन भरून घेण्यासाठी श्रीलंकेत थांबावं लागे, त्यानंतर मग ते पूर्व पाकिस्तानकडे जात. यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होतं.

भारताची गुप्तचर संस्था 'रॉ'चे संस्थापक सदस्य आणि 'रॉ'च्या दहशतवादविरोधी विभागाचे माजी प्रमुख बी. रमन यांनी 'द काउबॉयज ऑफ रॉ: डाउन मेमरी लेन' या आठवणींच्या पुस्तकात सदर घडामोडींविषयी विस्तारात लिहिलं आहे. 'गंगा' अपहरणाची योजना पूर्व पाकिस्तानच्या मदतीसाठी गोपनीय मोहीम म्हणून हाती घेण्यात आली होती, ती यशस्वीरित्या पार पडली.

त्यांनी लिहिलं आहे, "जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या दोन सदस्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण केलं, त्याला प्रत्युत्तर म्हणून इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानकडे जाणाऱ्या सर्व पश्चिम पाकिस्तानी विमानांवर बंदी घातली. या बंदीमुळे पश्चिम पाकिस्तानातील सैन्यदलांच्या मुख्यालयातून पूर्व पाकिस्तानात कुमक पाठवणं आणि सैनिकांचा पुरवठा टिकवून ठेवणं अधिकाधिक अवघड होत गेलं, त्यामुळे त्यांची ताकद कमी झाली. यातून पूर्व पाकिस्तानातील विजयाचा मार्ग मोकळा केला."

2012 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात रमन पुढे लिहितात की, 1968 साली 'रॉ'ची स्थापना झाल्यानंतर लगेचच संस्थेचे पहिले प्रमुख रामेश्वर नाथ काव यांनी या गुप्तचर संस्थेवर दोन कामं सोपवली. पाकिस्तान आणि चीन यांची गुप्तचर माहिती मिळवणं आणि पूर्व पाकिस्तानात गोपनीय मोहीम आखणं, अशी ही कामं होती.

पाकिस्तानवर भारताने घातलेल्या हवाई प्रवासाच्या निर्बंधांचा परिणाम दिसायला लागल्यावर अपहरणाच्या या घटनेने नवीन वळण घेतलं. तेव्हा पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संशय यायला लागला की, 'गंगा' अपहरणनाट्य हे कदाचित आपल्या विरोधातील कारस्थान असावं आणि त्याचं कारण देऊन आपल्यावर हवाई निर्बंध घातला गेला असेल.

.

फोटो स्रोत, ZAHID HUSSEIN

पाकिस्तानातील तत्कालीन लष्करी सरकारने 'गंगा' अपहरणनाट्यामागील उद्देश शोधून घेण्यासाठी एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष होते, सिंध उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नूर-उल-आरिफीन.

काही दिवस तपास केल्यानंतर या आयोगाने आपला अहवाल सादर केला. या अहवालात म्हटल्यानुसार, 'गंगा' 'अपहरणनाट्य हे मुळात भारताने केलेलं कारस्थान होतं. हाशिम कुरेशी भारतीय गुप्तहेर होते, या योजनेला शेवटापर्यंत नेण्यासाठी त्यांना बीएसएफमध्ये भरती करवून घेण्यात आलं. पाकिस्तानवर निर्बंध घालण्यासाठी हे घडवण्यात आलं, जेणेकरून पूर्व पाकिस्तानत वाढत चाललेल्या अतिरेकी आंदोलनावर नियंत्रण ठेवणं पश्चिम पाकिस्तानला कठीण जावं.'

हाशिम कुरेशी आणि अशरफ कुरेशी यांची काही आठवड्यांपूर्वीपर्यंत पाकिस्तानात प्रशंसा केली जात होती, पण या आयोगाचा अहवाल आल्यानंतर अचानक ते दोघेही सरकारचे आणि सरकारी संस्थांचे शत्रू झाले. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे मकबूल भट, डॉक्टर फारूख हैदर, अमानुल्लाह खान, जावेद सागर आणि इतर नेत्यांसह त्यांनाही या कारस्थानाच्या आरोपाखाली अटक झाली.

अशरफ कुरेशी सांगतात त्यानुसार, त्यांना फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात अटक झाली. चौकशी करण्याचं कारण देऊन अधिकारी त्यांना टांडा डॅमकडे घेऊन गेले.

यानंतर हाशिम कुरेशी यांना जवळपास नऊ वर्षं तुरुंगवास भोगावा लागला. हाशिम कुरेशी आणि अशरफ कुरेशी यांच्यासह इतर नेत्यांवर विमानाचं अपहरण, मग ते जाळणं, यांसह अनेक आरोप लावण्यात आले आणि खटला चालवण्यात आला. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एका विशेष न्यायालयाची निर्मिती करण्यात आली.

बीबीसीशी बोलताना हाशिम कुरेशी यांनी असा दावा केला की, शाही किल्ल्यामध्ये कैदेत असताना त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले. त्यांना सक्तीने एका लिखित प्रतिज्ञापत्रावर सही करायला लावण्यात आलं. त्यांनी (हाशिम कुरेशी आणि अशरफ कुरेशी यांनी) भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून 'गंगा' विमानाचं अपहरण केलं, असं त्यात लिहिलं होतं.

हाशिम कुरेशी सांगतात त्यानुसार, बरीच मारहाण झालेली असल्यामुळे त्यांनी सही केली, पण हे प्रतिज्ञापत्र आपल्याकडून जबरदस्तीने घेण्यात आल्याचं त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं.

या प्रकरणी सुनावणी सुरू झाली तेव्हा त्यांना कोणी वकील मिळत नव्हता. यावर उपाय करण्यासाठी न्यायालयाने ज्येष्ठ वकील आबिद हसन मंटो यांच्यासह इतर वकिलांना पाचारण केलं.

आबिद हसन मंटो सांगतात की, ते घरी होते, तेव्हा अचानक रजिस्ट्रार कार्यालयातून त्यांना फोन आला आणि विशेष न्यायालयात हजर राहावं असं सांगण्यात आलं.

हाशिम कुरेशी न्यायालयात हजर झाले तेव्हा त्यांच्या समोर एक अथवा दोन नव्हे तर तब्बल नऊ वकील उभे होते, त्यापैकी योग्य वाटेल त्या वकिलाची नियुक्ती करावी, असं त्यांना सांगण्यात आलं. या संदर्भातील इतर तजवीज करण्याची जबाबदारी सरकारवर राहणार होती.

हाशिम कुरेशी यांनी आपली निवड केल्याचं आबिद हसन मंटो सांगतात. मंटो यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत हाशिम यांची बाजू लढवली.

डिसेंबर 1971 ते मे 1973 इतका काळ हा खटला चालला. सर्व पुराव्यांची छाननी केल्यानंतर हाशिम कुरेशी हेच अपहरण प्रकरणातील मुख्य दोषी असल्याचं न्यायालयाने जाहीर केलं. त्यांच्यावर हेरगिरीसह इतरही आरोप सिद्ध झालं. त्यांना एकत्रितरित्या सुमारे 19 वर्षांची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या सोबत या घटनेत सहभागी असलेल्या अशरफ कुरेशीसह मकबूल भट आणि इतरांना न्यायालय बरखास्त होईपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली.

आबिद हसन मंटो यांचे निकटवर्तीय आणि या खटल्यातील एक आरोपी डॉक्टर फारूख हैदर साक्षीदार म्हणून पुढे आले, त्यामुळे त्यांना शिक्षेपासून संरक्षण मिळालं.

या निकालाने हाशिम कुरेशी आजही अस्वस्थ होतात. त्यांच्या म्हणण्यानुसार अशरफ आणि त्यांनी मिळून एका गुन्हा केला, त्याची शिक्षा मात्र वेगवेगळी कशी असू शकते?

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अशरफ कुरेशी यांनी पंजाब विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांनी अध्यापन सुरू केलं, कालांतराने याच विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या अशरफ यांचं २०१२ साली निधन झालं.

दुसऱ्या बाजूला हाशिम कुरेशी यांना सुटकेसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागली. त्यांनी शिक्षेविरोधात याचिका दाखल केली. या खटल्याचा निकाल लागायला अनेक वर्षं गेली. या शिक्षेच्या कालावधीदरम्यान हाशिम कुरेशी यांना रावळपिंडी, कोट लखपत, कँप जेल मियांवाली, फैसलाबाद आणि अटक या तुरुंगांसहित इतरही अनेक तुरुंगातंमध्ये ठेवण्यात आलं.

शेख मुजीब यांची भेट

तुरुंगवासादरम्यान हाशिम कुरेशी यांची आवामी लीगचे अध्यक्ष शेख मुजीब यांच्याशी भेट झाली, शिवाय पाकिस्तानातील आणि इतरही अनेक महत्त्वाच्या राजकारण्यांशी त्यांची भेट झाली. "डिसेंबर 1971मध्ये मी मियांवाली तुरुंगात होतो, तेव्हा शेख मुजीबसुद्धा त्याच तुरुंगात असल्याचं मला कळलं", असं हाशिम कुरेशी सांगतात.

"शेख मुजीब माझ्या शेजारच्या बरॅकमध्ये होते, त्यात मध्ये एक उंच भिंत होती. एके दिवशी मी खटपट करून त्या भिंतीवर चढलो आणि दुसऱ्या बाजूला शेख मुजीब एका कोपऱ्यात बसल्याचं मला दिसलं. मी त्यांना म्हटलं, शेख साहब! सलाम. ते इकडेतिकडे पाहायला लागले आणि त्यांचं लक्ष भिंतीकडे गेलं तेव्हा त्यांनी मी कोण आहे असं विचारलं."

"मी हाशिम कुरेशी आहे, भारताच्या 'गंगा' विमानाचं अपहरण मी केलं होतं, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर ते शेख मुजीब म्हणाले, 'अच्छा, म्हणजे तो तू आहेस तर"

हाशिम कुरेशींच्या म्हणण्यानुसार, शेख मुजीब अंगणाच्या दिशेने बोट दाखवून म्हणाले, "ते बघ मित्रा, या लोकांनी तिथे एक खड्डा खोदलाय आणि मला मारून ते इथेच दफन करणार आहेत." त्यावर हाशिम त्यांना आश्वस्त करत म्हणाले, "नाही, असं काही होणार नाही, तुमचे लोक तुमच्यासाठी लढत आहेत."

मे 1980 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील तीन सदस्यांच्या खंडपीठाने (यात न्यायमूर्ती नसीम हसन शाह, न्यायमूर्ती करम अली आणि न्यायमूर्ती रियाझ यांचा समावेश होता) हाशिम कुरेशी यांच्या बाजूने निकाल दिला, त्यानंतर त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं.

सुटकेनंतर काही वर्षं ते पाकिस्तानात राहत होते, पण मग परदेशात निघून गेले. नंतर ते हॉलंडमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झाले. ते 2000 साली श्रीनगरला परत येत होते, तेव्हा नवी दिल्लीत त्यांना अटक करण्यात आली.

अटक झाल्यावर भारतीय अधिकाऱ्यांनीही त्यांच्याविरोधात पाकिस्तानी हेर असल्याची आणि 'गंगा' विमानाचं अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. या खटल्याचा निकाल आता 20 वर्षं उलटून गेली तरी लागलेला नाही. ते आजही या प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत.

"आधीच या खटल्यात मी पाकिस्तानात शिक्षा भोगली आहे. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार एकाच प्रकरणात दोनदा शिक्षा मिळू शकत नाही, त्यामुळे भारत या प्रकरणाच्या निकालामध्ये सातत्याने चालढकल करतो आहे," असं हाशिम कुरेशी म्हणतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतात पाकिस्तान हेर असल्याचा आरोप आणि पाकिस्तानात भारतीय हेर असल्याचा आरोप, असा दुहेरी आरोप सहन केलेले आपण एकमेव मनुष्य आहोत, असं हाशिम म्हणतात. त्यांच्या मते, हेरगिरीचा हा आरोप हास्यास्पद आहे.

'गंगा' विमानाचं अपहरण केवळ काश्मीरला दोन्ही देशांपासून स्वतंत्र करण्यासाठी केलं होतं, आपण कोणत्याही देशाचे हेर नाही, असं ते म्हणातात.

वापर

आपण दोन्हींपैकी कोणत्याही देशाच्या गुप्तचर संस्थांसाठी काम केलेलं नाही, असं हाशिम कुरेशी सांगतात. "पण मी दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांचा वापर माझ्या उद्देशासाठी केला, असं नक्कीच म्हणता येईल."

हाशिम क़ुरैशी

फोटो स्रोत, HASHIM QURESHI

फोटो कॅप्शन, हाशिम क़ुरैशी

बी. रमन यांच्या पुस्तकावर टिप्पणी करताना हाशिम कुरेशी म्हणतात की, पाकिस्तानी किंवा भारतीय गुप्तहेर असल्याचं ऐकल्यावर त्यांना आश्चर्य वाटतं. त्यांनी बी. रमन यांचं पुस्तक वाचलेलं नाही, पण असच पुस्तक लिहिणाऱ्या 'रॉ'च्या एका माजी हेराविरोधात त्यांनी खटला दाखल केला आहे, असं ते सांगतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी असं काम केलं असतं, तर त्यांना अभिमान वाटला असता आणि आज ते बंगाली लोकांचे नायक असते. अशा प्रकारची हिंसा कोणत्याही अर्थाने योग्य नव्हती आणि आज त्यांना याचा पश्चात्ताप होतो, असंही हाशिम कुरेशी सांगतात.

आबिद हसन मंटो बीबीसीशी बोलताना म्हणाले की, हाशिम कुरेशी गुप्तहेर होते असं त्यांना वाटत नाही. पण 'गंगा' अपहरणनाट्याने पाकिस्तानचे खूप नुकसान केलं. पूर्व पाकिस्तानातील फुटीरतावादी आंदोलनावर याचा मोठा प्रभाव पडला.

आबिद हसन मंटो यांच्या म्हणण्यानुसार, भारत आणि पाकिस्तान हे दोघेही या अपहरणनाट्याचा लाभ उठवू पाहत होते, पण वास्तवात भारतालाच याचा लाभ झाला.

पाकिस्तानचे अंमली पदार्थ नियंत्रणाचे केंद्रीय मंत्री आणि निवृत्त ब्रिगेडियर एजाझ शाह बीबीसीशी बोलताना हसत म्हणाले, "गंगा अपहरणनाट्य ही अतिशय दुर्दैवी घटना होती. भारताच्या 'रॉ'सह इतर संस्थांनी ही योजना आखली आणि तिची बहुतांशाने यशस्वी समाप्ती केली."

एजाझ शाह यापूर्वी आयएसआय पंजाबचे प्रमुख राहिले आहेत.

अपहरण झालं तेव्हा ते लेफ्टनंट म्हणून मकबूलपूर सेलेंट इथे तैनात होते, आणि गंगा अपहरणनाट्यानंतर त्यांना सीमेवर पाठवण्यात आलं, असं एजाझ बीबीसीशी बोलताना म्हणाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, "भारताने 'गंगा' अपहरणाचं कारस्थान यशस्वीरित्या पूर्णत्वास नेलं. त्यानंतर पूर्व पाकिस्तानातून उडणाऱ्या पश्चिम पाकिस्तानच्या विमानांवर निर्बंध घातले, त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या दळणवळणाला मोठा फटका बसला, त्यामुळेच पूर्व पाकिस्तानातील (आतचा बांगलादेश) आंदोलनाचा निपटारा करणं अवघड होऊन गेलं."

पाकिस्तानी गुप्तचरसंस्थांच्या अकार्यक्षमतेमुळे 'गंगा' अपहरणनाट्य यशस्वी झालं का, या प्रश्नावर एजाझ शाह म्हणतात की, इतक्या वर्षांनी या गोष्टीबद्दल काय सांगणार- कोण अकार्यक्षम होतं, कोण नव्हतं, काय सांगणार. पण या अपहरणामुळे आमचं खूप नुकसान झालं एवढं निश्चित.

भारताने हवाई प्रवासावर बंदी घातल्यानंतर काहीच आठवड्यांनी, मार्च 1971 रोजी आवामी लीगचे अध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशाचा नारा दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानात 'सर्च लाइट' मोहिमा सुरू केल्या.

26 मार्च रोजी शेख मुजीब यांना अटक करण्यात आलं. त्याच दिवशी मेजर झिया-उर-रहमान यांनी रेडिओवरून बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती.

21 नोव्हेंबर 1971 रोजी मुक्तिवाहिनीच्या नावाने बांगलादेश आणि भारताने संयुक्त सैन्य उभं केलं, 3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालं.

6 डिसेंबर रोजी बांगलादेशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा भारत हा पहिला देश ठरला. त्यानंतर 16 डिसेंबर 1971 रोजी ढाक्यात पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली आणि बांगलादेश हा नवीन देश जगाच्या नकाशावर उमटला.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)