जॅक मा : अलिबाबा कंपनीचे मालक चर्चेत का आहेत?

जॅक मा

फोटो स्रोत, Getty Images /Wang HE

जॅक मा हे नाव जगात सुपरिचित आहे. जॅक मा आणि त्यांची अलिबाबा कंपनी यांना चीनमध्ये तर एक महत्त्वाचं स्थान आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे जॅक मा सध्या चर्चेत आहेत.

अलीबाबा समूहाचे संस्थापक असणारे जॅक मा आणि चीन सरकार यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. तसंच, जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं काही माध्यमांनी म्हटलंय.

ट्विटरवर याची चर्चा आहे, #WhereIsJackMa हॅशटॅग ट्रेंड होतोय. पण चीनमध्ये ट्विटर नसल्याने जगातल्या इतर भागात हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

जॅक मा

फोटो स्रोत, Getty Images

जॅक मा बेपत्ता आहेत किंवा कुठे आहेत याबद्दलच्या बातम्यांची आणि दाव्यांची बीबीसीने अजून स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.

जॅक मा यांच्याविषयी चर्चा का होतेय?

जॅक मा यांचा स्वतःचा 'आफ्रिकाज बिझनेस हिरोज' नावाचा एक टॅलेंट शो आहे. या शोच्या सुरुवातीच्या राऊंडसना ते हजर होते, पण नोव्हेंबर नंतर मात्र त्यांची जागा अलिबाबा कंपनीच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने घेतली. आणि चर्चांना सुरुवात झाली.

ऑक्टोबर 2020 मध्ये जॅक मा यांनी एका भाषणादरम्यान चीनमधल्या सरकारी बँका आणि चिनी नियामकांवर टीका केली होती.

अलिबाबासोबतच जॅक मा यांची आणखी एक कंपनी आहे - Ant Group. ही एक FinTech कंपनी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा यांची सांगड घालणाऱ्या कंपन्यांना फिनटेक कंपनी म्हणतात.

जॅक मा

फोटो स्रोत, AFP

Ant Group चा 37 अब्ज डॉलर्सचा जगातला सगळ्यात मोठा IPO येणार होता. शांघाय आणि हाँगकाँगच्या शेअरबाजारमध्ये एकाचवेळी या कंपनीचं लिस्टिंग होणार होतं. या IPO नंतर जॅक मा चीनमधले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले असते.

पण जॅक मा यांनी सरकारवर टीका केल्यानंतर चिनी नियामकांनी अँट ग्रूपचा हा IPO खुला होण्य़ाच्या 48 तास आधी तडकाफडकी थांबवला.

जॅक मा यांची अलिबाबा ही कंपनी जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी मानली जाते. अॅमेझॉनची सगळ्यात मोठी स्पर्धक मानली जाते. त्यासोबत जॅक मा यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

भारतामधल्या पेटीएम, पेटीएम मॉल, झोमॅटो, बिग बास्केट, स्नॅपडील या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे.

या सगळ्यामुळेच चीनमध्ये आणि चीनच्या बाहेरही जॅक मा यांचा दबदबा आहे.

लाखो युजर्स आणि कोट्यावधी डॉलर्सचा टर्नओव्हर असणाऱ्या अलिबाबाच्या विविध वेबसाईट्सच्या माध्यमातून जॅक मा असंख्य चिनी माणसांच्या आय़ुष्यावर प्रभाव पाडतात.

जॅक मा

चिनी नियामकांकडून एकीकडे अँट ग्रूपचा आयपीओ थांबवण्यात आला तर दुसरीकडे अलिबाबा होल्डिंग कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली. अँट ग्रूपच्या कर्जविषयक आणि इतर फायनान्स सेवांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही चीन सरकारने दिल्यायत. जॅक मा आणि त्यांच्या कंपनीने आपल्या मूळ व्यवसाय म्हणजे पेमेंट सर्व्हिसपर्यंतच मर्यादित रहावं असं नियामकांनी सांगितलंय.

कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळात जॅक मा यांनी फेसमास्कपासून व्हेंटिलेटर्सपर्यंतची मदत जगभरातल्या गरजू देशांना पाठवली. चीननेही जगात काही ठिकाणी मदतीचं सामान पाठवलं होतं, पण काहीवेळा या मालाच्या दर्जावरून चीन आणि शी जिनपिंग यांच्यावर टीका करण्यात आली. उलट जॅक मा यांनी पाठवलेल्या मदतीचं कौतुक झालं होतं. ही गोष्टही चिनी राज्यकर्त्यांना खुपत असल्याचं म्हटलं जातंय.

टीकाकारांवर कारवाई

मीडिया सॅव्ही असणारे जॅक मा गेले दोन महिने समोर न आल्याने या चर्चा होतायत. पण या चर्चांचं आणखी एक कारण म्हणजे इतर काही चिनी उद्योगपतींसोबत हे यापूर्वीही घडलेलं आहे.

कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात सरकारवर टीका करणारे रिअल इस्टेट उद्योगपती रेन झिकीयांग मार्च 2020पासून बेपत्ता असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सने म्हटलं होतं. नंतर त्यांना 18 वर्षं कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

जॅक मा

फोटो स्रोत, Getty Images

चीन सरकारने कोरोनाची परिस्थिती ज्याप्रकारे हाताळली, त्यावर टीका करणाऱ्या अनेकांवर अशी कारवाई करण्यात आल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. चीन मधली एक लोकप्रिय अभिनेत्री, एक लोकप्रिय न्यूज अँकरही अशाच प्रकारे दीर्घकाळ गायब झाले होते.

जानेवारी 2017मध्ये चिनी उद्योगपती शाओ जिआनहुआ यांचं हाँगकाँगमधून अपहरण करण्यात आलं, आणि नंतर ते तुरुंगातून गायब झाले, त्यांच्या कंपनीतला काही हिस्सा सरकारने ताब्यात घेतला, असं रॉयटर्सने म्हटलंय.

गेले दोन महिने जॅक मा दिसलेले नाहीत, ते त्यांच्याच टॅलेंट शोच्या फायनललाही गैरहजर राहिले आणि त्यांनी या काळात काही ट्वीटही केलेलं नाही.

जॅक मा यांच्या संपत्तीत घट

या दोन महिन्यांच्या काळात त्यांच्या संपत्तीतही मोठी घसरण झालीय. ब्लूमबर्ग बिलयनेयर्स इंडेक्सनुसार ऑक्टोबर 2020च्या 61 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून जॅक मा यांची संपत्ती 11 अब्जांनी घटत 50.1 अब्ज डॉलर्सवर सध्या आलेली आहे.

अलिबाबा कंपनीच्या शेअर्सची सोमवारी हाँगकाँग एक्स्चेंजमध्ये 2.15टक्क्यांची घसरण झाली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)