पाकिस्तानच्या कैदेतून 11 वर्षांनी सुटका झाल्यानंतर मायदेशी परतला भारतीय तरुण

पूर्णमासी

फोटो स्रोत, BBC/Samiratmaj Mishra

फोटो कॅप्शन, पूर्णमासी
    • Author, समिरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

उत्तर प्रदेशातील मिर्जापूरचा राहणारा एक तरुण 11 वर्षांपूर्वी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दशकभराहूनही अधिक काळ पाकिस्तानाच्या तुरुंगात घालवल्यानंतर आणि अनेक क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर हा तरुण मंगळवारी रात्री आपल्या घरी परतला.

मिर्जापूरच्या भरहुना गावचे रहिवासी 35 वर्षांचे पूर्णमासी यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. 2009 साली ते चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यांच्यावर पाकिस्तानातील लाहोर न्यायालयात खटलाही चालला. तेव्हापासून पूर्णमासी तिथल्याच तुरुंगात कैद होते.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतची माहिती दिली. पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पूर्णमासी भारतातचेच नागरिक आहेत का, हे तपासण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला.

स्थानिक पोलिसांकडून पूर्णमासी समहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भरहुना गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली.

पूर्णमासी यांच्या आई-वडिलांचं निधन झाल्याचं आणि त्यांच्या पश्च्यात पूर्णमासी यांच्या कुटुंबात कुणीच नसल्याचं मिर्जापूरचे पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितलं.

पाकिस्तान से लौटे पूर्णमासी

फोटो स्रोत, BBC/SamiratmajMishra

बहिणीने केले स्वागत

एसपी अजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पूर्णमासी यांना किरण नावाची बहीण आहे. त्या लालगंज पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बेलहरा गावात राहतात. पूर्णमासी यांचे चुलत भाऊ जवाहीर यांनी फोटो बघून फोटोतली व्यक्ती पूर्णमासीच असल्याची खातरजमा केली. आम्ही इथून पूर्णमासी यांची बहीण आणि त्यांच्या पतीला एका कॉन्स्टेबलसह अमृतसरला पाठवलं. मंगलवारी संध्याकाळी उशिरा सर्वजण सुखरूप परतले."

केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे 17 नोव्हेंबर 2020 रोजी पाकिस्तानने पूर्णमासी यांना पंजाबच्या अटारी सीमेवर बीएसएफच्या हवाली केलं. 14 दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना मिर्जापूरला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर मिर्जापूर पोलिसांनी पूर्णमासी यांच्या बहीण किरण आणि त्यांचे पती मुन्नू यांच्यासोबत एका शिपायाला अमृतसरला पाठवलं.

बहिणीसोबत अमृतसरला गेलेले पोलीस शिपाई मनोज गौड यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही मिर्जापूरहून 1 तारखेला वाराणासीला गेलो. तिथून बेगमपुरा एक्सप्रेस ट्रेनने अमृतसरला गेलो. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नायब तहसीलदारांनी 35 वर्षीय पूर्णमासी यांना आम्हाला सोपवलं. त्यानंतर आम्ही मंगळवारीच ट्रेनने परतलो."

पाकिस्तान से लौटे पूर्णमासी

फोटो स्रोत, BBC/SamiratmajMishra

पुनर्वसनासाठी प्रशासन करणार मदत

मिर्जापूरला परतल्यावर जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्णमासी यांचं हार-फुलांनी स्वागत करण्यात आलं. प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश सिंह आणि एसपी अजय कुमार सिंह देखील यावेळी उपस्थित होते.

पूर्णमासी यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल आणि लवकरात लवकर रहाण्यासाठी घरही देऊ, असं आश्वासन मिर्जापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश सिंह यांनी दिलं.

दरम्यान अमृतसरचा प्रवासही खडतर होता, असं पूर्णमासी यांच्या बहीण किरण यांनी सांगितलं.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "अमृतसरमध्ये त्याला एका आरोग्य केंद्रात ठेवलं होतं. इतक्या थंडीत त्याच्याकडे एक जॅकेटही नव्हतं. पूर्णमासीचं मानसिक आरोग्य आधीपासूनच बरं नाही. इतकी वर्ष तुरुंगात राहिल्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य अधिकच ढासळलं आहे. आमच्या थांबण्याचीही कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. बऱ्याच अडचणींनंतर रेड क्रॉसच्या एका निवाऱ्यात दोन दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)