कराचीत विद्वेषाच्या आगीत जेव्हा हिंदू आणि शीख होरपळतात...

पाकिस्तान

फोटो स्रोत, Inqlab

    • Author, रियाज सुहैल
    • Role, बीबीसी उर्दू, कराची

वेळ सकाळची. मांगा राम कर्मचंदानी आपल्या घराच्या बाल्कनीत उभे होते. त्यावेळी लोक गुरुद्वाऱ्यावर हल्ला करत आहेत व शीख सरदार तलवारीने स्वतःचा बचाव करत असल्याचे त्यांनी पहिले.

अचानक गुरुद्वाऱ्यामध्ये आगीच्या ज्वालांनी पेट घेतला. काही सरदार स्वतःचा बचाव करण्यासाठी इकडे तिकडे धावत होते, तर काही मृत जमिनीवर पडले होते. या घटनेनंतर संतप्त जमाव शहराच्या विविध भागात पसरले आणि घेराव घालून आग लावायला सुरवात केली. याने शहरातील रहिवासी हिंदू सर्वाधिक प्रभावित झाले.

त्यावेळी मांगा राम 15 वर्षांचे होते व ते कराचीमधील रतन तलाव भागातील अकाल बुंगा गुरुद्वाराजवळ राहात होते. 6 जानेवारी 1948 रोजी झालेल्या या हल्ले व दंगलीनंतर इतर हजारो कुटुंबांप्रमाणेच ते भारतात निघून गेले.

मांगा राम यांनी एका मुलाखतीत नंदिता भवानी यांना ही गोष्ट सांगितली होती. नंदिता यांनी 'द मेकिंग ऑफ एक्साईल सिंधी हिंदू अँड पार्टीशन' या नावाने भारताचे विभाजन आणि सिंधी हिंदूंच्या समस्या यावर एक पुस्तक लिहिले आहे.

पाकिस्तानच्या स्थापनेनंतर 6 ते 7 जानेवारी 1948 दरम्यान राजधानी कराची येथे झालेल्या दंगलीत डझनभर लोक ठार झाले होते. कराची येथून प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांत हे आकडे प्रसिद्ध झाले नव्हते.

मुस्लिम लीगशी संबंधित 'अल-वहीद' या सिंधी दैनिकात असोसिएटेड प्रेसच्या माध्यमातून दोन दिवसांत 127 लोक ठार आणि 300 हून अधिक जखमी झाल्याचे प्रकाशित करण्यात आले.

लाहोर येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक 'इन्कलाब' च्या 10 जानेवारीच्या अंकात मृतांचा आकडा 105 व तितकेच लोक जखमी झाल्याचे सांगितले गेले.

अयूब

उत्तर सिंध मधून शीखांचे आगमन

नंदिता भवानी आपल्या पुस्तकात लिहितात की, 6 जानेवारी रोजी शिख उत्तरेकडील सिंध येथून रेल्वेमार्गे कराचीला पोचले जेणेकरून ते येथून भारतात जाऊ शकतील. रेल्वे स्थानकातून पोलिस व्हॅनमध्ये त्यांची रतन तलावात अकाल बंगा गुरुद्वारामध्ये रवानगी होईल अशी त्यांना आशा होती.

कॉंग्रेसच्या प्रांतीय विधानसभेचे सदस्य स्वामी कृष्ण नंद यांना पोलिस व्हॅन दिसली नाही तेव्हा त्यांनी टांगा भाड्याने घेतला आणि मेकलो रोड येथून रतन तलाव गुरुद्वारासाठी प्रस्थान केले.

त्या लिहितात, वाटेत काही शिखांना टांगांवरुन ओढले गेले आणि लोक "मारो मारो" असे ओरडायला लागले पण ते गुरुद्वारापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. त्यानंतर दोन तासात संतप्त लोकांचा मोठा जमाव एकत्र आला आणि त्यांनी आत प्रवेश करून शीखांचा नरसंहार सुरू केला.

प्रीडी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या या गुरुद्वाराच्या जागेवर आज नबी बाग महाविद्यालय बांधले गेले आहे. त्यामागील काही भिंती आणि जळलेली दारे आजही या इतिहासाच्या शोकांतिकेचा पुरावा म्हणून अस्तित्वात आहेत. या रस्त्याचे नाव अजूनही टेम्पल रोड असे आहे.

पाकिस्तान

फोटो स्रोत, dawn

हिंदू लोक गदारोळाच्या घेऱ्यात होते

रतन तलाव गुरुद्वारापासून सुरू झालेला गदारोळ शहरभर पसरला. ठाकूर चावला, सिंधी भाषेचे कवी आणि लघुकथाकार, त्यांच्या 'तुम सिंध में रह जाओ' या सिंध यात्रा पुस्तकात, त्या दिवशी दंगली लवकरच शहरात पसरल्याची आठवण सांगतात. विशेषत: हिंदू लोकसंख्या असणाऱ्या गाडी खाता, फ्रेरे रोड, बिरिंस रोड, जमशेद क्वार्टर, अमिल कॉलनी या शहरांना घेराव घालून लुटले गेले.

हिंदु बहुसंख्य आर्य समाज राम बाग, रतन तलाव येथे असलेले कॉंग्रेस कार्यालय स्वराज भवन आणि लॉरेन्स रोडवरील राम कृष्ण हवेलीवर हल्ला करण्यात आला.

खूड़ो

फोटो स्रोत, HAMMED KHORO

घरांवर हल्ले आणि लूटपाट

ठाकूर चावला गाडी खाता (आताचे पाकिस्तान चौक) जवळ असलेल्या ठाकूर निवास नावाच्या एका पाच मजली इमारतीत राहत होते. ते लिहितात की पहिल्या मजल्यावर एक कार्यालय व तिसऱ्या मजल्यावर एक निवासस्थान होते, तर उर्वरित अपार्टमेंट भाड्याने दिले होते.

"6 जानेवारी, 1948 रोजी सकाळी दहा वाजता, रस्त्यावर गोंधळ उडाला आणि 'अल्लाह अकबर' च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. मी बाल्कनीत गेलो तेव्हा मला डॉक्टर प्रेम चंद यांच्या घराच्या खाली असलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यात ट्रक उभे असल्याचे दिसले ज्यात हिंदूंचे सामान टाकले जात होते. हे चाळीस ते पन्नास लोक होते ज्यांच्या हातात तलवारी, चाकू आणि काठ्या होत्या. काही क्षणातच हा जमाव आमच्या इमारतीत घुसला. मी पहारेकऱ्याला आवाज देऊन लोखंडी दार बंद करून टाळे लावण्यास सांगितले. "

"आमच्या नातेवाईकांनी आपले आणि मुलीच्या हुंड्याचे सामान आधीच आमच्याकडे ठेवले होते व पाण्याच्या जहाजात चढण्याच्या एक दिवस आधी येऊन जातील असे सांगितले होते. आम्ही पहिल्या मजल्यावरील दोन फ्लॅट, म्हणजेच सहा खोल्या त्यांच्या सामानाकरिता रिकाम्या केल्या होत्या. प्रत्येक पॅकेट किंवा बॉक्सवर त्यांची नावे होती, दुर्दैवाने आमचे सामानही त्या दिवशी तिथेच ठेवले होते.

ते पुढे म्हणाले, जमावाने लोखंडी गेट तोडण्यास सुरवात केली. "आम्ही जे काही उपलब्ध होते ते वरून टाकून त्यांना तेथून घालवण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ ठरले. अखेर ते आत शिरले आणि सामान लुटून ट्रकमध्ये लोड करण्यास सुरुवात केली. मी सतत पोलिसांना कॉल करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांचा नंबर व्यस्त होता. "

ते घोषणा देत खोलीपर्यंत आले आणि दरवाजा तोडून चाकूने वार करायला सुरवात केली. माझ्या चेहरा, नाक आणि पाठीवर जखमा होत्या. आम्ही वरच्या खोलीत महिला आणि मुलांना लपवले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावले.

इंग्रजी दैनिकाच्या 'सिंध ऑब्जर्व्हर' ने ठार झालेल्यांची यादी प्रसिद्ध केली, त्यात माझेही नाव होते कारण मी गंभीर स्वरूपात जखमी झालो होतो.

कराची

छावण्या, कल्याणकारी संस्था आणि रुग्णालयांवरही हल्ले

त्या दिवसांमध्ये, कराची ते मुंबईसाठी पाण्याच्या जहाजांची तिकिटे मिळत असत व प्रवाशांना प्रस्थानाकरिता दहा दिवस वाट बघावी लागे.

चित्तमल यांनी आपल्या मुलाखतीत नंदिता भवानी यांना सांगितले होते की, सोभराज हॉस्पिटलजवळ एक आर्य समाज शाळा आहे (उर्दू बाजार येथे असलेल्या या शाळेचे नाव नंतर केंद्रीय गृहमंत्री फजलूर रहमान यांच्या नावावर ठेवले गेले), येथे शंभराहून अधिक कुटुंबांनी आश्रय घेतला होता. ही कुटुंबे उत्तर सिंधच्या विविध भागांतून आली होती.

दरवाजा तोडून जमाव आत शिरला आणि जे लोक निषेध करीत होते त्यांना मारले गेले किंवा जखमी करण्यात आले. मालमत्तेव्यतिरिक्त महिलांचे दागिनेही काढून घेण्यात आले.

"या लोकांनी सामान टांगे, ट्रक व कारमध्ये टाकून दिले. ज्या लोकांजवळ कसले वाहन नव्हते, त्यांनी डोक्यावर वाहून नेले. तेथे उपस्थित असलेल्या महिला, मुले आणि पुरुष किंचाळत होते आणि जे जखमी झाले होते ते विव्हळत होते. दंगलखोरांनी जाण्यापूर्वी रॉकेल व टायर जाळून शाळेला आग लावली. "

सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट कराचीचे संपादक एम.एस.एम. शर्मा यांनी आपल्या 'पीप्स इन टू पाकिस्तान' या संस्मरणात लिहिले आहे की, "ते मद्रास येथील आपल्या घरी गेले होते आणि 6 जानेवारीला कराचीला परत आले होते. विमानतळावर त्यांना घेण्यासाठी गाडी येऊ शकली नाही." त्यांनी मिस्टर खूड़ो यांना फोन केला, त्यांनी स्कॉट पाठवले. "

कल्याणकारी संस्था असलेल्या राम कृष्ण हवेलीलाही दंगलखोरांनी सोडले नाही. एमएसएम शर्मा यांनी बंगालमधील दुष्काळाच्या वेळी कसलाही धार्मिक भेदभाव न करता खूप चांगले काम केले होते.

सिंध गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज
फोटो कॅप्शन, सिंध गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज

"मी प्रथम त्या ठिकाणी गेलो जिथे राम कृष्णाची मूर्ती तुटलेली होती, पुस्तके विखुरलेली होती. हल्ल्यात डॉ. हेमानंदन वाधवानी यांना झालेली दुखापत हा माझ्यासाठी दुसरा धक्का होता. त्यांचा मानवतेवर विश्वास होता व त्यांच्या नर्सिंग होममध्ये गरिबांना मोफत उपचार दिले जायचे. "

मुख्यमंत्री खूड़ो यांनी स्वत: दंगलखोरांवर गोळीबार केला

डॉ. हमीदा खूड़ो यांनी आपले वडील अय्यूब खूड़ो यांच्या संस्मरणांवर आधारित 'मोहम्मद अय्यूब खूड़ो: जुर्रतमंदाना सियासी जिंदगी' (साहसी राजकीय जीवन) या पुस्तकात लिहिले आहे की, 6 जानेवारीला दंगलीची बातमी जेव्हा उघडकीस आली तेव्हा मुख्यमंत्री अय्यूब खूड़ो त्यांच्या कार्यालयात होते. सकाळी 11 वाजता शांतता मंडळाचे सचिव थल रमानी धावत आले व त्यांनी सांगितले की शिखांवर सशस्त्र लोकांनी खंजीराने हल्ला केला आहे.

खूड़ो म्हणाले की त्यांनी डीआयजी पोलिस काझिम रझा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांनी आयएसपी शरीफ खान यांना गुरुद्वाऱ्याला घेराव घालून लोकांचे प्राण वाचवण्याची सूचना दिली. तासाभरानंतर रामानी परत आले आणि त्यांनी लोक अजूनही मारले जात आहेत, पोलिस काहीही करत नसल्याचे सांगितले.

कराची

अय्यूब खूड़ो यांच्या म्हणण्यानुसार, दुपारी 12:30 वाजता ते कार्यालयातून दंगलग्रस्त भागाकडे गेले आणि त्यांनी स्वत: च्या डोळ्यांनी पाहिले की सशस्त्र लोक सुरी आणि काठीने मंदिरावर हल्ला करीत आहेत. त्यातील बरेच जण गुरुद्वाऱ्यात दाखल झाले. घटनास्थळी एसपी आणि पोलिस कर्मचारी हजर होते, त्यांचे म्हणणे होते की त्यांच्याकडे फक्त दहा सैनिक काठी घेऊन सज्ज होते, जे दंगल रोखण्यासाठी पुरेसे नव्हते.

संस्मरणानुसार, अय्यूब खूड़ो एक गार्ड, एक ड्रायव्हर आणि एक बंदूक घेऊन त्या भागात गेले होते. त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकाला नेम धरण्यास सांगितले, त्यांनी स्वत: देखील गोळीबार केला, त्यानंतर दंगलखोर इतःस्ततः पांगले. परंतु तोपर्यंत शहरात दंगल पसरली होती, त्यांनी शहरातील अनेक भागात भेटी दिल्या आणि आपल्या वैयक्तिक पिस्तुलाचाही वापर केला.

गुरुद्वाराच्या जमिनीवर आता नबी बाग कॉलेज उभारण्यात आलंय.
फोटो कॅप्शन, गुरुद्वाराच्या जमिनीवर आता नबी बाग कॉलेज उभारण्यात आलंय.

पाकिस्तान स्थापनेनंतरचा पहिला कर्फ्यू

जानेवारी 1948 च्या कराची येथे झालेल्या दंगलींमुळे पाकिस्तानची राजधानी येथे पहिला कर्फ्यू लागू करण्यात आला, हा कर्फ्यू चार दिवस चालला होता. अय्यूब खूड़ो यांच्या संस्मरनुसार, त्यांनी साडेतीन वाजता जीओसी अकबर खान यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी त्यांना तीन वाजता सैन्य पोहोचत असल्याचे सांगितले.

ब्रिगेडिअर केएम शेख यांच्या आदेशाखाली सैन्य शहरात दाखल झाले. अय्यूब खूड़ो यांनी त्यांच्याबरोबर मीटिंग घेतली, त्यांनी गरज पडली तर दृष्टीक्षेपात येताच गोळी मारावी असे ब्रिगेडियर केएम शेख यांना सांगितले.

मुस्लिम लीगशी जवळीक असलेल्या सिंधी दैनिक 'अल-वहीद' च्या 6 जानेवारीच्या अंकात पोलिस आणि सैन्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याची आणि नऊ बदमाशांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.

GETTY IMAGES

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फाळणीनंतरच्या दंगलीत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोटो

मुस्लिम लोकांमध्ये शीखांप्रति राग होता

पाकिस्तान सरकार आणि सिंधचे मुख्यमंत्री अय्यूब खूड़ो यांनी शिखांवरील हल्ल्याला मुस्लिमांची प्रतिक्रिया म्हटले आणि त्यांची ही विधाने वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली.

केंद्रीय गृहमंत्री फजलूर रहमान यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 7 डिसेंबर 1947 रोजी भारतीय शहर अजमेर येथे झालेल्या प्राणघातक दंगलीत सुमारे 20 मुस्लिम ठार आणि एक हजाराहून अधिक जखमी झाले होते. शतकानुशतके तेथे वास्तव्यास असलेल्या मुस्लिमांना जेव्हा भारत सरकारने संरक्षण दिले नाही, तेव्हा आपले सर्व काही सोडून ते सिंध येथे आले. त्यांची संख्या हजारोंमध्ये होती आणि त्यांच्यात शिखांबद्दल खूप राग होता.

त्यांच्या निवेदनानुसार, दुर्दैवाने दिल्लीत नुकतीच दंगल झाली होती. तेथे काही शिखांनी मुस्लिमांना जबरदस्तीने घराबाहेर घालवण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा त्यांनी विरोध केला तेव्हा त्यांना मारले गेले. अशाप्रकारे, दिल्लीहून मुस्लिम कराचीला आले होते. त्यांचा शीखांवर राग होता.

भारतात शीखांनी केलेल्या अत्याचारांमुळे मुस्लिम निर्वासित स्वत: वर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, असेच विधान मुख्यमंत्री अय्यूब खूड़ो यांनीही केले.

कराची

त्यांच्या मते, कॉंग्रेसच्या दबावाखाली शिखांनी भारतात पोहोचले पाहिजे असे निश्चित करण्यात आले होते. रात्रीच्या अंधारातच त्यांना शहरात आणून तेथून निर्वासित केले जाईल, असा निर्णयही घेण्यात आला. ही पहिली तुकडी नव्हती, यांच्या पूर्वीही तुकड्या आल्या होत्या, त्यांना देखील पाठविले गेले होते. त्याच्या आगमनाची माहिती पोलिसांना नव्हती.

दुसरीकडे, अय्यूब खूड़ो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणींवर आधारित पुस्तकात म्हटले आहे की ज्या दिवशी दंगल झाली तेव्हा ते डीआयजी पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांसोबत होते जे नंतर उघडकीस आले. शिखांना सुरक्षा देण्यासाठी पोलिस रेल्वे स्थानकात गेलेच नव्हते, अशीही माहिती मिळाली. शहरात घडणाऱ्या घटनांबाबत पोलिस उदासीन होते किंवा घाबरले होते. पोलिसांनी प्रयत्नच केले नाहीत, असे दिसत होते.

बुरखा, तुर्की टोपी आणि मुस्लिम आश्रय

कराचीमध्ये झालेल्या या दंगलींच्या वेळी बर्याच मुस्लिमांनी आपल्या शेजार्यांना आश्रय दिला. अल-वहीदच्या एका वृत्तानुसार, ओरिएंटल एअरवेजच्या एका मुस्लिम कर्मचाऱ्याने आपल्या घरात 20 हिंदू महिलांना आश्रय दिला. जमावाला महिलांकडील दागिने हिसकावून घ्यावयाचे होते. त्या युवकाने त्यांना धमकावले.

नंदिता भवानी यांनी आपल्या 'द मेकिंग ऑफ एक्साईल सिंधी हिंदू अँड पार्टीशन' या पुस्तकात असे लिहिले आहे की, कला शाहनी हे कॉंग्रेसचे प्रमुख नेते होते ज्यांचे पती शांती हे देखील कॉंग्रेसशी संबंधित होते. रतन तलाव येथील कॉंग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचे त्यांना कळताच, त्यांनी एका मुस्लिम शेजाऱ्याकडे आश्रय घेतला, ज्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बुरखा घातला होता.

मोतीलाल जोतवानी यांच्या कुटुंबाला मुस्लिम जमीन मालक अल्लाह दिनो यांनी आश्रय दिला होता. जेव्हा दंगलखोर तेथे पोहोचले तेव्हा त्यांना सांगितले गेले की हिंदू कुटुंब आधीच तेथून निघून गेले आहे.

त्या काळात तुरूंगात काम करणाऱ्या आपल्या भावाबद्दल चित्तमल यांनी नंदिता भवानी यांना सांगितले. लाल तुर्कीची टोपी घालून त्याने स्वत: ला दंगलखोरांपासून वाचवले आणि त्याच्या कुटुंबाने मुस्लिम शेजाऱ्याच्या घरात आश्रय घेतला. ज्यांनी (शेजाऱ्यांनी) येथे कोणतेच हिंदू कुटुंब नाही असे दंगलखोरांना सांगितले.

मुस्लिमांवर बदनामीचा कलंक

दंगलीच्या दुसर्या दिवशी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिन्ना, त्यांची बहीण फातिमा जिन्ना आणि सिंधचे मुख्यमंत्री अय्यूब खूड़ो यांनी बाधित भागाचा दौरा केला. दैनिक अल-वहीदच्या वृत्तानुसार, त्यांनी व्हिक्टोरिया रोड (आताचा अब्दुल्ला हारून रोड), बहार कॉलनी आणि बंदर रोडला भेट दिली आणि मध्य बंदर रोडवरील लुटलेल्या दुकानांची पाहणी केली.

अल-वाहिद या वृत्तपत्राने "दंगलींनी मुस्लिमांना कलंकित केले आहे, हिंदूंना त्यांची दुकाने, घरे आणि इतर मालमत्ता परत दिल्या जातील" अशा तीन प्रमुख मथळ्यांसह त्यांचे निवेदन प्रकाशित केले.

नवाबशाह मध्ये हल्ला

हमीदा खूड़ो यांच्या पुस्तकातून उत्तर सिंधमधील परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे दिसून येते. ज्यामध्ये नवाबशाहमधील शीखांच्या हत्याकांडाने धोक्याची घंटा वाजविली होती.

त्या लिहितात की 1 सप्टेंबर 1947 रोजी, एक 55-अप मिक्सड ट्रेन, 11 वाजून 40 मिनिटांनी नवाबशाहाहून निघाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ती 12 वाजून 5 मिनिटांनी नवाबशाहमधील शफिदाबाददरम्यान 77 मैल पोस्टवर रुळावरून उतरली.

सशस्त्र जमावाने ट्रेनमधील प्रवाशी शीखांवर हल्ला केला, ज्यामध्ये 11 पुरुष आणि चार महिला जागीच ठार झाल्या आणि 17 लोक जखमी झाले. 1 सप्टेंबरच्या या घटनेमुळे लूटमारीच्या इतर घटना घडल्या आणि सिंध सरकारला काही भागात कर्फ्यू लावण्यास भाग पाडले.

कराचीमध्ये दंगली एका योजनेंतर्गत घडल्या?

दंगल ही एक प्रतिक्रिया व योगायोग आहे असे कराचीमधील या दंगलींविषयी पाकिस्तानच्या तत्कालीन केंद्र व प्रांतीय सरकारचे म्हणणे होते. परंतु काहीजणांचा असा विश्वास आहे की हा एक संघटित आणि नियोजित ऑपरेशनचा परिणाम होता.

कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत सूभो ज्ञानचंदानी यांनी दैनिक 'अवामी आवाज' मधील एका स्तंभात आपण त्या दिवसांत कामगार संघटनेत काम करत असल्याचे लिहिले. 5 जानेवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास, बंदर रोडवरील (आताचा एमए जिन्ना रोड) माल्डेनो सरायमध्ये कट्टरपंथी जमले असल्याचे एका शिंप्याने त्यांना सांगितले. शहरात दंगल व्हायला हवी, जेणेकरून हिंदू येथून निघून जातील व त्यांची घरे रिकामी होतील असे बैठकीत ठरवले गेले.

दुसर्या दिवशी, म्हणजेच सहा जानेवारी रोजी त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दंगली सुरू झाल्याचे सुभो ज्ञानचंदानी लिहितात.

हिंदूंना मालमत्ता विकणे कठीण झाले

पाकिस्तान बनल्यानंतर लवकरच हिंदूंना दागिने आणि रोख रक्कम नेण्यास बंदी घालण्यात आली.

हमीदा खूड़ो यांनी त्यांचे पिता अय्यूब खूड़ो यांच्यावरील पुस्तकात लिहिले आहे की, पाकिस्तानमध्ये येणार्या मुस्लिमांना दिल्ली व इतर ठिकाणांवर थांबवून त्यांचे सामान हिसकावले जात असल्याचा अहवाल पंतप्रधान लियाकत अली खान यांना मिळाला.

त्यांनी सह सचिवांना खूड़ो यांच्याकडे पाठवले आणि संदेश दिला की, या संदर्भात एक कायदा करा आणि प्रांतीय स्तरावर अशी पावले उचला जेणेकरून सिंधमधून प्रवास करणा हिंदूंना त्यांच्याबरोबर मोठी रक्कम घेऊन जाता येऊ नये. त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शस्त्रे, दारूगोळा, सोनं इत्यादींची तस्करी रोखण्यासाठी अध्यादेश काढला.

'द डॉन' ने 21 ऑक्टोबर, 1947 ला लिहिले की, मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरित्या सिंध येथून जोधपूर, बॉम्बे व इतर शहरांकडे जाणाऱ्या हैदराबाद स्थानकावरील हिंदूंच्या सामानाच्या तपासाची टेहळणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना नरमाईने घ्या आणि वैयक्तिक वस्तू घेऊन जाण्यास परवानगी देण्याची सूचना केली आणि रेशीम आणि लोकरीचे कपडे परतवण्याचे आदेश दिले.

कराची दंगलीमुळे हिंदूंना अधिक समस्या निर्माण झाल्या आणि आपली मालमत्ता विकणे त्यांच्यासाठी अवघड होऊन बसले. सिंधी लघुकथा लेखक ठाकूर चावला लिहितात की, डीजे सिंध महाविद्यालयाच्या मागे असलेल्या त्यांच्या वीस फ्लॅट इमारतीचा सौदा लूटपाटपूर्वी सहा लाख रुपयांवर झाला होता. पण सरकारने सहा जानेवारीच्या दंगलीनंतर हिंदूंकडून कोणतीही संपत्ती घेतली जाऊ शकत नाही, असे विधान केले. या तारखेपूर्वी एखादा करार झाला असता तर कराचीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून एनओसी घेणे बंधनकारक होते.

ठाकूर चावला यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या आदेशानंतर खरेदीदाराने ते घेण्यास नकार दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात दहा हजार रुपयांची लाच देऊन एनओसी मिळाल्यानंतरही खरेदीदार इमारत घ्यायला तयार नव्हता. अखेरीस त्या इमारतीचा सौदा सहा लाख ऐवजी 68 हजारात ठरला.

पाकिस्तानचा झेंडा घेऊन चालणाऱ्यांचेही पलायन

कराची येथील कम्युनिस्ट पक्षाचे प्रख्यात नेते गोबिंद माल्ही, हे संघटनेचे 'नई दुनिया' या पत्रिकेचे प्रकाशन करणाऱ्या संघाचे सदस्य होते. पाकिस्तानच्या स्थापनेची घोषणा झाल्यानंतर त्यांनी 1 ऑगस्ट 1947 रोजी शेरवानी आणि जिन्ना कॅप घालून हातात पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज घेत मोर्चा काढला होता.

गोबिंद माल्ही आपल्या आत्मचरित्रात लिहितात की ते आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बसले होते, तेव्हा एक उंच माणूस आला व म्हणाला, "पन्नास हजार रुपये घे आणि ही प्रेस माझ्या स्वाधीन कर. येथून निघून जा, हा देश आता आमचा आहे."

ते (गोबिंद माल्ही) म्हणाले हा देश त्यांचाही आहे. ज्यावर त्या व्यक्तीने पेपरवेट उचलले आणि धमकी दिली, तीन दिवसानंतर मी माझ्या लोकांसह येणार आहे, आणि ताबा मिळवणार आहे. जर तुम्ही दिले नाही तर धडा शिकवेल, त्यानंतर तो निघून गेला. त्याच दिवशी टाटा कंपनीचे विमान घेऊन ते अहमदाबादला गेले.

गोबिंद माल्ही लिहितात, काही दिवसांनी त्यांच्या पालकांनी नकार देऊनही ते कराचीला परत आले. पण आता हे शहर बदलले होते. युद्ध, भांडणे आणि दंगलीने त्याचा नकाशा बदलला होता. काही दिवसातच आपला देश सोडून ते कायमचे निघून गेले.

अटक केलेल्या दंगलखोरांना सोडण्यात आले

जबरदस्तीने हिंदूंच्या घरांवर कब्जा करून त्यांना लुटलेल्या मुस्लिमांना कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सिंधचे मुख्यमंत्री अय्यूब खूड़ो यांनी जाहीर केले. अल-वहीदमध्ये प्रकाशित होणार्या त्यांच्या निवेदनानुसार, सरकार हिंदूंना त्यांची घरे आणि दुकाने परत करेल. ज्या बदमाषांनी दंगलीत सामील होऊन सिंध आणि पाकिस्तानची बदनामी केली आहे, त्यांना सिंधमधून काढून टाकले जाईल व तुरूंगात डांबले जाईल.

कराची दंडाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले की, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे एक हजाराहून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे आणि दीड हजारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

'पीप्स इन टू पाकिस्तान' या आपल्या संस्मरणात कराचीचे सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेटचे संपादक एमएसएम शर्मा यांनी लिहिले आहे की, काही दिवसांनंतर 12 रबी-उल-अव्वल, (अरबी महिन्यात) पाकिस्तानी मंत्र्यांनी खुडोंवर दबाव आणला की, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना सोडण्यात यावे. ज्यांच्यावर दंगलीत सामील होणे, लूटपाट करणे आणि महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप होता. सचिवालयातील कर्मचार्यांच्या घरातूनही लूटीचा माल जप्त केली गेला असला, तरी खुंडोंनी त्यांना सोडून दिले.

हमीदा खूड़ो लिहितात की, दंगल संपल्यानंतर 9 किंवा 10 जानेवारी रोजी अय्यूब खूड़ो पंतप्रधान लियाकत अली खान यांच्याकडे काही कामानिमित्त गेले होते, तेव्हा ते उपरोधिकपणे म्हणाले, आपण कसे मुसलमान आहात. जेव्हा भारतात मुस्लिमांचा नरसंहार केला जात आहे, तेव्हा तुम्ही इथल्या हिंदूंना सुरक्षा पुरवत आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का? तेव्हा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सुरक्षा पुरविणे ही आपली जबाबदारी आहे, असे उत्तर खूड़ो यांनी दिले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)